Wednesday, September 11, 2024

DIO AMRAVATI NEWS 11.09.2024

 

परिवहनेत्तर (दुचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिकेबाबत सूचना

अमरावती, दि. 11 (जिमाका) : परिवहनेत्तर (दुचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात आली आहे. इच्छुक अर्जदारामार्फत एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादी मधील पसंती क्रमांकासाठी ज्यांनी अर्ज केला आहे, अशाच अर्जदारांनी गुरुवार, दि. 12 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सीलबंद करून खिडकी क्रमांक 25 वर जमा करावे. एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनापेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन सीलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट धारकांनी दि. 12 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात उपस्थित रहावे.

 लिलावासाठी उपस्थित राहणा-या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकारपत्रासह हजर रहावे. कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. तसेच, विहित वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठलाही प्रकारचा विचार केला जाणार नाही तसेच पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन अमरावती प्रादेशिक परिवहन  अधिकारी यांनी केले आहे.

 

00000

 

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न

            अमरावती, दि. 11 (जिमाका):  उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामार्फत आरोग्य तपासणी शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

            या शिबिरामध्ये कर्करोग, हृदयरोग, मेंदूशी संबंधित आजार, मूत्रमार्गाशी  संबंधित आजार, किडनी प्रत्यारोपण, प्लास्टिक सर्जरी, बालरोग अन्य आजाराशी संबंधित रुग्णांची तपासणी करून एकुण 224 रुग्णांपैकी 37 रुग्ण विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. या शिबिर आयोजनासाठी वैद्यकीय अधीक्षक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय विशेष कार्यकारी अधिकारी नोडल अधिकारी डॉ. गवारे, डॉ. मंगेश मेंढे, डॉ. श्याम गावंडे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये तपासणीसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथील तज्ज्ञ वैद्यकीय चमूमध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आदित्य गुप्ता, न्यूरोसर्जन डॉ. अभिजीत वानखडे यांची विशेष उपस्थिती होती. याचबरोबर वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना गुप्ता, समुपदेशक दिनेश हिवराळे, लेखापाल भूपेंद्र जेवडे,  परिचर अभिजीत शुक्ला, हर्षा काळे , डॉ. शिवम नाईक , डॉ. गुणवंत जधळ , डॉ. विलास मेश्राम, डॉ. वर्षा नेमाडे, मीना इंगळे, समुपदेशक माधुरी तायडे, स्वाती पवार आदी उपस्थित होते.

00000

 

Tuesday, September 10, 2024

5 संक्षिप्त बातम्या

 







अटल भूजल योजना भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत

जरुड ग्रामपंचायतीचा राज्यात दुसरा क्रमांक

         अमरावती, दि. 10 (जिमाका):  अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा सन 2022-23 चा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जरुड ग्रामपंचायतने राज्यात दुसऱ्या क्रमांक तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक  आणि झटामझिरी ग्रामपंचायतने दुसरा तर अंबाडा ग्रामपंचायतने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता  मंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते या ग्रामपंचायतींना धनादेश, सन्मानचिन्ह देऊन  नुकतेच सन्मानित करण्यात आले.

 

       अटल भूजल योजनेअंतर्गत सन 2022-23 या वर्षात भूजल समृद्ध ग्रामस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये जरुड ग्रामपंचायतने राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे 50 लाख रुपयांचे बक्षिस प्राप्त केले तसेच जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करुन जिल्ह्याचे 50 लाख रुपये असे एकत्रितरित्या एक कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त केले. तसेच वरुड तालुक्यातील झटामझिरी ग्रामपंचायतने दुसरा क्रमांक प्राप्त करुन 30 लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला तर मोर्शी तालुक्यातील अंबाडा ग्रामपंचायतने तिसऱ्या क्रमांकाचे 20 लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला.

 

      दि. 9 सप्टेंबर 2024 रोजी नाशिक (मित्रा) मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आयुक्त पवनीत कौर याच्या हस्ते  या ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात आले.

 

00000

  

शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रियेला 16 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 

       अमरावती, दि. 10 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिक मागास प्रर्वगातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अमरावती जिल्ह्यामध्ये न्याय विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुला, मुलींचे शासकिय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा मोफत पुरविण्यात येतात. सन 2024-25 साठी व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी  https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आलेली आहे. चालू वर्ष सन 2024-25 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन तसेच ऑनलाईन भरलेले अर्ज पोर्टलवरुन डाऊनलोड करुन त्याची प्रिंट घेवून संबंधित वसतिगृहामध्ये ऑफलाईन अर्ज सादर करावा.

         तसेच अमरावती जिल्ह्यात महाविद्यालयीन पदवी, पदविका, पदव्युत्तर (व्यावसायिक अभ्यासक्रम) प्रवेशाकरिता विभागीय स्तरावरील मागासवर्गीय 1 हजार  मुलांकरीता शासकिय वसतिगृह, युनिट क्र.1, 2, 3 निभोरा, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, निभोरा व संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, निभोंरा तसेच मुलींकरिता मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह ,कॅम्प, अमरावती, गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह, जेल रोड, अमरावती तसेच विभागीय स्तरावरील 250 मुलींचे युनिट क्र.4 अमरावती तसेच तालुका स्तरावरील मुला -मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये महाविद्यालयीन पदवी, पदविका, पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश अर्ज स्वीकारण्याची मुदतवाढ दि.16 सप्टेंबर 2024 पर्यंत करण्यात आलेली असून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहाकडे सादर करावे . अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 यावर संपर्क  साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

 

00000

 

 

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा

 

            अमरावती, दि. 10 (जिमाका): दरवर्षी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून 10 सप्टेंबर  हा दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्ष तथा  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. प्रिती मोरे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने, डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. सृष्टी देऊळकर, प्रमोद भक्ते, सुनिल कळतकर, अधिसेविका  ललिता अटाळकर, आहारतज्ज्ञ वृषाली चव्हाण,भावना पुरोहित, श्रध्दा हरकंचे, सारा बांगर, विशाल झामरे, मंगेश घोडेस्वार, व परीचर्या महाविद्यालयामधील विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठ्या संख्याने कार्यक्रमास उपस्थित होते.

            या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सौंदळे, डॉ. अमोल गुल्हाने, श्री. .अटाळकर, भावना पुरोहित यांनी उपस्थितांना आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रामाचे संचालन प्रमोद भक्ते व आभार प्रदर्शन श्रीमती श्रध्दा हरकंचे यांनी केले.

 

0000

 

 

 

माता बनल्या अंगणवाडी ताई..... मुलांना शिकवली अ आ इ ई.....

 

राष्ट्रीय पोषण महानिमित्त महिनाभर विविध कार्यक्रमांची मेजवानी

 

- मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा

 

अमरावती, दि. 10 (जिमाका) : 'राष्ट्रीय पोषण महा'निमित्त महिला बाल विकास विभागामार्फत संपूर्ण महिनाभर वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षीही महिला बालविकास विभागामार्फत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 'माता बनल्या अंगणवाडी ताई , .मुलांना शिकवली अ आ इ ई... 'या उपक्रमांतर्गत गावातील मातांनी अंगणवाडी केंद्रात जाऊन बालकांसोबत संवाद साधला . काही मातांनी बालकांना गाणी शिकवली, काहींनी मातीकाम तर काहींनी लिहायला - वाचायला शिकवले .त्यामुळे मुलांना नवीन अंगणवाडी ताई भेटल्याचा आनंद झाला.

             यावर्षी प्रामुख्याने राष्ट्रीय पोषण महानिमित्त ॲनेमिया कमी करणे, बालकांची वजन वाढ मोजणे, बालकांना योग्य तो आहार खाऊ घालणे, पोषण भी और पढाई भी, तंत्रज्ञानाची ओळख आणि सर्वांगीण पोषण या महत्त्वाच्या बाबीवर राष्ट्रीय पोषण महा अंतर्गत उपक्रम राबविले जाणार आहे . याअंतर्गत महिला बालविकास विभाग अमरावती विभागामार्फत महिनाभराच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये एक पेड माँ के नाम, हजार दिवस उपवास बंद चळवळ, हाट बाजार, इलेक्ट्रॉनिक उपवास, अक्षय पात्र आणि मटका फ्रीज, मातांची पाककृती स्पर्धा, अन्नसाक्षरता, एक दिवस मेळघाटासाठी, माता -बालक संयुक्त योगा, मासिक पाळी व्यवस्थापन काळाची गरज, पोषणावर बोलू काही, लोकप्रतिनिधी दिवस, वृद्धांचे वाढदिवस, नवविवाहितांचे  समुपदेशन, आजीबाईंची अंगणवाडी अशा विविध कार्यक्रमांचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून संपूर्ण महिनाभर या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

       या उपक्रमात अंगणवाडीताई ऐवजी गावातील मातांनी अंगणवाडी ताई म्हणून मुलांना शिकवल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून आला. त्याचबरोबर नवीन बाबी शिकायला मिळाल्यामुळे मुले उत्साहित होती. काही मातांनी मुलांना खाऊही आणला होता ज्यामुळे मुलांना आणखी आनंद झाला. राष्ट्रीय पोषण महानिमित्त जे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतील त्यामध्ये पालकांनी सहभागी व्हावे , असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके  यांनी केले आहे.

 

"महिला बाल विकास विभागाने राष्ट्रीय पोषण महा निमित्त अतिशय दर्जेदार कार्यक्रमांचे नियोजन केलेल आहे. अंगणवाडी ताईंच्या मार्फत सदर कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार असून गावातील पालक, युवक, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय यांनीही या कार्यक्रमात सहभागी होऊन राष्ट्रीय पोषण आहार थाटामाटात साजरा करावा."

 

   संजिता मोहपात्रा 

 

 

00000

 

अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहातील कंत्राटी पदांची भरती

             अमरावती, दि. 10 (जिमाका): अल्पसंख्याक विभागाद्वारे संचालित शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृहातील कंत्राटी पदांसाठी अत्यंत तात्पुरावा स्वरुपात एकत्रित मानधनावर कंत्राटी पध्दतीने 11 महिने मुदतीकरिता खालील  पदे भरावयाची आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या  पदांसाठी आवेदन करण्यासाठीचा अर्ज व शैक्षणिक पात्रता तसेच अटी व शर्तीबाबत संपूर्ण माहिती https://amravati.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी नमूद संकेतस्थळावरुन अर्जाचा नमुना प्राप्त करून घ्यावा व शैक्षणिक पात्रतेच्या व अनुभवाच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज कार्यालयीन वेळेमध्ये अल्पसंख्याक  शाखा,  जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे सादर करावा, उमेदवारांनी दि. 25 सप्टेंबर 2024  पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे. एकुण पदांमध्ये अधीक्षक महिला (मानधन 15000/-), लिपीक महिला (मानधन 8000/-), शिपाई महिला (मानधन 6500/-), सफाई कामगार महिला (मानधन 6000/-), सुरक्षा रक्षक पुरूष (मानधन 9000/-) अशा प्रकारे प्रतिमाह मानधन देण्यात येईल, संबंधितांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

00000

 

 

 

 

Monday, September 9, 2024

एकुण 4 बातम्या

 

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी

मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 09 (जिमाका) : ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांना मानधन देण्यासाठी राजश्री शाहू महाराज योजना लागू आहे. यासाठी दि. 15 सप्टेंबरपूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर योजनेचा सुधारीत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यात आता योजनेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर सदस्य सचिव उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग हे राहणार आहेत. कलाकारांची मानधन योजनेसाठी निवड करताना त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे. त्यासाठी mahakalasanman.org यावर कलाकारांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे. सर्व वृद्ध कलावंत आणि साहित्यिकांनी मानधन योजनेचे अर्ज दि. 15 सप्टेंबर 2024 पूर्वी भरावेत, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत बालासाहेब बायस यांनी केले आहे.

00000

जागतिक पर्यटन दिनानिमित्त

अमरावती, दि. 09 (जिमाका) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यत येणार आहे. यात नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वर्षी संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेद्वारे सन 2024 करीता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य पर्यटन आणि शांतता हे घोषित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्रादेशिक कार्यालयातर्फे उपक्रम राबविण्यात येणार आहे.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त परिसंवाद आयोजित करणात येणार आहे. यात जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ज्ञ पर्यटन व्यवसासिकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. यातील सहभागी विद्यार्थाना प्रमाणपत्र आणि बक्षिसे देण्यात येणार आहेत. चिखलदरा येथील पर्यटक निवासात पर्यटकांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करून पर्यटन स्थळांची माहिती देण्यात येणार आहे.

महामंडळाने सोमवार ते गुरुवार ज्येष्ठ नागरिकांसाठी 20 टक्के, शासकीय कर्मचारी यांना 10 टक्के, दिव्यांगासाठी 20 टक्के, माजी सैनिकांसाठी 20 टक्के पर्यटक निवासाच्या आरक्षणावर सवलती जाहीर केली आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त महामंडळाने जाहिर केलेल्या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी केले आहे.

00000

घरेलू कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप

*दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन

अमरावती, दि. 09 (जिमाका): महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जिल्ह्यातील 31 जुलै 2024 पर्यंत नोंदणी केलेल्यांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. याबाबत दिशाभूल आणि फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 जिल्ह्यातील नोंदीत जिवित पात्र घरेलू कामगारांना गृहपयोगी वस्तु संच वाटप करण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळाकडून प्राप्त निर्देशानुसार दि. 1 ऑगस्ट 2023 ते दि. 31 जुलै 2024 या कालावधी दरम्यान ज्या घरेलू कामगारांची मंडळामध्ये नोंदणी, नुतनीकरण केले आहे, तसेच घरेलू कामगार जिवित पात्र असतील अशा कुटुंबातील एकाच व्यक्तीला गृहपयोगी वस्तू संच वाटप करण्याची वेळ व दिनांक नेमून दिलेल्या कंपनी मार्फत कळविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात दि. 31 जुलै 2024 नंतर नोंद झालेल्या घरेलू कामगारांना गृहपयोगी वस्तू संचाचे वाटप करण्याबाबत कोणतेही निर्देश मंडळाकडून प्राप्त झालेले नाही. त्यामुळे संबंधित घरेलू कामगारांनी नोंदणीसाठी कुठल्याही त्रयस्त व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नये. तसेच आर्थिक फसवणूक करुन घेऊ नये. घरेलू कामगारांची नोंदणी शुल्क 13 रूपये आणि नूतनीकरण शुल्क 12 रूपये मंडळामार्फत स्विकारण्यात येते. तसेच घरेलू कामगारांना  मंडळामार्फत रीतसर पावती देण्यात येते. या व्यतिरिक्त मंडळामार्फत कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत नाही.

सदर मंडळाची योजना ही निशुल्क असून त्रयस्त व्यक्तीद्वारे आपली दिशाभूल, फसवणूक करण्यात येत असल्यास नजिकच्या पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करावी, असे आवा हन कामगार उप आयुक्त कार्यालयाने केले आहे.

0000

गणेशोत्सवाच्या काळात राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

*तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती, दि. 09 (जिमाका) : गणेशोत्सवाच्या काळात राज्य उत्पादन शुल्कने अवैध दारूविक्री विरोधात कारवाई सुरू केली आहे. यात महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेलगत मोर्शी तालुक्यातील पाळा येथे मध्यप्रदेशात निर्मित आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या बियरचा 85 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच मध्यप्रदेशातू‌न महाराष्ट्र राज्यात येणारी 360 लिटर गावठी दारुसह 1 लाख 92 हजार 799  रुपयांचा मुदेमाल जप्त करून तीन दुचाकीसह 2 लाख 78 हजार 499 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

मध्यप्रदेशातून महाराष्ट्र राज्यात येणारी बजाज डिस्कव्हर क्र. एमपी 48 एमक्यू 3251, हिरो पॅशन प्रो क्रमांक अस्पष्ट, बजाज सिटी 110 क्र. एमएच 27 9707 ही वाहने गावठी दारु 360 लिटर, मध्यप्रदेश राज्यात निर्मित बिअर 31.2 लिटर दारुचा साठा व दोन मोबाईल पवन शामदेवराव निर्मळ, रा. वार्ड क्र. 1, सालबर्डी, ता. मुलताई, जि. बैतुल (मध्यप्रदेश), सुभाष रामभाऊ नागले, रा. वार्ड क्र. 20, नरखेड, ता. मुललाई, जि. बैतुल (मध्यप्रदेश), गणेश धोंडोजी कुमरे, रा. पेठपुरा, मोर्शी, रोशन अशोकराव नागमोते, रा. रामजीबाबा चौक, मोर्शी, रामदास जामलाल उईके, रा. गिट्टीखदान, मोर्शी, गोविंदा बसंता शिरसाट, रा गिट्टीखदान, मोर्शी यांच्याकडून एकूण 2 लाख 78 हजार 499  किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक सुरज दाबेराव, दुय्यम निरीक्षक डॉ. सचिन मेश्राम, दुय्यम निरीक्षक एकनाथ शेजू‌ळ, जवान बजरंग थोरात, पंकज भारती, महेश म्हैसकर व वाहनचालक संजय देहाड़े यांनी केली.

00000

 

आपले सरकार पोर्टल 2.0 बाबत जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुखांना प्रशिक्षण नागरिकांच्या तक्रारींचे गुणवत्तापूर्ण निराकरण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल उपयुक्त - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 





आपले सरकार पोर्टल 2.0 बाबत जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुखांना प्रशिक्षण

नागरिकांच्या तक्रारींचे गुणवत्तापूर्ण निराकरण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल उपयुक्त

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती, दि. 9 (जिमाका) : सर्वसामान्य नागरिक हा आपल्याशासन, प्रशासनाचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या तक्रारींचे गतीने आणि गुणवत्तापूर्ण निराकरणासाठी 'आपले सरकार पोर्टल 2.0' ही प्रणाली उपयुक्त आहे. या प्रणालीद्वारे प्राप्त तक्रारींचा निपटारा विहित कालावधीत करण्याला सर्व शासकीय विभागांनी प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिल्या.

आपले सरकार पोर्टल 2.0 प्रणालीच्या वापराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. कटियार बोलत होते. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील, कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसीलदार वैशाली पाथरे तसेच प्रशिक्षक देवांग दवे, शुभम पै यांच्यासह जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

   नागरिक आणि प्रशासन यांच्यात ऑनलाईन संवादाच्या माध्यमातून सेतू निर्माण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तक्रारींचा निपटारा गतिमान होण्यासाठी आपले सरकार पोर्टलमध्ये नव्याने काही बदल करण्यात आले आहेत. या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचा संवेदनशीलपणे निपटारा होण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या संकल्पनेतून आपले सरकार पोर्टलबाबत राज्यभर जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून प्रणालीचा प्रभावी वापर कशाप्रकारे करावा, याबाबत यावेळी माहिती दिली गेली. या माहितीचा वापर प्रत्यक्ष कामकाजात करून नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, असे जिल्हाधिकारी श्री . कटियार यांनी  सांगितले.

नागरिकांना आपल्या तक्रारी घरातून, गावातूनच शासन, प्रशासनापर्यंत पोहचविता याव्यात, यासाठी आपले सरकार पोर्टल सुरू करण्यात आले. आता नागरिक आणि शासकीय यंत्रणांसाठी सुसह्य ठरतील, अशा सुधारणा करून 'आपले सरकार पोर्टल 2.0' हे नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. कामकाजातील पारदर्शकता वाढविण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरणार आहे, असे प्रशिक्षक देवांग दवे यांनी सांगितले. तसेच शासकीय कार्यालये, नागरिकांना या पोर्टलचा कशाप्रकारे वापर करता येईल, याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

 

प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालक  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी तर आभार श्रीमती रुपाली आंबेकर यांनी मानले .

 

000000

ग्रामीण भागात  कलम 37(1) व (3) लागू

          अमरावती, दि. 09 (जिमाका) :  जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती  यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

            सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 22 सप्टेंबर 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी  अनिल भटकर  यांनी कळविले आहे.

0000


Thursday, September 5, 2024

भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

        अमरावती,दि.05 (जिमाका) : महानुभव पंथाचे संस्थापक, लिळाचरित्रकार भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त (जयंती) अधिक्षक निलेश खटके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

      यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

 

00000

Tuesday, September 3, 2024

DIO AMRAVATI NEWS 03.09.2024


 

त्‍वरीत आरोग्य सेवेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा

*जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आवाहन

अमरावती, दि. 03 : जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य सेवा तत्परतेने पुरविण्यात येत आहे. नागरिकांनीही आरोग्य सेवेसाठी त्वरीत आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

गरोदर माता कविता अनिल साकोम, वय 20 वर्षे, रा. दहेंद्री ढाणा यांचा दि. 1 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर घटनेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले आणि अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे यांनी सोमवार, दि. 2 सप्टेंबर 2024 रोजी काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच पिडीतेच्या घरी जाऊन चौकशी करून नातेवाईकांचे सांत्वन केले.

कविता साकोम यांची प्रसुतीची अपेक्षित तारीख 3 ऑक्टोंबर 2024 होती. सदर माता ही अति जोखमीची माता असल्यामुळे त्यांची वेळोवेळी 6 वेळा तपासणी करण्यात आली. तसेच 4 वेळा सोनोग्राफी करण्यात आली. वेळोवेळी गृहभेटीदरम्यान आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. गरोदर मातेचे पोट दुखायला लागल्यावर नातेवाइकांनी दि. 31 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2 वाजता आशा सेविकेला बोलाविले. गरोदर मातेच्या पतीने 2 वाजताच्या सुमारास रुग्णवाहिका बोलावण्यासाठी 108 क्रमांकावर संपर्क केला असता रुग्णवाहिका कॉलवर असल्याचे सांगितले, त्यामुळे सदर आशा व गावातील दाईने घरीच 4.30 वाजता प्रसुती केली. बाळ मृत असल्यामुळे त्यांनी लगेच बाळाचा दफनविधी केला. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मातेचे डोक आणि पोटात दुखत असल्यामुळे सदर माहिती अंगणवाडी सेविकेस दिली. अंगणवाडी सेविका यांनी त्वरीत दहेंद्री उपकेंद्र येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती दिली. समुदाय आरोग्य अधिकारी यांनी खासगी वाहनाची व्यवस्था करुन रुग्णाला चुरणी ग्रामीण रुग्णालयात संदर्भित केले.

चुरणी येथे संदर्भित करताना सदर मातेला झटके आले. ग्रामीण रुग्णलय चुरणी येथे तपासणी केली असता सदर रुग्णाचा रक्तदाब खूप वाढल्याने रुग्णाला झटके येत असल्याचे निदर्शनास आले. रोगनिदान करून उपचार केले. येथील उपचारानंतर रुग्णाली अचलपूर उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. परंतु अतिदक्षता कक्षामध्ये दि. 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजता सदर मातेचा मृत्यू झाला.

सदर घटनेमध्ये प्रसुती होण्याअगोदर किंवा पोट दुखायला लागल्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांना संपर्क करणे आवश्यक होते. इतर 102 रुग्णवाहिका, भरारी पथकाची वाहने उपलब्ध असतानाही वेळेवर माहिती दिली गेली नसल्यामुळे बालक व मातामृत्यू झाला आहे. त्यामुळे जोखिमीच्या वेळी तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

क्षयरोग दूरीकरणासाठी बीसीजी लस घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 03 : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत पात्र नागरिकांनी बीसीजी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

राज्य लसीकरण विभाग आणि आयएमसीआर यांच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात 60 वर्षावरील वयस्कर व्यक्ती, बॉडी मास इंडेक्स 18 किलो प्रती मीटर, स्वयंघोषीत मधुमेह असणारी व्यक्ती, स्वयंघोषीत सद्यस्थितीत व यापूर्वी धुम्रपान करणारी व्यक्ती, तीन वर्षे किंवा त्यानंतरच्या काळात क्षयरुग्णांच्या सहवासात असणारी व्यक्ती, पाच वर्षे व त्यानंतरच्या काळामध्ये क्षयरोगाचा उपचार घेतलेली व्यक्ती या बीसीजी लसीकरणास पात्र आहेत.

ग्रामीण भागात सदर मोहिमेकरिता दि. 2 मे 2024 पासून सर्व्हेक्षण राबविण्यात आले आहे, यात 1 लाख 54 हजार 329 व्यक्ती बीसीजी लसीकरणासाठी पात्र ठरले आहेत. ग्रामीण भागात दि. 3 सप्टेंबर 2024 पासून बीसीजी लसीकरणास सुरुवात झाली आहे. भविष्यामध्ये जोखीम असणाऱ्या लोकांना क्षयरोगापासून संरक्षण मिळावे यासाठी जवळच्या लसीकरण सत्रामध्ये जावून लस टोचून घ्यावी. लसीचा कोणताही दुःष्परीणाम आढळून आलेला नाही, ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. सदर लस ही भारतामध्ये सन 1971 पासून सार्वत्रिकरित्या लहान बाळाला जन्मतः देण्यात येते, तथापि 18 वर्षानंतर सदर लसीचा परिणाम कमी होवू शकतो. त्यामुळे अठरा वर्षावरील जोखीम असणाऱ्या व्यक्तींना लस देण्यात येते.

आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असणारी लस पात्र नागरिकांनी टोचून घेवून क्षयरोगाचे उच्चाटन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

00000


धनुर्विद्या मानद प्रशिक्षकासाठी अर्ज आवाहन

अमरावती, दि. 03 : खेलो इंडिया योजनेंतर्गत धनुर्विद्या खेळाचे प्रशिक्षण केंद्र अमरावती जिल्ह्यास मंजूर झाले आहे. यासाठी मानद प्रशिक्षक नेमण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावेत, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया सेंटर अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा केंद्र मंजूर केले आहे. खेलो इंडिया सेंटर आर्चरी प्रशिक्षण केंद्राकरीता प्रशिक्षकाची निवड करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 18 ते 45 वर्षातील धनुर्विद्या खेळातील अतिउच्च कामगिरी, गुणवत्ता असलेल्या आणि समितीच्या मान्यतेने उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. ऑलिम्पिक, एशियन गेम्स, जागतिक अजिंक्यपद अधिकृत स्पर्धा सहभाग, पदकप्राप्त प्रशिक्षणाच्या अनुभवासह जागतिक चषक स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, साऊथ एशियन स्पर्धा, संबंधित खेळांच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग, पदकप्राप्त खेळाडू प्रशिक्षणाच्या अनुभवासह, राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कारार्थी, प्रशिक्षणाच्या अनुभवासह, धनुर्विद्या खेळामध्ये एनआयएस पदविका किंवा संबंधित खेळाचे अधिकृत लेव्हल कोर्सेस किंवा बीपीएड, एमपीएडसह राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त किंवा नॅशनल गेम्स पदकप्राप्त प्रशिक्षणाच्या अनुभवासह राज्यस्तरीय खेळाडू बीपीएड, एमपीएडसह कमीत कमी 10 वर्षांचा प्रशिक्षणाचा अनुभव असणारे उमेदवार यांना खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राकरीता प्रशिक्षक निवड अर्ज वाटप करण्यात येणार आहे. सदर अर्ज स्विकृती दि. 4 ते 10 सप्टेंबर कालावधीत जिल्हा कीडा अधिकारी कार्यालय, तपोवन गेटसमोर, मार्डी रोड, अमरावती येथे अर्ज स्विकारण्यात येतील, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.

00000

 

Sunday, September 1, 2024

पावसामुळे संत्रा गळती नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत - उपमुख्यमंत्री अजित पवार

 











पावसामुळे संत्रा गळती नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत

-        उपमुख्यमंत्री अजित पवार

 

अमरावती, दि. १ : वरुड परिसरात गेल्या कालावधीमध्ये पावसामुळे झालेल्या संत्रा पिकाच्या नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. वरुड तालुक्यातील नवासा पार्डी येथील ज्ञानेश्वर मोघे यांच्या शेतातील संत्रा पिकाच्या नुकसानीची पाहणी श्री. पवार यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार देवेंद्र भुयार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते उपस्थित होते.

वरुड परिसरात गेल्या कालावधीमध्ये पावसामुळे संत्रा पिकाचे नुकसान होत आहे. सततच्या पावसामुळे संत्रा बहाराचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीची तातडीने पंचनामे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळावी, यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशा सूचना दूरध्वनीद्वारे  जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना दिल्या. पहिल्या टप्प्यातील पंचनामे झाले असले तरी शेतकऱ्यांचे जादा होत असलेले नुकसान पाहता दुसऱ्या टप्प्यातही पंचनामे करून तातडीने मंत्रालयस्तरावर सादर करण्यात यावे. शेतकऱ्यांना मिळणारी मदत मिळवून देण्यासाठी योग्य ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

यावेळी श्री. पवार यांनी संत्रा पिकाबाबत माहिती घेतली. संत्रा पिकासाठी येणारा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पादन याबाबत माहिती जाणून संत्र्याच्या असणाऱ्या जाती, चवीने उत्कृष्ट असणारे फळाची जाती, याबाबत माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांनी जनावरांसाठी हिरवा चारा उत्पादन घेण्यासाठी ही पुढे येण्याचे आवाहन केले.

0000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...