Monday, March 16, 2020

पालकमंत्र्यांकडून वसतिगृहाची आकस्मिक पाहणी


                   








                  
       परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वच्छता व पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
-         पालकमंत्री यशोमती ठाकूर
-          
अमरावती, दि. 16 : प्रत्येक वसतिगृहात पुरेशी स्वच्छता, आवश्यक साधने उपलब्ध असली पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कामे करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
            पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज निंभोरा येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाला अचानक भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. गृहप्रमुख एस़  एस़  तलवारे, तुषार नांदुरकर, गृहपाल प्रकाश जाधव यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी वसतिगृहातील सर्व पाचही इमारतींची माहिती घेत तेथील सुविधांची पाहणी केली व वसतीगृहातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या़. वसतिगृहात विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. तथापि, पुरेशी स्वच्छता आढळून येत नाही, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही. कठोर कारवाई करू. गृहप्रमुख व अधीक्षकांनी या स्थितीत तत्काळ सुधारणा करावी, असा इशारा यावेळी पालकमंत्र्यांनी दिला.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विविध उपायांची अंमलबजावणी शासनाकडून करण्यात येत आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये दक्षतेबाबत जागृती करावी. विद्यार्थ्यांसाठी भोजनगृह व स्वच्छतागृहाच्या ठिकाणी हँडवॉश, सॅनिटायझरची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आरोग्यरक्षणासाठी आवश्यक त्या सर्व साधनांची उपलब्धता वसतिगृहात ठेवावी, असेही निर्देश त्यांनी दिले.                                
  
वसतिगृहात स्वच्छतेबाबत तत्काळ कार्यवाही करावी. वसतिगृह परिसरात कुठेही अस्वच्छता पुन्हा दिसता कामा नये, अशी समज यावेळी वसतिगृहाच्या स्वच्छता व देखरेखीचे काम करणा-या कंत्राटदार कंपनीच्या व्यवस्थापकांना देण्यात आली. 

विद्यार्थी व नागरिकांत जागृती करावी

जिल्हा प्रशासनासह इतरही विभागांनी कोरोना प्रतिबंधासाठी जनजागृतीत योगदान द्यावे. विद्यार्थी, तसेच नागरिकांत व्यापक जनजागृती करावी. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती दक्षता घ्यावी. सर्वांनी मिळून योग्य दक्षता घेऊन संकटाचा मुकाबला करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
00000

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...