Monday, September 9, 2024

एकुण 4 बातम्या

 

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी

मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 09 (जिमाका) : ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांना मानधन देण्यासाठी राजश्री शाहू महाराज योजना लागू आहे. यासाठी दि. 15 सप्टेंबरपूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर योजनेचा सुधारीत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यात आता योजनेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर सदस्य सचिव उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग हे राहणार आहेत. कलाकारांची मानधन योजनेसाठी निवड करताना त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे. त्यासाठी mahakalasanman.org यावर कलाकारांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे. सर्व वृद्ध कलावंत आणि साहित्यिकांनी मानधन योजनेचे अर्ज दि. 15 सप्टेंबर 2024 पूर्वी भरावेत, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत बालासाहेब बायस यांनी केले आहे.

00000

जागतिक पर्यटन दिनानिमित्त

अमरावती, दि. 09 (जिमाका) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यत येणार आहे. यात नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वर्षी संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेद्वारे सन 2024 करीता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य पर्यटन आणि शांतता हे घोषित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्रादेशिक कार्यालयातर्फे उपक्रम राबविण्यात येणार आहे.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त परिसंवाद आयोजित करणात येणार आहे. यात जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ज्ञ पर्यटन व्यवसासिकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. यातील सहभागी विद्यार्थाना प्रमाणपत्र आणि बक्षिसे देण्यात येणार आहेत. चिखलदरा येथील पर्यटक निवासात पर्यटकांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करून पर्यटन स्थळांची माहिती देण्यात येणार आहे.

महामंडळाने सोमवार ते गुरुवार ज्येष्ठ नागरिकांसाठी 20 टक्के, शासकीय कर्मचारी यांना 10 टक्के, दिव्यांगासाठी 20 टक्के, माजी सैनिकांसाठी 20 टक्के पर्यटक निवासाच्या आरक्षणावर सवलती जाहीर केली आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त महामंडळाने जाहिर केलेल्या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी केले आहे.

00000

घरेलू कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप

*दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन

अमरावती, दि. 09 (जिमाका): महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जिल्ह्यातील 31 जुलै 2024 पर्यंत नोंदणी केलेल्यांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. याबाबत दिशाभूल आणि फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 जिल्ह्यातील नोंदीत जिवित पात्र घरेलू कामगारांना गृहपयोगी वस्तु संच वाटप करण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळाकडून प्राप्त निर्देशानुसार दि. 1 ऑगस्ट 2023 ते दि. 31 जुलै 2024 या कालावधी दरम्यान ज्या घरेलू कामगारांची मंडळामध्ये नोंदणी, नुतनीकरण केले आहे, तसेच घरेलू कामगार जिवित पात्र असतील अशा कुटुंबातील एकाच व्यक्तीला गृहपयोगी वस्तू संच वाटप करण्याची वेळ व दिनांक नेमून दिलेल्या कंपनी मार्फत कळविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात दि. 31 जुलै 2024 नंतर नोंद झालेल्या घरेलू कामगारांना गृहपयोगी वस्तू संचाचे वाटप करण्याबाबत कोणतेही निर्देश मंडळाकडून प्राप्त झालेले नाही. त्यामुळे संबंधित घरेलू कामगारांनी नोंदणीसाठी कुठल्याही त्रयस्त व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नये. तसेच आर्थिक फसवणूक करुन घेऊ नये. घरेलू कामगारांची नोंदणी शुल्क 13 रूपये आणि नूतनीकरण शुल्क 12 रूपये मंडळामार्फत स्विकारण्यात येते. तसेच घरेलू कामगारांना  मंडळामार्फत रीतसर पावती देण्यात येते. या व्यतिरिक्त मंडळामार्फत कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत नाही.

सदर मंडळाची योजना ही निशुल्क असून त्रयस्त व्यक्तीद्वारे आपली दिशाभूल, फसवणूक करण्यात येत असल्यास नजिकच्या पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करावी, असे आवा हन कामगार उप आयुक्त कार्यालयाने केले आहे.

0000

गणेशोत्सवाच्या काळात राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

*तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती, दि. 09 (जिमाका) : गणेशोत्सवाच्या काळात राज्य उत्पादन शुल्कने अवैध दारूविक्री विरोधात कारवाई सुरू केली आहे. यात महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेलगत मोर्शी तालुक्यातील पाळा येथे मध्यप्रदेशात निर्मित आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या बियरचा 85 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच मध्यप्रदेशातू‌न महाराष्ट्र राज्यात येणारी 360 लिटर गावठी दारुसह 1 लाख 92 हजार 799  रुपयांचा मुदेमाल जप्त करून तीन दुचाकीसह 2 लाख 78 हजार 499 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

मध्यप्रदेशातून महाराष्ट्र राज्यात येणारी बजाज डिस्कव्हर क्र. एमपी 48 एमक्यू 3251, हिरो पॅशन प्रो क्रमांक अस्पष्ट, बजाज सिटी 110 क्र. एमएच 27 9707 ही वाहने गावठी दारु 360 लिटर, मध्यप्रदेश राज्यात निर्मित बिअर 31.2 लिटर दारुचा साठा व दोन मोबाईल पवन शामदेवराव निर्मळ, रा. वार्ड क्र. 1, सालबर्डी, ता. मुलताई, जि. बैतुल (मध्यप्रदेश), सुभाष रामभाऊ नागले, रा. वार्ड क्र. 20, नरखेड, ता. मुललाई, जि. बैतुल (मध्यप्रदेश), गणेश धोंडोजी कुमरे, रा. पेठपुरा, मोर्शी, रोशन अशोकराव नागमोते, रा. रामजीबाबा चौक, मोर्शी, रामदास जामलाल उईके, रा. गिट्टीखदान, मोर्शी, गोविंदा बसंता शिरसाट, रा गिट्टीखदान, मोर्शी यांच्याकडून एकूण 2 लाख 78 हजार 499  किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक सुरज दाबेराव, दुय्यम निरीक्षक डॉ. सचिन मेश्राम, दुय्यम निरीक्षक एकनाथ शेजू‌ळ, जवान बजरंग थोरात, पंकज भारती, महेश म्हैसकर व वाहनचालक संजय देहाड़े यांनी केली.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...