Tuesday, August 27, 2024

‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी जेष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन

 

‘मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी जेष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन

 

           अमरावती, दि. 27 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरु करण्यात आली आहे. जेष्ठांमध्ये वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे, योग उपचार केंद्राव्दारे प्रबोधन, प्रशिक्षणासाठी पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. लाभ वितरण झाल्यावर या योजनेंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य  केंद्राव्दारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या प्राप्त करुन घ्यावे.

 

            या योजनेसाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमस्वरुपी रहिवासी असावा. जेष्ठ नागरिकांचे वय हे किमान 65 वर्ष असावे. तसेच या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.

 

            या योजनेत जेष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये थेट बँक खात्यात मिळतात. यामधून वृध्द लोकांसाठी उपयुक्त अशी श्रवणयंत्रे, फोल्डिंग वॉकर, बॅक सपोर्ट बेल्ट, सर्वाइकल कॉलर, चष्मा, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, कमोड चेअर आदी उपकरणे खरेदी करता येतात. यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत तथा कुठल्याही कोअर बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे, आरोग्य प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, समकक्ष योजनेचा लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र, बीपीएल कार्ड झेरॉक्स आदी कागदपत्रे आवश्यक आहे.

 

            या योजनेचे अर्ज ज्येष्ठ मंडळी त्यांच्या सोयीनुसार आपआपल्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, मुख्याधिकारी, नगरपरिषद कार्यालय तसेच सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, अमरावती येथे जमा करु शकतात. परिपूर्ण कागदपत्र जोडलेले अर्ज सादर करुन ज्येष्ठांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन समाजकल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

 

0000

हरविलेल्या महिलाबाबत आवाहन (सौ. प्रियंका योगेश पांडे)

 


हरविलेल्या महिलाबाबत आवाहन (सौ. प्रियंका योगेश पांडे)

 

            अमरावती, दि. 26 (जिमाका):  येथील  सौ. प्रियंका योगेश पांडे  (वय 32 वर्षे, रा. शिवराज्य कॉलनी रहाटगाव, नांदगाव पेठ, अमरावती ही महिला हरविल्याची फिर्याद नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

 

          सौ. प्रियंका योगेश पांडे हि  दि. 29 जुलै, 2024 रोजी काहीन सांगता घरून  निघून गेली. त्यानंतर शोध घेतला असता ती सापडली नाहीत. तीचा वर्ण गोरा, उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ, डोळे मोठे, नाक सरळ, घरून जातेवेळी  अंगात स्क्रीम रंगाचा टॉप, काळ्या रंगांची लॅगींग व गुलाबी रंगांची ओळणी, ब्राऊन फुलाची चप्पल घातलेली  होती. या वर्णनाची महिला कुणाला आढळल्यास त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश गावनेर यांनी केले आहे.

0000

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा - आयुक्त डॉ. एन. रामबाबू

 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा

- आयुक्त डॉ. एन. रामबाबू

 

           अमरावती, दि. 26 (जिमाका): महाराष्ट्र राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अमंलात आणला आहे. या अधिनियमान्वये प्रत्येक शासकीय विभागाने पात्र व्यक्तींना लोकसेवा विहित कालमर्यादेत प्रदान करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार नागरिकांना शासकीय विभागाच्या अधिसूचित सेवा विहित वेळेत मिळण्यासाठी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. एन. रामबाबू यांनी केले.

 

          महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसिलदार प्रशांत पडघन, आयोगाचे कक्ष अधिकारी देवेंद्र चव्हाण, जिल्हा समन्वयक महाआयटी मिलिंद गोंडसे आदी उपस्थिती होते. 

 

         आयुक्त डॉ. एन. रामबाबू यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 बाबत मार्गदर्शन केले. कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरिता सर्व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावे. या कायद्यामुळे नागरिकांना विहित कालमर्यादेत शासकीय विभागांच्या अधिसूचित सेवा मिळविता येणार असून सर्व विभागाने ऑनलाईन सेवा पुरविण्याबाबत प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

0000000


हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (अमोल गजानन उभोकार)

 


हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (अमोल गजानन उभोकार)

 

            अमरावती, दि. 26 (जिमाका):  येथील  अमोल गजानन उभोकार  (वय 36 वर्षे, रा. जळका शहापूर, नांदगाव पेठ, अमरावती ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

 

          अमोल गजानन उभोकार हे काहीन सांगता घरून  निघून गेले. त्यानंतर शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यांचा वर्ण गोरा, उंची 5 फूट 5 इंच, चेहरा चापट, केस काळे, बारीक मिशी, नाक मोठे, घरून जातेवेळी  अंगात पांढरे शर्ट, काळ्या रंगाचा फुलपॅन्ट  घातलेले  होते. या वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश गावनेर यांनी केले आहे.

0000

कोलकत्ता येथील घटनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी समन्वयाने उपाययोजना राबवा- सौरभ कटियार

 





              कोलकत्ता येथील घटनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी समन्वयाने उपाययोजना राबवा- सौरभ कटियार

 

           अमरावती, दि. 26 (जिमाका): कोलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेची दखल घेऊन जिल्ह्यात अशा घटनाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आरोग्य कर्मचारी व पोलीस यंत्रणेने आपसी समन्वय ठेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी आवश्यक ते उपाययोजना राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज दिले.

 

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे कोलकत्ता येथील घटनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील परिस्थिती व उपाययोजना संदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक ग्रामिण विशाल आनंद,  निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, पोलीस उपायुक्त सागर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रिती मोरे तसेच विविध विभागाचे कार्यालय प्रमुख, खाजगी व शासकीय वैद्यकीय आस्थापना व संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

         जिल्हाधिकारी म्हणाले की, कामाच्या ठिकाणी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना भेडसावत असलेल्या सुरक्षितता आणि संरक्षणविषयक समस्यांचे संबंधित आस्थापनानी तातडीने दखल घ्यावी. आवश्यकतेनुसार सुरक्षतेच्या दृष्टीने उपाययोजना करावी. सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, त्यांचे नियमित नियंत्रण करणे, सुरक्षा रक्षकाची नियुक्ती, महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह, निवासाची व्यवस्था अशा मुलभूत सुविधा कामाच्या ठिकाणी असल्याची खातरजमा संबंधित आस्थापनानी करावी. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात पोलिस यंत्रणेमार्फत ऑडिट केले जाईल. शासन व प्रशासन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कटीबद्ध असून त्यांच्यासाठी आवश्यक ते उपाययोजना राबविण्यात येईल. महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनासोबतच शाळा, महाविद्यालय, खाजगी व शासकीय आस्थापनाच्या ठिकाणी महिला सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यात यावी, असेही ते यावेळी म्हणाले.

 

           महिलांच्या सुरक्षतेसाठी पोलीस यंत्रणा सदैव तत्पर असून त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 24 तास उपलब्ध आहे. 112 हा आपत्कालीन क्रमांक असून संकटात सापडलेल्या महिला वा व्यक्तींना पोलीस विभागामार्फत तातडीने मदत दिल्या जाते. या सुविधेचा महिलांनी लाभ घ्यावा. खाजगी व शासकीय आरोग्य विभागाने पोलीस विभागासोबत आपसी समन्वय ठेवावा. ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जाताना रात्रीच्या वेळी पोलीस यंत्रणेव्दारे सुरक्षा उपलब्ध करुन दिल्या जाईल. संवेदनशील भागामध्ये रात्रीच्या वेळी पेट्रोलिंगचे प्रमाण जास्त करण्यात येईल. महिलासंदर्भातील प्रकरणे हाताळणीसाठी महिला पथक तयार करण्यात आले असून शाळा व महाविलयास्तरावर समुपदेशन करण्यात येत आहे. कोलकत्ता सारख्या घटना होवू नये यासाठी सर्वांनी जागृत राहून होणाऱ्या अत्याचाराविरोधात पोलीस विभागाकडे तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिस विभागामार्फत करण्यात आले आहे.

000000


Saturday, August 24, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बेलोरा विमानतळावर आगमन व स्वागत

 



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बेलोरा विमानतळावर आगमन व स्वागत

अमरावती, दि. 24 (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज अमरावती येथील बेलोरा विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन झाले. यावेळी प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री महोदयांचे स्वागत केले.

           आमदार रवी राणा, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा , पोलीस अधीक्षक (ग्रामीण)विशाल आनंद, महापालिका आयुक्त सचिन कलंत्री यावेळ उपस्थित  होते.

  यवतमाळ येथील महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रमासाठी मंत्री महोदय नुकतेच  यवतमाळ येथे पोहचले आहेत.

00000

Friday, August 23, 2024

ज्येष्ठांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन

 


ज्येष्ठांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन

          अमरावती, दि. 23 (जिमाका) : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून ‘मुख्यमंत्री वयोश्री योजनेद्वारे सहाय साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी, तसेच प्रबोधन- प्रशिक्षणासाठी एकवेळ एकरकमी तीन हजार रुपये डीबीटी प्रणालीव्दारे दिले जाते. या योजनेचा पात्र जेष्ठ व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

            राज्यातील 65 वर्ष व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र याद्वारे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार आवश्यक साधने, उपकरणे पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित करण्यात येतात. लाभ वितरण झाल्यावर योजनेअंतर्गत उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थींची देयक प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावे.

पात्रता :  या योजनेसाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा. ज्येष्ठ नागरिकांचे वय हे किमान 65 वर्ष असावे. तसेच या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.

लाभाचे स्वरूप : योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये थेट बँक खात्यात मिळतात. यामधून वृद्ध लोकांसाठी उपयुक्त अशी श्रवण यंत्रे, फोल्डिंग वॉकर, बॅक सपोर्ट बेल्ट, सर्वाइकल कॉलर, चष्मा, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर,  कमोड चेअर आदी उपकरणे खरेदी करता येईल.

 

कागदपत्रे : आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत तथा कुठल्याही कोअर बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे, आरोग्य प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, समकक्ष योजनेचा लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र, बीपीएल कार्ड झेरॉक्स आदी कागदपत्रे आवश्यक आहे.

अर्ज कुठे करावा : योजनेचे फॉर्म हे नागरिकांच्या सोयी नुसार आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, मुख्याधिकारी, नगरपरिषद कार्यालय तसेच सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, अमरावती येथे जमा करु शकतात. परिपूर्ण कागदपत्र जोडलेले अर्ज सादर करून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

                                                     000000

 

 

 

 

 

 

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...