Thursday, November 14, 2024

DIO NEWS AMRAVATI 14.11.2024






                                                       गृहमतदानाला जिल्हाधिकारी यांची भेट

अमरावती, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात आजपासून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या गृहमतदानाला सुरूवात झाली. दर्यापूर मतदारसंघातील गृहमतदानादरम्यान जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी भेट देऊन पाहणी केली.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दर्यापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूकविषयक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. तसेच गृहमतदान सुरू असलेल्या जयबुनाबी मोहम्मद अली, रा. दर्यापूर यांच्या घरी भेट दिली. गृहमतदानाच्या प्रक्रियेविषयी समाधान व्यक्त केले.

यावेळी त्यांनी दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार जनजागृतीकरीता तयार करण्यात आलेले स्वीप मल्टीमिडीया वाहनाला हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मतदान यंत्र असलेल्या स्ट्राँगरूमची पाहणी केली. दर्यापूर विधानसभा मतदारसंघात एकूण 342 मतदान केंद्र आहेत. शहरातील वा. का. धर्माधिकारी नगर परिषद शाळा क्र. 12 येथील पिंक बुथ, जु. मो. लड्डा नगर परिषद शाळा क्र. 7 येथील दिव्यांग कर्मचाऱ्यांचे बुथ आदी ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्व मतदान केंद्रावर पायाभूत सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.

तसेच दर्यापूर विधानसभा मतदारसंघात सुरु असलेल्या निवडणूक विषयक कामकाज सुरु असेलेले पोस्टल बॅलेट विभाग, मतदारयादी कक्ष, निवडणूक साहित्य कक्ष, आचारसंहिता कक्षाला भेट देवून पाहणी केली. तसेच कामकाजाबाबत सूचना दिल्या.

000000

 

बडनेरा विधानसभा क्षेत्रात चार उमेदवारांना नोटीस

उमेदवारांना खर्च सादर करण्याचे निर्देश

अमरावती, दि. 14 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 ची घोषणा निवडणुक आयोगाने केलेली आहे. त्याअनुषंगाने 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुका शांततापूर्ण, भयमुक्त व पारदर्शकरित्या पार पाडण्यासाठी निवडणुक आयोगाने आदर्श आचार संहिता लागू केलेली आहे. उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्याकरीता भारत निवडणुक आयोगाने वेंकन्ना तेजावथ यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. खर्च निरीक्षक यांनी उमेदवरांच्या लेख्याची तपासणी करण्याकरीता तीन तारखा निश्चीत केल्या आहेत. दुसरी तपासणी सभा दिनांक  11 नोव्हेंबर रोजी 2024 पार पडली .

              उमेदवारांच्या लेख्याच्या दुसऱ्या तपासणीवेळी एकुण 26 उमेदवारांपैकी 4 उमेदवार अनुपस्थित होते. अनुपस्थित उमेदवारांना 48 तासाचे आत निवडणुक खर्चाचे लेखे उपविभागीय अधिकारी कार्यालय, जुनी अमरावती तहसील कार्यालय, अमरावती येथे सादर करण्याबाबत नोटीस देण्यात आली. विहित मुदतीत खर्च सादर न केल्यास  तक्रार दाखल करण्यात येईल. तसेच वाहने , सभा इत्यादीसाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असे ०37 -बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विवेक जाधव यांनी कळविले आले.

एकुण 4 उमेदवारांनी दुसऱ्या तपासणीवेळी त्यांचा दैनंदिन खर्चाचा लेखा सादर केला असता तो छायांकित निरीक्षण नोंदवहीसोबत ताळमेळ अंती योग्य वाटला नाही किंवा खर्चाचा काही भाग त्यांनी सादर केलेला नाही. अशा उमेदवारांना उपविभागीय अधिकारी श्री. जाधव यांनी नोटीस दिली आहे . विहित मुदतीत त्यांनी आपले म्हणणे सादर न केल्यास उपरोक्त छायांकित निरीक्षण नोंदवहीनुसार खर्च उमेदवारांना मान्य आहे, असे गृहीत धरुन त्यांच्या निवडणुक खर्चामध्ये समावेश करण्यात येईल. उपरोक्त तफावत मान्य नसल्यास उमेदवारांनी त्यांच्या खुलाश्यामध्ये तो मान्य नसल्याच्या सुस्पष्ट कारणांसह निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे लिखित स्वरुपात सादर करावे लागेल. ते निवेदन खर्च निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा खर्च संनियंत्रण समिती समोर सादर करण्यात येईल. 

 तथापि, दुसऱ्या तपासणी अंती उमेदवारनिहाय खर्च हा तात्पुरत्या स्वरुपाचा असून निकालानंतर आयोजित लेखा ताळमेळ बैठकीमध्ये ताळमेळ घेऊन सदर खर्चास अंतिम स्वरुप देण्यात येईल. अंतिम बैठकीनंतर खर्चाचा ताळमेळ झाल्यानंतरच सदरचा खर्च हा  भारत निवडणुक आयोगास सादर केला जाईल.

 

00000




पं. जवाहरलाल नेहरू यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

         अमरावती, दि.14 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर नेते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान  पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.

         महसुल भवनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात अधीक्षक निलेश खटके यांनी  पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

00000

मतदानाच्या दिवशीचे आठवडी बाजार रद्द

* प्रतिबंधात्मक आदेशही जारी

अमरावती, दि. 14 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. नागरिकांना सोयीचे व्हावे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या दिवशीचे जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहे. यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आदेश दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी होणारे मतदान निर्भय, निरपेक्ष वातावरणात पार पडावे आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कायम राहावी, यासाठी बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यामधील शहरी आणि ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद ठेऊन दुसऱ्या दिवशी किंवा इतर सोयीच्या दिवशी बाजार भरविण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे. बाजार व जत्रा अधिनियम १८६२ चे कलम ५ (अ) (क) (ग) नुसार जिल्हाधिकारी यांना प्राप्त अधिकारानुसार सदर आदेश देण्यात आले आहे.

सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरु आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथक दि. १९ नोव्हेंबर निवडणूक साहित्यासह पोहोचणार आहे. त्यानंतर दि. २० नोव्हेंबर रोजी निर्भय व निरपेक्ष वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडावी यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचार संहिता अंमलात आली आहे. तसेच जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार स्थानिक आठवडी बाजाराच्या निमित्ताने मतदानकेंद्राच्या परिसरात नागरिकांची गर्दी होऊन त्याचा फायदा समाजकंटक कायदा व सुव्यवस्था बाधीत करण्याचा हेतू ठेवणाऱ्यांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच निवडणूक आचारसंहिता भंग करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आदेश देण्यात आले आहेत.

000000

 चांदुर रेल्वे विधानसभा क्षेत्राची दुसरी खर्च तपासणी

सर्व उमेदवारांनी सादर केला खर्च

            अमरावती, दि. 14 (जिमाका) : चांदुर रेल्वे  विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशित उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर रोजी तहसिल कार्यालय ,सभागृह येथे पार पडली. यावेळी सर्व 24 उमेदवारांनी खर्च सादर केला.

दुसरी तपासणी खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावथ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी तो खर्च शॅडो खर्च नोंदवही सोबत तुलना करता खरा व योग्य वाटत नाही किंवा खर्चाचा काही भाग त्यांनी सादर केलेला नाही  त्या उमेदवारांना चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी तेजश्री कोरे  यांनी नोटीस दिली.  नोटीस प्राप्त झाल्यापासून 48 तासाच्या आत आपले म्हणणे लिखित स्वरुपात निवडणुक संनियंत्रण कक्ष, तहसिल कार्यालय, चांदुर रेल्वे येथे सादर करण्यात यावे. विहित मुदतीत त्यांनी आपले म्हणणे सादर न केल्यास उपरोक्त शॅडो खर्च नोंदवहीनुसारचा खर्च उमेदवारांना मान्य आहे असे गृहीत धरुन त्यांच्या निवडणुक खर्चामध्ये समावेश करण्यात येईल. सदर तफावत उमेदवारांना मान्य असल्यास सदर खर्चाचा समावेश उमेदवारांच्या खर्च नोंदवहीत करण्यात येईल. उपरोक्त तफावत आपल्याला मान्य नसल्यास उमेदवारांनी त्याच्या खुलाश्यामध्ये तो मान्य नसल्याच्या सुस्पष्ट कारणांसह निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे लिखित स्वरुपात सादर करावे लागेल व ते निवेदन खर्च निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा खर्च संनियंत्रण समितीसमोर सादर करण्यात येईल. असे उमेदवारांना त्यांच्या नोटीसमध्ये जिल्हा निवडणुक  निर्णय  अधिकारी  यांनी  कळविले आहे.

तथापि दुसऱ्या तपासणी अंती उमेदवारनिहाय खर्च हा तात्पुरत्या स्वरुपाचा असून निकालानंतर आयोजित लेखा ताळमेळ बैठकीमध्ये ताळमेळ येऊन सदर खर्चास अंतिम स्वरूप देण्यात येईल. अंतिम बैठकीनंतर खर्चाचा ताळमेळ झाल्यानंतरच सदरचा खर्च हा  भारत निवडणूक आयोगास सादर केला जाईल. असे उपविभागीय अधिकारी  तथा  निवडणूक अधिकारी  तेजश्री  कोरे यांनी संबंधित उमेदवारांना कळविले आहे.

00000

धारणी विधानसभा क्षेत्राची दुसरी खर्च तपासणी

            अमरावती, दि. 14 (जिमाका) : धारणी  विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशित उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर रोजी उपकोषागार कार्यालय ,धारणी  येथे पार पडली.

दुसरी तपासणी खर्च निरीक्षक उमा माहेश्वरी  यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दि. 12 नोव्हेंबर रोजी उमेदवारांच्या खर्च तपासणीच्या वेळी एकुण 15 उमेदवारांपैकी 13 उमेदवार, प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी  खर्च नोंदवह्या उपलब्ध करुन दिल्या तसेच एकुण 2 उमेदवार, प्रतिनिधी अनुपस्थित होते. तसेच ज्यांच्या खर्च नोंदवह्या तपासणीसाठी उपलब्ध करून दिल्या नाहीत , त्या उमेदवारांना 48 तासाच्या आत निवडणूक खर्चाचे लेखे निवडणुक संनियंत्रण कक्ष ,उपकोषागार कार्यालय , धारणी येथे सादर करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. विहत मुदतीत खर्च सादर न केल्यास  तक्रार दाखल करण्यात येईल . तसेच वाहने सभा इत्यादीसाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या  तात्काळ  प्रभावाने  रद्द  करण्यात  येतील , असे  कळविण्यात आले आहे.

एकूण १३ उमेदवारांनी दुसऱ्या तपासणीवेळी त्याचा दैनंदिन खर्चाचा लेखा सादर केला आहे. त्यापैकी एकूण १३ उमेदवार यांचा खर्च शॅडो खर्च नोंदवही सोबत तुलना करता खरा व योग्य आढळून आलेला आहे. तथापि दुसऱ्या तपासणी अंती  उमेदवारनिहाय खर्च हा तात्पुरत्या स्वरुपाचा असून निकालानंतर लेखा ताळमेळ बैठकीमध्ये ताळमेळ घेऊन सदर खर्चास अंतिम स्वरुप देण्यात येईल. खर्चाचा ताळमेळ झाल्यानंतरच सदरचा खर्च हा भारत निवडणुक आयोगास सादर केला जाईल.

सदर तपासणीवेळी खर्च निरीक्षक उमा माहेश्वरी, नोडल अधिकारी दिनेश मेटकर व विजय देशमुख  उपस्थित होते.

00000

 

दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू

अमरावती, दि. 14 (जिमाका): परिवहनेतर दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी दि 18 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी  2.30  वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालय कॅम्प, अमरावती खिडकी क्रमांक 25 येथे जमा करावेत. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांचा रहिवासाचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे तसेच अर्जामध्ये वाहन ज्या व्यक्तीच्या नावे आहे त्या व्यक्तीचा आधारकार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अमरावती कॅम्प बॅच, ट्रेझरी बॅच कोड ००३८६६ साठी देय असावा.

            एका पसंती क्रमांकासाठी एकाच अर्ज आला असेल त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील त्यांच्या पावती क्रमांकाची यादी दि. 18 नोव्हेंबर रोजी  4 वाजता कार्यालयातील सूचना फलकवर प्रदर्शित करण्यात येईल.एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंती क्रमांकासाठी ज्यांनी अर्ज केला आहे ,अशाच अर्जदारांनी दि. 19 नोव्हेंबर  रोजी  दुपारी 1.30 वाजेपर्यत त्या क्रमांकासाठी  पसंती क्रमांक शुल्काचा डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सिलबंद करून खिडकी क्र. 25 वर जमा करावे. एकाच पसंतीक्रमांसाठी दोन किंवा दोनापेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन सिलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट  धारकांनी दि. 19 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे दालनात उपस्थित रहावे. लिलावासाठी उपस्थित राहणाऱ्या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकारपत्रासह हजर राहावे. कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. विहत वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठलाही प्रकारचा विचार केला जाणार नाही.  पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी किंवा एसएमएस केला जाणार नाही , याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

00000

मागासवर्गीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अर्जातील त्रुटिपूर्ततेसाठी 18 नोव्हेंबरपासून   विशेष मोहिम

अमरावती, दि. 14 (जिमाका): जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावतीच्या वतीने मागासवर्गीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दि.18  ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत विशेष त्रुटिपूर्तता मोहिम  राबविण्यात येणार आहे. सन 2024 वर्षामधील अनुसूचित जाती, इमाव, विमाप्र, व एसईबीसी या राखीव प्रवर्गातून प्रवेशासाठी इच्छुक आणि जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणीच्या अमरावती येथील कार्यालयात प्रस्ताव दाखल करुन पावतीच्या आधारे प्रवेश निश्चित केल्यानंतर अद्यापपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेले विद्यार्थ्यांसाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे. अर्जदार विद्यार्थ्यांनी ई-मेलवर व मेसेजद्वारे समितीकडून कळविण्यात आलेल्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी आपल्या जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जाची पावती, तसेच जाती दावा सिध्द करणारे महसूली, तसेच शालेय पुरावे व सर्व मुळ कागदपत्रांसह समिती कार्यालयात उपस्थित राहावे. व आपल्या प्रकरणातील त्रुटीची पूर्तता करावी. त्रुटीची पूर्तता केलेल्या प्रकरणावर समितीकडून तात्काळ कार्यवाही करुन निर्णय घेण्यात येणार आहे. त्रुटी पुर्ततेअभावी प्रकरणे अर्जदारस्तरावर प्रलंबित राहिल्यास त्यास अर्जदार स्वतः जबाबदार राहणार आहे. या विशेष मोहिमेमध्ये अर्जदार यांनी आपआपले जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाची त्रुटी पूर्तता करुन घ्यावी. जेणे करुन संबंधित अर्जदारास वैधता प्रमाणपत्र निर्गमित करणे समितीस सुलभ होईल.

या मोहिमेचा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा , असे आवाहन  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त तथा सदस्य यांनी केले आहे.

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 14.11.2024

                                                        गृहमतदानाला जिल्हाधिकारी यांची भेट अमरावती, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात आजपासून ज्ये...