Thursday, February 5, 2026

DIO NEWS AMRAVATI 05-02-2026


















                                             पत्रकारांसाठी विशेष आरोग्य शिबिर संपन्न;

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने उपक्रम

अमरावती, दि. 5 (जिमाका): धावपळीच्या जीवनशैलीत पत्रकारांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे अमरावतीतील पत्रकार, प्रसारमाध्यम कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आज एका विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये 226 पत्रकारांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेतला.

पत्रकारिता हे अत्यंत आव्हानात्मक क्षेत्र आहे. सततची धावपळ, कामाच्या अनिश्चित वेळा आणि मानसिक ताण यामुळे पत्रकारांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. ही गरज ओळखून पालकमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने उपस्थित राहून सर्वांची सखोल आरोग्य तपासणी केली. यामध्ये प्रामुख्याने रक्तातील चरबीचे प्रमाण तपासण्यासाठी संपूर्ण 'लिपिड टेस्ट', तसेच 'फुल बॉडी चेकअप' करण्यात आले. वाढत्या डिजिटल कामामुळे डोळ्यांवर येणारा ताण लक्षात घेऊन विशेष 'नेत्र तपासणी' आणि 'दंत चिकित्सा' शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात रूग्ण तपासणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार, मुख्यमंत्री सहायता निधीचे डॉ. श्याम गावंडे, ससंसर्गजन्य रोग विभागाचे डॉ. प्रज्ञा कडू, वैभव झुकरे, पल्लवी बोरकर, श्रद्धा कडू, टीबी हॉस्पीटलचे नितीन बेदरकर, शुभांगी उमरकर, दंत महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. अपूर्वा रोडे, डॉ. जान्हवी अंबाडकर, डॉ. पूजा शिंदे, डॉ. वेदश्री भडवे, डॉ. प्रितीका काळे, डॉ. अमिषा जुनघरे, डॉ. इशान पाटील, प्रमोद बकाडे, सुभाष दिघेकर, वैद्यकीय चमूतील डॉ.रूपाली ठाकरे, डॉ. प्रज्ञा चौधरी, डॉ. वैभव देशमुख, धीरज राऊत, संजीवनी सोनवणे, डॉ. नायब शेख आदी यांनी सहकार्य केले. शिबिरासाठी पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाचे शशांक चौरे यांनी पुढाकार घेतला.

या आरोग्य शिबिरामध्ये पत्रकारांना 'आयुष्मान भारत कार्ड'ची सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी 48 पत्रकारांना आयुष्मान भारत कार्ड तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले. या कार्डमुळे पत्रकारांना भविष्यात विविध गंभीर आजारांवरील उपचारांसाठी शासकीय योजनेचा लाभ घेता येणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीत हृदयविकाराचा झटका किंवा अन्य कारणांमुळे श्वास थांबल्यास व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी 'सीपीआर' ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते. या विषयावर यावेळी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉ. राधा सावदेकर प्रात्यक्षिक देऊन उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केले.

अशा स्वरूपाच्या आरोग्य तपासणीमुळे पत्रकारांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला. शिबिरामध्ये पत्रकारांनी स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची तपासणी करून घेतली.

000000

धामणगांव रेल्वे

तालुक्यात जन तक्रार निवारण दिन संपन्न

अमरावती, दि. 05 (जिमाका) :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेनुसार तालुका स्तरावर जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यासाठी पंचायत समिती धामणगांव रेल्वे येथे नुकतेच जन तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र उपस्थित होत्या.

जिल्हा नियोजन समितीच्या सभेत तालुका स्तरावर तक्रार निवारण बैठक आयोजित करून नागरिकांच्या तक्रारी, विकास कामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव तसेच स्थानिक पातळीवरील समस्यांचा आढावा घेण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने धामणगांव रेल्वे पंचायत समितीच्या सभागृहात पहिली जन तक्रार निवारण समिती सभा पार पडली.

या बैठकीदरम्यान कामनापूर घुसळी, बोरगांव धांदे, देवगाव आदी गावांतील नागरिकांकडून विविध तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारींवर 20 फेब्रुवारी पर्यंत अंतिम कार्यवाही करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना दिले.

पुढील आठवड्यात मोर्शी, धारणी, चिखलदरा तसेच अमरावती पंचायत समिती स्तरावर जन तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

दरम्यान, दौऱ्याच्या अनुषंगाने संजीता महापात्र यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत कावली व ढाकुळगांव या गावांना भेट देऊन राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरखडे तसेच पंचायत समिती स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.

0000000

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी

 आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

* 15 फेब्रुवारी अंतिम मुदत

       अमरावती, दि. 5 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना यांचा लाभ घेण्यासाठी 15 फेब्रुवारीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

      बारावीनंतरच्या बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय वसतिगृहामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे.

            वरील दिलेल्या दिनांकापर्यंत मुलांनी इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, अग्रवाल टॉवर जाफरीन प्लॉट आदर्श होटेल जवळ कॉटन मार्केट रोड अमरावती तसेच मुलींनी इतर मागास बहुजन कल्याण मुलींचे शासकीय वसतिगृह, ब्लॉक A, राम लक्ष्मण संकुल, तिसरा मजला, रामपूरी कॅम्प जवळ, विलास नगर चौक, अमरावती या वसतिगृहामध्ये सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक सरीता बोबडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण अमरावती, सामाजिक न्याय भवन पोलीस आयुक्तालयाचे मागे, चांदुर रेल्वे रोड, अमरावती तसेच   ई-मेल आयडी dobbwoamravati@gmail.com यावर कार्यालयाशी संपर्क साधावा.

        इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या  पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. प्रवेशासाठी अर्ज करावयाची कालावधी 6 फेब्रुवारी  ते 15 फेब्रुवारी पर्यंत राहील. अर्जांची छाननी 16 फेब्रुवारी  ते 18 फेब्रुवारी  दरम्यान होईल. गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी 20 फेब्रवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीतील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत  26 फेब्रुवारी आहे

     योजनेच्या अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी इतर मागास बहुजन कल्याणच्या सहाय्यक संचालक सरीता बोबडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

युवक-युवतींना रोजगारांच्या संधी

कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ सोमवारी

अमरावती, दि. 05 (जिमाका) : अमरावती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, अमरावती व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन  सोमवार, दि. 9 फेब्रुवारी  2026 रोजी होणार आहे. तसेच मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.

जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत-जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्यामधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात येतो. त्यात विविध आस्थापनांचे, कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणा-या उमेदवारांना लगेच नोकरीची संधी मिळेल.

 या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.gov.in  या लिंकवर  जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. Employment वर क्लिक करावे. Job Seeker  हा पर्याय निवडून आपला नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड साईन इन करा. आपल्या होम पेजवरील Job Fair हा पर्याय निवडा. District मध्ये Amravati जिल्हा निवडून Fiter बटनवर क्किल करावे. नंतर दिनांकित मेळावा निदर्शनास येईल. त्यासमोर असलेल्या Action बटनच्या खाली View  व Apply बटन दिसेल. मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबत माहिती दिसेल. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून Apply बटनवर क्लिक करा. I Agree हा पर्याय निवडा. शेवटी Successfully Applied for the Job असा Message दिसेल. अशा रितीने आपण ऑनलाईन सहभाग नोंदवावा. आपली रजिट्रेशन Slip PDF ची प्रिंट काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे.

 याबाबत काही अडचण असल्यास अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा. तसेच 9 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर डेपो रोड, अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो व आवश्यक कागदपत्रासंह कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.

0000000

57 हजार शेतकऱ्यांच्या खिशात आता ‘महाविस्तार एआय

अमरावती, दि. 5 (जिमाका) : आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. विभागाचे ‘महाविस्तार ॲप सध्या जिल्ह्यातील 57 हजारांहून अधिक शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल सोबती ठरत असून, याद्वारे शेतीविषयक सल्ल्यापासून ते बाजारभावापर्यंतची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे.

महाविस्तार ॲप कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असून, पारंपारिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यातील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी यात चॅटबॉटची सुविधा आहे. विशेष म्हणजे, पूर्वीची 10 प्रश्नांची मर्यादा आता वाढवून 20 प्रश्न करण्यात आली आहे. शेतकरी आपल्या मातृभाषेतून संवाद साधू शकतात.

विविध बाजार समित्यांमधील शेतीमालाचे भाव तात्काळ कळत असल्याने शेतकऱ्यांना विक्रीचे निर्णय घेणे सोपे जात आहे. तसेच दररोजचा अचूक हवामान अंदाज यावर उपलब्ध आहे. खतांचे नियोजन, कीड-रोग नियंत्रण आणि कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती या एकाच प्लॅटफॉर्मवर मिळते.

या ॲपमुळे शेती व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार असून, तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन वाढवण्यास शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी वेळ आणि पैशांची बचत करण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. गुगल प्ले स्टोअरवरून 'महाविस्तार एआय' ॲप डाउनलोड करून डिजिटल क्रांतीचा भाग व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना निस्ताने यांनी केले आहे.

00000

एमएसएमई राष्ट्रव्यापी क्रेडिट आउटरीच कार्यक्रम शनिवारी;

सवलतीच्या दरात कर्ज आणि स्पॉट सॅन्शनची संधी

अमरावती, दि. 05 (जिमाका) : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना (MSME) बळ देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून 7 फेब्रुवारी 2026 रोजी अमरावतीत विशेष 'राष्ट्रव्यापी क्रेडिट आउटरीच' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दस्तूर नगर येथील ओल्ड बायपास रोडवरील कमल प्लाझा येथे सकाळी 11 वाजता हा सोहळा पार पडणार असून, उद्योजकांना एकाच छताखाली बँकेच्या विविध योजना, सबसिडी आणि कर्ज सुविधांबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील उपमहाव्यवस्थापक  हेमंत शर्मा उपस्थित राहणार असून, विशेष व्याख्याते सनदी लेखापाल पंकज अग्रवाल एमएसएमई कर्जातील सबसिडी योजनांवर प्रकाश टाकणार आहेत. तसेच बडनेरा एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर यांची उपस्थिती याप्रसंगी राहणार आहे.

 या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी उद्योजकांना पात्रतेनुसार 'इनप्रिन्सिपल सॅन्शन लेटर' घटनास्थळीच उपलब्ध करून दिले जाणार आहे. सेंट्रल बँकेच्या एमएसएमई महोत्सवांतर्गत उद्योजकांना सर्वात कमी व्याजदर आणि प्रक्रिया शुल्कात विशेष सवलतींचा लाभ घेता येईल. यासोबतच उद्यम नोंदणी आणि जीएसटी अनुपालनाबाबतही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. अमरावतीतील नवउद्योजक आणि प्रस्थापित व्यावसायिकांनी आपल्या व्यवसाय विस्तारासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावतीचे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उद्योजकांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा.

000000

इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षेसाठी 'कॉपीमुक्त' अभियानावर भर

प्रशासन सज्ज

अमरावती, दि. 05 (जिमाका): जिल्ह्यात आगामी 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. सन 2025-26 शैक्षणिक वर्षातील 12 वीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून तर 10 वीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. परीक्षेच्या काळात कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून तिची पहिली बैठक संपन्न झाली आहे.

यावर्षी अमरावती जिल्ह्यातून 10 वीसाठी 187 केंद्रांवर 28 हजार 531 विद्यार्थी, तर 12 वीसाठी 137 केंद्रांवर 39 हजार 934 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जिल्हयातील एकूण केंद्रांपैकी 85 टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. विशेषतः जिल्ह्यातील 34 उपद्रवी आणि 43 संवेदनक्षम केंद्रांवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले असून, तिथे केंद्रप्रमुख आणि पर्यवेक्षकांची अदलाबदल करण्याचे आदेश राज्य मंडळाने दिले आहेत.

यासंदर्भात जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी  विविध विभागांना सूचना दिल्या आहेत. परीक्षा काळात खंडित वीज पुरवठ्याची समस्या उद्भवू नये यासाठी महावितरणला सतर्क राहण्यास सांगितले आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर केंद्रावर पोहोचता यावे यासाठी परिवहन मंडळाने जादा बसचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार असून महसूल विभागाची विशेष भरारी पथकेही कार्यरत राहतील. पंचायत समिती स्तरावरील वर्ग-1 आणि वर्ग-2 च्या अधिकाऱ्यांची नियुक्ती या पथकांमध्ये केली जाणार आहे.

परीक्षेचे गांभीर्य राखण्यासाठी केवळ प्रशासकीय तयारीच नाही, तर विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शपथ देखील देण्यात आली आहे. 'कॉपीमुक्त' आणि 'भयमुक्त' वातावरणात प्रत्येक विद्यार्थ्याला आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी, हाच या नियोजनाचा मुख्य उद्देश असल्याचे श्री. येरेकर यांनी सांगितले. 

              सर्व शिक्षक, संस्थाचालक आणि पालकांनी या परीक्षा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही दडपणाशिवाय अभ्यासावर लक्ष केंद्रित करून परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 05-02-2026

                                                         पत्रकारांसाठी विशेष आरोग्य शिबिर संपन्न; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढा...