मेळघाटातील
अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात
-जिल्हाधिकारी सौरभ कटियार
अमरावती,
दि. 30 : सिमाडोह येथील अपघातानंतर मेळघाटातील अपघाताचा मुद्दा गांभीर्याने समोर
आला आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्या लागणार आहे. त्यामुळे शक्य असलेल्या ठिकाणी
रस्ता रूंदीकरण, संरक्षण कठडे उभारणे आणि परिवहन मंडळाच्या बसेसच्या फेऱ्या
तातडीने वाढवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी
कार्यालयात सिमाडोह येथील खासगी बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या
उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता
मोहपात्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी
उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
श्री. कटियार यांनी, अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, परिवहन आणि परिवहन
महामंडळातर्फे एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. परिवहन
महामंडळाच्या बसेसची संख्या आणि वेळेवर बसेस नसल्यामुळे नागरिक खासगी बसेसमधून
नाईलाजाने प्रवास करतात. त्यामुळे परिवहन मंडळाने बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात.
तसेच प्रवाशांच्या गरजेनुसार बसेसचा वेळ ठरविण्यात यावा. यामुळे खासगी बसमधून
प्रवास करणाऱ्यांची संख्या नियंत्रणात येईल.
मेळघाटातील
रस्ते अरूंद आहेत. तसेच वळणाचे रस्ते असल्यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता वाढत
असते. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी फलक लावण्यात यावेत. तसेच रस्ता रूंदीकरण आणि
अपघात प्रवण क्षेत्रात संरक्षक कठडे उभारण्यात यावेत. अपघातासाठी खासगी वाहनांचा
अतिवेग कारण असल्यामुळे परिवहन विभागाने पोलिसांसोबत वाहनांची तपासणी करण्यात
यावी. यात अतिवेगासोबतच मर्यादेपेक्षा जादा प्रवासी असल्यास कारवाई करावी.
त्यामुळे खासगी वाहतुकीवर अंकुश लागण्यास मदत होईल.
वन
विभागाच्या परवानगी अभावी नवीन रस्त्यांचे कामे करणे शक्य नाही. मात्र खडीकरण करून
रस्ते रूंद करणे तातडीने शक्य आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या
रूंदीकरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. त्यामुळे भविष्यात याठिकाणी रूंद रस्ते
तयार होण्यास मदत होईल. यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश
दिले.
00000
नांदगाव
खंडेश्वर येथे स्वच्छता ही सेवा मोहिमेला सुरुवात
अमरावती,
दि. 30 : नेहरू युवा केंद्रतर्फे नांदगाव खंडेश्वर येथे स्वच्छता ही सेवा मोहीमेला
सुरवात करण्यात आली. यात नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद
नोंदविला.
जिल्हा
समन्वयक स्नेहल बासुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या
कालावधीत स्वच्छता ही सेवा 2024 मोहीम राबविण्यात येत आहे. यात स्वच्छतेचे
महत्त्व, स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता यांचे पालन करण्यात येत आहे. गांधी
जयंती अगोदर परिसर स्वच्छ करणे, दररोज परिसर स्वच्छ ठेवणे आणि आरोग्य निरोगी
राहावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांना
भूपेंद्र जेवडे यांनी स्वच्छतेची शपथ दिली. स्वच्छता मोहिमेला ॲड. मोहन जाधव, भुमेश्वर
गोरे, आकाश मंगळे, पवन जेवडे, निलेश हळदे, सचिन डोक यांनी पुढाकार घेतला.
00000
नया अकोला
येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
अमरावती,
दि. 30 : उपमुख्यमंत्री सामुदायिक मोफत आरोग्य तपासणी शिबीर नया अकोला येथे पार
पडले.
शिबिरात
कर्करोग, हृदयरोग, मेंदू, लघवी, किडनी आजार, किडनी प्रत्यारोपण, प्लास्टिक सर्जरी,
बालरोग, एनसीडी आजाराशी संबंधित रुग्ण तपासणी करण्यात आली. यात 92 रुग्णांपैकी 25 रुग्ण विभागीय
संदर्भ सेवा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. शिबिरासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.
अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, नोडल अधिकारी डॉ. श्याम गावंडे
यांनी मार्गदर्शन केले. तपासणीसाठी डॉ. सपना गुप्ता, वैद्यकीय अधिकारी दिनेश
हिवराळे, लेखापाल भूपेंद्र जेवडे, अधिपरीचारीका प्रतिभा सोळंके, एस. एस. खेडेकर,
आशा जी. एच. निमकर, सुनंदा ढोक, योगिता घोम, राजकन्या बुरडे, आरती बागडे, दिपक
शर्मा यांनी सहकार्य केले.
0000
सणउत्सव
कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी
अमरावती,
दि. 30 : जिल्ह्यात आगामी काळात सण उत्सव साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर
प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे.
जिल्ह्यात
नवरात्री उत्सवास प्रारंभ होणार आहे, तसेच दुर्गा विसर्जन, विविध कर्मचाऱ्यांचा
संप सुरू आहे, या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित
राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 नुसार पोलीस आयुक्तालयाच्या
परिसरातील दि. 2 ते दि. 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पर्यंत प्रतिबंधात्मक
आदेश लागू राहणार आहे.
0000
तंत्रनिकेतनमध्ये
मोफत ब्युटिशियन प्रशिक्षण
अमरावती,
दि. 30 : केंद्र शासन पुरस्कृत कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्निक योजना ही
शासकीय तंत्रनिकेतन येथे राबविण्यात येते. यात तांत्रिक कौशल्यावर आधारीत
ब्युटिशियन या तीन महिने कालावधीचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण
ग्रामीण अल्पशिक्षीत युवतींसाठी आहे. प्रशिक्षणासाठी वयाची अट नाही.
प्रशिक्षणासाठी अर्ज योजनेच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. मुलाखतीतून
प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कम्युनिटी
डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्निक योजना कार्यालय, मुलींचे वसतिगृहासमोर, शासकीय
तंत्रनिकेतन परिसर गाडगेनगर, अमरावती येथे संदीप डाहाके, विनोद कदम यांच्याशी
संपर्क साधावा, असे आवाहन योजनेचे समन्वयक प्रा. एस.
व्ही. आचार्य आणि प्राचार्य व्ही. आर मानकर यांनी केले आहे.
00000
भूकंपामुळे कोणतीही हानी नाही
नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अमरावती, दि. 30 : जिल्ह्यात आज दि. ३० सप्टेंबर रोजी वेळ दुपारी १.३७ मिनिटांनी चिखलदरा तालुक्यातील टेटू आणि आमझरी भागामध्ये आणि लगतचे काही गाव, तालुक्यामध्ये भूकंपाचा धक्का जाणविल्याची माहिती मिळाली. या भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नसून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या संदर्भातील तांत्रिक माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, नवी दिल्ली यांनी वेबसाईटवर भूकंपाची माहिती प्रकाशित केली आहे. यात 4.2 तिव्रता दर्शविली आहे. यासंदर्भात भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण मध्य विभाग नागपूर येथील भूवैज्ञानिकांशी संपर्क करण्यात आला आहे. त्यांच्याद्वारे क्षेत्रिय तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर भूकंप किंवा हादऱ्याबद्दलची कारणे आणि इतर आवश्यक बाबींची माहिती प्राप्त होणार आहे.
जिल्ह्यातील भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याबाबत माहिती प्राप्त झालेली नाही. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, तसेच सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
00000
No comments:
Post a Comment