Friday, February 6, 2026

DIO NEWS AMRAVATI 06-02-2026

 


जिल्ह्यात 18 फेब्रुवारीला तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम;

नागरिकांनी आपल्या समस्या व प्रलंबित कामांबाबत या सुविधेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अमरावती, दि. 06 (जिमाका): पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महोदयांच्या निर्देशानुसार नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' प्रभावीपणे राबवण्यासाठी येत्या बुधवार, 18 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 'तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या संदर्भात आदेश निर्गमित केले असून, प्रत्येक तालुक्यासाठी वरिष्ठ समन्वयक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

या कार्यक्रमात नागरिकांच्या वैयक्तिक व सार्वजनिक तक्रारी, विविध विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव आणि स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. या दिवशी तहसील स्तरावर जिल्हा परिषद तसेच संबंधित तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव आणि कृषी सहाय्यक यांची उपस्थिती राहणार आहे.

तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रमासाठी समन्वयक अधिकारी

प्रशासनाने तालुकानिहाय जबाबदारी सोपवली असून उपस्थितीत तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम घेण्यासाठी खालीलप्रमाणे समन्वयक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे. अचलपूर तालूक्यातील उपजिल्हाधिकारी महसूल विवेक जाधव, प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, तहसिलदार सुदर्शन सहारे, दर्यापूर तालुक्यातील उपजिल्हाधिकारी निवडणूक शिवाजी शिंदे, उपमुकाअ बाळासाहेब रायबोले, तहसिलदार रविंद्र कानडजे, अमरावती जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, उपमुकाअ श्रीराम कुळकर्णी, तहसिलदार विजय लोखंडे, धारणी तालुक्यातील उपजिल्हाधिकारी रोहयो ज्ञानेश्वर घ्यार, कार्यकारी अधिकारी सुनिल जाधव, तहसिलदार प्रदिप शेवाळे, भातकुली तालुक्यातील उपजिल्हाधिकारी पुनर्वसन श्रध्दा उदावंत, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी शिल्पा पवार, तहसिलदार अक्षय मंडवे, चांदुर रेल्वे तालुक्यातील उपजिल्हाधिकारी प्रसन्नजीत चव्हाण, कृषी विकास अधिकारी मल्ला तोडकर, तहसिलदार पुजा माटोडे,  मोर्शी तालुक्यातील उपजिल्हाधिकारी भूसंपादन सुषमा चौधरी, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रिया देशमुख, तहसिलदार सागर ढवळे, वरूड तालुक्यातील उपविभागाय अधिकारी प्रदीप पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक सतीश मुगल, तहसिलदार रामदास शेळके, चांदुर बाजार तालुक्यातील उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रविण पारिसे, तहसिलदार मनोज सोनारकर, तिवसा तालुक्यातील उपविभागीय अधिकारी दादाराव दराडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, तहसिलदार मयुर कळसे, धामणगाव रेल्वे तालुक्यातील उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे, उपमुकाअ पंचायत बाळासाहेब बायस, तहसिलदार अभय घोरपडे, चिखलदरा तालुक्यातील सहा. जिल्हाधिकारी सिध्दार्थ शुक्ला, कार्यकारी अधिकारी बांधकाम दिनेश गायकवाड, तहसिलदार जीवन मोराणकर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, उपमुकाअ मबाक विलास मरसाळे, तहसिलदार अश्विनी जाधव, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, सहा. गविअ, पंचायत विभाग सुनिल गवई, तहसिलदार पुष्पा सोळंके हे समन्वयक म्हणून कामकाज पाहणार आहेत.

 

            वरील प्रमाणे जिल्हा परिषद तसेच संबंधित तालुक्यातील इतर सर्व विभागाचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव, कृषी सहायक यांचे उपस्थितीत तालुक्यातील जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम आयोजित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

00000000

बदलत्या हवामानातील शेतीसाठी 'पोकरा'बाबत 13 फेब्रुवारीला विशेष वेबिनार

अमरावती, दि. 06 (जिमाका) : महाराष्ट्र राज्यातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून, राज्याच्या आर्थिक विकासामध्ये कृषी उत्पन्नाचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, मागील दशकापासून हवामानात होणाऱ्या जलद बदलांमुळे शेतीवर प्रतिकूल परिणाम होत असून पिकांच्या उत्पादनात मोठी घट आणि अनिश्चितता दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्याच्या 21 जिल्ह्यांत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात या प्रकल्पांतर्गत एकूण 454 गावांमध्ये अंमलबजावणी केली जात असून, हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कृषी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत.

याचाच एक भाग म्हणून, शुक्रवार, दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12:30 या वेळेत 'लागवडपूर्व तंत्र, हमखास यशाचा मंत्र' या विषयावर एका विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारमध्ये बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये कोणते बदल करावेत, नैसर्गिक आपत्तींमधील जोखीम कशी कमी करावी आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे, यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच, योग्य पेरणी पद्धती, बियाण्यांची निवड आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापराबाबतही सविस्तर माहिती दिली जाईल.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव, भगिनी, कृषिताई, महिला शेतकरी बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सभासदांना या वेबिनारचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी गटामध्ये एकत्र बसून प्रकल्पाच्या अधिकृत YouTube चॅनेलवर किंवा https://www.youtube.com/@PoCRAMaharashtra या लिंकवर हा वेबिनार नक्की पहावा. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

00000000

तृतीयपंथीयांना तक्रार नोंदविण्यासाठी हेल्पलाईन

        अमरावती, दि. 06 (जिमाका) : तृतीयपंथीयांना तक्रार नोंदविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाने ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्काचे संरक्षण कायदा 2019 व नियम 2020 संपूर्ण देशात लागू झाला आहे. त्याअनुषंगाने तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींसाठी केंद्र शासनातर्फे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथीयांसाठी 14427 हा राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक जाहिर करण्यात आला आहे. या हेल्पलाईन क्रमांकाद्वारे तृतीयपंथीय व्यक्तींना योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया संबंधित मार्गदर्शन, अडचणीचे निराकरण, तसेच तक्रारी नोंदविण्यासाठी केंद्र शासनाची तृतीयपंथीय हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

गरजूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार, सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

000000















स्पर्धा परीक्षेत सातत्य, शिस्त महत्वाची

*अधिकाऱ्यांचा स्पर्धा परीक्षा शिबीरात मार्गदर्शन

अमरावती, दि. 6 (जिमाका) : राज्य आणि केंद्र स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. या अभ्यासासाठी पुस्तके आणि माहितीचे स्त्रोत विचारपूर्वक निवडणे गरजेचे आहे. तसेच स्पर्धा परीक्षेतील यशासाठी सातत्य आणि शिस्त महत्वाची असल्याचे मत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरात व्यक्त केले.

जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. यात भारतीय पोलिस सेवेतील सागर भामरे आणि भारतीय वन सेवेतील प्रांजल चोपडे यांनी मार्गदर्शन केले.

श्री. भामरे यांनी अखिल भारतीय सेवेतील परीक्षा उत्तीर्ण होण्यात ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व स्तरातील विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. मात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करताना पर्यायी मार्गही शोधणे आवश्यक आहे. या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी निश्चित कालावधी आहे. त्यामुळे परीक्षा देण्याआधी पूर्ण अभ्यासक्रम जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठी परीक्षेच्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेला अभ्यासक्रम आणि मागील वर्षीच्या पेपरमधील प्रश्नावली महत्वाचे आहेत.  तसेच पर्यायी विषय निवडताना अभ्यासक्रमाची उपलब्धता आणि मार्गदर्शन महत्वाचे आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आपली वैयक्तिकरित्या आपली बलस्थाने आणि कमजोरी लक्षात घेऊन तयारी करावी. यासोबतच चालू घडामोडीसाठी वृत्तपत्र आणि मासिकांचा आधार घेणे आवश्यक आहे.

श्री. चोपडे यांनी पर्यायी विषय निवडताना काळजीपूर्वक निवडावे. आवश्यकता भासल्यास विषय बदलवावा. परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी दररोज सात ते आठ तास अभ्यास करणे आवश्यक आहे. यातही दर्जेदार अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यासोबतच मॉक टेस्टला समोर जाणे आवश्यक आहे. यामुळे परीक्षा पद्धती समजून घेण्यास मदत होईल. परीक्षांमध्ये लेखनाचा सराव होणे आवश्यक आहे. यात गतीने प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. या परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी संयमीही आवश्यक आहे. अपयशाच्या कालावधीत मार्गदर्शक आणि मदत करणारे मित्र आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथालय सहायक संचालक राजेश पाटील यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली.

000000

मेरा युवा भारततर्फे माय भारत बजेट क्वेस्टचे आयोजन

अमरावती, दि. 06 (जिमाका): मेरा युवा भारत कार्यालयातर्फे युवकांमध्ये केंद्रीय बजेटबद्दल जागरुकता आणि समज विकसित करण्यासाठी माय भारत बजेट क्वेस्टचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम क्विझ स्पर्धा नोंदणी मोहिमेचा भाग म्हणून बहुस्तरीय आणि सहभागी स्वरुपात आयोजित केला आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीयस्तरावरील ऑनलाईन क्विझचा समावेश राहणार आहे. ही स्पर्धा दि. 3 ते 17 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी युवकांनी माय भारत पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी. प्रश्नमंजुषेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांची राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश स्तरावर निबंध लेखनासाठी निवड केली जाणार आहे. यात युवक केंद्रीय अर्थसंकल्प 2026 च्या प्रमुख विषयांवर विचार मांडतील. अंतिम टप्प्यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेश स्तरावर निवडलेल्या तरुणांना केंद्रीय अर्थसंकल्प 2026 वर धोरणकर्ते आणि मान्यवरांशी आभासी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यांनी केले आहे.

000000

युवक-युवतींना रोजगारांच्या संधी

कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ सोमवारी

अमरावती, दि. 06 (जिमाका) : अमरावती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, अमरावती व स्वामी विवेकानंद महाविद्यालय वरूड ता. वरूड जि. अमरावती  यांचे संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन  बुधवार, दि. 11 फेब्रुवारी  2026 रोजी होणार आहे. तसेच मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.

जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत-जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्यामधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात येतो. त्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी शिवाजी कला व विज्ञान महाविद्यालय, मोर्शी आस्थापनांचे, कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणा-या उमेदवारांना लगेच नोकरीची संधी मिळेल.

 या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.gov.in  या लिंकवर  जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. Employment वर क्लिक करावे. Job Seeker  हा पर्याय निवडून आपला नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड साईन इन करा. आपल्या होम पेजवरील Job Fair हा पर्याय निवडा. District मध्ये Amravati जिल्हा निवडून Fiter बटनवर क्किल करावे. नंतर दिनांकित मेळावा निदर्शनास येईल. त्यासमोर असलेल्या Action बटनच्या खाली View  व Apply बटन दिसेल. मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबत माहिती दिसेल. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून Apply बटनवर क्लिक करा. I Agree हा पर्याय निवडा. शेवटी Successfully Applied for the Job असा Message दिसेल. अशा रितीने आपण ऑनलाईन सहभाग नोंदवावा. आपली रजिट्रेशन Slip PDF ची प्रिंट काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे.

 याबाबत काही अडचण असल्यास अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा. तसेच 11 फेब्रुवारी 2026 रोजी स्वामी विवेकानंद महाविद्यालय वरूड ता. वरूड जि. अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो व आवश्यक कागदपत्रासंह कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 06-02-2026

  जिल्ह्यात 18 फेब्रुवारीला तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम; नागरिकांनी आपल्या समस्या व प्रलंबित कामांबाबत या सुविधेचा लाभ घे...