शहरात प्रतिबंधात्मक कलम 37 (1) व (3) लागू
अमरावती, दि. 10 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 11 फेब्रुवारी ते दि. 25 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कळविले आहे.
000000
लाडकी बहीण योजनेसाठी आता आधार प्रमाणीकरण
अमरावती, दि. 10 (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार प्रमाणीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तथापि, सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना नजर चुकीचे पर्याय निवडण्यात आलेला आहे, अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-केवायसीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दि. 31 मार्च 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी कळविले आहे.
0000000
ग्रामीण भागात कलम 37(1) व (3) लागू
अमरावती, दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 24 फेब्रुवारी 2026च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी कळविले आहे.
0000000
पेंशन समाधान उपक्रम, पेंशन अदालत उत्साहात
अमरावती, दि. 10 (जिमाका) : जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे कोषागार कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आहरण व संवितरण अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी पेंशन समाधान उपक्रम आणि पेंशन अदालत उत्साहात पाडली.
कोषागार अधिकारी अमोल इखे अध्यक्षस्थानी होते. महालेखापाल नागपूर यांचे कार्यालयातील वरीष्ठ लेखाधिकारी मैथीली जगनाथन, सहाययक लेखाधिकारी अनुपमा भटटाचार्य, लेखापाल सचिनकुमार, वरीषठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार उपस्थित होते.
महालेखापाल कार्यालयातील अधिकारी यांनी अचूक निवृत्ती वेतन प्रस्ताव कसे तयार करावेत, ज्यामुळे निवृत्ती वेतन व कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना वेळेवर लाभ प्रदान करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी निवृत्तीवेतनविषयक प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करुन देण्यात आली. तसेच शंकाचे समाधान करण्यात आले. उपस्थितांनी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवृत्तीवेतन प्रदाने तात्काळ करण्यासाठी महालेखाकार कार्यालय, कोषागार कार्यालय आणि संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी एकत्रितपणे कार्य करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
कनिष्ठ लेखापाल साजीया शमसू मोहम्मद यांनी प्रास्ताविक केले, त्यांनी निवृत्तीवेतन विहीत कालावधीत प्रदान करणेसाठी कोषागार कार्यालयाची भूमिका विषद केली. तसेच पेंशन समाधान उपक्रम आणि पेंशनअदालतीचे आयोजन करण्याचे उद्दीष्ट सांगितले. कनिष्ठ लेखापाल श्रुतिका तडस यांनी सूत्रसंचालन केली.
निवृत्तीवेतन धारकांकरीता पेंशन अदालत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डी. आर. देशमुख, जगदीश सायसिकमल, विरेंद्र दिक्षीत आदी उपस्थित होते. वरीष्ठ लेखापाल राम जाधव यांनी प्रस्ताविक केले. यावेळी निवृत्तीवेतनधारक, तसेच कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. निवृत्तीवेतन धारकास घरपोच सेवा देण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. जगदीश सायसिकमल यांनी सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लाभ त्यांना विहीत कालावधीत मिळण्यासाठी कोषागार कार्यालय आणि महालेखाकार कार्यालय करीत असलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली. विरेंद्र दिक्षीत यांनी मांडलेल्या तक्रारीची महालेखाकार कार्यालयाच्या चमूने तात्काळ सोडवणूक केली.
कनिष्ठ लेखापाल राधिका निरंतर यांनी आभार मानले. श्रीमती जगनाथन यांनी उपस्थित निवृत्तीवेतन धारकांच्या अडचणींची सोडवणूक केली. निवृत्तीवेतन प्रकरणामध्ये महालेखाकार कार्यालयाची भूमिका मांडली. कार्यक्रमासाठी कनिष्ठ लेखापाल सुबोध भगत, आदित्य सुरजूसे, लेखा लिपीक प्रणीत टिंगणे, सोनू राठोड, दिपक चव्हाण यांनी पुढाकार घेतला.
00000000
चिखलदरा येथे पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 10 (जिमाका) : चिखलदरा येथे स्काय वॉक, गोलमार्ग, ग्लो गार्डन, मधाचे गाव आमझरी आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे पाठपुरावा करण्यात येत आहे. चिखलदरा परिसरात पर्यटन क्षेत्र विकासाला वाव असून याठिकाणी पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यटन आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी चिखलदरा येथे सिडकोमार्फत स्कायवॉकचा आढावा घेतला. स्कायवॉकची लांबी असल्याने मध्यभागी आधार द्यावा लागणार आहे. यासाठी वनविभागाची परवानगी घेण्यात आली आहे. या स्कायवॉकला कायमस्वरूपी आधार द्यावा लागणार असल्यामुळे या भागातून माकड किंवा इतर प्राणी चढून जाऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. यासोबतच 27 किलोमीटरचा गोलमार्ग तयार करण्यात येणार आहे. वन क्षेत्रातून जाणाऱ्या मार्गासाठी वनविभागाची परवानगी घ्यावी. तसेच ग्लो गार्डनसाठी शक्यता तपासून पहाव्यात.
चिखलदरा येथे पर्यटन वाढीसाठी नवीन प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. याठिकाणी ट्रेकींगचे पर्याय दिल्यास पावसाळ्यानंतर मार्चपर्यंत पर्यटक येतील. यासाठी वन विभागाने ट्रेकचे मार्ग निश्चित करावेत. पर्यटनामुळे चिखलदरामध्ये क्रांती घडू शकते. त्यामुळे येथे पर्यटकांना सुविधा द्याव्यात. पीएम मित्रा पार्कमधील महापारेषणने उपकेंद्राचे काम सुरू करावे. यासाठी आवश्यक असणारे सहकार्य करण्यात येईल. यासोबतच मेळघाटातील 22 गावांच्या विजेच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची परवानगी मिळातच इतर कामे करावीत. आमझरी मधाचे गाव म्हणून विकसित करण्यात येत आहे. येथे शबरी महामंडळाने रिसॉर्टसाठी एकत्रितरित्या कार्य केल्यास जादा पर्यटकांची सुविधा निर्माण होण्यास मदत होईल. तसेच जिल्ह्यात कोल्ड स्टोअरेज, संत्रा प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यात यावी, अशी सूचनाही श्री. येरेकर यांनी केली.
0000000
बारावीची परीक्षा 'कॉपीमुक्त' वातावरणात सुरू
*जिल्हाधिकाऱ्यांची परीक्षा केंद्राना भेटी
*पहिल्याच दिवशी प्रशासनाचा कडक पहारा
अमरावती, दि. 10 (जिमाका): बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यात उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरुवात झाली. जिल्ह्यातील 137 केंद्रांवर पहिल्या दिवशीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरळीत पार पडला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या 'कॉपीमुक्त' अभियानामुळे परीक्षा केंद्र परिसरात शांतता दिसून आली. आज एकाही केंद्रावर गैरप्रकार आढळून आला नाही.
कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून नियोजन करण्यात आले आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संस्था प्रमुखांची बैठक घेऊन सूचना दिल्या. त्यानुसार प्रत्येक परीक्षा केंद्रावर पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रावरील कोणत्याही गैरप्रकारासाठी या समितीला जबाबदार धरले जाणार आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवशी आज सकाळीच जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संस्था प्रमुखांशी संवाद साधून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. प्रशासनातर्फे भरारी व बैठे पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागातील वर्ग एक व वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची परीक्षा केंद्र भेटीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
आज जिल्हाधिकारी अशिष येरेकर यांनी अमरावतीतील विद्याभारती येथील परीक्षा केंद्राला भेट दिली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी नांदगाव पेठ येथील दोन केंद्राची पाहणी केली. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने कोणत्याही केंद्रावर बाहेरून असामाजिक तत्वांचा उद्रेक आढळून आला नाही.
जिल्हा प्रशासनाने धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी आयएफएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज उपवनसंरक्षक अग्रीम सैनी, निता कट्टे, किर्ती जमदाळे यांनी परिसरातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तसेच मेळघाटातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.
केवळ शिस्तच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सोयीचाही विचार प्रशासनाने केला आहे. परीक्षा कालावधीत विद्युत पुरवठा अखंडित रहावा आणि परिवहन विभागाने विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्यासाठी सहकार्य करावे, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. परीक्षेत कॉपी किंवा इतर गैरप्रकार आढळल्यास संबंधितांविरुद्ध 'महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मालप्रॅक्टिस ॲक्ट 1982'च्या कलम 8 सह भारतीय दंड विधानाच्या कलम 34, 188 व 127 नुसार गुन्हे दाखल करण्यात येतील. बारावीच्या परीक्षा केंद्रावर अनुचित आणि कॉपीचा प्रकार होत असल्यास याची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
000000
जिल्हा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये राज्यात तिसरा, विदर्भात अव्वल
*जिल्हाधिकाऱ्यांकडून बँकांना कडक तंबी
अमरावती, दि. 10 (जिमाका): मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्याने मोठी झेप घेतली असून, कर्ज मंजुरीमध्ये जिल्हा विदर्भात प्रथम तर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत हा आढावा घेण्यात आला.
उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हाधिकारी 'ॲक्शन मोड' मध्ये आले आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 साठी जिल्ह्याला 1600 कर्ज प्रकरणांचे लक्ष्य देण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने 3 हजार 704 प्रस्ताव बँकांकडे पाठवले असून, त्यापैकी 802 प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सरकारी योजनांच्या कर्ज मंजुरीबाबत खाजगी बँकांकडून दाखवण्यात येणाऱ्या अनास्थेबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आयसीआयसीआय, ॲक्सिस, एचडीएफसी आणि येस बँक या बँकांच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढत, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भर सभेतून निघून जाण्याचे आदेश दिले.
जिल्ह्यातील नवउद्योजक युवक-युवतींच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अमरावती येथे 'स्वरोजगार महासंमेलन' आयोजित करण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होईल. यात स्वयंरोजगारातून उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी विशेष स्टॉल्स उभारले जातील. यात नाविन्यपूर्ण उत्पादन करणाऱ्या उद्योगांना प्राधान्य दिले जाईल. बेरोजगार युवक-युवतींनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
00000000
जिल्हाधिकारी कार्यालयात 'सुरक्षित इंटरनेट दिन' उत्साहात साजरा
'स्मार्ट टेक, सुरक्षित पर्याय' या संकल्पनेवर भर
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम
अमरावती, दि. 10 (जिमाका) : आजच्या वेगवान डिजिटल युगात इंटरनेट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरक्षितरीत्या व्हावा, या उद्देशाने 'सुरक्षित इंटरनेट दिन' जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी हा दिवस “स्मार्ट टेक, सुरक्षित पर्याय - आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरक्षित आणि जबाबदार वापर” या संकल्पनेवर आधारित होता.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनातील जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी मनीष कुमार आणि गाडगेनगर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल ताहीर अली सय्यद यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, पासवर्डची सुरक्षितता आणि ओटीपी शेअर न करणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती दिली.
यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापरताना कोणती खबरदारी घ्यावी, डिजिटल हायजीनमध्ये डिजिटल अकाउंट्स आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याच्या पद्धती, सोशल मीडियाचा वापर करीत असताना शासकीय काम आणि वैयक्तिक जीवनात सोशल मीडियाचा जबाबदार वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोविंद धनेज, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 'इंटरनेट आणि एआयच्या सुरक्षित वापरा'ची सामूहिक शपथ घेतली. तसेच, कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी एका विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले.
0000000

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment