भूमी अभिलेखचा तालुकास्तरीय जनसंवाद कार्यक्रम
*नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 09 (जिमाका) : नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' राबवण्यात येत आहे. यासाठी 'तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुधारीत कार्यक्रमानुसार 20 फेब्रुवारीपासून अभियान राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमात नागरिकांच्या वैयक्तिक व सार्वजनिक तक्रारी, विविध विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव आणि स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. या दिवशी तहसीलस्तरावर जिल्हा परिषद तसेच संबंधित तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव आणि कृषी सहाय्यक यांची उपस्थिती राहणार आहे.
तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रमासाठी समन्वयक अधिकारी प्रशासनाने तालुकानिहाय जबाबदारी सोपवली असून उपस्थितीत तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम घेण्यासाठी खालीलप्रमाणे घेण्यात आले आहेत.
सकाळी 10 ते 2 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख अमरावती येथे दि. 02 मार्च, 2026 रोजी, दुपारी 3 ते 6 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख भातकुली येथे दि. 02 मार्च, 2026 रोजी, सकाळी 10 ते 1.30 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख मोर्शी येथे दि. 20 फेब्रुवारी, 2026 रोजी, दुपारी 3 ते 6 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख वरूड येथे दि. 20 फेब्रुवारी, 2026 रोजी, सकाळी 10 ते 1.30 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख चांदुर बाजार येथे दि. 23 फेब्रुवारी, 2026 रोजी, सकाळी 10 ते 1.30 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख दर्यापूर येथे दि. 26 फेब्रुवारी, 2026 रोजी, दुपारी 3 ते 6 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख अंजनगाव येथे दि. 26 फेब्रुवारी, 2026 रोजी, सकाळी 12 ते 3 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख चिलखदरा येथे दि. 27 फेब्रुवारी, 2026 रोजी, दुपारी 12 ते 3 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख धारणी येथे दि. 06 मार्च, 2026 रोजी कार्यक्रम घेण्यात यईल.
जिल्हा परिषद, तसेच संबंधित तालुक्यातील इतर सर्व विभागाचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव, कृषी सहायक यांचे उपस्थितीत तालुक्यातील जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम आयोजित करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे महेशकुमार शिंदे यांनी केले आहे.
00000000
कर्ज निवारण योजनेची माहिती संकलित करण्याचे काम सुरू
*शेतकऱ्यांना सचिवांकडे कागदपत्रे देण्याचे आवाहन
अमरावती, दि. 09 (जिमाका): जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थांचे थकीत कर्जदार शेतकरी सभासदांनी अद्यापही आधार कार्ड, फार्मर आयडी आणि इतर आवश्यक असलेली माहिती संबंधित सेवा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेला उपलब्ध करून दिलेली नसल्यास या सर्व शेतकरी सभासदांनी तातडीने उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाने शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसंदर्भात माहिती मागविली आहे. याअनुषंगाने थकीत कर्जदार सभासदांची माहिती संकलित करुन विहीत नमुना प्रपत्र अ व ब मध्ये तयार करण्याचे काम संबंधित प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा स्तरावर सुरु आहे.
त्यानुसार सेवा सहकारी संस्थांचे थकीत सभासदांचे कर्ज खाते आणि इतर अनुषांगिक माहिती संकलित करण्याचे काम संस्था पातळीवर सुरु आहे. सेवा सहकारी संस्थांचे थकीत कर्ज असलेल्या सभासदांनी संबंधित सहकारी संस्थेच्या सचिवाशी संपर्क करुन त्यांचे आधार कार्ड, फार्मर आयडी आणि इतर आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करुन दिलेली नाही, त्यामुळे सदर माहितीचे संकलन संस्था पातळीवर करता आले नाही. त्यामुळे सर्व शेतकरी सभासदांनी संबंधित संस्थेचे सचिव, किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेचे वसुली अधिकारी यांच्याशी त्वरीत संपर्क करुन आधारकार्ड आणि आवश्यक माहिती उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शंकर कुंभार यांनी केले आहे.
0000000
ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा
अमरावती, दि. 9 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
दौऱ्यानुसार, मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील मिशनच्या कार्यालयात उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता तामसवाडी फाटा, ता. दर्यापूर येथे शिवछत्रपती शंकरपट कार्यक्रमास उपस्थित राहतील.
दुपारी 4.30 वाजता वडाळगव्हाण, ता. दर्यापूर येथे देवेश अशोक वडाळ यांचे शेतामध्ये कापूस काढणी यंत्राची पाहणी करतील. त्यानंतर सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.
0000
जिल्ह्यात महारेशीम अभियानाचा शुभारंभ
*800 एकरवर रेशीम लागवडीचे उद्दिष्ट
अमरावती, दि. 9 (जिमाका): जिल्हाधिकारी आशिष येरेकार यांच्या हस्ते आज ‘महारेशीम अभियान २०२६’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रेशीम रथाला हिरवी झेंडी दाखविली. तसेच रेशीम उद्योगाची माहिती जाणून घेतली.
सन २०२६-२७ या वर्षात जिल्ह्यात एकूण ८०० एकर क्षेत्रावर रेशीम शेती लागवडीचे उद्दीष्ट आहे. यात कृषि विभागातर्फे ३०० एकर, रेशीमतर्फे विभाग: २५० एकर, आणि जिल्हा परिषदेतर्फे २५० एकर रेशीम लागवड करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी जून २०२६ मध्ये तुती लागवडीसाठी ४ फेब्रुवारी ते ५ मार्चपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी 'आपले सरकार' पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने करून त्याची प्रत जिल्हा रेशीम कार्यालयात जमा करावी लागणार आहे. यासाठी प्रति एकर ५०० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे.
शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत जॉब कार्डधारक असावा आणि त्याच्याकडे सिंचनाची सोय असावी. एका गावातून किमान पाच लाभार्थी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने सातबारा, ८-अ उतारा, चतुःसिमा नकाशा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
मग्रारोहयो अंतर्गत या योजनेतून शेतकऱ्यांना तीन वर्षांसाठी मजुरी आणि साहित्यासाठी एकूण ४ लाख ३२ हजार २४० रुपये दिले जाणार आहे. सिल्क समग्र-२ योजनेतून जे शेतकरी अल्पभूधारक नाहीत, त्यांच्यासाठी ही योजना असून यात प्रवर्गांनुसार अनुदान दिले जाणार आहे. यात १ एकरसाठी ३ लाख ७५ हजार रुपये इमावसाठी ते ४ लाख ५० हजार रुपये अनुसूचित जाती, जमातीसाठी दिले जाणार आहे. २ एकरसाठी ५ लाख ६२ हजार ५०० रुपये इमावसाठी ते ६ लाख ७५ हजार रुपये अनुसूचित जाती, जमातीसाठी दिले जाणार अहो.
नोंदणी, तसेच अधिक माहितीसाठी अमरावती, तिवसा, अचलपूर, अंजनगाव सुर्जीसाठी डी. एच. नागोलकर, संपर्क ९५२७९३४५७३, मोर्शी, वरूड, चांदूरबाजार, धामणगाव रेल्वेसाठी एस. बी. भोयर, संपर्क ९३७२७९१६२६, तर नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, भातकुली, चिखलदरा, धारणीसाठी एस. एम. देठे ८८३०५९३४५९ या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
000000
शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन युवकांनी रोजगार देणारे व्हावे
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्नेहमेळावा' उत्साहात
42 उमेदवारांची प्राथमिक निवड
अमरावती, दि. 9 (जिमाका) : सध्याच्या स्पर्धात्मक युगात युवकांनी केवळ नोकरीच्या शोधात राहू नये. आपल्यामधील कौशल्यांनी युवकांनी रोजगार देणारे व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व स्नेहमेळावा' आज पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, उमेदवारांनी केवळ पदवीवर अवलंबून राहू नये. युवकांनी आता कौशल्यावर भर देणे आवश्यक आहे. सुरुवातीला पगारापेक्षा अनुभवाचा विचार करावा. आपल्यातील कौशल्य वाढवून युवकांनी स्वत:चा रोजगार उभारावा. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन उद्योगाचे स्वरूप वाढावे, असे आवाहन केले.
आजच्या रोजगार मेळाव्यात लेक्साकेम ओर्गानिक, जाधव गियर्स, अर्थ वे टेक्नॉलॉजी यांसारख्या 6 नामांकित कंपन्यांचा सहभाग होता. यात 63 रिक्त पदांसाठी 126 उमेदवारांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष मुलाखतीनंतर 42 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. यातील 8 उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तात्काळ नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. स्नेहमेळाव्यात 103 उमेदवारांनी सहभाग नोंदविला.
यावेळी जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीमध्ये यश मिळवणारे आदर्श लिहारे, निशा बंड, शशांक लोखंडे आणि विराज पुसदकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात कंपन्यांमध्ये रुजू झालेल्या उमेदवारांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त द. ल. ठाकरे, सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, रेडियंट हॉस्पिटलच्या संचालक डॉ. माधुरी अग्रवाल, ईसीईचे संचालक समीर काळे, गोल्डन फायबरचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. प्रसाद आदी उपस्थित होते. श्री. ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रांजली बारस्कर यांनी प्रास्ताविक केले, प्राजक्ता राऊत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
0000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment