Thursday, August 16, 2018

चिमूरमध्ये शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन








चिमूर, दि. 16 : चिमूर येथील स्वातंत्र्यलढ्यात बलिदान केलेल्या शहिदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस आज चिमूर येथे क्रांती दिनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आले होते. शहरातील मुख्य मार्गावर असणाऱ्या हुतात्मा स्मारकास त्यांनी भेट दिली. येथे त्यांनी शहिदांच्या स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर त्यांनी किल्ला परिसरातील शहिदांच्या स्मृती भवनाला भेट दिली. याठिकाणी उभारण्यात आलेल्या नागाच्या प्रतिकृती शहीद स्मारकाला व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे वित्त नियोजन वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा उपस्थित होते.
या दोन्ही ठिकाणी शहिदांना नमन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चिमूर येथील बीपीएड कॉलेज येथे आयोजित सभास्थळी भेट दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांच्या मुळे आज स्वातंत्र्य आपल्याला अनुभवता येत आहेत. त्या सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. चिमूरच्या स्वातंत्र्य लढ्यामुळेच नंतरच्या स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणांचे सर्वोच्च बलिदान केले. त्या सर्व शहिदांना मी अभिवादन करतो.                              
त्यानंतर लगेच चिमूर क्रांती लढ्यातील शहिदांना मौन बाळगून श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, खासदार अशोक नेते, आमदार देवराव  होळी, महापौर अंजलीताई घोटेकर आणि या कार्यक्रमाचे आयोजक कीर्तीकुमार भांगडिया, माजी आमदार मितेश भांगडिया, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, संजय देवतळे आदी उपस्थित होते.

'दिलखुलास' कार्यक्रमात संचालक शेखर गायकवाड आणि डॉ. विजय पाखमोडे



मुंबई, दि. १६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात ‘महाराष्ट्र भूजल नियम २०१८’ या विषयावर संचालक शेखर गायकवाड व उपसंचालक डॉ. विजय पाखमोडे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून शुक्रवार दि. १७ आणि शनिवार दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुरेश ठमके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
 महाराष्ट्र भूजल नियम २०१८, भूजल नियमनाची आवश्यकता व पार्श्वभूमी, भूजलाची पातळी कमी होण्याचे व वारंवार दुष्काळ होण्याचे कारण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, भूजल नियमाबाबतच्या हरकती व सूचना, नव्या नियमानुसार पाण्याची तरतूद, शेतकऱ्यांच्या विहिरींची नोंदणी तसेच भूजल नियमाचे दूरगामी परिणाम याबाबतची माहिती श्री.गायकवाड आणि श्री.पाखमोडे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे


  मुंबई, दि. १६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात 'गुणवत्तापूर्ण शिक्षण' या विषयावर शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  विनोद तावडे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक शैलेश पेठे यांनी ही मुलाखत  घेतली आहे.
शालेय शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येणारे 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान', जिल्हा परिषद शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओढा निर्माण होण्यासाठी शासन स्तरावर घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय, विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांचा कल कोणत्या शाखेकडे आहे यासाठी कलमापन चाचणी, व्यवसायाभिमुख शिक्षण आणि ओजस आंतरराष्ट्रीय शाळा याविषयाची माहिती श्री. तावडे यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.

महान क्रिकेटपटू हरपला : मुख्यमंत्री


 माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटमधील एक महान व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
       मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. वाडेकर यांनी खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक, व्यवस्थापक, निवड समिती प्रमुख आणि क्रीडा संघटक अशा विविध भूमिकांतून भारतीय क्रिकेटला अतिशय मोलाचे योगदान दिले होते.वेस्ट इंडिज आणि  इंग्लंड  यासारख्या मातब्बर संघांना त्यांच्याच भूमीत प्रथमच  नमविण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या वाडेकरांनी भारतीय क्रीडा क्षेत्रात विजयाचा एक नवा अध्याय सुरू केला. आक्रमक फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असलेल्या वाडेकरांनी मुंबई क्रिकेटच्या   विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. क्रिकेटशी असलेली आपली बांधिलकी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जोपासली होती.

Wednesday, August 15, 2018

मंत्रालयात स्वातंत्र्यदिन साजरा विविध क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर राज्याचा पुरोगामित्त्वाचा वारसा कायम ठेवू या ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस







            मुंबई, दि. 15: शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल कामगिरी करत असताना राज्याने आपला पुरोगामी वारसा जोपासणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वातंत्र्यदिनी मंत्रालय येथे ध्वजारोहणप्रसंगी केले.
            भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक,क्रांतीकारक तसेच हुतात्म्यांना अभिवादन करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करत असलेल्या जवानांना तसेच बळीराजालाही अभिवादन करत आहे.आपले राज्य अनेक क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत पुढे जात आहे. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ शहरे, राहण्यायोग्य शहरांचा निर्देशांक, परकीय थेट गुंतवणूक आदी वेगवेगळ्या राष्ट्रीय कार्यक्रमात देशात सातत्याने अग्रेसर कामगिरी करत आहे.
            महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानामध्ये आतापर्यंत 16 हजार गावे जलपरिपूर्ण करत आहोत. पुढील काळात 25 हजार गावे जलपरिपूर्ण करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. या लोकसहभागाच्या चळवळीने राज्यात एक अभूतपूर्व क्रांती केली आहे. विशेषत: पावसाच्या खंड असलेल्या कालावधीत पिकांना शाश्वत  सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने उत्पादकता वाढली आहे.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, उत्पादकता वाढत असतानाच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र शासनाने उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा या सूत्रानुसार विविध पिकांच्या हमीभावात़ वाढ केली आहे. तसेच राज्य शासनानेही मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची खरेदी केली आहे. 1999 ते 2014 या 15 वर्षांतच्या कालावधीत करण्यात आलेल्या 450 कोटी रुपयांच्या अन्नधान्य खरेदीच्या तुलनेत गेल्या 3 वर्षात 8 हजार कोटी रुपयांची अन्नधान्याची विक्रमी खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रती राज्य शासनाची प्रतिबद्धता यातून दिसून येते.
            जागतिक बँकेच्या मदतीने दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यात राबविण्यात येत आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी शेतीचे संपूर्ण परिवर्तन करु शकणारा स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी प्रकल्प सुरू करण्यात आला असून आता कृषी विपनन तसेच मूल्यवर्धनांतर्गत वेगवेगळे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.
            त्यांनी पुढे माहिती दिली की, आपले राज्य औद्योगिक क्षेत्रात सातत्याने अग्रेसर आहे. राज्यात जास्तीत जास्त उद्योग यावेत, अधिकाधिक परकीय गूंतवणूक यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘व्यवसाय सुलभता’ (इज ऑफ डुईंग बिझनेस) धोरण राबविण्यात येत असल्यामुळे गेल्या 2 वर्षात देशात आलेल्या परकीय गुंतवणुकीपैकी 42 ते 47 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.रोजगारनिर्मितीतही राज्याने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. संघटित क्षेत्रात 8 लाख इतका सर्वाधिक रोजगारही महाराष्ट्रात निर्माण झाला आहे.
            अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग अशा सर्व समाजघटकांच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या 2022 पर्यंत सर्वांना घरे ही योजना शहरी तसेच ग्रामीण भागात राबविण्यातही महाराष्ट्र अग्रेसर आहे, असेही ते म्हणाले.
            ते पुढे म्हणाले, छत्रपती शाहू- फुले- आंबेडकर यांचा वारसा आपण पुढे  नेत आहोत. राज्याचे पुरोगामित्व अबाधित ठेवण्यासाठी  सर्व समाजघटकांनी प्रयत्नशील राहायचे आहे. जात, धर्म आदी कोणत्याही कारणाने भेदभाव होऊ दिला जाणार नाही. यासाठी सामाजिक सौहार्द टिकून राहणे गरजेचे आहे. सर्वांना सोबत घेऊन आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे, असेही ते म्हणाले.
            मनोगतानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस तसेच राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. व्हीजेटीआयच्या(वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट) विद्यार्थ्यांनी खेळातील ठोकळ्यांचा (क्यूब्ज) वापर करुन महात्मा गांधींजींच्या प्रतिमा मंत्रालय इमारतीमध्ये बनविली होती. मुख्यमंत्री यांनी या विद्यार्थ्यांच्या कलेला दाद दिली.
            याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राज पुरोहित, आमदार विनायक मेटे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन. एच. पाटील, मुख्य सचिव डी. के. जैन, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, लोकायुक्त न्या. एम. एल. तहलियानी, राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, माजी पोलीस महासंचालक ज्युलीयस रिबेरो, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख अधिकारी,महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष भगवंतराव मोरे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष चंद्रशेखर ओक, अपर मुख्य  सचिव प्रविणसिंह परदेशी, सुनील पोरवाल, बिजय कुमार, श्रीकांत सिंह,  शामलाल गोयल, संजय कुमार, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंद कुमार विविध मंत्रालयीन विभागांचे  प्रधान सचिव, सचिव आदी उपस्थित होते.

·         जलयुक्त शिवारअंतर्गत  आतापर्यंत 16 हजार गावे जलपरिपूर्ण
·         पुढील काळात 25 हजार गावे जलपरिपूर्ण करण्यात येणार
·         गेल्या तीन वर्षात 8 हजार कोटींची विक्रमी अन्नधान्य  खरेदी
·         देशातील परकीय गुंतवणूकीपैकी 47 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात
·         संघटित क्षेत्रात 8 लाख रोजगारनिर्मिती


युवा माहिती दूत उपक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ




                               
·         राज्यात एक लाख युवा माहिती दूत करणार योजनांचा प्रसार
अमरावती, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर  विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात झाला. या उपक्रमातून राज्यात एक लाख युवा माहिती दूत निवडण्यात येणार असून, त्यांची योजनांच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे.    
विभागीय आयुक्त आमदार बच्चू कडू, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे,  जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस अधीक्षक दिलीप झळके, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी यावेळी उपस्थित होते.  
माहिती दूत या उपक्रमाचा युवकांच्या समाजमाध्यमातील प्रभावी वापराचा शासकीय योजनांचा प्रसार करण्यासाठी लाभ होईल. हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी दिले.   उपक्रमाच्या लोगोचे आणि माहितीपत्रकाचे अनावरण यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. योजनेची माहिती देणारी चित्रफीतही यावेळी दाखविण्यात आली.
 युनिसेफच्या सहयोगाने  उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या  प्रत्यक्ष सहभागाने  महासंचालनालयाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेटपणे पोहचविण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. पवार यांनी प्रास्ताविकातून दिली.
या उपक्रमातून किमान एक लाख युवक राज्य शासनाच्या किमान 50 योजनांच्या माहितीशी जोडले जातील. या एक लाख युवकांमार्फत किमान 50 लाख प्रस्तावित लाभार्थ्याशी म्हणजेच किमान दोन ते अडीच कोटी व्यक्तींशी शासन जोडले जाईल, असेही श्री. पवार यांनी सांगितले. सहायक संचालक गजानन कोटुरवार यांनी आभार मानले. माहिती सहायक पल्लवी राऊत यांनी सूत्रसंचालन केले. माहिती सहायक विजय राऊत, मनीष झिमटे, सागर राणे यांनी संयोजन केले.  
                                                000

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वज वंदन समारंभ उत्साहात


           
अमरावती, दि. 15 :  भारतीय स्वातंत्र्याच्या 71 व्या वर्धापनदिनोत्सवानिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वज वंदन  समारंभ जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते झाले.
            प्रारंभी श्री. बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण व राष्ट्रगीत झाले. पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.  श्री. बांगर यांनी सर्व उपस्थित अधिकारी- कर्मचारी यांच्याशी हस्तांदोलन करुन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.   त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम झाला. जिल्हाधिका-यांनी सर्व अधिकारी- कर्मचा-यांशी यावेळी संवाद साधला.
 आपत्ती व्यवस्थापनात महत्वाची कामगिरी बजावणा-या विविध अधिकारी- कर्मचा-यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.  अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, अजय लहाने, आर. डी. काळे, विनोद शिरभाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर, विधी अधिकारी श्री. बोहरा, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
                               



DIO NEWS AMRAVATI 05.11.2026

निवृत्तीवेतनधारकांसाठी आज 'डिजिटल जीवन प्रमाणपत्र' मार्गदर्शन सत्राचे आयोजन   अमरावती, दि.5 (जिमाका): वरिष्ठ कोषागार कार्यालय, अमराव...