Friday, February 20, 2026

DIO NEWS AMRAVATI 20-02-2026

 सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा ‘मेगा रिटेल क्रेडिट आऊटरीच’ मेळावा आज;

ऑन-द-स्पॉट कर्ज मंजुरीची संधी

अमरावती, दि. 20 (जिमाका ): स्वतःचे घर, हक्काची गाडी किंवा व्यवसायाचा विस्तार करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने उद्या, दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी शहरात 'मेगा रिटेल क्रेडिट आऊटरीच' कार्यक्रमांतर्गत विशेष ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा गाडगे नगर येथील संत गाडगे बाबा विसावा भवन येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजांसाठी तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन मिळणार असून, पात्र अर्जांना 'ऑन-द-स्पॉट' प्राथमिक मंजुरी आणि चेक वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये गृहकर्ज, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर किरकोळ कर्ज सुविधांचा समावेश आहे. आकर्षक व्याजदर आणि सुलभ प्रक्रिया यावर या कार्यक्रमात भर दिला जाणार आहे.

नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी केले आहे.

                                                                       000000

जिल्ह्यात रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा;

29 हजार विद्यार्थी देणार परीक्षा, प्रशासकीय यंत्रणा सज्ज

अमरावती, दि. 20 (जिमाका ): जिल्हा परिषद अमरावतीच्या शिक्षण विभागामार्फत (प्राथमिक) पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन रविवार, दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण 225 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, सुमारे 29 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

या परीक्षेच्या नियोजनाबाबत अधिक माहिती देताना शिक्षण विभागाने कळविले आहे की, इयत्ता 5 वी साठी जिल्ह्यात 134 केंद्रे निर्धारित करण्यात आली असून तेथे 18,447 परीक्षार्थी परीक्षा देतील. तसेच, इयत्ता 8 वी साठी 91 परीक्षा केंद्रे असून तेथे 10,551 परीक्षार्थी आपली क्षमता सिद्ध करतील. संपूर्ण जिल्ह्यात एकूण 225 केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे.

परीक्षेच्या पारदर्शक आणि सुरळीत संचालनासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर एक केंद्र संचालक एकूण 225 आणि 1 हजार 439 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा स्तरावर 2 भरारी पथके आणि प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र एक पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.

0000000


जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

अमरावती, दि. 20 (जिमाका) : मराठी पत्रकारितेचे जनक, ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांनी आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, वरीष्ठ लिपिक मनोज थोरात, योगेश गावंडे, कनिष्ठ लिपिक कोमल भगत, साजिद शेख आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

00000

जन्म-मृत्यूची नोंदणी 21 दिवसांत करणे बंधनकारक;

जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आवाहन

अमरावती, दि. 20 (जिमाका): जन्म किंवा मृत्यूची घटना घडल्यापासून 21 दिवसांच्या आत त्याची अधिकृत नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक आहे. विहित मुदतीत नोंदणी न केल्यास भविष्यात अनेक कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी नागरिकांना ही प्रक्रिया गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे.

शासन निर्णय आणि जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 नुसार, 21 दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणी केल्यास प्रमाणपत्र मोफत मिळते. यामुळे नागरिकांना विनाकारण विलंब शुल्क किंवा दंडाचा भुर्दंड सोसावा लागणार नाही. जन्म नोंदणी ही शाळा व महाविद्यालयीन प्रवेशासाठी, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र काढण्यासाठी आणि शासकीय योजना, शिष्यवृत्ती व वयाचा अधिकृत पुरावा म्हणून आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, मृत्यू नोंदणी ही वारसाहक्क निश्चित करणे, मालमत्तेचे हस्तांतरण, पेन्शन, विमा दावे आणि बँक खाती बंद किंवा हस्तांतरित करण्यासाठी तसेच शासकीय नोंदी अद्ययावत ठेवण्यासाठी आवश्यक असते.

अनेकदा नागरिकांच्या दुर्लक्षामुळे नोंदणी करण्यास उशीर होतो, अशा वेळी अतिरिक्त दंड भरण्यासोबतच पोलीस चौकशी आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ व पैसा खर्च करावा लागतो. ही कटकट टाळण्यासाठी जन्म किंवा मृत्यूची घटना घडताच संबंधित नगरपरिषद, ग्रामपंचायत, शासकीय रुग्णालय किंवा अधिकृत नोंदणी केंद्रात तातडीने संपर्क साधावा.  नागरिकांनी सामाजिक जबाबदारी ओळखून आणि स्वतःच्या सोयीसाठी जन्म-मृत्यूची नोंद वेळेतच करावी, जेणेकरून भविष्यातील तांत्रिक अडचणी टाळता येतील, असे आवाहन डॉ. पारिसे यांनी केले आहे.

0000000

भूमी अभिलेखचा तालुकास्तरावर जनता दरबार

अमरावती, दि. 20 (जिमाका) : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातर्फे कामकाजाचा आढावा आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी तालुकास्तरावर जनता दरबार घेणार आहे. यासाठी चांदूरबाजार, अचलपूर आणि चिखलदरा येथील सुधारीत कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.

यादरम्यान नागरिकांची जमिन मोजणी, नगर भूमापन, एकत्रिकरणाबाबत समस्या सोडविणार आहेत. तसेच या  कार्यालयाचे अधिनस्त असलेल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधित दिवशी उपस्थित राहतील. सुधारीत वेळापत्रकानुसार, दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 1:30 यावेळेत चांदुर बाजार आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत अचलपूर उपअधीक्षक कार्यालयात जनता दरबार होणार आहे. दि. 9 मार्च रोजी दुपारी 12 ते 3 वाजता चिखलदरा येथे जनता दरबार घेण्यात येणार आहे. तक्रारींच्या तात्काळ निवारणासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक महेंद्रकुमार शिंदे यांनी केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 20-02-2026

  सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा ‘मेगा रिटेल क्रेडिट आऊटरीच’ मेळावा आज; ऑन-द-स्पॉट कर्ज मंजुरीची संधी अमरावती, दि. 20 (जिमाका ): स्वतःचे घर, हक्काच...