Friday, September 27, 2024

DIO AMRAVATI NEWS 27.09.2024

 





महिलांना एमआयडीसीत प्राधान्याने जागा देणार

       - उद्योगमंत्री उदय सामंत

महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रम थाटात संपन्न

            अमरावती, दि. 27 (जिमाका) : उद्योग क्षेत्रामध्ये राज्य आघाडीवर आहे. उद्योग क्षेत्रामध्येही स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिलांचा टक्का वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एमआयडीसीच्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र भूखंड उपलब्ध करुन दिले जातील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रम आज येथे पार पडला. यावेळी आमदार रवी राणा, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, संपूर्ण बाजारपेठेचा उद्योग क्षेत्राशी संबंध येतोच. त्यामुळे सामाजिक सक्षमीकरण करताना उद्योग क्षेत्राचा विचार करावाच लागतो. लाडकी बहिण योजनेतून महिलांचे सक्षमीकरण करीत असताना त्यांना मिळालेल्या मदतीतून बाजारपेठेतील आवश्यक वस्तूंची खरेदी होत असल्यामुळे एका दृष्टीकोनातून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. त्यामुळे राज्याचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी उद्योग क्षेत्राचा विकास करणे गरजेचे आहे. विदर्भाचा विकास व्हावा यासाठी नांदगाव पेठ येथे पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे. उद्योग क्षेत्रात सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही महत्वाची नांदी आहे.

             ग्रामीण पातळीवर रोजगार निर्माण करणारी विश्वकर्मा योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेत 50 हजार नोंदणी झाली, यातील 30 हजार लाभार्थ्यांना किटचे वाटप करण्यात आले. यात 35 हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्रामीण पातळीवरील रोजगारासह मोठे उद्योग राज्यात येण्यासाठी उद्योग विभाग कार्य करीत आहे. राज्यातील एकही उद्योग बाहेर जाऊ दिल्या जाणार नाही. त्यासोबतच गडचिरोली सारख्या जिल्ह्यात स्टील क्षेत्रातील गुंतवणूक होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या एक वर्षात येथील चित्र बदलेले असेल.

 कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. उपेंद्र तोमर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. मोनिका उमक यांनी सूत्रसंचालन केले.

000000







पर्यटनदिनानिमित्त विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन

            अमरावती, दि. 27 (जिमाका) : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज विविध उपक्रम राबविण्यात आले. यात पक्षीनिरिक्षण, कला प्रदर्शन आणि पथनाट्याचे सादरीकरण करून पर्यटनाबाबत जनजागृती करण्यात आली.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज सकाळी वाजता छत्री तलाव परिसरात ट्रेकिंग आणि पक्षी निरिक्षणाचा कार्यक्रम पार पडला. यात अॅडव्हेंचर हब क्लबचे जयंत वडतकर, मनिष ढाकुलकर यांनी विविध पक्ष्यांबाबत माहिती दिली. आजच्या पक्षी निरिक्षणामध्ये 35 प्रजातींचे पक्षी आढळून आले. पक्षी निरीक्षकांकडून या पक्ष्यांबाबत सविस्तर वैज्ञानिक माहिती देण्यात आली.

अॅनिमेशन कॉलेजच्या वतीने पेपर शिल्प, कला प्रदर्शनी घेण्यात आली. यात प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी पेपरपासून तयार केलेल्या गणपतीचे प्रदर्शन भरविण्यात आले. पेपर शिल्पाबाबत प्राचार्य विजय राऊत यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. समाजकार्य महाविद्यालयाच्या युवा पर्यटन क्लबमार्फत इर्विन चौकात पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणातून पर्यटनाबाबत माहिती देण्यात आली. यात सहभागी कलावंताना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्था या आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थेद्वारे २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन जाहिर करण्यात आला आहे. या दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थेद्वारे घोषवाक्य प्रसिद्ध करण्यात आले आहे. यावर्षी जागतिक पर्यटन दिनाचे पर्यटन आणि शांतता हे घोषवाक्य घोषित करण्यात आले होते. त्यानुसार जागतिक पर्यटनदिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यातून पर्यटन आणि शांततेचा संदेश देण्यात आला आहे.

पर्यटनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्थानिक नागरिकांतर्फे विविध क्षेत्रात उपक्रमशिल कार्यक्रम राबविण्यात येतात. ही आशादायक बाब आहे. यातूनही स्थानिक पर्यटनवाढीसाठी हातभार लागेल, असे मत पर्यटन उपसंचालक विजय अवधाने यांनी व्यक्त केले.

00000


जागतिक रेबीज दिनानिमित्त जनजागृती

अमरावती, दि. 27 (जिमाका) : जागतिक रेबीज दिन दि. 28 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. रेबीज दिनानिमित्त आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

नागरिकांना रेबीजबद्दल जागरूक करण्यासाठी आणि प्राणघातक आजारापासून वाचवण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी रेबीज दिन साजरा करण्यात येतो. जागतिक रेबीज दिनाचा उद्देश मानव आणि प्राण्यांवर रेबीजच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता वाढविणे, धोकादायक रोग रोखता येईल, याविषयी माहिती आणि सल्ला प्रदान करणे आणि रेबीज नियंत्रणातील वाढीव प्रयत्नांसाठी प्रयत्न करणे आहे.

रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी कुत्रा, ससा, माकड, मांजर चावल्यानंतर होतो. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास म्हणतात. रेबीज रोग झाल्यास प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175  दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात, त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात, त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि रेबीज झालेली कुत्री माणसांना चावल्यास हा रोग होतो. कुत्र्यांच्या लाळेद्वारे रोगाचा प्रसार होतो.

या रोगाची लक्षणे ही साधारणपणे 2 ते 12 आठवडे ताप आणि तापाची लक्षणे दिसतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, अतिशयोक्ती करत वागणे अशी लक्षणे दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची भिती वाटते. रेबीज झालेल्या माणसाचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो. माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो. वास्तविक कुत्रा चावला म्हणून असा आवाज येतो असे नाही. पण काही अशिक्षित माणसे असा विचार करून कुत्र्यांना मारतात.

या आजारावर उपचार म्हणून चावल्याने जखम झाल्यावर लवकरात लवकर साबण व स्वच्छ पाण्याने धुतल्यास जखमेतील रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होते. शक्य असल्यास त्यावर ॲण्टीसेप्टीक मलम लावावे. त्वरीत जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रेबीजवर पीईपी पोस्ट एक्‍स्पोजर प्रोफायलॅक्सिस ही प्रभावी लस उपलब्ध असून कुत्रे चावल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ती टोचून घेणे योग्य आहे. पेशंटने मानवी रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस 28 दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकरात लवकर घेतला पाहिजे. त्यानंतर 3 दिवस, 7 दिवस आणि 28 दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. आता पोटात घ्यायचे इंजेक्शन देण्याची गरज नसून दंडावर देण्याचे इंजेक्शन उपलब्ध आहे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

000000

--




No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...