1420 कोटी रूपयांतून दर्जेदार विकासकामे होणार
-उपमुख्यमंत्री अजित पवार
*विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन
*वाढीव कराबाबत ऑक्टोबरपर्यंत कार्यवाही
अमरावती, दि. 26 : अमरावती शहर आणि परिसराच्या विकासासाठी भरघोस निधी देण्यात आला आहे. यातून शहराच्या वैभवात भर पडणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण होतील. एकाच दिवशी 1420 कोटी रूपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले आहे. ही कामे दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
जिल्हा नियोजनच्या सभागृहात आज विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, मुख्य अभियंता गिरीश जोशी, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रुपा गिरासे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, शासनाला उत्पन्न देणाऱ्या विभागांकडून मोठ्या प्रमाणावर कर गोळा करण्यात येत आहे. या विभागांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. विकासकामे करताना पुढील काळाचा विचार ठेवण्यात आला आहे. सारथी संस्थेमध्ये 300 आसन क्षमतेचे श्रोतागृह मंजूर आहे. मात्र याठिकाणी 500 विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय राहणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व सारथीच्या ठिकाणी आता 500 क्षमतेचे श्रोतागृह राहणार आहे. यासाठी लागणारा अतिरिक्त निधीही देण्यात येणार आहे. एकाच दिवशी 1420 कोटी रूपयांच्या विविध कामांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले आहे. या सुविधांचा नागरिकांना लाभ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
अमरावती महापालिकेकडून वाढीव दराने कर आकारणी केली आहे. त्यामुळे तात्काळ सॉफ्टवेअरमध्ये दुरूस्ती करून नागरिकांना करपावत्या देण्यात याव्यात. कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबरपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश दिले. सर्व घटकांचा विकास होण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. त्याचा भाग म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मुलींना मोफत शिक्षण, बारावीनंतर विद्यावेतन, शेतकऱ्यांना मोफत वीज, दुधाला अनुदान, तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येत आहे.
सारथी, बार्टी सारख्या संस्था उभारून अध्ययनासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात येत आहे. त्यासोबतच विभागीय स्तरावर चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधांचा खेळाडूंनी लाभ घ्यावा. खाशबा जाधव यांच्यानंतर यावर्षी राज्यातील खेळाडूने वैयक्तिक पदक प्राप्त केले आहे. खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळाल्यास भविष्यात पदक मिळवणारे खेळाडू राज्यातून तयार होतील, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलासाठी निधी वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे या क्रीडा सुविधा प्राधान्याने उभ्या राहतील.
अमरावती येथील पाणी पुरवठ्याची अमृत योजना, सारथीचे विभागीय कार्यालय, वसतिगृह, अभ्यासिका, लालखडी रेल्वे उड्डाणपूल, चांगापूर फाटा रस्ता, विभागीय क्रीडा संकुल मैदानाचे भूमिपूजन तर जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यासोबतच वस्तू व सेवा कर इमारतीचे नुतनीकरण, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील क्रीडा सुविधा, उत्पादन शुल्कच्या इमारतीचे उद्घाटन, वडाळी उद्यान सौंदर्यीकरणाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच नगरोत्थान अभियानातील कामांचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले.
क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले. उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांनी आभार मानले.
00000
‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’चे आज आयोजन
अमरावती, दि. 26 : राज्याने घेतलेल्या उद्योगविषयक महत्त्वाच्या निर्णयांची माहिती उद्योजक, व्यावसायिकांना व्हावी, तसेच राज्याचे व्हीजन कळावे यासाठी शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर रोजी हॉटेल ग्रँड मैफिल येथे दुपारी २ वाजता "उद्यमात् सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, खासदार अनिल बोंडे, बळवंत वानखडे, अमर काळे, आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, यशोमती ठाकुर, सुलभा खोडके, रवि राणा, राजकुमार पटेल, प्रताप अडसड, देवेंद्र भुयार उपस्थित राहतील.
तसेच उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, विकास आयुक्त उद्योग दिपेंद्र सिंह कुशवाह, व्यवस्थापकीय संचालक एमएसएसआयडीसी राजेंद्र निंबाळकर, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड उपस्थित राहणार आहेत.
000000
आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रम
अमरावती दि. २६ (जिमाका) : ' संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संस्था ' (UNWTO) या आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थेद्वारे घोषित दि.२७ सप्टेंबर यादिवशी दरवर्षी 'जागतिक पर्यटन दिन ' म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या औचित्याने दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थेद्वारे घोषवाक्य प्रसिद्ध करण्यात येते. यावर्षी जागतिक पर्यटन दिनाचे 'पर्यटन आणि शांतता' हे घोषवाक्य घोषित करण्यात केले आहे.
या जागतिक पर्यटन दिनानिमित्त उद्या शुक्रवार , दि. २७ सप्टेंबर, २०२४ ला सकाळी ६ ते १० या वेळेत छत्री तलाव परिसरात 'ट्रेकिंग व पक्षी निरिक्षण कार्यक्रम ' आयोजित करण्यात आला आहे. तसेच ॲनिमेशन कॉलेजचे प्राचार्य विजय राऊत यांच्या वतीने 'पेपर शिल्प, कला प्रदर्शनी'चे आयोजन सकाळी १०.३० वाजता ॲनिमेशन कॉलेज येथे करण्यात आले आहे. तसेच युवा पर्यटन क्लब, समाजकार्य महाविद्यालय, अमरावती यांच्या मार्फत इर्विन चौक येथे सकाळी ९ ते १० या कालावधीमध्ये पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
वरील उपक्रमांमध्ये स्थानिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रादेशिक कार्यालय, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय अवधाने यांनी केले आहे.
00000
--
No comments:
Post a Comment