Sunday, June 23, 2024

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सपत्नीक घेतले श्री अंबा व श्री एकविरा देवीचे दर्शन

 





केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सपत्नीक घेतले श्री अंबा व श्री एकविरा देवीचे दर्शन

 

     अमरावती, दि. 23 (जिमाका) :  केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आज अमरावती दौऱ्यावर आले होते. आज त्यांनी सपत्नीक विदर्भाची कुलदेवता असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले. श्री अंबादेवी व श्री एकविरा  संस्थाच्यावतीने केंद्रीय मंत्री श्री. गडकरी तसेच त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांचा शाल, श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रविण पोटे-पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

     श्री अंबादेवी संस्थानाचे अध्यक्ष विद्या देशपांडे, सचिव रवींद्र कर्वे, विश्वस्त विलास मराठे, किशोर बेंद्रे, सुरेंद्र भुरंगे, अशोक खंडेलवाल, डॉ. यशवंत मशानकर, जयंत पांढरीकर यांनी तर श्री एकविरा देवी संस्थानाचे अध्यक्ष डॉ. अनिल खरया, सचिव चंद्रशेखर कुळकर्णी, विश्वस्त राजेंद्र टेंबे यांनी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांचा  सपत्नीक सत्कार केला. श्री अंबादेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य सुरू आहे. याबाबत श्री. गडकरी यांनी यावेळी माहिती जाणून घेतली.

मंदिराच्या विकास कामाबाबत सदस्य विलास मराठे यांनी प्रास्ताविकेतून  माहिती दिली. मंदिराच्या विकास कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन श्री. गडकरी यांनी यावेळी दिले.

 

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Saturday, June 22, 2024

पालकमंत्र्यांच्या हस्ते सुपरस्पेशालिटी येथील कॅथलॅबचे लोकार्पण आरोग्य सेवा-सुविधा नियमितपणे सुरु ठेवाव्यात -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील











पालकमंत्र्यांच्या हस्ते सुपरस्पेशालिटी येथील कॅथलॅबचे लोकार्पण

आरोग्य सेवा-सुविधा नियमितपणे सुरु ठेवाव्यात

-पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करुन द्याव्यात


अमरावती, दि. 22 : सुपरस्पेशालिटी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कॅथलॅबमुळे विभागातील सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना हृदयरोगासंबंधीच्या आजारावर उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. नवीन उपचार सेवा-सुविधा कार्यान्वित होत असताना त्या नियमितपणे सुरु राहाव्यात, याची जाणीवपूर्वक खबरदारी घ्यावी, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज रुग्णालय प्रशासनाला दिल्या. 

येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल) उभारण्यात आलेल्या हृदयरोगसंबंधीच्या कॅथलॅबचे लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे-पाटील, आमदार किरण सरनाईक, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, डॉ. मंगेश मेंढे, डॉ. अविनाश चौधरी, पदाधिकारी तुषार भारतीय, निवेदिता दिघडे यांच्यासह सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलचे वैद्यकीय अधिकारी, अधिपरीचारिका व आरोग्य कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, कोविड महामारीच्या संकटाने आरोग्य सेवा-सुविधांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात कॅथलॅब व इतर वैद्यकीय उपचार सुविधा उभारण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे 4 कोटी 21 लक्ष निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून कॅथलॅब उभारण्यात आली आहे. या लॅबच्या माध्यमातून 80 रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. समाजातील गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांसाठी पुरेश्या खाटा व इतर वैद्यकीय सेवा-सुविधा, उपचार यंत्र-साहित्य रुग्णालयास हवे असल्यास त्यांनी मागणीचा प्रस्ताव सादर करावा. त्यास तात्काळ मंजूरी देऊन साहित्य उपलब्ध करुन दिल्या जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

ते पुढे म्हणाले की, गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या आजारांवर मोफत उपचार सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार खर्चाची मर्यादा वाढवून पाच लाख पर्यंत करण्यात आली आहे. या योजनेतून पाच लाखापर्यंत खर्च येणाऱ्या मोठ्या आजारांसाठी उपचार सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. या योजनेचा जनतेनी लाभ घ्यावा. रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवाऱ्याची व भोजनाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. तसेच निम्म्या किंमतीत जीवनाश्यक वस्तू उपलब्ध होतील, यादृष्टीने एखादे फिरते वितरण केंद्र सारखा उपक्रम राबविण्यात यावा. यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग घ्यावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी रुग्णालय प्रशासनाला केल्या. जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाही भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल. डॉक्टरांनीही आरोग्यसेवा हीच खरी ईश्वरसेवा समजून रुग्णांना मनापासून औषधोपचार सेवा-सुविधा पुरवाव्यात, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

यावेळी पालकमंत्र्यांनी कॅथलॅबची पाहणी करुन शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी संवाद साधला.  रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांचे नातेवाईक मंडळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

           0000 

 

विभागीय क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा संकुल येथे आधुनिक क्रीडा सुविधा खेळाडूंना उपलब्ध करुन देणार - पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील



 

विभागीय क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा संकुल येथे आधुनिक

क्रीडा सुविधा खेळाडूंना उपलब्ध करुन देणार

-     पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील


अमरावती, दि. 22 (जिमाका): महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणानुसार विभाग, जिल्हा तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येत आहे. अमरावती जिल्हा क्रीडा क्षेत्रामध्ये पूर्वीपासून अग्रेसर आहे. येथील खेळाडूंना स्थानिक पातळीवर आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा संकुलात अत्याधिक सोयी-सुविधा निर्माण करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.

 जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये आज विभागीय क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा संकुल बांधकामाचा आढावा पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रताप अडसड, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, महानगरपालिका आयुक्त देविदास पवार, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रुपा गिरासे, चंद्रकांत मेहत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक विजय संतान, जि.प. शिक्षणाधिकारी (माध्य) प्रतिनिधी निखिल मानकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

 पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, जिल्हा क्रीडा संकुल येथे बहुउद्देशीय हॉल, जीम हॉल, ऑफिस कार्यालय, आंतरराष्ट्रीय आर्चरी रेंज सौंदर्यीकरण इत्यादी कामे पूर्ण झालेली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा क्रीडा संकुलातील अंतिम टप्प्यातील किरकोळ कामे तात्काळ पूर्ण करावी. मुला-मुलींकरीता वसतिगृह, कँटिन, सिंथेटिक ट्रॅक, कबड्डी, हॉलीबॉल, खो-खो, क्रिकेट यासारख्या स्थानिक खेळांच्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव क्रीडा विभागाने तात्काळ सादर करावा. तसेच विजेच्या वापराबाबत बचत करण्यासाठी सौर पॅनलवरील प्रकाशझोत, विद्युत व्यवस्था महाऊर्जामार्फत बसविण्यात यावी.

      आंतरराष्ट्रीय खेलो इंडिया आर्चरी रेंज अत्याधुनिक करण्याबाबत कृत्रिम पॉलीमर ग्रास लावण्यासाठी अंदाजपत्रक व आराखडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांना तयार करण्याबाबत यावेळी निर्देश देण्यात आले. सद्यस्थितीत तयार असलेल्या सुविधांची अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण करुन जिल्हा क्रीडा संकुलाचा वापर खेळाडूंना व्हावा, यासाठी ऑगस्ट 2024 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत येथील कामे पूर्णत्वास न्यावी. जेणेकरुन या संकुलाचा लोकार्पण सोहळा करुन खेळाडूंना क्रीडा सुविधा लवकर उपलब्ध करुन देता येईल. येथील कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत क्रीडा विभाग तसेच बांधकाम विभाग यांना निर्देश देण्यात आले.

     क्रीडा संकुलातील सुविधांची देखभाल, दुरुस्ती व व्यवस्थापन होण्यासाठी क्रीडा सुविधा संघटना, तज्ज्ञ मार्गदर्शक, संस्था, मंडळे यांना विहित अटी व शर्तीवर उत्पन्न वाढीच्या दृष्टीने व देखभालीसाठी चालविण्यास द्यावे. तसेच विभागीय क्रीडा संकुलातील उपलब्ध असलेली क्रीडांगणे, 400 मी. धावनपथ यांचे सिंथेटिक अत्याधुनिक क्रीडांगणे तयार करणे व अन्य क्रीडा सुविधा यासाठी संकुलाच्या लगतच्या परिसरातील जागा मागणीचा प्रस्ताव त्वरीत सादर करावा. जेणेकरुन एकाच परिसरात खेळाडूंना अत्याधुनिक क्रीडा सुविधा प्राप्त होतील. तसेच क्रीडा संकुलातील अन्य क्रीडा सुविधांचेही नुतनीकरण करण्यात यावे.

     या संकुलातील क्रीडा सुविधांचा वापर बघता आवश्यक ते मनुष्यबळ बाह्यस्त्रोतावर घेण्यात यावे. तसेच क्रीडा सुविधेकरिता निधी कमी पडत असल्यास केंद्र शासन, राज्य शासन यासह जिल्हा वार्षिक योजना, नाविण्यपूर्ण योजनेतून अतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिला जाईल. अमरावती जिल्ह्यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, ऑलंपिक दर्जाचे खेळाडू निर्माण होऊन विद्यार्थी व युवकांमध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात येतील, असा विश्वास पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

 

00000

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे तात्काळ पूर्ण करा - पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 








जिल्हा वार्षिक योजनेतील कामे तात्काळ पूर्ण करा

-        पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 

अमरावती, दि. 22 (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चा निधी नियोजित कामावर तात्काळ खर्च करा. तसेच आचारसंहितेचा कालावधी लक्षात घेता जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 चा निधी व या कामांवरील निविदा व कार्यालयीन आदेश व अन्य कामे 15 जुलै पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे अमरावती जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्रमुख विभागांकडील विकास कामांची  प्रगती व सद्यस्थिती याबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. सर्वश्री खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त देविदास पवार, अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अधीक्षक अभियंता रुपा गिरासे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, यंदाचे वर्ष निवडणूकांचे आहे. विधानसभा निवडणूकांची आचारसंहिता  लागण्यापूर्वी नियोजित कामांना प्रशासकीय तसेच तांत्रिक मंजूरात प्राप्त करुन कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होतील, यादृष्टीने तातडीने कार्यवाही करा. नागरिकांनी दिलेल्या कराचा विनियोग योग्यरितीने होत आहे, यासाठी नागरिकांची मतेही जाणून घ्या. 15 जुलैपूर्वी सर्व निविदा पूर्ण करा. मोठ्या निधीची कामे कंत्राटदारांमार्फत अडली असल्यास कंत्राटदारांच्याही अडचणी समजून घेण्यासाठी त्यांची बैठक घ्यावी. शेती, उद्योग व जनजीवन प्रभावित करणाऱ्या कामांना अधिक प्राधान्य द्यावे. शहराच्या सर्वांगिण विकासाबरोबरच आरोग्य, शिक्षण, उद्योग त्याचप्रमाणे पर्यटन आणि मानवी विकासासंदर्भात असणाऱ्या योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी सहकार्य आणि आत्मियतेने सर्व यंत्रणांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

पालकमंत्री श्री. पाटील यांनी विविध विभाग प्रमुखांशी संवाद साधून त्यांच्या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. वन विभागाने त्यांच्याशी निगडित अन्य विभागांशी समन्वय साधून प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा करावा. वनसंरक्षण करतानाच स्थानिकांना विश्वासात घ्यावे. तसेच मृद व जलसंधारण विभागाने कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाऱ्याचे बांधकाम त्वरीत पूर्ण करावे. गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त असल्यामुळे त्यावर विशेष भर द्या. शेतकऱ्यांच्या वीज जोडणीच्या संदर्भात ऊर्जा विभागाने युध्दपातळीवर कामे पूर्ण करावी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलजीवन मिशनची कामे त्वरीत पूर्ण करावी. कृषी विभागाने बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी अशी बियाणे विक्री करणाऱ्या परवानाधारकांवर कठोर कार्यवाही करावी. तसेच बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी पर्यायी वाण वापरण्यासाठी शेतकऱ्यांना सूचित करावे.

 

रासायनिक खतांची मागणी, पुरवठा व विक्री यांचा योग्य ताळमेळ राहावा. शेतकऱ्यांना बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध असावा. महानगरपालिकेने लाभार्थ्यांच्या सदनिका तसेच शाळेचे बांधकाम करताना ते वॉटरप्रुफ असावे. पोलीस विभागाने अमरावती शहर तसेच ग्रामीण विभागातील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त साहित्य वापरावे. गुन्ह्यांचा तपास करताना त्यामध्ये ए.आय. (आर्टिफिशियल इंटेलिजेन्स) चा वापर प्रभावी पद्धतीने व्हावा यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.       

 

जिल्हा समाज कल्याण विभाग (जि.प.), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा उद्योग विभाग, सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग, महापारेषण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा मार्केटिंग कार्यालय, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालय, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांच्या विभाग प्रमुखांशी पालकमंत्री  श्री. पाटील यांनी संवाद साधून नियोजित कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

 

00000

Friday, June 21, 2024

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; निरोगी स्वास्थाकरीता नियमित योग आवश्यक-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 






आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा;

निरोगी स्वास्थाकरीता नियमित योग आवश्यक-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

          अमरावती, दि. 21 (जिमाका): दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन आज सकाळी 7 वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची असल्यास योग करणे आवश्यक आहे. योग जीवनाचा अविभाज्य अंग असून निरोगी स्वास्थाकरीता नियमित योग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

 

              प्राचिन भारतीय संस्कृतीने अवघ्या जगाला दिलेली एक अमुल्य देन म्हणजे योग होय.  माणसाला आंतरबाह्य निरोगी करून दिर्घ आयुष्य प्रदान करण्याचे सामार्थ्य योगात आहे. आज संपूर्ण जगाने योगाभ्यासाचा केलेला स्विकार हे त्याचेच प्रतिक आहे. जीवन तनाव मुक्त, भय मुक्त आणि निरोगी राहावे. या हितुने आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्यावतीने योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये जिल्हा प्रशासन,  क्रीडा व युवक सेवा अमरावती विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय, महानगर पालिका, राष्ट्रीय छात्र सेना,  स्काउट गाईड शारिरीक शिक्षण संघटना नेहरु युवा केंद्र, बृहमहाराष्ट्र योग परिषद, श्री रविशंकर आर्ट ऑफ लिव्हींग, आरोग्य भारती महिला पंतजली योग समिती, भारत स्वाभिमान ट्रस्ट, युवा भारत किमान पंचायत, वंदे मातरम योग प्रसारक मंडळ, अमरावती व जिल्ह्यातील विविध योग संघटना, खेळ संघटना क्रीडा मंडळे, विविध शाळेतील विद्यार्थी, खेळाडू, युवक-युवती, नागरीक, अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. 

 

         आंतरराष्ट्रीय योग दिनांचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जोगी, क्रीडा व युवक सेवाचे उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, उपायुक्त समाज कल्याण अधिकारी सुनिल वारे, सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, शिक्षणाधिकारी प्रीती देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदि उपस्थित होते.

 

           समाजकल्याण उपायुक्त सुनिल वारे व समाज कल्याणचे सहायक आयुक्त माया केदार यांनी उपस्थितांना व्यसन मुक्तीची शपथ आणि स्क्रीन ॲडीक्शन विषयी मार्गदर्शन केले. योग कार्यक्रमाचे सुत्र संचालन आर्ट ऑफ लिव्हींगचे निरज अग्रवाल तर आभार प्रदर्शन योगेश राठी यांनी केले. तसेच मंचावरील प्रात्यक्षिक कविता मोटवाणी, पुनम राठी, नेहा कातपुरे यांनी केले. 

0000

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा 22 जून रोजी अमरावती दौरा

 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

यांचा 22 जून रोजी अमरावती दौरा

अमरावती, दि. 22 (जिमाका) : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा शनिवार, (दि. 22 जून 2024) रोजीचा अमरावती दौरा पुढीलप्रमाणे:

 

 शनिवार, दि. 22 जून रोजी सकाळी 6.30 वाजता रवि भवन, नागपूर येथून शासकीय वाहनाने अमरावतीकडे प्रयाण. सकाळी 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे अमरावती जिल्ह्यातील सर्व विभागांच्या विभाग प्रमुखांची आढावा बैठक.

 

सकाळी 10.30 जिल्हाधिकारी कार्यालय येथे अमरावती जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रमुख विभागांकडील विकास कामांच्या प्रगतीबाबत आढावा. सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा क्रीडा संकुल समिती व विभागीय क्रीडा संकुल समिती आढावा सभा. दुपारी 12.10 वाजता जिल्हा सामान्य रूग्णालय परिसर येथे अमरावती जिल्हा वार्षिक योजना निधीमधून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उभारलेल्या कॅथ लॅबच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 12.40 शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 2.10 वाजता शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्र, धामक (बेलोरा), ता. नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावतीकडे प्रयाण.

 

दुपारी 3 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, धामक, ता. नांदगाव खंडेश्वर येथे आगमन व प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव खंडेश्वर येथे या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. मातोश्री पाणंद योजनेंतर्गत मंजूर पाणंद रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. अर्थसंकल्पीय निधीतून  . जिल्ह्यातील बेलोरा -धामक -येवती - पिंप्री - -कलगा -वाघोडा -शेलु - नटवा - फुबगाव रस्ता सुधारणा प्रजिमा-32 कि. मी. 7/00ते 11/00 या रस्त्याचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सोयीनुसार धामक ता. नांदगाव खंडेश्वर येथून वाहनाने नागपूरकडे प्रयाण.

00000

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा दि. 23 जून रोजी अमरावती दौरा

 

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा

दि. 23 जून रोजी अमरावती दौरा

         

         अमरावती, दि 22 (जिमाका) : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे रविवार, दि. 23 जून रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-

             

          रविवार, दि. 23 जुन रोजी सकाळी 9.30 वाजता नागपूर येथून अमरावतीकडे प्रयाण. सकाळी 11.40 वाजता श्री. अंबादेवीचे दर्शन. दुपारी 12.15 वाजता राजकमल चौक येथे डॉ. पाठक सुपर व्हिजन आय केअर ॲन्ड लेजर सेंटरचे उद्घाटन. दुपारी 1 वाजता रिम्स हॉस्पीटल,  बडनेरा रोड येथे किडनी ट्रान्सप्लांट व अवयव पुनप्राप्ती केंद्राचे उद्घाटन. दुपारी 1.40 वाजता महिन्द्रा रहाटगावकर, श्रीकृष्ण पेठ यांच्या घरी सदिच्छा भेट. दुपारी 3 वाजता राखीव. दुपारी 4.10 वाजता अमरावती येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...