‘ट्रॅक ॲण्ड ट्रेल’च्या माध्यमातून मेळघाटातील पर्यटनाचा विकास
जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 2 (जिमाका): मेळघाटमध्ये निसर्ग सौदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक येतात. याठिकाणी असलेल्या पर्यटनस्थळाशिवाय त्यांना जंगलातील भ्रमंती आणि निसर्गाशी एकरूप होण्याची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी ट्रॅक आणि ट्रेलसाठी मार्ग शोधण्यात येतील, यातून मेळघाटातील पर्यटनाचा विकास साधण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
मेळघाटातील पर्यटनाबाबत मेळघाट ॲडव्हेंचर क्लबने जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण केले. विदर्भातील वन पर्यटनामध्ये मेळघाट हा उत्तम पर्याय आहे. याठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटनस्थळांच्या विकासासोबतच पर्यटनाचे विविध पर्याय देणे आवश्यक आहे. जंगल सफारी, साहसी पर्यटन यासह जंगल भ्रमंती हा पर्यायही देणे आवश्यक आहे. यासाठी वन विभागाने पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन ट्रेकिंगसाठी मार्ग निवडावेत. आवश्यकता पडल्यास याठिकाणी स्वतंत्र गेट उभारण्यात यावे. याप्रकारचे पर्याय दिल्यास पर्यटक मेळघाटात थांबण्यास तयार होतील.
मेळघाटातील पर्यटनाबाबत युवकांना लक्ष ठेऊन समाजमाध्यमांवरून प्रसिद्धी करावी. यामुळे मेळघाटबाबत माहिती होण्यास मदत मिळणार आहे. शालेय विद्यार्थी आणि समूहाने येणारे पर्यटकांवर लक्ष केंद्रीत करावे. त्यांच्यासाठी निवास, फिरणे आणि जेवणाची उत्तम व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था उत्तम दर्जाची असावी. याठिकाणी स्वच्छता आणि निटनेटकेपणा असणे आवश्यक आहे. सेमाडोह आणि कोलकास येथे राहण्याची व्यवस्था आहे. याठिकाणांची देखभाल, दुरूस्ती सातत्याने करावी. इतर ठिकाणी टेंटमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येते. हा पर्याययही तपासून पाहण्यात यावा. आमझरी येथे साहसी खेळाची सोय करण्यात आली आहे. येथेही पर्यटक येतील, याचे नियोजन करावे.
सुविधा आणि सवलती दिल्यास त्यांचा मेळघाटातील पर्यटनाकडे कल वाढू शकेल. यासाठी पर्यटनाचे क्षेत्र विस्तारण्याची गरज आहे. धबधबे, ऐतिहासिक वास्तू ही केंद्र ठरवून पर्यटकांना त्याठिकाणी पायी नेण्यासाठी मार्ग तयार करण्यात यावे. या वाटेत नाश्ता, जेवण आदी व्यवस्था झाल्यास पर्यटकांसाठी एक चांगली सुविधा निर्माण होऊ शकेल. वन विभागाने पर्यटकांना राहण्याच्या व्यवस्थेसोबतच जंगल भ्रमंतीसाठी रस्ता शोधावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.
000000
एमडी ड्रग्सबाबत कारवाई करावी
जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 2 (जिमाका): महसूल गुप्तचर संचालनालयाने पाच किलो एमडी ड्रग्स पकडून कार्यवाही केली आहे. शहराच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत प्रामुख्याने युवकांमध्ये जनजागृती करावी, तसेच स्थानिक पोलिस यंत्रणांनी संपर्क वाढवून एमडी ड्रग्सबाबत कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर जिल्हास्तरीय समितीची मासिक सभा पार पडली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखेडे यांनी अंमली पदार्थाबाबत माहिती दिली. अंमली पदार्थाबाबत प्रामुख्याने किशोरवयीन मुले लक्ष्य होत असल्याने त्यांच्यामध्ये जनजागृतीसाठी व्याख्याने आयोजित करण्यात यावे. येत्या 15 दिवसात समाज कल्याणमधील सर्व वसतिगृहे आणि शाळांमध्ये ही व्याख्याने आयोजित करण्यात यावीत. आऊटरिच कार्यक्रम राबवून समाजात जनजागृती करण्यात यावी. यासाठी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. 'नशामुक्त भारत, खुशहाल भारत' या टॅगलाईनला अनुसरून व्यापक जनजागृती करावी.
अंमली पदार्थामुळे समाजावर दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी संपर्क वाढवून सातत्याने कारवाई करावी. अमरावती येथील कारवाईच्या अनुषंगाने पोलिसांनी बंद घरे, फ्लॅट यांच्यावर निगराणी ठेऊन गोपनीय पोलिस यंत्रणा सतर्क करावी. आवश्यकता पडल्यास अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई प्रस्तावित करावी. तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाने रासायनिक कारखान्यांमध्ये अंमली पदार्थांचे उत्पादन होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रामख्याने औद्योगिक परिसरातील बंद कारखान्यात अंमली पदार्थांची निर्मिती होत असल्याचे काही ठिकाणी लक्षात आल्याने अशा परिसरावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिल्या.
00000
सण उत्सव कालावधीत शहरात कलम 38 लागू
अमरावती, दि. 02 (जिमाका): जिल्ह्यात आगामी काळात सण, उत्सव साजरा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधिनियमांतर्गत शहरात कलम 38 लागू झाले आहे.
आगामी काळात विविध धर्मियांचे सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातील. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 38 नुसार सर्व ग्रामीण जिल्ह्यामध्ये परिसरातील व त्यांच्यावरील अधिकाऱ्यांना (पोलीस आयुक्तलांचे क्षेत्र वगळून) आजपासून, दि. 2 फेब्रवारी ते 31 डिसेंबर 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत अधिकार प्रदान करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण विशाल आनंद यांनी दिले आहे.
रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळ्याचा संभव असेल तर अडथळा होऊ न देणे, सर्व मिरवणूकाच्या व जमावाच्या प्रसंगी व पूजा-अर्चा या ठिकाणी कोणताही रस्ता किंवा अडथळा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा न होवू देण्यासाठी याठिकाणी बंदोबस्त ठेवणे, सर्व रस्त्यांवर किंवा रस्त्यात, इतर सर्व सार्वजनिक किंवा लोकांच्या येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त राहण्यासाठी, वाद्यांबाबत नियम व नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.
000000
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पीसीबी डिझायनिंग’वर कार्यशाळा संपन्न
अमरावती, दि. 2 (जिमाका): इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी क्षेत्रात पीसीबीचे व्यावहारिक प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता, वास्तविक जगातील इलेक्ट्रॉनिक उत्पादने कशी बनतात हे समजण्यास मदत करते. हीच गरज ओळखून येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे नुकतेच 'पीसीबी डिझायनिंग' या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
स्मार्टफोनपासून ते वैद्यकीय उपकरणांपर्यंत सर्व गॅझेट्समध्ये पीसीबी हा त्यांचा पाया असतो. या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना पीसीबी बोर्डसाठी आवश्यक मूलभूत साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स घटक आणि त्यांची वैशिष्ट्ये, तसेच आधुनिक सॉफ्टवेअरमध्ये स्किमॅटिक आणि लेआउट डिझाइन करण्याची सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना तांत्रिक संकल्पनांवर आधारित 'हँड्स-ऑन' ट्रेनिंगही देण्यात आले. या उपक्रमात तृतीय वर्षातील ७० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या सॉफ्टवेअरवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळविली. विभागप्रमुख पी. आर. देशमुख यांनी या प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थी उद्योगांच्या गरजांनुसार तयार होतात. आजच्या काळात ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस आणि दूरसंचार क्षेत्रात कुशल पीसीबी डिझायनर्सना मोठी मागणी आहे.
0000000
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत तालुकास्तरावरील जनता दरबाराचे वेळापत्रक जाहीर
अमरावती, दि. 02 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हे जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान नागरिकांची जमीन मोजणी, नगर भूमापन, एकत्रिकरण याबाबत समस्या सोडविणार आहेत. तसेच या कार्यालयाचे अधिनस्त असलेल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधित दिवशी उपस्थित राहतील.
या जाहीर वेळापत्रकानुसार, 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते 1:30 या वेळेत चांदुर रेल्वे आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत तिवसा उपअधीक्षक कार्यालयात ते भेट देतील. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता नांदगांव खंडेश्वर आणि दुपारी 3 वाजता धामणगांव रेल्वे येथे दौरा नियोजित आहे. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत अमरावती मुख्यालय आणि दुपारी 3 ते 6 दरम्यान भातकुली उपअधीक्षक कार्यालयात आढावा घेतला जाईल.
दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात, 12 फेब्रुवारी रोजी सकाळी मोर्शी आणि दुपारी वरूड येथे, तर 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता चांदुर बाजार आणि दुपारी 3 वाजता अचलपूर येथे जिल्हा अधीक्षक उपस्थित राहतील. 16 फेब्रुवारी रोजी दर्यापूर सकाळी 10 वाजता आणि अंजनगांव येथे दुपारी 3 वाजता नागरिेांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल. दौऱ्याचा समारोप 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत चिखलदरा आणि 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत धारणी उपअधीक्षक कार्यालयातील भेटीने होईल. जनतेच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख महेंद्रकुमार शिंदे यांनी केले आहे.
00000
'पालवी' जिल्हास्तरीय प्रकल्पाचा प्रारंभ
अमरावती, दि. 02 (जिमाका): जिल्ह्यातील अंगणवाड्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषद, आणि 'क्वेस्ट' संस्थेच्या वतीने 'पालवी' या जिल्हास्तरीय प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. नुकतेच या तीन वर्षांच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. या प्रकल्पास टाटा ट्रस्ट आणि मोटिवेशन फॉर एक्सलन्स यांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.
या प्रकल्पाचे स्वरूप त्रिसूत्रीवर आधारित आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील सर्व अंगणवाडी सेविकांना सहा-स्तरीय विशेष प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कामात ऑनसाइट सपोर्ट दिला जाणार आहे. दुसऱ्या महत्त्वाच्या घटकांतर्गत धारणी आणि चिखलदरा या आदिवासी पट्ट्यात 'बहुभाषिक शिक्षण' राबविले जाईल. यात कोरकू भाषिक मुलांच्या घरच्या भाषेचा वापर करून त्यांना मराठी माध्यमात शिकण्यास सक्षम केले जाणार आहे. तिसऱ्या घटकात तिवसा तालुक्यातील 75 शाळांमध्ये इयत्ता पहिली व दुसरीसाठी 'पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान' उपक्रम राबवण्यात येणार आहे.
उद्घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी या प्रकल्पाला प्रशासकीय स्तरावर पूर्ण पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. त्या म्हणाल्या, अंगणवाडी ते प्राथमिक शाळा असा सलग शिक्षणप्रवाह निर्माण होणे गरजेचे आहे. या अंतर्गत 188 मॉडेल अंगणवाड्या विकसित केल्या जाणार असून, ग्रामपंचायतींच्या मदतीने भौतिक सुविधा आणि शैक्षणिक साहित्य पुरवले जाईल.
यावेळी 'गोष्टरंग' टीमने सादर केलेल्या नाटकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाला विलास मरसाळे, नितीन विशे, मिताली थत्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
0000000
धारणीत 8 फेब्रुवारीला विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा
अमरावती, दि. 02 (जिमाका): मेळघाटातील दुर्गम आणि वंचित भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना विविध शासकीय योजनांशी जोडण्यासाठी येत्या 8 फेब्रुवारी 2026 रोजी धारणी येथे 'विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा' आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात पार पडणार आहे. या महामेळाव्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर आणि अमरावती जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती प्रविण पाटील यांची उपस्थित राहतील.
या महामेळाव्याचा मुख्य उद्देश समाजातील दुर्बल घटक, कामगार, दिव्यांग आणि महिलांना विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांची माहिती देणे आणि त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा आहे. शिबिरामध्ये तज्ज्ञ कायदेतज्ज्ञांमार्फत मोफत कायदेशीर सल्ला दिला जाईल, तसेच नागरिकांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कायदेशीर सक्षमीकरण करण्यात येईल. या ठिकाणी विविध शासकीय विभाग आणि स्वयंसेवी संस्थांचे स्टॉल्स उपलब्ध राहणार असून, पात्र लाभार्थ्यांना जागेवरच योजनांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे.
000000
जिल्ह्यात ‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र’ अभियानाचा शुभारंभ
अमरावती, दि. 02 (जिमाका): कुष्ठरोग हा शाप नसून तो एक उपचारसाध्य आजार आहे, हा संदेश जनमानसांत रुजवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या उपस्थितीत 'स्पर्श' कुष्ठरोग जनजागृती आणि 'कुसुम' कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र अंजनगाव बारी (ता. अमरावती) येथे नुकताच हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुष्ठरोग निवारणाची सामुहिक शपथ घेतली.
श्रीमती महापात्र यांनी स्वतः अंजनगाव बारी परिसरातील वीटभट्ट्यांवर जाऊन तेथील कामगारांशी संवाद साधला. त्यांनी तपासणीसह कुष्ठरोगाची लक्षणे ओळखण्याबाबत कामगारांचे समुपदेशन केले. कुष्ठरुग्णांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे आणि त्यांच्याबद्दलची अंधश्रद्धा दूर व्हावी, हा या 'स्पर्श' अभियानाचा मुख्य उद्देश आहे. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या पंधरवड्यामध्ये जिल्हाभरात विविध उपक्रम राबवून या आजाराविषयी शास्त्रोक्त माहितीचा प्रसार केला जाणार आहे.
या आजारावरील'बहुविध औषधोपचार' सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत उपलब्ध आहे. वेळेवर उपचार घेतल्यास कुष्ठरोगामुळे येणारी शारीरिक विकृती पूर्णपणे टाळता येते. कुष्ठरुग्णांना संविधानाने दिलेला समानतेचा अधिकार मिळवून देणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणे हे समाजाचे कर्तव्य आहे. या कार्यक्रमाला सहायक संचालक डॉ. पूनम मोहोकार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा निंबाळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रिकुंजय केचे, डॉ. रसिका धर्मे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. ‘भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया’ असे आवाहन कीत हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
0000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

No comments:
Post a Comment