Friday, September 20, 2024

DIO AMRAVATI NEWS 20.09.2024

 





प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कचे ई-भूमिपूजन

नांदगाव पेठ पार्क क्रांतिकारी पाऊल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

अमरावती, दि. 20 (जिमाका) : अमरावती येथील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कमुळे देशाच्या अर्थकारणाला हातभार लागणार आहे. याठिकाणी तीन लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. टेक्सटाईल पार्कमुळे याठिकाणी आमुलाग्र बदल होणार आहेत. या भागाच्या औद्योगिक क्रांतीसाठी हे क्रांतीकारी पाऊल आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केले. त्यांच्या हस्ते वर्धा येथून नांदगाव पेठ येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन करण्यात आले.

नांदगाव पेठ येथील अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र येथे वर्धा येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. खासदार डॉ. अनिल बोंडे, नवनीत राणा, आमदार रवी राणा, डिगर गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रज्ञा बाजारे, पिंपर विहीरच्या सरपंच मुक्ता ठाकरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता ए. बी. डाबेराव, सहायक पो‍लिस आयुक्त सागर पाटील, के. एम. पुंडकर, प्रादेशिक अधिकारी प्रशांत पडाळकर, वस्त्रोद्योग उप वस्त्रोद्योग अभियंता सुधीर अमृतकर, तहसीलदार वैशाली पाथरे, उप अभियंता संजय विधळे, उप अभियंता श्री. राठोड, क्षेत्र व्यवस्थापक सुभाष राऊत आदी उपस्थित होते.

          प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क ही वस्त्रोद्योग क्षेत्रात क्रांती आणणारी योजना आहे. पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क येथे जागतिक दर्जाच्या औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. यामुळे थेट शेतातून विदेशात निर्यात होणारे कापड निर्मितीकरीता संपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील. नांदगाव पेठ येथील अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्रात 1 हजार हेक्टर जागेमध्ये पीएम मित्रा पार्क उभारण्यात येणार आहे. येथे 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. निर्यात क्षमता वाढीसाठी फाईव्ह एफ व्हिजन ठेवण्यात आले आहे. यामध्ये फार्म ते फायबर, फायबर ते फॅब्रिक, फॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन ते फॉरेन अशा पद्धतीने कार्यप्रणाली राबविण्यात येणार आहे. पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कमुळे अमरावतीचे नाव देशाच्या नकाशावर अधोरेखित होणार आहे.

          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेक्सटाईल पार्कमुळे औद्योगिक वसाहतीचा चेहरामोहरा बदलला आहे. याठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येण्यास मदत झाली आहे. याठिकाणी तीन लाख रोजगार निर्माण होणार असल्याने या भागाची प्रतिमा उंचावण्यास मदत होणार आहे. देशातील सात टेक्सटाईल पार्कपैकी एक विदर्भात मंजूर झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

          उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी टेक्सटाईल पार्क अमरावती येथे दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यामुळे देशाचा जीडीपी वाढविण्यासाठी राज्याच्या वाटा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिकांना येथे अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येथील अर्थकारणास वेग येणार आहे. याठिकाणी नविन गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टेक्सटाईल पार्क मंजूर होणे ही महत्वपूर्ण बाब आहे. त्यामुळे विकासाच्या वाटा निर्माण होतील. टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

00000






जिल्ह्यातील 13 कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन


        अमरावती, दि. 20 (जिमाका) : राज्यातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते वर्धा येथून करण्यात आले. यात जिल्ह्यातील 13 केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.

            शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील सी. व्ही. रमण सभागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जयवंत पुसदेकर, सदस्य सुभाष बनसोड, प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे, डॉ. दिनेश खेडकर, कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर आदी उपस्थित होते.

श्री. पुसदेकर यांनी केंद्राचे उद्घाटन करीत असल्याचे जाहिर केले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासासाठी दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. यात वेब डिझाईन आणि इंस्ट्रुमेंटेशन प्रोग्रामचा समावेश असल्याचे सांगितले. या दोन्ही अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन संस्थेचे नाव मोठे करावे, असे आवाहन केले. श्री. खेळकर यांनी कौशल्य विकास केंद्रातील सर्व प्रकियांची माहिती दिली. अभ्यासक्रम हे जागतिक पातळीवरील मान्यताप्राप्त असल्याने याचे महत्व असल्याचे सांगितले. यात मर्यादीत प्रवेश दिला जाणार आहे, तसेच जाणीवपूर्वक अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार असल्याने विद्यार्थ्यांनी यात आवड असल्यास प्रवेश घेण्याचे आवाहन केले.

            कार्यक्रमाच्या सुरवातीला दिप प्रज्ज्वलन करून गाडगे महाराज आणि पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वर्धा येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. प्रा. रेखा मग्गीरवार यांनी सूत्रसंचालन केले. दिनेश खेडकर यांनी आभार मानले.

अमरावती येथील बबनराव देशमुख महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, श्री शिवाजी सायंस कॉलेज, जी. एच. रायसोनी युनिर्व्हसिटी, महिला महाविद्यालय, सुशीला सुर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲडव्हॉन्समेंट, बडनेरा येथील राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, वरुड येथील ज्योशबा सिव्हील सर्विसेस महाविद्यालय, चांदूर बाजार येथील जी. एस. टोम्पे कॉलेज, चिखलदरा येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, तिवसा येथील वायडीव्हीडी आर्ट्स, कॉमर्स कॉलेज, फातिमा कॉलेज ऑफ नर्सिंग येथील केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

00000

 


Thursday, September 19, 2024

DIO AMRAVATI NEWS 19.09.2024

 

शनिवारी राज्यस्तरीय विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

       अमरावती, दि. 19 (जिमाका) : राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, कोलकत्ता व नॅशनल कौन्सिल ऑफ सायंस म्युझियम यांच्यातर्फे अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी, दि. 21 रोजी सकाळी 9 वाजता शिवाजी विज्ञान महा‍विद्यालयात या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. यावर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता - संभाव्यता व आवाहने या विषयावर हा मेळावा होणार आहे.

यावेळी उद्घाटक म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी सौरभ कटियार अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. व्ही. जी ठाकरे उपस्थित राहतील.

            राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी प्रत्येक विभागातून दोन विद्यार्थी याप्रमाणे सोळा विद्यार्थी दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी सर सी. व्ही रमन सभागृह, शिवाजी विज्ञान महाविद्यालय येथील स्पर्धेत सहभागी होतील. यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धेसाठी शंभर गुणांचे मुल्याकन राहणार आहे. या सोळा विद्यार्थ्यापैकी  गुणानुक्रमे एका विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.

समारोप कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. शिवलिंग पटवे उपस्थित राहतील.

            राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक 3 हजार 500 रूपये ट्रॉफी व प्रमाणपत्र, सहा उत्तेजनार्थ प्रति विद्यार्थी 1 हजार 500 रूपये ट्रॉफी व प्रमाणपत्र आणि सहभागी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. हर्षलता बुराडे यांनी कळविले आहे.    

0000





स्वच्छताही सेवा अभियानाला सुरवात

अमरावती, दि. 19 (जिमाका) : नेहरु युवा केंद्रातर्फे स्वच्छताही सेवा या स्वच्छता अभियानाला सुरवात झाली आहे. यात युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर अभियान दि. 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवक घर, मोहल्ला, गाव, शहर आणि तलाव नदी. नाले यातील प्लास्टीक गोळा करणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत निशनच्या 10 व्या वर्षानिमित्त माय भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय या विभागांतर्गत स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता या थीमसह स्वच्छ भारत मिशन - नया संकल्प है देशव्यापी अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे उदि्दष्ट एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टीकच्या पर्यावरण आणि आरोग्यावरील परिणामाबद्दल शिक्षित आणि जागरुकता निर्माण करणे आणि स्वच्छ आणि निरोगी वातावरण राखण्यासाठी समुदायाच्या सहभागाद्वारे पुन्हा वापरता येण्याजोग्या उत्पादनांचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात युवक मंडळाच्या माध्यमाने राबविण्यात येणार आहे. यासाठी युवकांनी सार्वजनिक ठिकाणी येवून गाव, परिसराची स्वच्छता करुन विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच युवकांनी केरकचरा, प्लास्टीकपासून गावाची मुक्तता करावी, तसेच माय भारत पोर्टलपर नाव नोंदणी करावी, असे आवाहन नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यांनी असे केले आहे.

000000

करजगाव, देवरा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

अमरावती, दि. 19 (जिमाका) : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातर्फे उपमुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य मोफत तपासणी अंतर्गत करजगाव आणि देवरा (शहिद) येथे आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.

आरोग्य शिबिरात कर्करोग, हृदयरोग, मेंदू, लघवी, किडनी, किडनी प्रत्यारोपण, प्लास्टिक सर्जरी, बालरोग रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील 86 रूग्णांपैकी 19 रुग्णांवर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पुढील उपचार करण्यात येणार आहे.

शिबिरासाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, नोडल अधिकारी डॉ. श्याम गावंडे यांनी पुढाकार घेतला. शिबिरामध्ये तपासणीसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय चमूमध्ये डॉ. सपना गुप्ता, आहारतज्ज्ञ कविता देशमुख, समुपदेशक दिनेश हिवराळे, लेखापाल भूपेंद्र जेवडे, समुदाय आरोग्य अधिकारी गीता दराके, आरोग्य सहाय्यक श्री. पतंगराव, रूग्णवाहिका चालक आबाराव खंडारे, परिचर हर्षा काळे यांनी सहकार्य केले.

0000




मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच. विजयाशंकर यांनी साधला

धनगर बेडा येथील समाज बांधवांशी संवाद

अमरावती दि. 19 (जिमाका) : मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच. विजयाशंकर यांचे आज अमरावती विश्रामगृह येथे सकाळी आगमन झाले.  यावेळी त्यांना पोलीस विभागामार्फत सलामी देऊन मानवंदना देण्यात आली . पद्मश्री डॉ. विकास महात्मे, धनगर विकासमंचचे अध्यक्ष संतोष महात्मे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, विभागीय उपायुक्त संजय पवार, महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, वनविभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, सहायक वनसंरक्षक ज्ञानेश्वर देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी बी. आर. पवार तसेच चांदुर रेल्वेच्या उपविभागीय अधिकारी तेजस्विनी कोरे, तहसीलदार पूजा माटोडे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

             त्यानंतर राज्यपाल श्री. विजयाशंकर त्यांनी  चांदुर रेल्वे तालुक्यातील धनगर बेडा येथे भेट दिली. यावेळी धनगर समाज बांधवांचे दैवत श्री. खंडोबा यांच्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. धनगर बेडा समाज बांधवांनी राज्यपाल श्री. विजयाशंकर यांचा पारंपारिक पद्धतीने घोंगडी श्रीफळ देवून सत्कार केला . तसेच स्त्री-पुरुषांनी पारंपारिक नृत्य यावेळी सादर केले. राज्यपाल महोदय यांनी धनगर समाज बांधवांशी संवाद साधला.

भटकंती करणाऱ्या समाज बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बेड्यावरील बांधवांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी निवडक प्रतिनिधींसह सुनियोजित दिवशी मुंबई येथील राजभवन येथे यावे .मी तेथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या समोर आपल्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा करू. तुमच्या समस्यांचे निराकरण करण्याचे मी निश्चित प्रयत्न करेल. पाड्यावरील सर्व बांधवांना शासकीय योजनेअंतर्गत घर बांधणे, पाड्यांपर्यंत रस्ते बांधकाम, शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था तसेच आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. वन विभागामार्फत धनगर समाज बांधवांना सहकार्य मिळेल. तसेच पाड्यावर  राहणाऱ्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड अशी शासकीय कागदपत्रे तयार करण्यावर भर दिला जाईल, असा विश्वास राज्यपाल श्री. विजयाशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमानंतर राज्यपाल यांनी  नागपूरकडे  प्रयाण केले .

00000

पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ई-भूमिपूजन

अमरावती दि. 19 (जिमाअ) :  नांदगाव पेठ येथील अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र येथे उद्या शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता पी एम मित्रा टेक्सटाईल पार्कचे ई-भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नांदगाव पेठ येथील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क येथे करण्यात येणार आहे .या कार्यक्रमाला जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडळकर यांनी केले आहे.

            पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रीजन्स ॲड अपेरल (पीएम मित्रा )पार्क अमरावती या प्रकल्पाची किंमत 703.23 कोटी रुपये एवढी आहे. या टेक्स्टाईल पार्कला विकसित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत विकास भांडवल अर्थसहाय्य 200 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. हा प्रकल्प 1076.80 हेक्टर जमिनीवर विकसित झालेल्या अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र येथे सदर पार्क निर्माण होणार आहे. पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कमध्ये जलद गतीने उद्योग स्थापन होण्यासाठी प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी प्रति पार्क 300 कोटी रुपयांची तरतूद आहे. एकात्मिक टेक्सटाईल पार्कच्या स्वरूपात विशेषतः महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी निर्माण होतील. या प्रकल्पातून 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीची शक्यता आहे तसेच एक लाखांपेक्षा जास्त रोजगारांची निर्मिती होणार आहे.

00000

Wednesday, September 18, 2024

DIO AMRAVATI NEWS 18.09.2024

 शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

अमरावती, दि. 18 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलिस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर कलम दि. 2 ऑक्‍टोबर 2024 रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या कलमाचा भंग करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येणार आहे, असे अमरावती शहर पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.

00000

सण-उत्सवाच्या काळात जमावबंदी आदेश जारी

अमरावती, दि. 18 (जिमाका) : जिल्ह्यात येत्या काळात सण उत्सव साजरे होणार आहेत. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे.

सदर आदेशाची अंमलबजाणी करण्यासाठी सर्व पोलिस ठाणेदार, अंमलदार त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम 36 मधील पोटकलमानुसार कार्यवाही करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

            रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असल्यास किंवा अडथळ्यांचा संभव असल्यास अडथळा होऊ देऊ नये, मिरवणूकांचे मार्ग विहित करणे, मोर्चे, निदर्शने, सभा, पदयात्रा, वाद्यांबाबत नियम आणि नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सक्षम अधिकाऱ्यांनी या अधिनियमाच्या कलम 33, 35, 37 ते 40, 44 व 45 अन्वये कार्यवाही करावी, असे पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.

0000

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

अमरावती, दि. 18 (जिमाका) : कौशल्य विकास या संकल्पनेचा लाभ युवकांना व्हावा, यासाठी नामांकित महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हस्ते वर्धा येथून राज्यातील एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी उद्घाटन होणार आहे. यात जिल्ह्यातील 13 केंद्रांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ज्योशबा सिव्हील सर्विसेस महाविद्यालय, वरुड, जी. एस. टोम्पे कॉलेज, चांदूर बाजार, अमरावती येथील बबनराव देशमुख महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, श्री शिवाजी सायंस कॉलेज, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, चिखलदरा, वाय डीव्हीडी आर्ट्स, कॉमर्स कॉलेज, तिवसा, राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा, जी. एच. रायसोनी युनिर्व्हसिटी, अमरावती, महिला महाविद्यालय, अमरावती, फातिमा कॉलेज ऑफ नर्सिंग, तिवसा, सुशीला सुर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲडव्हॉन्समेंट, अमरावती केंद्रांचा समावेश आहे.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या प्रागंणात करण्यात येणार आहेत. यावेळी अन्य जिल्ह्यातील कौशल्य विकास केंद्राचे दूरदृष्यप्रणालीद्वारे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रात उमेदवारांनी नोंदणी करावी, तसेच महाविद्यालयातील कार्यक्रमात उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी केले आहे.

0000

Tuesday, September 17, 2024

DIO AMRAVATI NEWS 17.09.2024

 मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच. विजयाशंकर यांचा दौरा

अमरावती दि. 17 (जिमाका) : मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच. विजयाशंकर दि. 19 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

त्यांचा दौरा कार्यक्रमानुसार, दि. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता अमरावती विश्रामगृह येथे आगमन होईल. दुपारी 12 वाजता अमरावती विश्रामगृह येथून धनगर बेडा येथे निघून दुपारी 12.30 वाजता धनगर बेडा येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 2.30 वाजता अमरावती येथील विविध कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 4.30 वाजता अमरावती येथून नागपूरकडे  प्रयाण करतील.

000000



आरोग्य विभागामुळे मेळघाटातील साथ आटोक्यात

अमरावती, दि. 17 (जिमाका)  : मेळघाटातील जामली येथे अतिसाराची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाला प्राप्त झाली. आरोग्य विभागाने केलेल्या तातडीच्या प्रतिसादाने येथील साथ आटोक्यात आली आहे.

स्थानिक मोहन गायन यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांना अतिसाराची लागण झाल्याची माहिती दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र टेम्ब्रुसोंडाच्या अंतर्गत जामली उपकेंद्रातील जामली गावामध्ये अतिसाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याचे निदर्शनास येताच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या जिल्हास्तरीय शिघ्र प्रतिसाद पथकातील  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.  सुरेश असोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे, माताबाल संगोपन अधिकारी डॉ. सुभाष ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी  आणि पथकातील सदस्यांनी गावाला तातडीने भेट दिली. तसेच सखोल चौकशी करून तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या.

गावात दोन सार्वजनिक विहिरी असून एका विहिरीच्या आजुबाजूला नाली असल्याने पाणी साचून ते पाणी विहिरीत झिरपते. तसेच दुसरी विहिर नदीकाठी असून नदीचे गढुळ पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. या विहिरीचे पाणी नमुने दुषित आढळुन आलेले आहे. गावात 2 पाण्याच्या टाक्या असून 1 टाकी 50 हजार लिटर, तर दुसरी 30 हजार लिटर क्षमतेची आहे. नळ योजनेमार्फत घरोघरी पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु गावामध्ये ठिकठिकाणी नळजोडणी फुटल्याचे आढळून आले आहे. गावात खताचे ढिगारे, तुडुंब भरलेल्या नाल्या, तसेच सर्वत्र अस्वच्छता असल्याने डासांच्या घनतेत वाढ झाली आहे. त्यामुळे तापाच्या रुग्णात वाढ झाली आहे.

जामली येथील जिल्हा परिषद शाळेत रुग्णांसाठी उपचारार्थ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. याठिकाणी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच रुग्णांना संदर्भीत करण्यासाठी दोन रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी 436 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

गावात 9 चमूकडून घरोघरी साथरोग सर्वेक्षण करण्यात येत आहे. दररोज पाणी नमुन्यांची ओटी चाचणी करण्यात येत आहे. तसेच आरोग्य पथकाद्वारे दररोज किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. गावात डासनाशक औषधांद्वारे धुरफवारणी करण्यात आली आहे.  नाल्यांमध्ये टेमीफोस अॅक्टीव्हीटी राबविण्यात आली. डास उत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडण्यात आले आहे. घरोघरी पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी मेडीक्लोरचे वाटप करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने केलेल्या उपायायोजनांमुळे याठिकाणीच परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जिल्हास्तरीय साथरोग नियंत्रण कक्षातील अधिकारी जामली येथे नियमित भेटी देत आहे. तसेच तेथील परिस्थतीचा नियमित आढावा घेत आहे. सध्या साथरोग परिस्थिती नियंत्रणात आहे.

0000000

आजपासून माय भारत पोर्टलवर युवकांची नोंदणी

*विविध उपक्रमाचे होणार आयोजन

 

अमरावती, दि. 17 (जिमाका) : केंद्र शासनातर्फे युवकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. ही नोंदणी बुधवार, दि. 18 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. यासाठी युवकांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या युवक कल्याण व क्रीडा विभागा मार्फत दि. 18 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर दरम्यान युवकांच्या सहभागाने युवांची नोंदणी, अनुभवात्मक शिक्षण, सेवाकार्य, स्वच्छता, फिट इंडिया उपक्रम, पंधरवाडा अंतर्गत विविध उपक्रमाची नोंदणी माय भारत पोर्टलवर करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, तसेच राष्ट्रीय छात्र सेना, स्काउट गाईड आणि प्रशिक्षणार्थ्यांनी mybharat.gov.in या संकेतस्थळावर 25 सप्टेंबर नोंदणी करावी लागणार आहे. 15 ते 29 वयोगटातील युवकांनी यात नोंदणी करावी. तसेच दि. 18 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोंबर या कालावधीत विविध उपक्रमांची नोंदणी करावी लागणार आहे.

सामाजिक कार्य, अनुभवनात्मक शिक्षण, कौशल्याच्या संधी, नवीन संकल्पना, आरोग्य, सायबर सुरक्षा, रस्ते सुरक्षा, पोलिस स्वयंसेवक, कौशल्य विकासात्मक कार्यक्रमासाठी नोंदणी करता येणार आहे.

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, संस्था, क्रीडा मंडळांनी माय भारत पोर्टलवर उपक्रमाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

0000000

कंत्राटी वाहनासाठी निविदा आमंत्रित

अमरावती, दि. 17 (जिमाका) : अमरावती येथील राज्य वस्तू व सेवा कर कार्यालयासाठी 2 कंत्राटी वाहने 11 महिन्यांच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घ्यावयाचे आहे. यासाठी इच्छुकांनी निविदा सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

कंत्राटी वाहनांच्या निविदा दरपत्रक बंद पाकिटामध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत राज्य वस्तू व सेवाकर कार्यालय, विभागीय आयुक्त कर्यालय परिसर, जुना बायपास रोड, कॅम्प, अमरावती 444602 येथे पाठविण्यात यावे. याबाबत अटी व शर्ती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आल्या आहेत.

00000


जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी


     अमरावती, दि. 17: महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानात मोलाचे योगदान देणारे विचारवंत, झुंझार पत्रकार,आणि साहित्यिक प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली.


      निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिलदार प्रशांत पडघम, अधिक्षक निलेश खटके यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.







पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल

 

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल

 

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार सन्मान सोहळा

 

मुंबई, दि. 17 : पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केलेल्या कार्यासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. एनसीपीए येथे 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत उद्या 18 सप्टेंबर रोजी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

 

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र देशात प्रथम

आता तापमान वाढीचे युग संपून होरपळीचे युग सुरू झाल्याने त्वरित कृतीची गरज संयुक्त राष्ट्र संघटनेने व्यक्त केली आहे. त्यास प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे तर महाराष्ट्र हे देशातील    पहिले राज्य ठरले आहे. यासाठी राज्यात मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीची स्थापना  केली असून त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री श्री. शिंदे आहेत. अंमलबजावणीसाठी कार्यकारी अध्यक्षपदी पाशा पटेल यांना नेमून संबंधित सचिव यांचे कार्यकारी मंडळ देखील तयार करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यासाठी पहिले पाऊल टाकले. तापमान वाढ कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हरित महाराष्ट्राची संकल्पना त्यांनी मांडली. त्याशिवाय औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये 5 टक्के बायोमास वापरायचे देखील निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. त्यासाठी 11 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 1 लाख 20 हजार एकर क्षेत्रामध्ये बांबू लागवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

 

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे ॲग्रीकल्चर टुडे या संस्थेने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा दिल्लीमध्ये नुकताच सन्मान केला. त्याची दखल आता थेट जागतिक पातळीवर घेण्यात आली व वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमने पुढाकार घेऊन जागतिक स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या कामाची दखल घेतली आहे.

 

'वर्ल्ड एग्रीकल्चर फोरम' अन्नसुरक्षा विषयी जागतिक व्यासपीठ

'वर्ल्ड एग्रीकल्चर फोरम' हे अन्नसुरक्षा विषयी जागतिक नेत्यांना चर्चा करण्यासाठीचे व्यासपीठ आहे. जागतिक कृषी मंचचे अध्यक्ष डॉ. रुडी रॅबिंज हे आहेत. कृषी क्षेत्रातील प्रगतीच्या अनुषंगाने भविष्यातील धोरण आणि जागतिक स्तरांवर होत असलेल्या कामांची दखल घेऊन जागतिक पुरस्कारासाठी जगातील विविध देशातून नामांकन विचारात घेण्यात येतात. जागतिक परिणामकारक  वनस्पती विज्ञान, कृषी विषयक विविध पैलूंबद्दल माहिती घेताना उत्पादन, व्यापार, तंत्रज्ञान, व्यवसाय, धोरण आणि आर्थिक परिस्थिती, पोषण, अन्न प्रक्रिया, पाणी आणि पर्यावरण या व्यापक बाबींचा  समावेश करते. यासाठी  निवड योग्यता आणि पूर्णतेसाठी नामांकनांचे पुनर्विलोकन करून, ते निवडीसाठी पाठवले जातात. निवड समिती नंतर नामांकनांचे पुनर्विलोकन करते आणि प्राप्तकर्त्याची शिफारस करते.  बुधवारी 18 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुंबईतील या कार्यक्रमाचे आयोजन फिनिक्स फाउंडेशन (लोदगा, जिल्हा लातूर) यांनी केले असून 18 सप्टेंबर या आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम एनसीपीए सभागृहात सकाळी 11 वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत विविध चर्चासत्रांमध्ये पार पडणार आहे. यामध्ये जगभरातील या विषयातले तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. त्याच दिवशी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत मुख्य सत्काराचा कार्यक्रम होईल.

 

0000

 

Friday, September 13, 2024

DIO AMRAVATI NEWS 13.09.2024

 

ईद-ए-मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात बदल

            अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती शहरात  16 सप्टेंबर रोजी (एक दिवस मागे-पुढे चंद्र दर्शनानुसार) मुस्लीम बांधवाचे ईद-ए-मिलाद  निमित्त मिरवणुक काढण्यात येतात. या कालावधीत मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. ते याप्रमाणे :

वाहतुकीचा पर्यायी मार्ग

            ट्रांसपोर्ट नगर ते नागपुरी गेट चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची एकतर्फा वाहतुक सुरू राहील. चित्रा चौक ते पठाण चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक प्रभात टॉकीज व दीपक चौक मार्गे वळविण्यात येईल. हनुमान नगर पोलीस चौकी ते पठाण चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकाराचा जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक महाजनपुरा मार्गे वळविण्यात येईल.

            जवाहर गेट ते टांगा पडाव या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक सराफा- गांधी चौक- जयस्तंभ मार्गे वळविण्यात येईल. लालखडी ते पठाण चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक लालखडी रिंगरोड मार्गे वळविण्यात येईल.

            वाहन चालकांनी या अधिसूचनेचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्याविरुध्द मोटार वाहन कायद्या व महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत करवाई करण्यात येईल. हा आदेश दि. 16 सप्टेंबरच्या (एक दिवस मागे-पुढे चंद्र दर्शनानुसार) सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लागू राहील, सर्व नागरिकांनी वाहतुक मार्गातील बदलाबाबत सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर  यांनी केले आहे.

00000


हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन

 (बुधाराम जकसन तंती)

 

            अमरावती, दि. 13  (जिमाका):  येथील  बुधाराम जकसन तंती  (वय 41 वर्षे, रा. लुलकीडीही, सिटी कोतवाली, अमरावती ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

 

          बुधाराम जकसन तंती यांचे इर्विन दवाखान्यात उपचार सुरू असतांना ते उपराचारादरमान्य कुणालाही न सांगता  निघून गेले. त्यानंतर शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यांचा वर्ण निम गोरा, उंची 5 फूट, केस काळे बारीक, दाढी मिशी काळी व बारीक, अंगात निळा रंगाचा हाफ बाहीची टी शर्ट, काळ्या रंगाचा लोअर घातलेले  होते. या वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, तसेच वपोनी मनोहर कोटनाके यांचा भ्रमणध्वनी क्रमांक (8390151921), पोलीस हेड कॉन्टेबल रमेश यांचा भ्रमणध्वनी क्रमांक (9823221021), व पोलीस हेड कॉन्टेबल उषा पांडे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक (9923032298) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिटी कोतवाल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

0000

 

DIO AMRAVATI NEWS 12.09.2024

 

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना पहिला हप्ता

*15 सप्टेंबरला होणार वितरीत

अमरावती, दि. 12 (जिमाका) : प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना दि. 15 सप्टेंबर रोजी पहिला हप्ता वितरीत करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता राज्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2.0 अंतर्गत 6 लाख 36 हजार 89 उदिद्ष्ट दिले आहे. सदर उद्दिष्टे जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतनिहाय आवास सॉफ्ट प्रणालीवर वितरीत करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व लाभार्थ्यांना मंजुरी देवून पहिला हप्ता दि. 15 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते देशातील 10 लाख लाभार्थ्यांना एका क्लिकवर पहिला हप्ता वितरीत करण्यात येणार आहे. यात राज्यातील किमान 2 लाख 50 हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात येणार आहे.

जिल्ह्यासाठी 26 हजार 166 लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यापैकी 40 टक्के घरकुल लाभार्थ्यांना दि. 15 सप्टेंबर 2024 रोजी लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी घरकूल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पंचायत समिती कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

00000

रिक्षाचालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाची स्थापना

अमरावती, दि. 12 (जिमाका) : राज्य शासनातर्फे धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळ स्थापना करण्यात आली आहे.

ऑटो-रिक्षा परवानाधारक, ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनेंतर्गत जीवन विमा अपंगत्व विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास 50 हजारापर्यंत अर्थसहाय्य योजना, पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्यवृद्धी योजना, 65 वर्षावरील ऑटोरिक्षा मिटर्ड टॅक्सी परवानाधारक यांना निवृत्ती सन्मान योजनेंतंर्गत सानुग्रह अनुदान, नवीन ऑटोरिक्षा मिटर्ड टॅक्सी खरेदी, गृह खरेदीसाठी घेण्यात येणारे कर्ज इत्यादी, ऑटोरिक्षा परवानाधारक ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनामार्फत रावण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना राबविणे. मंडळाच्या कल्याणकारी निधीचे विनियोजन व व्यवस्थापन करणे इत्यादी मंडळाचे उदिष्टे आहे.

मंडळाच्या योजनांच्या लाभासाठी ऑटो-रिक्षा परवानाधारक, ऑटो-रिक्षा आणि मिटरटॅक्सी चालकांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील परिवहन कार्यालयामार्फत याबाबतची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नोंदणीकृत चालकांना लाभ देण्यासाठी मंडळाच्या जिल्ह्यातील कार्यालयाकडून ओळखपत्र जारी करण्यात येणार आहे. मंडळाचा सभासद होण्यासाठी अर्जदाराने राज्यामध्ये नोंदणी असलेल्या ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी अनुझप्ती व बॅज धारण केले असणे बंधनकारक राहिल. पात्र अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील. तथापि, कुटुंबातील सदस्य संख्या ही मुले मिळून 4 पर्यंत मर्यादित राहणार आहे.

सभासद सलग एक वर्षापेक्षा जास्त काळ मंडळाची वर्गणी अथवा मंडळानी विहीत केलेली इतर रक्कम मंडळाकडे अदा करणार नाही, अशा सभासदाचे सभासदत्व सुनावणीची एक संधी देऊन रद्द करण्यात येणार आहे. परवानाधारक अपंग झाल्यास तो परवानाधारक देखील कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र राहील. परवानाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याची अनुज्ञप्ती त्याच्या कायदेशिर वारसास हस्तांतरीत करण्यात येणार आहे. मयत परवानाधारकाला कायदेशीर वारस त्याच्याकडे अनुज्ञप्ती, बॅज नसेल तर सदर कायदेशीर वारस कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र राहिल.

नोंदणी शुल्क आणि ओळखपत्र शुल्काची रक्कम रूपये 500 राहणार आहे. सदर नोंदणी शुल्क अर्जासोबत जमा करण्यात येणार आहे. तसेच नोंदणी शुल्क आणि ओळखपत्र शुल्काची रक्कम राज्यस्तरीय मंडळांनी निश्चित केल्याप्रमाणे असणार आहे. वार्षिक सभासद शुल्क रक्कम 300 राहणार आहे. तसेच वार्षिक सभासद शुल्काची रक्कम राज्यस्तरीय मंडळांनी वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे असेल.

ऑटो रिक्षा व मिटर्ड टॅक्सी परवानाधारकांनी कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

00000

 

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...