Wednesday, November 6, 2024

DIO NEWS AMRAVATI 06.11.2024

 






विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण

- विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

* निवडणूक आयोगाची छत्रपती संभाजीनगरला  बैठक

* जिल्ह्यातील निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा सादर

अमरावती, दि. 6 : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान यंत्र, निवडणुकीसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ, यंत्रणा यासोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी दिली.

निवडणूक आयोगाने संभाजीनगर येथे अमरावती विभागातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा घेतला. या बैठकीला श्रीमती पाण्डेय यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे सहभाग घेतला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह सामान्य निवडणूक निरीक्षक श्यामलाल पुनिया, बिधानचंद्र चौधरी, रवी राजन कुमार विक्रम, पोलीस निरीक्षक बत्तुला गंगाधर, खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावथ, डॉ. उमा माहेश्वरी आदी उपस्थित होते.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहेत. त्यानुषंगाने फिरते पथक, स्थिर पथक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच प्रत्यक्ष निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात त्यांचे दुसरे प्रशिक्षण घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी सुक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यातील दूर्गम भागातील मतदान केंद्राशी संपर्क साधण्याची सुविधा वनविभाग व पोलीसांच्या संपर्क यंत्रणांच्या सहाय्याने कार्यान्वित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांना निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भेटी देऊन याठिकाणच्या सोयी सुविधांची पाहणी करणार आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना योग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासोबतच निवडणूक कामांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सेक्टर ऑफीसर, पोलीस, होम गार्ड यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार आहे. 85 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदान दि. 9 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे, याची राजकीय पक्षांना माहिती आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. याचे दस्तावेज निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तयार करण्यात आले आहे. यासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी स्वीपचे उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रामुख्याने शहरी भागात आणि लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या भागात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी फिरते पथक, स्थिर पथक, खर्च पथक प्रभावीपणे कार्य करीत आहे.

0000

 

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसाठी

अर्ज स्वीकारण्यास 11 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 06 (जिमाका): सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती या कार्यालयामार्फत इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत सन 2024-25 या वर्षातील अर्ज 11 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात  येणार आहे.

वरील योजनेचे अर्ज घेताना विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे, त्या महाविद्यालयाचे बोनाफाईट सर्टिफिकेट व मागील वर्षाची गुणपत्रिका कार्यालयात सादर करावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसाठी वेळापत्रकानुसार निवड प्रकिया राबविण्यात येत आहे. उच्च शिक्षणाचे प्रथम, व्दितीय, तृतीय, चतुर्थ वर्ष अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. 11 नोव्हेंबर पर्यंत 2024 राहील.

00000



मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविणार

-मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र

*8 ते 19 नोव्हेंबरपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन

*प्रत्येक तालुक्यात दोन मोठे कार्यक्रम घेणार

अमरावती, दि. 6 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदार जनजागृतीसाठी स्वीपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात दि. 8 नोव्हेंबरपासून कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. याचे तालुकास्तरावर नियोजन करण्यात यावे, तसेच या आठ दिवसांच्या कालावधीत प्रत्येक तालुक्यात दोन मोठे कार्यक्रम घ्यावेत, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी दिले.

स्वीप उपक्रमांतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा आज घेण्यात आला. श्रीमती महापात्र यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

श्रीमती महापात्र यांनी, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत पिंक फोर्स तयार करण्यात आली होती. यावेळी महिलांनी सक्रीय सहभाग नोंदवावा. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका, उमेद आणि बचतगटांच्या महिलांनी घरोघरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करावे. यावर्षी अंगणवाडी सेविका महिला बचतगटाचे चर्चासत्र घेणार आहे. सदर चर्चासत्र हे सायंकाळच्या वेळेत घेण्यात यावे. पिंकफोर्सच्या माध्यमातून गृहभेटी करण्यात याव्यात.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदानाची टक्केवारी कमी नोंदवली गेली आहे, अशा भागावर लक्ष केंद्रीत करावयाचे आहे. यावेळी महिलांचे मतदान होण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात महिलांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा. महिलांच्या सहभागाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यास मदत होणार आहे. यावेळी 80 टक्के मतदानाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात दोन मोठे उपक्रम राबविण्यात येणार आहे, तसेच आठवडाभरात राबवावयाच्या कार्यक्रमाचे नियोजन तातडीने करण्यात यावे. यावेळी दि. 16 नोव्हेंबर रोजी सर्व तालुक्याच्या ठिकाणी रॅली काढण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

00000




विधानसभा निवडणूक 2024

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे- हिर्देशकुमार

पूर्वतयारी आढावा बैठकीत आयोगाचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर, दि.6 (जिमाका):- निवडणूक प्रक्रिया राबवितांना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये याची खबरदारी  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त  हिर्देशकुमार यांनी आज निवडणूक यंत्रणांना दिले.

            येथील स्मार्ट सिटी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीस राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, अति.मुख्य निवडणूक अधिकारी बी. प्रदीपकुमार, उपसचिव सुमनकुमार, संजयकुमार, अभिलाष कुमार, अनिलकुमार, अविनाशकुमार तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते.

प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता जपा

प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणूक निर्णय अधिकारी यांनाच सर्व प्रक्रिया राबवावयाची आहे. राबवित असलेल्या निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या प्रतिनिधींना माहिती द्यावी व प्रक्रिया राबवावी. त्याचे दस्तऐवजीकरण करावे. त्यांचे शंकानिरसन करावे. निवडणूक प्रक्रिया राबवितांना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,असे हिर्देशकुमार यांनी सांगितले.

मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवा

मतदार याद्यांबाबतही योग्य ती काळजी घेऊन त्या याद्या अधिक बिनचूक असाव्यात. प्रत्येक मतदारापर्यंत मतदान चिठ्ठ्या वेळत पोहोचतील याचे नियोजन करा. मतदार याद्यांविषयी असलेल्या तक्रारींबाबत तात्काळ दखल घ्यावी.  मतदान केंद्रांबाबतही सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. प्रत्येक मतदान केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था, तात्पुरत्या मतदान केंद्रांची मान्यता घेणे, मतदान केंद्राचे ठिकाण बदलले असल्यास त्याबाबत मतदारांपर्यंत माहिती पोहोचविणे, त्याची प्रसिद्धी करणे, विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करणे जसे. पर्यावरणपूरक, महिलांनी, दिव्यांग कर्मचाऱ्यांनी संचलित केलेले इ, मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, रॅम्प, सावली इ. सुविधांची निर्मिती, तसेच वेब कॅमेरे व सीसीटीव्ही कॅमेरे लावून मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करणे, मतदान केंद्राच्या बाहेर व आत कॅमेरे लावावे इ. सुचना दिल्या. तसेच या सर्व सुविधांची पूर्तता झाल्याबाबत व आवश्यकतांबाबत स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांनी स्वतः पाहणी करुन खातरजमा करावी,असे निर्देशही देण्यात आले.

            यंदा मतदान हे नोव्हेंबर महिन्यात असून आता सुर्यास्त लवकर होईल, अशा वेळी सायंकाळी मतदान केंद्रांवर पुरेशा प्रकाशासाठी दिवे लावण्याची सुविधा करावी,अशी सुचना देण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत मतदान केंद्रात मोबाईल नेता येणार नाही, याबाबत योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. टपाली मतदान व गृह मतदान प्रक्रियेबाबतही यंत्रणांनी पूर्ण प्रक्रिया व्यवस्थित राबवावी. गृह मतदान कार्यक्रम अगोदर जाहीर करावा. त्याबाबत उमेदवारांना कळवावे.

मतदान कर्मचाऱ्यांसाठी सुविधा द्या

निवडणूक कामकाजासाठी लागणारे पुरेस मनुष्यबळ उपलब्ध असल्याची खात्री करावी. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना जेवण, पिण्याचे पाणी, कामकाजाची सुविधा, मतदान केंद्रांवर गेल्यावर मुक्काम, मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता, भोजन, पाणी याबाबतची व्यवस्था पुरविण्यात यावी. महिला कर्मचाऱ्यांना विशेष सुरक्षा व सोयी सुविधा द्याव्या. निवडणूक कामकाजात कर्मचाऱ्यांना अचानक उद्भवणाऱ्या आजारांसाठी तात्काळ वैद्यकीय सेवा देण्याचे नियोजन असावे. त्यासाठी स्थानिक पातळीवर रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवाव्या. प्रत्येक निवडणूक कर्मचाऱ्याची योग्य काळजी घेतली जाईल, याची खबरदारी घ्यावी.

सी व्हिजील वरील तक्रारींचे तात्काळ निराकरण करा

प्रत्येक जिल्ह्यात व विधानसभा क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी  सर्व संलग्न जिल्ह्यांच्या पोलीस यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवावा. मद्य, अंमलीपदार्थ, मौल्यवान वस्तू, रोकड यांच्या अवैध वाहतुकीवर नजर ठेवून कारवाई करावी. याबाबत सी व्हिजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करावी. या तक्रारींचे तात्काळ निराकरण  झाले पाहिजे, याबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले.

फेक न्यूजला तात्काळ पायबंद

निवडणूक काळात माध्यमांमध्ये येणाऱ्या बनावट बातम्या, फेक न्यूज अर्थात खोट्या माहितीचे प्रसारण तात्काळ रोखावे. खोटी माहिती असल्यास तिचे प्रसारण रोखून सत्य माहितीचे तात्काळ प्रसारण करावे.  याबाबत या विभागाशी संबंधित बातम्या असतील त्यांनी तात्काळ योग्य माहिती पुरवावी व वस्तूस्थिती जनतेसमोर मांडावी, जेणेकरुन निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होणार नाही व त्याबाबत गैरसमज निर्माण होणार नाही.

मतदार जनजागृतीवर भर द्या

मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी आयोगामार्फत लवकरच ‘स्विप’ उपक्रम मोठ्याप्रमाणावर राबविले जाणार आहेत. ते सर्व उपक्रम आपल्या विधानसभा क्षेत्रात राबवावे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करावे. मतदारांना मतदान करणे सोईचे व सुलभ व्हावे यासाठी उपाययोजना राबवाव्या.

अचूक आकडेवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी

मतदानाचे प्रमाण नेमके कळावे व त्यातील आकडेवारीत अधिक अचूकता यावी यासाठी या निवडणूकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी विधानसभा मतदार संघस्तरावर, जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर नेमण्यात येणार आहे. मतदान टक्केवारीची आकडेवारी बुथनिहाय पडताळणी करुन मतदान टक्केवारी अचूक देण्यात येईल यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचेही निवडणूक उपायुक्त यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एस. चोकलिंगम म्हणाले की, राजकीय पक्ष उमेदवारांना वेळोवेळी अद्यावत निर्णय व माहिती देऊन अवगत करावे.मतमोजणी साठी मतमोजणी केंद्राच्या पुनर्रचनेचा आराखडा नव्याने मंजूर करावयाचा असल्यास त्याचे प्रस्ताव तातडीने पाठवावे. टपाली मतमोजणीबाबतच्या व्यवस्थेसह आराखडा मंजूर करावा. निवडणूक कामकाजाविषयी सर्व अहवाल वेळेत व अचूक पाठविणे आवश्यक आहे. त्यात कोणतीही दिरंगाई व हयगय खपवून घेतली जाणार नाही. सर्व आकडेवारी अचूक पाठवावी. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आपल्या अंतर्गतअसलेल्या सर्व विधानसभा क्षेत्रातील कामकाजावर लक्ष ठेवावे. पैशांचा वापर. माध्यमांमध्ये येणारी माहिती, आणि असामाजिक तत्वांचा वावर याबाबत सजग राहून वेळीच कारवाई करावी.  यांची होती उपस्थिती बैठकीस नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, लातूरचे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे,नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत  राऊत, परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक, लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे,चंद्रपूर जिल्हाधिकारी . विनय गौडा जी सी, गोंदिया जिल्हाधिकारी प्राजित नायर, भंडारा जिल्हाधिकारी संजय कोलते, वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी.एस, वर्धा जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, गडचिरोली, जिल्हाधिकारी संजय दैने, हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल, धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओबांसे, लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, नागपुरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल तसेच बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, नांदेड पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव,गोंदिया पोलीस अधीक्षक    गोरख भामरे,चंद्रपूर पोलीस अधीक्षक रिना जानबंधू,लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे, गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल, परभणी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी,  हिंगोली पोलीस अधीक्षक एस. डी. कोकाटे, भंडारा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन  तसेच दुरदृष्य पद्धतीने  सर्व जिल्ह्यातील अधिकारी व या निवडणूकीसाठी नेमलेले निवडणूक आयोगाचे निरीक्षक सहभागी झाले होते.

0000

 

 


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...