Friday, November 8, 2024

DIO NEWS AMRAVATI 08.11.2024













                                               जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वोटर स्लिप चे नागरिकांना वाटप

जिल्हाधिकाऱ्यांनी केली विविध मतदान केंद्राची पाहणी

 

अमरावती, दि . 8 (जिमाका) :  विधानसभा  सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते  आज नागरिकांना वोटर स्लिप  व गुलाबपुष्प देवून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी 'आम्ही मतदानाचा हक्क निश्चित बजावू व राष्ट्रीय कार्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेवू', अशी ग्वाही दिली .

    जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी आज अमरावती तसेच बडनेरा येथील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील, कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव  आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

       निवडणूक प्रक्रियेत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय राखावा. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध असल्याची खात्री उपविभागीय अधिकारी यांनी करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी दिले .

            मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था, आवश्यक असेल तिथे पेंडॉल, स्वच्छतागृहे या मूलभूत  सोयी-सुविधा असणे आवश्यक आहे. मतदान करतेवेळी त्या कक्षामध्ये चांगला प्रकाशझोत असावा. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन, मतदार संख्या आणि होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीबाबत तात्काळ अद्ययावत माहिती अपलोड करावी, असेही ते यावेळी म्हणाले.

            जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जुनी वस्ती, बडनेरा येथील अमरावती मनपा उर्दू प्राथमिक कन्या शाळा क्रमांक -3,  साईनगर येथील साईबाबा विद्यालय, हलिमा उर्दू शाळा, बिस्मिल्ला नगर येथील मनपा उर्दू प्राथमिक शाळा, जमील कॉलनी येथील मनपा उर्दू हायस्कूल, छत्रसालगंज येथील मनपा हिंदी प्राथमिक शाळा क्रमांक -2, वलगाव रोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्योचित ॲकेडेमीक माध्यमिक शाळा या मतदान केंद्रांना भेट देऊन तेथे व्यवस्थेची पाहणी केली.

     'मी मतदान करणारच' या सेल्फी पॉईंटवर जिल्हाधिकारी तसेच सर्व मान्यवर यांनी सेल्फी काढून मतदानाचा हक्क बजावण्याबाबत  नागरिकांना आवाहन केले.  पोलीस आयुक्त श्री. रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती मोहपात्र, मनपा आयुक्त श्री कलंत्रे यांनीही यावेळी  नागरिकांना मतदानाचा हक्क बजावून  राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, आम्हीही करतो, तुम्हीही मतदान करा, असा संदेश दिला. यावेळी नागरिकांनी  मतदानाचा हक्क बजावण्याबाबत प्रतिज्ञा घेतली.  चांदणी चौक ते राजकमल चौक या मार्गाने मतदानाबाबत जनजागृती करणारी रॅली यावेळी काढण्यात आली.

0000

 

‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी पाच पाणीपाळ्या प्रस्तावित

शेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन

       अमरावती, दि. 08 (जिमाका): उर्ध्व वर्धा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी  पाणीसाठा उपलब्ध असून पाच पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी 10 नोव्हेंबरपूर्वी संबंधित शाखा कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

       उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून  14.34 किमीपर्यंत व डावा मुख्य कालव्याच्या  22.44 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसूचित नदीनाल्यांवरील लाभधारकांना रब्बी हंगामासाठी  पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तिथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार  ‘पुच्छ भागाकडून ते मुखाकडे’ (टेल टु हेड) या तत्त्वानुसार सिंचन होणे आवश्यक आहे.

नोव्हेंबर ते मार्च दरम्यान पाच वेळा पाणी मिळेल.

       कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7 संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून 10  नोव्हेंबरपर्यंत तिथेच सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. रब्बी हंगामात  नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंत  या कालावधीत मागणीप्रमाणे पाच पाणी पाळ्या देण्यात येतील.

लाभधारकांनी नियम पाळणे आवश्यक

            इच्छुक लाभधारकांनी त्यांच्याकडील थकबाकीची एक तृतीयांश व चालू हंगामाची अग्रिम पाणीपट्टी भरावी. उपसा सिंचन लाभधारकांनी नळमार्गावर पाणी मोजमाप यंत्र बसवावे. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर या पटीत असावे. पाणी अर्ज मंजूर करुन घेऊनच उपसा सिंचनासाठी पाणी वापर करावा.

             मंजूर क्षेत्रासाठी कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. उपसा सिंचन धारकांनी (उदा. कालवा, नदी व नाले) पाणी मंजुर करून घेवूनच उपसा सिंचनास पाणी वापर करावा. पाटबंधारे अधिनियमानुसार प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 20 टक्के  दर लागू असेल.

पाणीपट्टी न भरणा-या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाही. व त्यांचा पाणीपुरवठा केव्हाही बंद करण्यात येईल व थकबाकीवर शासन निर्णय नियमानुसार द.सा.द.शे. 10 टक्के दरान विलंब आकारण्यात येईल.

शेतचारा स्वच्छ ठेवा

कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची आहे. शेतचारी स्वच्छतेअभावी पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय आल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. उडाफ्याचे क्षेत्रास पाणीपुरवठा करण्यात येणार नाही व तसेच लाभधारकांनी मंजूर क्षेत्राचे मर्यादेपर्यंत कालवा व नदी-नाल्याच्या पाण्याचा वापर करावा. मंजूरीपेक्षा जादा क्षेत्र भिजविल्यास व अनधिकृतपणे पाणी घेतल्यास नियमाप्रमाणे पंचनामा करुन दंडनीय आकारणी करण्यात येईल. मंजूर न केलेल्या क्षेत्रास पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही.

     लाभधारकाने दिवस व रात्री पाणी घेणे बंधनकारक आहे. अडचणी असल्यास कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता पाणी पाळी पत्रकात बदल करण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांना राहतील.

थकबाकीदार लाभधारक व थकबाकीदार पाणीवापर संस्थांना पाणी देणे बंधनकारक राहणार नाही.   वितरिका पाणी पाळीमध्ये पाणी चालू असताना लाभधारक वितरिकेचा दरवाजा  वेळी-अवेळी कमी-जास्त प्रमाणात उघडतात. त्यामुळे त्या वितरिकेवरील चालू असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी जास्त होऊन ‘टेल टू हेड’ सिंचनावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे त्या वितरिकावरील पिकांना संचलनाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे प्रस्तावित पाणी पाळी कालावधीत वाढ होते.

 

रब्बी हंगाम 2024-25 संभाव्य पाणी पाळी नियोजन

कालव्यात पाणी सोडण्याचा कालावधी  दि. 15 नोव्हेंबर  ते 29 नोव्हेंबर 2024  (15 दिवस) तर  कालवा बंद कालावधी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2024 राहील. दि. 7 डिसेंबर 2024 ते 21 डिसेंबर 2024 कालव्यात  (15 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 22 ते 28  डिसेंबर 2024  कालवा बंद राहील. दि. 29 डिसेंबर ते  दि. 1 जानेवारी 2025 (15 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 13 ते 19 जानेवारी 2025 कालवा बंद राहील.  दि. 20 ते  दि. 3  फेब्रुवारी 2025 (15 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर  दि. 4 ते दि. 10 फेब्रुवारी 2025  कालवा बंद राहील. दि. 11  ते 25 फेब्रुवारी 2025 (15 दिवस) पाणी सोडण्यात येईल. तर दि. 26 फेब्रुवारी ते दि. 4 मार्च 2025 कालवा बंद राहील.  कालव्यात एकूण 75 दिवस पाणी सोडण्यात येईल.

जर लाभधारकांनी संचलन कार्यक्रमाप्रमाणे टेल टू हेड रात्रंदिवस शेजपाळीपध्दतीने पिकांना पाणी घेतले तर संभाव्य पाणीपाळीचा कालावधी कमी होवून पाण्याचा अधिकाधिक लाभ होईल. संपूर्ण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनी कोठेही दारे स्वतः उघडून टेल टू हेड सिंचन प्रकारात अडथळा आणल्यास पाण्याचा नाश तर होतोच शिवाय पाणीपाळी कालावधी वाढतो. उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.

000000

मध्यप्रदेशातून येणा-या अवैध गावठी हातभट्टी दारुवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

 

            अमरावती, दि. 08 (जिमाका): विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ, राज्य उत्पादन शुल्क अमरावती विभाग व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्रीमती ज्ञानेश्वरी आहेर  यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श आचारसंहीता विधानसभा निवडणुक - 2024च्या पार्श्वभूमीवर विशेष मोहिमेत भरारी पथक यांनी नुकतीच धारूळ ते चिंचोली रोडवर, बस थांब्यांच्या बाजुला ता. मोशी येथे एक बजाज कंपनीची डिस्ककवर दुचाकी मोटरसायकल, (क्रमांक एमएच 27 ऐपी 1399 )  दुचाकीच्या मागील सीटवर एका नॉयलानच्या पोत्यात दोरीच्या साहाय्याने बांधलेला रबरी ट्युबमध्ये अंदाजे 70 लीटर गावठी हातभट्टी दारु भरलेली होती. कारवाई दरम्यान दुचाकी वाहनासह गावठी हातभट्टी दारुची अंदाजे किंमत 55 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी इसम रामकिशन झनकराम धुर्वे, वय 35  वर्ष, रा. तरोडा ता. मोर्शी यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदयानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

            तसेच धामणगाव गढ़ी ते धारणी रोडवर वझ्झर धरणाजवळ ता. अचलपुर येथे एक दुचाकी मोटरसायकल ( क्रमांक एमएच 27 / 7154) या दुचाकीच्या मागील सीटवर एका नॉयलानच्या पोत्यात दोरीच्या साहाय्याने बांधलेल्या 60 लीटर क्षमतेच्या एक रबरी ट्युब व 30 लीटर क्षमतेचे दोन रबरी ट्युबमध्ये अंदाजे 120 लीटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. कारवाई दरम्यान दुचाकी वाहनासह गावठी हातभट्टी दारुची अंदाजे कींमत 52 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी आरोपी इसम आकाश गणेश उईके, वय 28 वर्ष, रा. गौलान मोहल्ला खोमई ता. भैसदेही, जि. बैतुल यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदयानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

       ही कारवाई दुय्यम निरीक्षक एस.पी. वायाळ, पी. पी. देशमुख,  एस. एस. पेंढारकर, एस टी. जाधव, पी. आर. भोरे, जवान के. एम. मातकर,  व्ही. बी. पारखी, डी. डी. मानकर यांचे संयुक्त पथकाने केली. या कारवाईचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. पी. वायाळ व पी. पी. देशमुख भरारी पथक हे करीत आहेत.

0000

खर्च संनियंत्रण पथकाकडून उमेदवारांच्या लेख्यांची प्रथम तपासणी पूर्ण

 

            अमरावती, दि. 08 (जिमाका): विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करण्यात आली. यानंतर पहिली तपासणी 11 नोव्हेंबर तर दुसरी तपासणी 15 नोवव्हेंबर रोजी होणार आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक - 2024 च्या अनुषंगाने अमरावती विधानसभा मतदारसंघात दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक होणार असून निवडणुका शांततापूर्ण, भयमुक्त व पारदर्शकरित्या पार पाडण्यासाठी निवडणुक आयोगाने आदर्श आचार संहिता लागू केलेली आहे. उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्याकरीता भारत निवडणुक आयोगाने खर्च निरीक्षक उमा माहेस्वरी यांची नियुक्ती केली आहे. खर्च निरीक्षक यांनी उमेदवरांच्या लेख्याची तपासणी करण्याकरीता तीन तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यातील पहिली तपासणी खर्च निरीक्षक उमा माहेस्वरी यांचे मार्गदर्शनाखाली  दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी नवीन तहसिल इमारत, दर्यापूर येथील सभागृहात पार पडली.

             उमेदवारांच्या लेख्याच्या तपासणीवेळी एकुण 16 उमेदवारांपैकी 15 उमेदवार, प्रतिनिधी उपस्थित होते. अनुपस्थित एका उमेदवारास 48 तासाचे आत निवडणुक खर्चाचे लेखे निवडणुक संनियंत्रण कक्ष, नवीन तहसिल इमारत, दर्यापूर येथे सादर करण्याबाबत नोटीस देण्यात आली. विहित मुदतीत खर्च सादर न केल्यास कायद्यान्वये तक्रार दाखल करण्यात येईल. तसेच वाहने, सभा इत्यादी साठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असे कळविण्यात आले आहे. या खर्च तपासणीचे वेळी उपस्थित 15 उमेदवार, प्रतिनिधी यांनी त्यांच्या खर्च नोंदवहीत नोंदविलेला खर्च व खर्च सनियंत्रण पथकाद्वारे नोंदविण्यात आलेला खर्च यात असलेली तफावत उमेदवारांनी मान्य करून प्रथम तपासणीत सदर पंधराही उमेदवारांचे खर्च लेख्याचे ताळमेळ घेण्यात आला.

       उमेदवरांच्या लेख्याची दुसरी व तिसरी तपासणी अनुक्रमे दि. 11 व 15 नोव्हेंबर 2024 रोजी नवीन तहसिल इमारत, दर्यापूर येथील सभागृहात आयोजिली आहे, संबंधितांनी याची नोंद घेण्याच्या आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...