Wednesday, February 11, 2026

DIO NEWS AMRAVATI 11-02-2026




जिल्हाधिकारी यांच्या 300 कोटी रुपये अतिरिक्त मागणीला मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद

·        राज्य नियोजन समितीची बैठक संपन्न

अमरावती, दि. 11 (जिमाका) : राज्य नियोजन समितीच्या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथून जिल्हाधिकारी आशिष येरेकर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तीनशे कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

              आमदार सुलभा खोडके यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र, उपवनसंरक्षक अजुर्ना के. आर, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे तसेच संबंधित विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी यावेळी जिल्ह्यातील विविध विभागांची माहिती, त्यांची चालू कामे, सद्यस्थिती तसेच भविष्यकालीन नियोजनाबाबत अभ्यासपूर्ण माहिती सादरीकरणाव्दारे सविस्तर दिली. अमरावती जिल्ह्यात 14 तालुके आहेत. यामुळे विकास कामांसाठी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत विकास कामांसाठी जिल्ह्याला अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. सन 2025 -26 जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यानुसार 527 कोटी रुपयांची विकास कामे सुरु आहेत. सन 2026 -27 साठी 434. 71 कोटी रुपयांचे स्पिलिंग दिले आहेत. त्यानुसार आराखड्याचे काम करण्यात आले आहे. परंतु यामध्ये अतिरिक्त 300 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे श्री. येरेकर यांनी यावेळी मागणी केली. जिल्ह्याच्या विकासासाठी तालुका हा घटक महत्त्वपूर्ण आहे.जिल्ह्यातील लोकसंख्या, तालुक्यांची संख्या, भौगोलिक क्षेत्रफळ याचा विचार करून अतिरिक्त निधीच्या आवश्यकतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आग्रही भूमिका मांडली.  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक उत्तम काम करणाऱ्यास निधीची कमतरता पडणार नसल्याचा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये वाढीव निधी प्राप्त होणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील प्रलंबित विकासकामांना आता नवी उभारी मिळणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे आमदार श्रीमती खोडके यांनी सन 2026 -27 साठी मनपा अंतर्गत विविध विकास कामांसाठी 100 कोटी रुपये अतिरिक्त निधीची  विशेष मागणी केली. जिल्ह्यामध्ये मनपाच्या 63 शाळा आहेत. मनपा शाळेच्या दुरुस्ती व देखभालीसाठी जिल्हा नियोजन समिती आराखड्यात नवीन लेखाशीर्ष समाविष्ट करण्याबाबतची मागणीही त्यांनी यावेळी केली.

 

0000000 

                            मोर्शी येथे शुक्रवारी ‘मेगा कृषी क्रेडिट आऊटरीच’ कार्यक्रम;

शेतकऱ्यांना कर्ज मंजुरी पत्रांचे होणार वितरण

अमरावती, दि. 11 (जिमाका): सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने मोर्शी येथे विशेष ‘मेगा कृषी क्रेडिट आऊटरीच’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा शेतकरी मेळावा येत्या शुक्रवारी, 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता शिरभाते मंगलम, अमरावती रोड, मोर्शी येथे पार पडणार असून, यामध्ये बँकेच्या विविध नवीन शेती योजनांचे सादरीकरण आणि पात्र शेतकऱ्यांना प्रिन्सिपल सॅन्शन चेकचे वितरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार, गट विकास अधिकारी प्रिती खाटिंग, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मुंबई कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक जयशंकर प्रसाद उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात बँक अधिकाऱ्यांमार्फत शेती कर्ज, शासनाच्या नवीन योजना आणि विविध सबसिडींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांना बँकेच्या योजनांची माहिती देण्यासोबतच व्याजदरातील सवलतींबाबतही सादरीकरण केले जाईल. शासन आणि बँकेच्या या संयुक्त उपक्रमामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला कृषी व्यवसाय विस्तारण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी केले आहे.

0000000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 11-02-2026

जिल्हाधिकारी   यांच्या 300 कोटी रुपये अतिरिक्त मागणीला मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद ·          राज्य नियोजन समितीची बैठक संपन्न अमरा...