प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम
अभियानामधून
आदिवासी बहुल गावांच्या विकासात
पडणार भर
अमरावती, दि. 24 (जिमाका): केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळाने
नुकतीच प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी
अभियानाला मान्यता दिली. या अभियानाव्दारे संपूर्ण देशभरातील 30 राज्ये केंद्रशाशित
प्रदेशातील 549 जिल्ह्यांमधील 2 हजार 740 तालुक्यातील 63 हजार 843 आदिवासीबहुल गावांचा
विकास साधला जाणार आहे. या अभियानांतर्गत या गावांमध्ये 79 हजार 256 कोटी रुपयांची
विकास कामे करण्यात येणार असून, यामध्ये 56 हजार 333 कोटी रुपये एवढा केंद्राचा वाटा
असून, 22 हजार 823 कोटी रुपये एवढा राज्याचा वाटा असणार आहे.
या अभियानांतर्गत 17 मंत्रालयीन विभागांना 25 प्रकारच्या
योजना राबविण्यासाठी अनुसूचित जमातीसाठी विकास कृती आराखडा अंतर्गत प्राप्त झालेल्या
निधीतून 5 वर्षाच्या कालावधीत आपल्याला ठरवून दिलेली साध्ये प्राप्त करावयाची आहेत.
या अभियानांतर्गत ग्रामीण विकास मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय, उर्जा मंत्रालय, नवीन
व नवीकरणीय उर्जा मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, पेट्रोलिअम व नैसर्गिक
वायु मंत्रालय, महिला व बाल विकास मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, आयुष मंत्रालय, दुरसंचार
विभाग, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय,
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, मत्स्य मंत्रालय, पशुसंवर्धन व डोंगरी विभाग, पंचायतराज
मंत्रालय, पर्यटन मंत्रालय या मंत्रालय व विभागांचा समावेश असणार आहे.
या विभागामार्फत आदिवासी बहुल गावांमध्ये पक्की घरे (प्रधानमंत्री
आवास योजना), रस्ते (प्रधानमंत्री ग्रामसडक योजना), पाणी पुरवठा (जल जीवन मिशन), घरांचे
विद्युतीकरण, नवीन सौरउर्जा योजना, फिरती आरोग्य पथक (राष्ट्रीय आरोग्य अभियान), आयुष्यमान
भारत कार्ड (प्रधानमंत्री जनआरोग्य योजना), एलपीजी कनेक्शन्स (प्रधानमंत्री उज्ज्वला
योजना), अंगणवाडी केंद्राची स्थापना (पोषण अभियान), वसतिगृहांची स्थापना (समग्र शिक्षा
अभियान), पोषण वाटीका (राष्ट्रीय आयुष अभियान), भारतनेट, स्किल इंडिया मिशन, शाश्वत
शेती प्रसिद्धी, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, राष्ट्रीय पशुधन मोहीम, राष्ट्रीय
ग्राम स्वराज अभियान, ट्रायबल होम स्टे (स्वदेश दर्शन), प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम
योजना या योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. याबरोबरच ट्रायबल मल्टिपर्पज मार्केटिंग
सेंटर्स, वनहक्क धारकांसाठी शाश्वत उपजीविका, सिकल सेल आजारासाठी क्षमता केंद्रे, आश्रमशाळा, वसतिगृहे येथील पायाभूत
सुविधा विकास यावरही विशेष भर दिला जाणार आहे.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ‘प्रधानमंत्री जनजातीय
उन्नत ग्राम अभियान’ जिल्ह्यातील अमरावतीसह अचलपुर, भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा,
दर्यापूर, धारणी, मोर्शी, वरुड या 9 तालुक्यामधील 321 आदिवासीबहुल गावांमध्ये राबविले
जाणार असल्याचे सांगितले. धारणीच्या सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प़, प्रियंवदा म्हाडदळकर
यांनी ‘प्रधानमंत्री जनजातीय उन्नत
ग्राम अभियान’ जिल्ह्यातील सर्व संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांच्या सहभागातून राबवून
या 321 गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा मानस व्यक्त केला.
000
जिल्हा खनिकर्म विभागाचे रेतीघाटबाबत
आवाहन
अमरावती, दि. 24 (जिमाका): वाळू रेती निर्गती सुधारित धोरण,
वाळू, रेती उत्खनन मार्गदर्शक सूचना तसेच वेळोवेळी निर्गमित झालेल्या सर्वोच्च न्यायालयाचे
आदेशानुसार जिल्ह्यातील रेतीघाटांचे सर्वेक्षण
करून एकूण 33 रेतीघाट तालुकास्तरीय संनियंत्रण समितीने रेती उत्खननासाठी योग्य असल्याचे
अहवाल जिल्हा खनिकर्म कार्यालयास सादर केला आहे.
अमरावती
जिल्ह्यातील रेती उत्खननासाठी योग्य असलेल्या रेतीघाटांचे तपशिलाचा समावेश करुन वर्ष
2024-25 च्या सुधारणेसह अद्यावत करण्यात आलेला आहे. जिल्हा सर्वेक्षण अहवालाची सुधारित आवृत्ती सर्व
जनतेचे अवलोकनार्थ तसेच अभिप्राय/सूचना (Comment) प्राप्तीसाठी www.amravati.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने
आपले अभिप्राय,/सूचना/आक्षेप//तक्रार/निवेदन ठराव इत्यादी असल्यास त्या लेखी स्वरुपात
जिल्हा वाळू संनियंत्रण समिती खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे किंवा
dmoamravati1@gmail.com या ई-मेल आयडीवर सदर जाहीर सूचनेच्या
दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीत सादर
करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांनी केले आहे.
00000
शिष्यवृत्तीचे अर्ज तातडीने निकाली काढल्याचे आवाहन
शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी महाडीबीटी पोर्टलवरून नवीन
ब नुतनीकरणाच्या अर्जांची ऑनलाईन स्वीकृती सुरू करण्यात आलेली आहे.
परंतु, सदर वर्षातील शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी
सन 2023-24 वर्षातील अर्ज निकाली काढणे आवश्यक आहे. दि.19 सप्टेंबर, 2024 रोजीच्या महाडीबीटी डॅशबोर्डनुसार विद्यार्थी स्तरावर
1 हजार 47 तर महाविद्यालयस्तरावर 789 अर्ज महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे
अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती
अर्ज विहित मुदतीत जिल्हा कार्यालयाकडे पाठविणे अपेक्षित असते. असे असतानाही जिल्ह्यातील
काही महाविद्यालयांनी ही बाब गांर्भीयाने घेतली नाही. सदर अर्ज मंजुरीसाठी समाजकल्याण
विभागाचे सहायक आयुक्त यांच्याकडे सादर करण्याबाबत वेळोवेळी कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी आपल्या
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले पात्र अर्ज जिल्हा लॉगिन वर पाठवावे. तसेच विद्यार्थ्यांनी
लॉगिनकडे त्रुटी पूर्ततेसाठी परत केलेले अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून
त्वरित त्रुटिपूर्तता करून पात्र अर्ज जिल्हा लॉगिन वर पाठविण्यात यावे, असे आवाहन
समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र व्ही. जाधवर यांनी केले आहे.
0000
अमरावती शासकीय औेद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे
येत्या गुरुवारी शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा
अमरावती,
दि. 24 (जिमाका): शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एनएसएस हॉल, अमरावती येथे गुरुवार,
दि. 26 सप्टेंबर, 2024 रोजी सकाळी 10 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात
आले आहे. या भरती मेळावामध्ये नागपूर येथील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार
आहेत. भरती मेळाव्यासाठी जास्तीत-जास्त आयटीआय मोटर मेकॅनिक, डीजल मेकॅनिक आणि इलेक्ट्रिशियन
व्यवसाय उत्तीर्ण उमेदवारांनी सहभागी होवून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक तसेच सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी केले आहे. प्रशिक्षणार्थी
यांनी बायोडाटा व मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.
अंजनगाव सूर्जी आयटीआयमध्ये
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण
रोजगार भरती मेळावा येत्या गुरुवारी
अमरावती, दि. 24 (जिमाका): मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत गुरुवार,
दि. 26 सप्टेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंजनगाव सूर्जी येथे सकाळी
11 वाजता प्रशिक्षण रोजगार भरती मेळावा व इंटर्नशिप मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात
आले आहे. या संधीचा लाभ 12 वी ,आयटीआय, पदविका, पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी घ्यावा.
योजनेचे
स्वरुप : युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन
त्यांची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री
युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्य शासनाव्दारे सुरू केली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य
प्रशिक्षण योजनेसाठी 5 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शासकीय,
निमशासकीय कार्यालये, महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स आस्थापनांनी
आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविल्यानुसार संबंधित आस्थापनांना त्याप्रमाणे
मनुष्यबळ उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.
प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक अर्हतेनुसार
12 वी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय, पदविका उत्तीर्णांना 8 हजार व पदवीधर,
पदव्युत्तर यांना 10 हजार रुपये शासनाकडून विद्यावेतन दिले जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा
कालावधी 6 महिने असून प्रशिक्षणार्थ्यांचे वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील असावा. या
योजनेसाठी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या अधिकृत
संकेतस्थळाला भेट द्यावी व मार्गदर्शक सूचनांनुसार आपली नोंदणी करावी, असे आवाहन विभागाव्दारे
करण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रे : उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा, उमेदवारांची
आधार नोंदणी असावी, उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे, उमेदवाराने कौशल्य, रोजगार
व उद्योजकता आयुक्तलयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त
केलेला असावा, उमेदवारांने अर्ज भरताना उपरोक्त ठिकाणापैकी एकाच ठिकाणासाठी अर्ज सादर
करावा. सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधीत उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन
देण्यात येणार आहे. एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल. उमेदवाराचे ज्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी नेमणूक केली
जाईल, ते मुख्यालय सोडता येणार नाही, यांची नोंद घ्यावी, असे संस्थेचे प्राचार्य आर.
टी. शेगोकार यांनी कळविले आहे.
0000
अमरावती, दि. 24 (जिमाका) : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातर्फे
उपमुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य मोफत तपासणी अंतर्गत वलगाव येथे आरोग्य तपासणी
शिबिर पार पडले.
आरोग्य शिबिरात कर्करोग, हृदयरोग, मेंदू, लघवी, किडनी, किडनी
प्रत्यारोपण, प्लास्टिक सर्जरी, बालरोग रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील 102
रुग्णांपैकी 34 रुग्णांवर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पुढील उपचार करण्यात
येणार आहे.
शिबिरासाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.
अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, नोडल अधिकारी डॉ. श्याम गावंडे
यांनी पुढाकार घेतला. शिबिरामध्ये तपासणीसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील
तज्ज्ञ वैद्यकीय चमूमध्ये डॉ. सपना गुप्ता, आहारतज्ज्ञ कविता देशमुख, समुपदेशक
दिनेश हिवराळे, लेखापाल भूपेंद्र जेवडे, प्राथमिक आरोग्य केंद्र वलगाव डॉ.
दक्षायणी अनवाने, पी. एस. शहा, एच. एल. एल. मिलिंद गजभिये, गिरिश उघडे,
रूग्णवाहिका चालक दिपक शर्मा, परिचर हर्षा काळे यांनी सहकार्य केले.
0000
No comments:
Post a Comment