Wednesday, September 25, 2024

DIO AMRAVATI NEWS 25.09.2024

 



पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

                अमरावती, दि. 25 : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात  आज निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 तहसिलदार प्रशांत पडघम, अधीक्षक निलेश खटके, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रज्ज्वल पाथरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यांनीही यावेळी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.               

                            

00000

 

जलजन्य व कीटकजन्य आजाराच्या साथीला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाच्या सूचना

 

अमरावती, दि. 25 : दरवर्षी पावसाळयात व पावसाळयानंतर  जलजन्य व कीटकजन्य आजाराच्या साथी पसरतात. पावसाळ्यात पाण्याचे स्रोत दूषित होतात. त्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, कावीळ, विषमज्वर, विषाणूजन्य या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होऊन हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनियासारखे आजार वाढतात. यासाठी आरोग्य विभागामार्फत आरोग्य शिबिरांचे आयोजन करुन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. किरकोळ आजारावर उपचार करुण संशयित रुग्णांचे रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. या आजारांना आळा घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी सर्वेक्षण करीत आहेत. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली आहे.

जलजन्य व कीटकजन्य आजाराच्या साथीला आळा घालण्यासाठी शुध्द पाण्याचा पिण्यासाठी वापर करा. गावातील विहिरीचे शुध्दीकरण करुन घ्यावे. आपल्या घराचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. परिसरातील नाल्या, गटारी, डबकी  यात पाणी तुंबू नये याबाबत दक्ष रहावे, आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, सांडपाण्यासाठी शोषखड्‌डा व परसबाग निर्माण करावी, आजारी व्यक्ती व लहान मुलांना पाणी उकळून गार करुन प्यावयास दयावे. साथीचे आजार बळावल्यास सर्वप्रथम आशा, आरोग्य सेवक, सेविका प्राथमिक आरोग्य केंद्रास सूचना दयाव्यात, साचलेल्या पाण्यामध्ये ऑईल, गोडे तेल टाकावे जेणेकरुन डास उत्पत्ती होणार नाहीत.  भाजीपाला व फळे मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावीत.  ग्रामपंचायतकडून धूर फवारणी करुण घेण्यात यावी. आपल्या छतावरील टायर व रिकाम्या प्लास्टिकच्या बॉटल्स तसेच इतर पाणी साचणारे साहित्य काढून टाकावे. झोपतांन मच्छरदाणीचा वापर करावा. कुलरमधील पाणी काढावे. तसेच फुलदाण्या आणि कुंडयांमध्ये पाणी साचू देवू नये.

शिळे व उघडयावरचे अन्न खाऊ नये. तसेच दूषित मांस व फळे खाऊ नये, डासांच्या अळया पाण्यामध्ये होवू देऊ नये.  पिण्याच्या विहिरीजवळ भांडी, कपडे व प्राणी धुवू नये.  परिसरात कुठेही सांडपाण्याचे डबके साचू देवू नये, उघडयावर शौचास बसू नये. अनोळखी तथा नवीन विहिरीचे पाणी शुध्द केल्यावर अथवा खात्री झाल्याशिवाय सेवन करु नये, याबाबींची खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

000000

संत्रा फळबाग योजनेतंर्गत प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभारण्याबाबत

प्रस्ताव सादर करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : राज्य शासनाने राज्यातील नागपूर जिल्हयातील नागपूर, काटोल व कळमेश्वर तर अमरावती जिल्हयातील मोर्शी,  बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणे यास मान्यता देवून 20 कोटी रुपये  निधीची तरतुद करण्यात आलेली आहे. योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सहकारी प्रक्रिया संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, खाजगी उद्योजक आणि बाजार समिती यांचा समावेश आहे.

               महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने पहिल्या टप्यात प्राथमिक प्रक्रिया प्रकल्पासाठी लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरु केलेली आहे. या प्रकल्पासाठी प्रस्ताव मागविण्यासाठी निविदा तसेच मॉडेल प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य कृषि पणनमंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  आता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024  पर्यंत वाढविण्यात येत आहे. त्याबाबतची सूचना पणनमंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ संबंधित तालुक्यातील जास्तीत-जास्त लाभार्थींनी घ्यावा. या योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या मुख्यालयाशी     020-24528100  या दूरध्वनी क्रमांकावर प्रकल्प विभागाशी संपर्क साधावा,  असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी केले आहे.

000000

 

 

शहरातील इच्छुक महिलांना रोजगारासाठी

पिंक (गुलाबी) ई- रिक्षा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुर्नवसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, स्त्री सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या अमरावती शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व  चालविण्यासाठी  इतर सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  शहरातील गरजू महिलांना रोजगारासाठी  ‘पिंक (गुलाबी) ई- रिक्षा’ योजना लागू करण्यात आली आहे.

 योजनेचे स्वरुप : 

ई-रिक्षाची किंमतीमध्ये सर्व करांच्या (जीएसटी, रेजिस्ट्रेशन रोड टॅक्स इ.­) समावेश असेल. नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकाकडून ई- रिक्षा किंमतीच्या 70 टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल.  राज्य शासन 20 टक्के आर्थिक भार उचलेल,  योजनेची लाभार्थी महिला-मुली यांच्यावर 10 टक्के आर्थिक भार असेल, कर्जाची परतफेड करण्याची मुदत 5 वर्षे  राहील.

योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता :

लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र रहिवाशी असणे आवश्यक राहील. अर्जदाराचे वय 20 ते 40 वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न  3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.  विधवा, कायद्याचे घटस्फोटित, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह बालगृहातील आजी-माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल.  दारिद्रय रेषेखालील महिलांनाही प्राधान्य देण्यात येईल.

योजनेचा अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल कल्याण, जिल्हा परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ, सर्व कार्यालय, महिला व बाल विकास भवन, कॅम्प रोड, अमरावती, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी (पूर्व), बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी (पश्चिम), दत्तापॅलेस गांधी चौक, अमरावती, अधीक्षक, शासकीय मुलींचे निरीक्षणगृह, बालगृह, देसाई ले-आउट, गणेश कॉलनी, जिल्हा समन्वयक महिला सक्षमीकरण केंद्र, वन स्टॉप सेंटर, जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती या कार्यालयातून प्राप्त करुन 7 दिवसात सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...