मतदान जनजागृतीसाठी तिरंगा महारॅली
मतदारांच्या सक्रीय सहभागाने मतदानाचा
टक्का वाढणार
-जिल्हाधिकारी सौरभ कटियार,
अमरावती, दि 11: स्वीप उपक्रमांतर्गत
जिल्हा प्रशासन, महापालिका आणि विविध संस्था, संघटनांच्या मदतीने आज अमरावती येथे मतदार
जनजागृतीसाठी तिरंगा महारॅली काढण्यात आली.
नेहरू मैदान येथे झालेल्या उद्घाटन
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र,
महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी रॅलीला हिरवा
झेंडा दाखविला. राजकमल, जयस्तंभ, इर्विन चौक
मार्गे ही रॅली निघून विभागीय क्रीडा संकुलात समारोप करण्यात आला.
समारोपावेळी जिल्हाधिकारी श्री.
कटियार यांनी महारॅलीचे आयोजन उत्कृष्ट प्रकारे झाले आहे. यात सर्व नागरिकांनी सहभाग
नोंदविला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविल्यामुळे मतदानाच्या
टक्केवारीत वाढ झाली होती. मात्र शहरी भागात मतदान कमी होत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत
पोहोचून जागरूकता करणे गरजेचे आहे. त्यांच्यापर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचल्यास
मतदानाच्या टक्केवारीत निश्चितच वाढ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपले
कर्तव्य समजून मतदान करावे, असे आवाहन केले.
श्री. कलंत्रे यांनी मतदारांमध्ये
जनजागृतीसाठी रॅलीचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये विविध घटकांनी उत्स्फूर्त सहभाग
नोंदविला. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राथमिक
शाळा रहाटगाव आणि प्रगती विद्यालय रहाटगाव यांनी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून
मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना मतदानाची प्रतिज्ञा
देण्यात आली. तसेच मतदानासाठी नागरिकांना जागरूक करण्यासाठी मान्यवरांनी हवेत फुगे
सोडले.
विभागीय क्रीडा संकुलात मानवी
साखळी करण्यात आली. यातून 'गो वोट'चा संदेश देण्यात आला. तसेच मनपा शाळेने पथनाट्य
सादर करण्यात आले. दिव्यांनी 'गो वोट' साकारण्यात आले. शिक्षणाधिकारी श्री. मेश्राम
यांनी आभार मानले.
00000
दिव्यांगांना मतदानासाठी दिव्यांग रथाची सोय
अमरावती, दि. 11(जिमाका) : अमरावती
विधानसभा मतदारसंघासाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दिव्यांग मतदारांना
मतदान केंद्रावर जाणे सुलभ व्हावे, यासाठी दिव्यांग रथ तयार करण्यात आला आहे. हा दिव्यांग
रथ दिव्यांगांना मतदान केंद्रावर घेऊन जाणार आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या
अनुषंगाने दिव्यांग मतदारांकरीता मतदान केंद्रापर्यंत पोहोचविणेकरीता अमरावती विधानसभा
मतदारसंघात दिव्यांग रथाची सोय करण्यात आली आहे. मतदारसंघ क्षेत्रातील दिव्यांग मतदारांच्या
सोयीकरीता या दिव्यांग रथाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या दिव्यांग मतदारांना मतदानकेंद्रापर्यंत
पोहोचण्यासाठी सहाय्याची गरज आहे, अशा मतदारांनी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी या दिव्यांग
रथाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
तसेच अमरावती विधानसभा मतदारसंघ
क्षेत्रातील दिव्यांग मतदारांकरीता मदत कक्षाची स्थापना केले आहे. दिव्यांग रथाची आवश्यकता
असलेल्या मतदारांना मदत कक्ष प्रतिनिधी तथा ग्राम महसूल अधिकारी सुनिल भगत, संपर्क
क्रमांक 9890698712 यांचेशी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात
आले आहे.
000000
मतदानासाठी कामगारांना सुटी देण्याचे
आवाहन
अपवादात्मक स्थितीत दोन तासांची
सवलत
अमरावती, दि. 11 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत सर्वांना
मतदान करता यावे यासाठी, कामगार आणि कर्मचाऱ्यांना सुटी दयावी, असे आवाहन करण्यात आले
आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान दि. 20 नोव्हेंबर
2024 रोजी होणार आहे. या निवडणूकीमध्ये सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता
यावा यासाठी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक
उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या
निवडणूकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुटी
दिली जाईल. मतदानाच्या दिवशीची सुटी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह,
महामंडळ, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील.
जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील सर्व कामगार, कर्मचारी
मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी. अपवादात्मक
परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर,
मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटी ऐवजी कमीत कमी दोन तासांची
सवलत देता येईल. मात्र त्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, यांची पूर्व
परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची
सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील.
उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळ, उद्योग समुह, कंपन्या
व संस्थामध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन
होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानासाठी सुटी किंवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता
येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरूध्द योग्य कारवाई करण्यात येणार
आहे.
जिल्ह्यातील सर्व कामगार मतदारांना
मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्व प्रकाराच्या आस्थापना धाराकांनी भरपगारी सुटी
द्यावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त यांनी केले आहे.
00000
तिवसा विधानसभा क्षेत्रात तीन
उमेदवारांना नोटीस
*खर्च सादर करण्याचे निर्देश
अमरावती, दि. 11 (जिमाका) : तिवसा
विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशित उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी शुक्रवार, दि.
8 नोव्हेंबर रोजी पार पडली. यात खर्च सादर केलेला नाही, अशा तीन उमेदवारांना नोटीस
देऊन 48 तासाच्या आत खर्च सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
उमेदवारांच्या खर्चावर देखरेख
ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक म्हणून वेंकन्ना तेजावथ यांची नियुक्ती केली आहे.
लेख्यांच्या
पहिल्या तपासणीवेळी एकूण 16 उमेदवारांपैकी 2 उमेदवार अनुपस्थित राहिले. अनुपस्थित उमेदवारांना
48 तासांत निवडणूक खर्चाचे लेखे निवडणूक संनियंत्रण कक्ष, तहसिल कार्यालय, तिवसा येथे
सादर करण्याबाबत नोटीस देण्यात आली. विहित मुदतीत खर्च सादर केला नसल्यास नियमानुसार
तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तात्काळ रद्द
करण्यात येणार आहे.
14 उमेदवारांनी पहिल्या तपासणीवेळी
त्यांचा दैनंदिन खर्चाचा लेखा सादर केला. 11 उमेदवारांनी खर्च जुळलेला असून उर्वरित
3 उमेदवारांनी सादर केला नसल्यास शॅडो खर्चानुसार
खर्च नोंदविण्यात येणार आहे. पहिल्या तपासणीअंती उमेदवारनिहाय खर्च हा तात्पुरत्या
स्वरुपाचा असून निकालानंतर आयोजित लेखा ताळमेळ बैठकीमध्ये ताळमेळ घेऊन सदर खर्चास अंतिम
स्वरुप देण्यात येणार आहे. अंतिम बैठकीनंतर खर्चाचा ताळमेळ झाल्यानंतरच सदरचा खर्च
हा भारत निवडणूक आयोगास सादर केला जाणार आहे, सदर तपासणीवेळी खर्च निरीक्षक वेंकन्ना
तेजावथ, उपविभागीय अधिकारी तथा तिवसा निवडणूक निर्णय अधिकारी मिन्नु पी.एम.,सहायक खर्च निरीक्षक आसिफ गनी, लेखा
अधिकारी डी.बी. जाधव, सहायक लेखा अधिकारी सतिश इंगळे, उपकोषागार अधिकारी तुषार रत्नपारखी,
तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
00000
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांना इफेक्टीव्ह लिसनिंग स्किल या विषयावर मार्गदर्शन
अमरावती, दि. 11 (जिमाका): शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथील विद्यार्थ्यांना 'इफेक्टीव्ह लिसनिंग स्किल '
या विषयावर अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र धुरजड यांनी नुकतेच मार्गदर्शन केले. श्री
धुरजड यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्ष एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना
इफेक्टिव्ह लिसनिंग स्कील या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना याबाबत मार्गदर्शन
केले. नवनिर्मित वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिकाधिक
लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे
अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपअधिष्ठाता डॉ.नितीन अंभोरे
यांनी केले. सहायक प्राध्यापक डॉ. मिनोती पोकळे यांनी संचालन केले तर आभार सहयोगी प्राध्यापक
डॉ. कुमूद हरले यांनी मानले.
000
No comments:
Post a Comment