Wednesday, August 9, 2023

खरीप हंगामातील पीक स्पर्धेत सहभागी होण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत

 

खरीप हंगामातील पीक स्पर्धेत सहभागी होण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत

अमरावती, दि. 9 (जिमाका): खरीप हंगाम सन 2023 राज्यांतर्गत पीकस्पर्धेमध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या पिकांसाठी पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2023 आहे. या पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

दि. 1 जून ते 7 ऑगस्ट या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान 603.1 मिमी असून या खरीप हंगामात दि. 7 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रत्यक्षात 602.8 मिमी एवढा पाऊस पडलेला आहे. खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लक्ष हेक्टर असून दि. 7 ऑगस्ट अखेर प्रत्यक्षात 131.75 लक्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. राज्यात पेरणीची कामे उरकत आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुर्नलागवडीची कामे सुरु आहेत. दि. 7 ऑगस्टपर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची 48.38 लक्ष हेक्टर क्षेत्रावर, कापूस पिकाची 41.47 लक्ष हेक्टर क्षेत्रावर तसेच तूर पिकाची 10.71 लक्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाची 11.76 लक्ष हेक्टर क्षेत्रावर पुर्नलागवड झाली आहे.

         खरीप हंगाम 2023 साठी 19.21 लक्ष क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लक्ष क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. राज्यात 19 लक्ष 70 हजार 904 क्विंटल बियाणे पुरवठा झालेला आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे साठा उपलब्ध आहे.

         खरीप हंगामसाठी राज्यास 43.13 लक्ष मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून आतापर्यंत 53.39 लक्ष मे. टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 29.23 लक्ष मे. टन खतांची विक्री झालेली असून सद्यस्थितीत राज्यात 24.13 लक्ष मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी. खरीप पीक स्पर्धेत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...