अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये बदल
पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 18 (जिमाका): अमरावती शहरात चित्रा चौक ते नागपूरी गेट उड्डाणपुलाचे उर्वरित बांधकाम नियोजनबध्द पध्दतीने पुर्ण करण्यासाठी आज दि. 18 फेब्रुवारी ते 4 मार्च 2026 पर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे.
सर्व वाहनांना वाहतूकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग
टांगा पडाव ते नागपूरी गेट चौक पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी पादचारीसह. चित्रा चौक ते नागपूरी गेट सर्व प्रकारचे जड व हलके मालवाहु तसेच बसेस इत्यादी वाहनांना प्रवेश बंदी राहील.
वाहतूकीस पर्यायी मार्ग
टांगा पडाव-जवाहर गेट-सक्करसाथ-नागपूरी गेट. दिपक चौक-चौधरी चौक-आदर्श हॉटेल-पिंजारा मस्जिद मार्गे नागपूरी गेट. फक्त दुचाकी, कार, ऑटोसाठी लागू राहील. इतर सर्व वाहनांना प्रवेशबंदी राहील.
वाहतूक परिस्थितीनुसार वाहतूक थांबविणे व वळविणे याबाबत सर्व अधिकार वाहतूक विभागास राहील. तसेच अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता सहायक पोलीस आयुक्त वाहतुक अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतूकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार राहील.
या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
अमरावती येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात
113 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड
अमरावती, दि. 18 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच स्थानिक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती कार्यालयाच्या आवारात 'पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे (प्लेसमेंट ड्राईव्ह) आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास जिल्ह्यातील उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लागला.
त्यानुसार एकूण 91 रिक्त पदांसाठी ऑनलाईन/ऑफलाईन 196 उमेदवारांनी सहभाग नोंदवून त्यापैकी 178 उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन मुलाखती दिल्या व मुलाखती दिलेल्या उमेदवारापैकी 113 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
या मेळाव्यात नामांकित खासगी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. यामध्ये इंदिराबाई मेघे महाविद्यालयाचे प्राचार्य अजय कोल्हे, डाटानोवा टेक्नॉलॉजी प्रा.ली. चे निशांत गिरी, भारतीय महाविद्यालयाचे आवारे, जिओ स्टोअर चे महेश कुंभार, हितेश गावंडे, सचिन निचले, शुभम ठवकर या उद्योजकांनी उपस्थित राहून निवड प्रक्रिया पार पाडली तसेच त्यांनी उपस्थित उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन विविध पदांवर प्राधानिक निवड केली.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, अनिषेक ठाकरे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश सोहळे यांनी तर आभार प्रदर्शन पंकज कचरे यांनी केले.
000000
कापुसतळणीत शुक्रवारी 'गाव भेट
उपक्रम'
*'शेतकरी-महिला संवाद' कार्यक्रमाचे
आयोजन
अमरावती, दि. 18 (जिमाका): महसूल विभागातर्फे शुक्रवार,
दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता 'गाव भेट उपक्रम 2026' अंतर्गत ग्रामपंचायत
कार्यालय, कापुसतळणी, ता. अमरावती येथे शेतकरी व महिला संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात
आला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात
आहे.
यावेही आमदार राजेश वानखडे, अमरावतीचे उपविभागीय अधिकारी
अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात महिलांच्या आरोग्यासाठी
कॅन्सर तज्ज्ञ डॉ. अरोरा हे 'महिला संबंधित कर्करोग' यावर मार्गदर्शन करणार आहेत.
शिबिरादरम्यान विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत,
ज्यात प्रामुख्याने गावात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात
आले आहे. तसेच महिलांच्या आरोग्यासाठी विशेष तपासणी शिबीर, नागरिकांच्या महसूल विभागाशी
संबंधित तक्रारींचे जागीच निवारण, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन,
जनावरांच्या आरोग्यासाठी तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला परिसरातील
नागरिक, शेतकरी आणि महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राजस्व मंडळ डवरगाव आणि तहसील
कार्यालय, अमरावती यांनी केले आहे.
000000
‘जनसंवाद’मध्ये 1200 नागरिकांनी मांडल्या समस्या
*‘जनसंवाद’ला जिल्ह्यात मिळाला उत्स्फुर्त प्रतिसाद
* जागेवरच 137 निकाली, गावातच ऐकल्या समस्या
अमरावती, दि. 18 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या समस्या निवारणासाठी आज एकाच दिवशी तालुकास्तरावर 'जनसंवाद व तक्रार निवारण' कार्यक्रम पार पडला. जिल्ह्यातील 14 तालुक्यात 1197 तक्रारी प्रत्यक्ष येऊन समस्या मांडल्यात. यातील 137 तक्रारींवर जागेवरच समाधान करण्यात आले.
जिल्ह्यातील आज पार पडलेल्या तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. अमरावती तालुक्यात 52, तिवसा 35, भातकुली 56, दर्यापूर 85, अंजनगाव सुर्जी 123, अचलपूर 76, चांदुर बाजार 48, धारणी 43, चिखलदरा 80, मोर्शी 76, वरूड 110, चांदुर रेल्वे 136, धामणगाव रेल्वे 134, नांदगाव खंडेश्वर 43 अशा एकुण 997 तक्रारी नागरीकांनी दाखल केल्या.
अचलपूर येथे आमदार प्रविण तायडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव, मोर्शी येथे उपजिल्हाधिकारी प्रसेनजित चव्हाण, नांदगाव खंडेश्वर येथे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार अश्विनी जाधव, अमरावती येथे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, तहसिलदार विजय लोखंडे आदींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
धारणी तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत जनसंवाद कार्यक्रम पार पडला. यात ग्रामीण ते शहरी भागातील नागरिकांनी विविध विभागांशी संबंधित समस्या थेट प्रशासनासमोर मांडल्या. विशेषतः वीज वितरण, जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा, जलसंधारण, महसूल, शिक्षण, घरकुल योजना, पुनर्वसन, तसेच गॅस वितरणाशी निगडीत तक्रारींचा समावेश होता.
धारणी येथील कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, धारणी नगरपंचायत अध्यक्ष सुनील चौथमल, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुनिल जाधव, तहसिलदार प्रदीप शेवाळे, गटविकास अधिकारी विजय गायकवाड आदी उपस्थित होते. नागरिकांनी शासन दरबारी आपल्या तक्रारी अधिकृतपणे नोंदविल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महापात्र यांनी प्राप्त तक्रारींचा आढावा घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश दिले. या उपक्रमात नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. जनसंवादाच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न होत आहे.
जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक तक्रारी, विविध विकास कामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव आणि स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला गेला. तसेच तहसील, जिल्हा परिषद, तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव आणि कृषी सहाय्यकांनी उपस्थिती दर्शवून नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले.
जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी समन्वयक अधिकारी नेमून त्यांना तालुकानिहाय जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या मार्गदर्शनात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
00000000
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व आणि विचार आजही सुसंगत
*शिवजयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे विशेष व्याख्यान
*शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती, दि. 18 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमरावती जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या विशेष व्याख्यानाचे आयोजन नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी वक्ते प्रा. प्रेमकुमार बोके तसेच डॉ. वैभव मस्के यांनी शिवरायांची विचारधारा, व्यवस्थापन कौशल्य, कार्यकर्तृत्व, त्यांचे शौर्य तसे त्यांचे आजही सुसंगत असलेले विचार यांची यावेळी उपस्थितांना माहिती दिली.
अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे संचालक श्रीकांत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, तहसीलदार विजय लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.
प्रेमकुमार बोके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंविषयी माहिती दिली. रयतेची काळजी घेणारा, दुष्काळाच्या काळात राज्याची तिजोरी रयतेसाठी खुली करणारा, स्त्रियांचा आदर करणारा, दूरदृष्टी व सूक्ष्म नियोजनात तरबेज, शेत जमिनीची मोजणी करणारा पहिला राजा ते आधुनिक विचारधारा अंगी कारणारा राजा अशा विविध पैलूंवर त्यांनी दाखल्यांसह माहिती दिली.
वैभव मस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची विविध दाखल्यांसह माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीकोन, गुणग्राहकता, उत्तम व्यवस्थापन आणि सर्वधर्मसमभाव वृत्ती, त्यांची प्रसंगावधानता ही विविध प्रसंगातून त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शहरात शिवजयंतीच्या दिवशी, म्हणजे उद्या, 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता भीमटेकडी येथून भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली यशोदा नगर चौक, कल्याण नगर चौक, राजापेठ उड्डाणपूल, राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक, चित्रा चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशा मुख्य मार्गावरून जात शिवटेकडी येथील शिवाजी महाराज पुतळ्यापाशी विसर्जित होईल. या रॅलीचे खास आकर्षण म्हणजे मार्गातील ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. राजकमल चौक, इर्विन चौक आणि माँ जिजाऊ पुतळा परिसर येथे शिवरायांच्या जीवनावर आधारित पथनाट्य सादर केले जाणार आहे. तसेच माँ जिजाऊंच्या पुतळ्याजवळ वीररसातील पोवाड्याचे सादरीकरण करून शिवरायांना मानवंदना दिली जाईल. या सर्व कार्यक्रमांमध्ये अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी प्रास्ताविकेतून केले.
कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार नायब तहसीलदार श्री रासेकर यांनी मानले.
0000000
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आधार अपडेट प्रलंबित;
कर्जमाफीच्या लाभासाठी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन
अमरावती, दि. 18 (जिमाका): राज्य शासनाकडून शेती क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रस्तावित कर्ज निवारण योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, अमरावती जिल्ह्यातील थकीत कर्जदार शेतकरी सभासदांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 294 शेतकरी सभासदांचे आधार क्रमांक प्राप्त झाले नसल्याने त्यांच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेत तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे.
शासनाच्या प्रस्तावित कर्जमाफी पोर्टलवर अमरावती जिल्ह्यातील एकूण 73 हजार 413 खाती नोंदवण्यात आली आहेत. यापैकी प्राथमिक कृषी पत पुरवठा सेवा सहकारी संस्थांचे 1 हजार 450 थकीत कर्जदार आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा स्तरावरील 1 हजार 844 कर्जदार अशा एकूण 3 हजार 294 सभासदांची आधार कार्ड माहिती अद्याप अप्राप्त आहे. विहित नमुना प्रपत्र 'अ' व 'ब' मध्ये ही माहिती भरण्याचे काम सध्या सेवा सहकारी संस्था आणि बँक स्तरावर सुरू आहे.
ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक प्रलंबित आहेत, त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांना प्रस्तावित योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील संबंधित सर्व शेतकरी सभासदांनी आपल्या संस्थेचे सचिव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली अधिकारी किंवा तालुका उप/सहायक निबंधक कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा. संपर्काच्या वेळी आपले आधार कार्ड व आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन विभागीय सहनिबंधक आणि जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी केले आहे.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment