Thursday, September 19, 2024

DIO AMRAVATI NEWS 19.09.2024

 

शनिवारी राज्यस्तरीय विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

       अमरावती, दि. 19 (जिमाका) : राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, कोलकत्ता व नॅशनल कौन्सिल ऑफ सायंस म्युझियम यांच्यातर्फे अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी, दि. 21 रोजी सकाळी 9 वाजता शिवाजी विज्ञान महा‍विद्यालयात या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. यावर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता - संभाव्यता व आवाहने या विषयावर हा मेळावा होणार आहे.

यावेळी उद्घाटक म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी सौरभ कटियार अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. व्ही. जी ठाकरे उपस्थित राहतील.

            राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी प्रत्येक विभागातून दोन विद्यार्थी याप्रमाणे सोळा विद्यार्थी दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी सर सी. व्ही रमन सभागृह, शिवाजी विज्ञान महाविद्यालय येथील स्पर्धेत सहभागी होतील. यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धेसाठी शंभर गुणांचे मुल्याकन राहणार आहे. या सोळा विद्यार्थ्यापैकी  गुणानुक्रमे एका विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.

समारोप कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. शिवलिंग पटवे उपस्थित राहतील.

            राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक 3 हजार 500 रूपये ट्रॉफी व प्रमाणपत्र, सहा उत्तेजनार्थ प्रति विद्यार्थी 1 हजार 500 रूपये ट्रॉफी व प्रमाणपत्र आणि सहभागी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. हर्षलता बुराडे यांनी कळविले आहे.    

0000





स्वच्छताही सेवा अभियानाला सुरवात

अमरावती, दि. 19 (जिमाका) : नेहरु युवा केंद्रातर्फे स्वच्छताही सेवा या स्वच्छता अभियानाला सुरवात झाली आहे. यात युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर अभियान दि. 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवक घर, मोहल्ला, गाव, शहर आणि तलाव नदी. नाले यातील प्लास्टीक गोळा करणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत निशनच्या 10 व्या वर्षानिमित्त माय भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय या विभागांतर्गत स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता या थीमसह स्वच्छ भारत मिशन - नया संकल्प है देशव्यापी अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे उदि्दष्ट एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टीकच्या पर्यावरण आणि आरोग्यावरील परिणामाबद्दल शिक्षित आणि जागरुकता निर्माण करणे आणि स्वच्छ आणि निरोगी वातावरण राखण्यासाठी समुदायाच्या सहभागाद्वारे पुन्हा वापरता येण्याजोग्या उत्पादनांचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात युवक मंडळाच्या माध्यमाने राबविण्यात येणार आहे. यासाठी युवकांनी सार्वजनिक ठिकाणी येवून गाव, परिसराची स्वच्छता करुन विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच युवकांनी केरकचरा, प्लास्टीकपासून गावाची मुक्तता करावी, तसेच माय भारत पोर्टलपर नाव नोंदणी करावी, असे आवाहन नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यांनी असे केले आहे.

000000

करजगाव, देवरा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

अमरावती, दि. 19 (जिमाका) : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातर्फे उपमुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य मोफत तपासणी अंतर्गत करजगाव आणि देवरा (शहिद) येथे आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.

आरोग्य शिबिरात कर्करोग, हृदयरोग, मेंदू, लघवी, किडनी, किडनी प्रत्यारोपण, प्लास्टिक सर्जरी, बालरोग रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील 86 रूग्णांपैकी 19 रुग्णांवर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पुढील उपचार करण्यात येणार आहे.

शिबिरासाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, नोडल अधिकारी डॉ. श्याम गावंडे यांनी पुढाकार घेतला. शिबिरामध्ये तपासणीसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय चमूमध्ये डॉ. सपना गुप्ता, आहारतज्ज्ञ कविता देशमुख, समुपदेशक दिनेश हिवराळे, लेखापाल भूपेंद्र जेवडे, समुदाय आरोग्य अधिकारी गीता दराके, आरोग्य सहाय्यक श्री. पतंगराव, रूग्णवाहिका चालक आबाराव खंडारे, परिचर हर्षा काळे यांनी सहकार्य केले.

0000




मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच. विजयाशंकर यांनी साधला

धनगर बेडा येथील समाज बांधवांशी संवाद

अमरावती दि. 19 (जिमाका) : मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच. विजयाशंकर यांचे आज अमरावती विश्रामगृह येथे सकाळी आगमन झाले.  यावेळी त्यांना पोलीस विभागामार्फत सलामी देऊन मानवंदना देण्यात आली . पद्मश्री डॉ. विकास महात्मे, धनगर विकासमंचचे अध्यक्ष संतोष महात्मे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, विभागीय उपायुक्त संजय पवार, महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, वनविभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, सहायक वनसंरक्षक ज्ञानेश्वर देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी बी. आर. पवार तसेच चांदुर रेल्वेच्या उपविभागीय अधिकारी तेजस्विनी कोरे, तहसीलदार पूजा माटोडे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

             त्यानंतर राज्यपाल श्री. विजयाशंकर त्यांनी  चांदुर रेल्वे तालुक्यातील धनगर बेडा येथे भेट दिली. यावेळी धनगर समाज बांधवांचे दैवत श्री. खंडोबा यांच्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. धनगर बेडा समाज बांधवांनी राज्यपाल श्री. विजयाशंकर यांचा पारंपारिक पद्धतीने घोंगडी श्रीफळ देवून सत्कार केला . तसेच स्त्री-पुरुषांनी पारंपारिक नृत्य यावेळी सादर केले. राज्यपाल महोदय यांनी धनगर समाज बांधवांशी संवाद साधला.

भटकंती करणाऱ्या समाज बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बेड्यावरील बांधवांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी निवडक प्रतिनिधींसह सुनियोजित दिवशी मुंबई येथील राजभवन येथे यावे .मी तेथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या समोर आपल्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा करू. तुमच्या समस्यांचे निराकरण करण्याचे मी निश्चित प्रयत्न करेल. पाड्यावरील सर्व बांधवांना शासकीय योजनेअंतर्गत घर बांधणे, पाड्यांपर्यंत रस्ते बांधकाम, शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था तसेच आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. वन विभागामार्फत धनगर समाज बांधवांना सहकार्य मिळेल. तसेच पाड्यावर  राहणाऱ्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड अशी शासकीय कागदपत्रे तयार करण्यावर भर दिला जाईल, असा विश्वास राज्यपाल श्री. विजयाशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमानंतर राज्यपाल यांनी  नागपूरकडे  प्रयाण केले .

00000

पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ई-भूमिपूजन

अमरावती दि. 19 (जिमाअ) :  नांदगाव पेठ येथील अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र येथे उद्या शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता पी एम मित्रा टेक्सटाईल पार्कचे ई-भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नांदगाव पेठ येथील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क येथे करण्यात येणार आहे .या कार्यक्रमाला जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडळकर यांनी केले आहे.

            पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रीजन्स ॲड अपेरल (पीएम मित्रा )पार्क अमरावती या प्रकल्पाची किंमत 703.23 कोटी रुपये एवढी आहे. या टेक्स्टाईल पार्कला विकसित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत विकास भांडवल अर्थसहाय्य 200 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. हा प्रकल्प 1076.80 हेक्टर जमिनीवर विकसित झालेल्या अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र येथे सदर पार्क निर्माण होणार आहे. पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कमध्ये जलद गतीने उद्योग स्थापन होण्यासाठी प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी प्रति पार्क 300 कोटी रुपयांची तरतूद आहे. एकात्मिक टेक्सटाईल पार्कच्या स्वरूपात विशेषतः महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी निर्माण होतील. या प्रकल्पातून 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीची शक्यता आहे तसेच एक लाखांपेक्षा जास्त रोजगारांची निर्मिती होणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...