मतदानासाठी 20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर
अमरावती , दि. 7 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक-2024चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीचे मतदान दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी होणार आहे. या निवडणुकीमध्ये 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 मधील कलम 135 (ब) नुसार उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या दि. 24 ऑक्टोबरच्या शासन परिपत्रकानुसार हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्यास सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या दिवशी मोठ्या संख्येने मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळ, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील.
मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सुट्टी देण्यात येते किंवा कामाच्या ठिकाणी योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये संस्था, खासगी आस्थापना इत्यादी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन या विधानसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे.
ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळ, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत मिळणार आहे.
कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक आहे. उद्योग विभागांतर्गत येणारे सर्व महामंडळ, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी या सूचनांचे योग्य अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहेत.
00000
तिवसा येथील जप्तीतील मुद्देमाल वैध
अमरावती, दि. 7 (जिमाका) :विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 साठी आदर्श आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहिता दरम्यान 39 - तिवसा मतदार संघात निगराणी पथक तयार करण्यात आले आहे. ही पथके नियमित वाहनांची तपासणी करतात. तपासणी करताना त्यांना 5 नोव्हेंबर 2024 रोजी बोलेरो या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता यात मुद्देमाल आढळून आला. यात 229.614 किलोग्रॅम चांदी व 4.392 किलोग्रॅम सोने आढळून आले. यावेळी वाहनासह असलेले कर्मचारी याबाबत समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत. हे वाहन सिक्वेल ग्लोबल प्रेशिअस लॉजिस्टिक्स या कंपनीचे असल्याचे कळले.
यानंतर या कंपनीला लेखी नोटीस व दूरध्वनीद्वारे आपली खरेदी पावती व आवश्यक सर्व दस्ताऐवजासह लेखी नोंद देण्याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर या कुरिअर कंपनीचे सेल्स मॅनेजर संतोष खुशालसिंग धोटियाल व जितेंद्र नरेश पवनीकर यांनी लेखी म्हणणे व आवश्यक वैध दस्तावेज पोलीस अधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी तसेच अन्य संबंधितांच्या सक्षम सादर केले. तसेच वाहनाचे वजनही इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर केले असता योग्य आढळून आले. याबाबतचा सर्व दस्तावेज व अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा तक्रार समितीचे अध्यक्ष संजिता मोहोपात्र यांच्याकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती 39 -तिवसा विधानसभा मतदार संघातील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे .
00000
जिल्ह्यात गुरूवारपासून तीन दिवस गृहमतदान
*ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना सुविधा
*2,862 मतदार मतदानासाठी पात्र
अमरावती, दि. 7 (जिमाका): निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात गुरूवार, दि. 14 नोव्हेंबरपासून गृहमतदानास सुरूवात होणार आहे. सलग तीन दिवस शनिवार, दि. 16 नोव्हेंबरपर्यंत हे मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील नागरिक आणि दिव्यांगांना घरून मतदान करण्याची सोय दिली आहे. यासाठी त्यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत 12 डी फॉर्म भरून द्यावा लागला. या फॉर्मची तपासणी केल्यानंतर जिल्ह्यातील 2 हजार 862 मतदार पात्र गृहमतदानासाठी ठरले आहेत. 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये धामणगाव रेल्वे मतदारसंघात 360, बडनेरा 192, अमरावती 221, तिवसा 484, दर्यापूर 273, मेळघाट 150, अचलपूर 388, मोर्शी 354 असे एकूण यात 2 हजार 422 ज्येष्ठ नागरिक मतदार मतदान करणार आहेत.
त्यासोबतच धामणगाव रेल्वे मतदारसंघात 52, बडनेरा 53, अमरावती 82, तिवसा 47, दर्यापूर 48, मेळघाट 22, अचलपूर 67, मोर्शी 69 असे एकूण यात 440 दिव्यांग मतदार मतदान करणार आहेत.
गृहमतदानासाठी विधानसभानिहाय चमू तयार करण्यात आली आहे. धामणगाव रेल्वे मतदारसंघात 20, बडनेरा 25, अमरावती 19, तिवसा 15, दर्यापूर 15, मेळघाट 14, अचलपूर 15, मोर्शी 16 अशा 139 गृहमतदानाची नोंदणी केल्या मतदारांच्या घरी जाऊन पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करून घेणार आहे.
गृहमतदानाची प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने करण्यात येणार आहे. मतदारांनी लेखी मागणी केल्यास त्यांना मदतनीसाची मदत घेता येणार आहे. मात्र एका मदतनीसाला केवळ एका मतदाराला मदत करता येणार आहे. गृहमतदानाच्या प्रक्रियेचे निरीक्षक करावयाचे असल्यास राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment