त्वरीत आरोग्य सेवेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा
*जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आवाहन
अमरावती, दि. 03 : जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य सेवा तत्परतेने पुरविण्यात येत आहे. नागरिकांनीही आरोग्य सेवेसाठी त्वरीत आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
गरोदर माता कविता अनिल साकोम, वय 20 वर्षे, रा. दहेंद्री ढाणा यांचा दि. 1 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर घटनेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले आणि अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे यांनी सोमवार, दि. 2 सप्टेंबर 2024 रोजी काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच पिडीतेच्या घरी जाऊन चौकशी करून नातेवाईकांचे सांत्वन केले.
कविता साकोम यांची प्रसुतीची अपेक्षित तारीख 3 ऑक्टोंबर 2024 होती. सदर माता ही अति जोखमीची माता असल्यामुळे त्यांची वेळोवेळी 6 वेळा तपासणी करण्यात आली. तसेच 4 वेळा सोनोग्राफी करण्यात आली. वेळोवेळी गृहभेटीदरम्यान आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. गरोदर मातेचे पोट दुखायला लागल्यावर नातेवाइकांनी दि. 31 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2 वाजता आशा सेविकेला बोलाविले. गरोदर मातेच्या पतीने 2 वाजताच्या सुमारास रुग्णवाहिका बोलावण्यासाठी 108 क्रमांकावर संपर्क केला असता रुग्णवाहिका कॉलवर असल्याचे सांगितले, त्यामुळे सदर आशा व गावातील दाईने घरीच 4.30 वाजता प्रसुती केली. बाळ मृत असल्यामुळे त्यांनी लगेच बाळाचा दफनविधी केला. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मातेचे डोक आणि पोटात दुखत असल्यामुळे सदर माहिती अंगणवाडी सेविकेस दिली. अंगणवाडी सेविका यांनी त्वरीत दहेंद्री उपकेंद्र येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती दिली. समुदाय आरोग्य अधिकारी यांनी खासगी वाहनाची व्यवस्था करुन रुग्णाला चुरणी ग्रामीण रुग्णालयात संदर्भित केले.
चुरणी येथे संदर्भित करताना सदर मातेला झटके आले. ग्रामीण रुग्णलय चुरणी येथे तपासणी केली असता सदर रुग्णाचा रक्तदाब खूप वाढल्याने रुग्णाला झटके येत असल्याचे निदर्शनास आले. रोगनिदान करून उपचार केले. येथील उपचारानंतर रुग्णाली अचलपूर उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. परंतु अतिदक्षता कक्षामध्ये दि. 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजता सदर मातेचा मृत्यू झाला.
सदर घटनेमध्ये प्रसुती होण्याअगोदर किंवा पोट दुखायला लागल्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांना संपर्क करणे आवश्यक होते. इतर 102 रुग्णवाहिका, भरारी पथकाची वाहने उपलब्ध असतानाही वेळेवर माहिती दिली गेली नसल्यामुळे बालक व मातामृत्यू झाला आहे. त्यामुळे जोखिमीच्या वेळी तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
क्षयरोग दूरीकरणासाठी बीसीजी लस घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 03 : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत पात्र नागरिकांनी बीसीजी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
राज्य लसीकरण विभाग आणि आयएमसीआर यांच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात 60 वर्षावरील वयस्कर व्यक्ती, बॉडी मास इंडेक्स 18 किलो प्रती मीटर, स्वयंघोषीत मधुमेह असणारी व्यक्ती, स्वयंघोषीत सद्यस्थितीत व यापूर्वी धुम्रपान करणारी व्यक्ती, तीन वर्षे किंवा त्यानंतरच्या काळात क्षयरुग्णांच्या सहवासात असणारी व्यक्ती, पाच वर्षे व त्यानंतरच्या काळामध्ये क्षयरोगाचा उपचार घेतलेली व्यक्ती या बीसीजी लसीकरणास पात्र आहेत.
ग्रामीण भागात सदर मोहिमेकरिता दि. 2 मे 2024 पासून सर्व्हेक्षण राबविण्यात आले आहे, यात 1 लाख 54 हजार 329 व्यक्ती बीसीजी लसीकरणासाठी पात्र ठरले आहेत. ग्रामीण भागात दि. 3 सप्टेंबर 2024 पासून बीसीजी लसीकरणास सुरुवात झाली आहे. भविष्यामध्ये जोखीम असणाऱ्या लोकांना क्षयरोगापासून संरक्षण मिळावे यासाठी जवळच्या लसीकरण सत्रामध्ये जावून लस टोचून घ्यावी. लसीचा कोणताही दुःष्परीणाम आढळून आलेला नाही, ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. सदर लस ही भारतामध्ये सन 1971 पासून सार्वत्रिकरित्या लहान बाळाला जन्मतः देण्यात येते, तथापि 18 वर्षानंतर सदर लसीचा परिणाम कमी होवू शकतो. त्यामुळे अठरा वर्षावरील जोखीम असणाऱ्या व्यक्तींना लस देण्यात येते.
आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असणारी लस पात्र नागरिकांनी टोचून घेवून क्षयरोगाचे उच्चाटन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
00000
धनुर्विद्या
मानद प्रशिक्षकासाठी अर्ज आवाहन
अमरावती,
दि. 03 : खेलो इंडिया योजनेंतर्गत धनुर्विद्या खेळाचे प्रशिक्षण केंद्र अमरावती
जिल्ह्यास मंजूर झाले आहे. यासाठी मानद प्रशिक्षक नेमण्यात येणार आहे. यासाठी
इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय
पातळीवरील खेळाडू तयार व्हावेत, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त
विद्यमाने खेलो इंडिया सेंटर अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा केंद्र मंजूर केले
आहे. खेलो इंडिया सेंटर आर्चरी प्रशिक्षण केंद्राकरीता प्रशिक्षकाची निवड करण्यात
येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 18 ते 45 वर्षातील धनुर्विद्या खेळातील अतिउच्च
कामगिरी, गुणवत्ता असलेल्या आणि समितीच्या मान्यतेने उमेदवारांची निवड करण्यात
येणार आहे. ऑलिम्पिक, एशियन गेम्स, जागतिक अजिंक्यपद अधिकृत स्पर्धा सहभाग,
पदकप्राप्त प्रशिक्षणाच्या अनुभवासह जागतिक चषक स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, साऊथ
एशियन स्पर्धा, संबंधित खेळांच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग, पदकप्राप्त
खेळाडू प्रशिक्षणाच्या अनुभवासह, राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कारार्थी, प्रशिक्षणाच्या
अनुभवासह, धनुर्विद्या खेळामध्ये एनआयएस पदविका किंवा संबंधित खेळाचे अधिकृत
लेव्हल कोर्सेस किंवा बीपीएड, एमपीएडसह राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त किंवा नॅशनल
गेम्स पदकप्राप्त प्रशिक्षणाच्या अनुभवासह राज्यस्तरीय खेळाडू बीपीएड, एमपीएडसह
कमीत कमी 10 वर्षांचा प्रशिक्षणाचा अनुभव असणारे उमेदवार यांना खेलो इंडिया
प्रशिक्षण केंद्राकरीता प्रशिक्षक निवड अर्ज वाटप करण्यात येणार आहे. सदर अर्ज
स्विकृती दि. 4 ते 10 सप्टेंबर कालावधीत जिल्हा कीडा अधिकारी कार्यालय, तपोवन
गेटसमोर, मार्डी रोड, अमरावती येथे अर्ज स्विकारण्यात येतील, असे जिल्हा क्रीडा
अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment