Sunday, November 30, 2025

DIO NEWS AMRAVATI 30-11-2025

 जिल्ह्यात एक नगराध्यक्ष, पाच  नगरपरिषदेतील आठ सदस्य निवडणुकीला स्थगिती

अमरावती, दि.30 (जिमाका) : जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील नगरपरिषद अध्यक्ष आणि इतर नगरपालिका, नगरपंचायत मधील आठ जागांवर सदस्यपदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी दाखल केलेले अपील 22 नोव्हेंबर 2025 नंतर निकाली निघाले आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुधारीत निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

 राज्य निवडणूक आयोगाच्या 4 नोव्हेंबर 2025 च्या पत्रान्वये नगर परिषदांच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. परंतु ज्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते, मात्र अपिलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून 22 नोव्हेंबर 2025 नंतर म्हणजेच 23 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर देण्यात आला आहे, अशा नगर परिषद व नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणुका 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत. तसेच अशा प्रकरणात अध्यक्ष पदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजी आदेशान्वये निर्देशित केले आहे.

सदर सूचनेनुसार अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगरपरिषदेतील जागा क्रमांक 2 अ, अचलपुर नगरपरिषदेच्या जागा क्र. 10 अ, जागा क्र. 19 ब, वरुड नगरपरिषदेच्या जागा क्र. 12 अ, अंजनगाव (सुर्जी) नगरपरिषदेच्या जागा क्र. 6 अ, जागा क्र. 7 ब, धारणी नगरपंचायतच्या प्रभाग क्र. 14, प्रभाग क्र. 16 आणि अंजनगाव (सुर्जी) नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदासह सदस्य पदाच्या सर्व जागांसाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. येथील निवडणूक प्रक्रिया सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आशिष यांनी कळविले आहे.

000000

Friday, November 28, 2025

DIO NEWS AMRAVATI 28-11-2025

 


महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट

डॉ. मिर्झा यांचे अमरावती येथे निधन
अमरावती दि. 28 : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी ,हास्यसम्राट, 'मिर्झा एक्सप्रेस 'फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज 28 नोव्हेंबर शुक्रवारला सकाळी 6.30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.ते 68 वर्षांचे होते.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज -माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव आहे. सध्या अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ' मिर्झा एक्सप्रेस ' या घरात त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी फातेमा मिर्झा,अभियंता मुलगा रमीज,महाजबी व हुमा या दोन सुविद्य कन्या आहेत.त्यांच्यावर अमरावती येथील ईदगा कब्रस्तानात दुपारी दोन नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डॉ.मिर्झा रफी अहमद बेग आपल्या खुमासदार सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्यांचे एकूण २० काव्यसंग्रह असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आपल्या 'मिर्झा एक्सप्रेस ' या काव्य मैफिलीचे ६ हजारावर सादरीकरण केले आहे.
गेल्या काही दिवसापासून मूत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते.त्यांच्यावर अमरावती येथे ईलाज सुरू होते.वयाच्या अकरा वर्षापासून त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली होती. 17 सप्टेंबर 1957 चा त्यांचा जन्म.1970 पासून त्यांनी मंचावर कविता सादर करायला सुरुवात केली. पुढील 50 वर्ष विदर्भ, मराठवाड्यातील कवी संमेलनाचे ते केंद्रबिंदू ठरले.वृत्तपत्रातील विविध स्तंभातून लेखनही त्यांनी केले.त्यांचा 'मिर्झाजी कहीन ' हा त्यांचा स्तंभ तुफान लोकप्रिय ठरला होता.त्यांचे २० काव्यसंग्रह असून मिर्झा एक्सप्रेस या नावाने अफलातून किस्से आणि कवितेचा कार्यक्रम प्रसिद्ध होता.शेती, माती, कृषी, शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील समस्या, आणि सामाजिक समस्यांवर व राजकीय विरोधाभासावर नर्म विनोदी शैलीमध्ये लिखाण करणे ही त्यांची खास हातोटी होती.
विदर्भातील ख्यातनाम संत फकीरजी महाराज या मंदिर ट्रस्टचे ते ट्रस्टी होते. त्यांचे वडील मिर्झा रज्जाक बेग उर्फ भाईजी हे यवतमाळ जिल्ह्यातील प्रभावी राजकीय सामाजिक व्यक्तिमत्व होते. विदर्भातील नागपूर येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ विधीज्ञ फिरदोस मिर्झा हे त्यांचे चुलत बंधू आहेत. मराठी, वऱ्हाडी भाषेवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. त्यांच्या कार्यक्रमांनी वऱ्हाडी भाषेची महती देशभर झाली.राजधानी दिल्ली पासून तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईपर्यंत त्यांचे कार्यक्रम सतत सुरू असायचे. मोठा माणूस, सातवा महिना, उठ आता गणपत, जांगडबुत्ता अशा कितीतरी कविता त्यांच्या लोकप्रिय झाल्या. जांगडबुत्ता या शब्दाचे ते जनक आहेत.
मुसलमान असूनही येते मला मराठी
ठोकू नका माई पाठ याच्यासाठी
जो जिथे जन्मला तेच त्याची भाषा
पऱ्हाटीकून बोंडाचीच करानं आशा
अशा शब्दात त्यांचे काव्य लेखन असायचे.धर्मभेदाची अतिशय सोपी त्यांची व्याख्या होती. त्यामुळे ते सर्वधर्मीयांच्या गळ्यातील ताईत होते.
हिंदू मुसलमानात काय आहे फरक
हा म्हणते हटजा तो म्हणते सरक
काथा संग जसा चुना असते पानात
हिंदू संग मुसलमान तसा हिंदुस्थानात
अशा अनेक रचना त्यांच्या व्यासपीठावरून लोकांच्या कायम स्मरणात आहेत. ते लोककवी होते.संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे हजारो चाहते आहेत.त्यांच्या निधनाने वऱ्हाडी भाषेचा स्तंभ ढासळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुप्रसिद्ध कवि, हास्यसम्राट आणि मिर्झा एक्स्प्रेस म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे, असे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने एक उत्तम विनोदी लोककवी आणि सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्व आपण गमावले आहे.
20 हून अधिक काव्यसंग्रह आणि 6000 वर काव्य मैफिलीचे प्रयोग त्यांनी केले. विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांचे वृत्तपत्रीय लेखन सुद्धा प्रचंड गाजले. कालौघात त्यांनी नवीन माध्यमाचाही तितक्याच सहजतेने स्वीकार केला. शेती आणि माती हा त्यांच्या काव्यलेखनाचा गाभा होता. त्यांचे सामाजिक भान वाखाणण्यासारखे होते. मराठी आणि त्यातही वऱ्हाडी भाषेवर त्यांनी निस्सीम प्रेम केले. त्यांच्यामुळे वऱ्हाडी भाषेतील सादरीकरण राष्ट्रीय पातळीवर गेले.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
0000








डिसेंबर महिन्यात गोल्डन कार्डसाठी विशेष मोहिम

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

*उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा सन्मान

अमरावती, दि. 28 : पात्र नागरिकांना आरोग्याची सुविधा देण्यासाठी गोल्डन कार्ड देण्यात येत आहे. सदर कार्ड काढण्याची जबाबदारी आशा सेविकांवर देण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्ड महत्वाचे असल्याने डिसेंबर महिन्यात गोल्डन कार्डसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात गोल्डन कार्ड नोंदणीसंबंधी बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, आयुष्मानच्या जिल्हा समन्वयक डॉ. अंकिता मटाले यांच्यासह आशा सेविका उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, आशा सेविकांना आता नवीन कार्ड नोंदणीसाठी 20 रूपये तर वितरणासाठी 10 रूपये मानधन मिळणार आहे. त्यामुळे आशा सेविकांनी यात सक्रीय सहभाग नोंदवावा. यासाठी येत्या दोन दिवसांत आशा सेविकांचे लॉगइन आयडी सक्रीय करावे. कार्डची नोंदणी होण्यासाठी मोहिम राबवावी लागणार आहे. यासाठी संपूर्ण डिसेंबर महिन्यात या नोंदणीवर लक्ष्य ठेवण्यात येणार आहे. नोंदणीचे काम गतीने होण्यासाठी आशांना लाभार्थ्यांच्या याद्या पुरविण्यात येणार आहे.

नोंदणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक यांच्या सहकार्याने डिसेंबर महिन्यात मोहिम घेण्यात येणार आहे. या योजनेत रूग्णांवर उपचारासाठी जिल्ह्यातील 51 रूग्णालये अंगीकृत असून नि:शुल्क उपचार करण्यात येतात. यासाठी नोंदणीला गती देण्यात येणार आहे. शिधा पत्रिकेवर या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे शिधापत्रिकेत नाव नसल्यास शिधापत्रिका अद्ययावत करावी. त्यानंतर 60 दिवसात लाभार्थ्यांचे नाव यादीत येणार आहे.

यावेळी नोंदणीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविका निता खंदेझोड, वर्षा आडोळे, मुक्ता वानखेडे, गुंफा खडसे, वनिता पंचाळे, जयश्री देवळे, पंची दहिकर, काजल साम्बरकर, सिमा सोनोने, गिता गावंडे, इंदिरा मोहोड, कल्पना मेश्राम, शेषकन्या थोरात, सुनिता चौरकर यांचा जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

00000 


Thursday, November 27, 2025

DIO NEWS AMRAVATI 27-11-2025

 हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी शहिदी समागमाच्या चित्ररथाला हिरवी झेंडी

अमरावती, दि. 27 (जिमाका) : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. नागपूर येथे 7 डिसेंबर 2025 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी चित्ररथाचे जिल्ह्यात आगमन झाले. या चित्ररथाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी हिरवी झेंडी दाखविली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, नानकराम अहुजा, ॲड. वासुदेव नवलानी, अमरज्योतसिंग जग्गी, रविंद्रसिंग सलुजा, डॉ. निख्खू खालसा, राजेंद्रसिंग सलुजा, राज छाबडा, दिनेश सचदेव, राजू मोंगा, सरनपालसिंग अरोरा, हरबक्श उपवेजा, सजिंदरसिंग उपवेजा, कुलदेवसिंग अरोरा, भजनसिंग सुलजा, विक्की अरोरा यांच्यासह विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आज सकाळी हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350व्या शहिदी समागमानिमित्त डिजिटल चित्ररथाचे उत्साहपूर्ण वातावरणात जिल्ह्यात आगमन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात चित्ररथाचे आगमन झाल्यानंतर मान्यवरांची यावरील चित्रफितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी या चित्ररथाला हिरवी झेंदी दाखविली. हा चित्ररथ जिल्हाभरात फिरून नागपूर येथील कार्यक्रमाबाबत जनजागृती करणार आहे.

0000000







हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी शहिदी समागम

नागपूर येथील कार्यक्रमासाठी सर्वोतोपरी सहकार्य

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 27 (जिमाका): हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नागपूर येथे 7 डिसेंबर 2025 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य केल्या जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज नागपूर येथील कार्यक्रमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी नानकराम अहुजा, ॲड. वासुदेव नवलानी, अमरज्योतसिंग जग्गी, रविंद्रसिंग सलुजा, डॉ. निख्खू खालसा, राजेंद्रसिंग सलुजा, राज छाबडा, दिनेश सचदेव, राजू मोंगा, सरनपालसिंग अरोरा, हरबक्श उपवेजा, सजिंदरसिंग उपवेजा, कुलदेवसिंग अरोरा, भजनसिंग सुलजा, विक्की अरोरा यांच्यासह विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी राज्य शासनाच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्यात नागपूरसह नांदेड आणि नवी मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. शहिदी समागमाचे शिख समाजात विशेष महत्व आहे. त्यामुळे या कार्यक्रमांना नागरिक मोठ्या प्रमाणावर जातील. त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासन घेईल. इतर जिल्ह्यामधून नागपूर येथे जाताना नागरिकांना वैद्यकीय आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रचारासाठी जिल्ह्यात चित्ररथ फिरविण्यात येणार आहे. तसेच येत्या काळात होर्डींग आणि इतर माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने 5 डिसेंबर रोजी 400 नागरिकांचा जत्था येणार आहे. यानिमित्ताने वाहतुकीसाठी कोणतीही अडचण होणार नाही. यासाठी पोलिसांना निर्देश देण्यात येणार आहे. त्यामुळे समाजाने यात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. येरेकर यांनी केले.

नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध समाजाच्या प्रतिनिधींनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती दिली.

00000

अमरावती कोषागार कार्यालयात 'संकल्पातून पेन्शन मेळावा' उत्साहात संपन्न

               अमरावती, दि. 27 (जिमाका): अमरावती कोषागार कार्यालयामार्फत ‘संकल्पातून पेन्शन मेळावा’ वरीष्ठ कोषागार अधिकारी श्रीमती शिल्पा पवार यांचे संकल्पनेतून नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन धारकास डीजी लॉकर वापराबाबत व त्यामध्ये ई-पीपीओ, जीपीओ, सीपीओ ही सर्व कागदपत्रे कशाप्रकारे जमा करावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

 तसेच निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतन वाहिनीवरील आणि तक्रार निवारण प्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्यासंबंधी निवृत्तीवेतन कोषागार अधिकारी अमोल इखे यांनी प्रशिक्षण दिले. तसेच मेळाव्यातील सर्व निवृत्तीवेतन धारकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले व हयातीच्या दाखल्याबाबत माहिती देण्यात आली.

या मेळाव्यात उपस्थित झालेल्या 85 वयापेक्षा जास्त निवृत्तीवेतन धारकांचे कोषागार कार्यालयामार्फत शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला. निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना माहे नोव्हेंबर 2025 ला द्यावयाचे हयातीचे दाखले सादर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. निवृत्तीवेतन धारकांना बँकेत जाऊन आपले नावासमोर स्वाक्षरी करावी अथवा जीवन प्रमाण या केंद्रशासनाच्या साईटवर जाऊन ऑनलाईन जीवन प्रमाण पत्र कसे अपलोड करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

000000

शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

              अमरावती, दि. 27 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

              सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून  दि. 28 नोव्हेंबर ते  12 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्र. पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  शाम घुगे  यांनी कळविले आहे.

00000

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना

1 आणि 2 डिसेंबर रोजी सुटी जाहीर

अमरावती, दि. 27 (जिमाका): अमरावती जिल्ह्यात आगामी नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना 1आणि 2 डिसेंबर 2025 रोजी सुटी राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

निवडणुकीच्या कामासाठी मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मतदान साहित्य घेऊन जाणे व मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडता यावी, यासाठी अमरावती जिल्ह्यातील संबंधित सर्व नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

या निवडणूक कार्यक्रमानुसार, मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी अध्यक्ष व सदस्य पदाकरिता मतदान होणार आहे. त्यामुळे, मतदान अधिकारी/कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राचा ताबा घेणार असलेल्या सोमवार, दिनांक  1 डिसेंबर 2025 आणि मतदानाच्या दिवशी म्हणजेच मंगळवार, दिनांक 2 डिसेंबर 2025 असे दोन दिवस जिल्ह्यातील संबंधित नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रांतील सर्व शाळा व महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी असेल, असा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला आहे.

00000

आंबिया बहार फळपीक विमा मंजूर:  3 हजार 910 शेतकऱ्यांच्या

खात्यात लवकरच जमा होणार नुकसान भरपाई

 अमरावती, दि. 27 (जिमाका): प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार 2024-25 मध्ये अमरावती जिल्ह्यातील 3 हजार 910 शेतकऱ्यांसाठी 18.30 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात या योजनेत  सुमारे 4 हजार  शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता, परंतु हवामान धोके (ट्रिगर) लागू करण्याबाबत शासन निर्णयातील कमाल व किमान तापमानाची स्पष्टता नसल्यामुळे युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीने आक्षेप घेतला होता. जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यानंतर कंपनीने केळी पिकासाठी 12 महसूल मंडळांत, मोसंबीसाठी 10 महसूल मंडळांत आणि संत्रा पिकासाठी 45 महसूल मंडळांत अखेर हवामान धोके मंजूर केले.

यामध्ये, 138 केळी उत्पादकांना 91.39 लक्ष रुपये, 46 मोसंबी उत्पादकांना 11.62 लक्ष रुपये, तर 3 हजार 726 संत्रा उत्पादकांना 17.27 कोटी रुपये असे एकूण 3 हजार 910 शेतकऱ्यांसाठी 18.30 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम लवकरच अर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल, अशी माहिती कंपनीने दिली असून, प्रलंबित दावे मंजूर झाल्यामुळे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी शेतकऱ्यांना आंबिया बहार 2025-26 मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

0000000

अमरावती तालुक्यात ‘फार्मर कप’साठी शेतकरी प्रशिक्षण संपन्न

अमरावती, दि. 27 (जिमाका):  कृषी विभाग, आत्मा आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात  'सत्यमेव जयते फार्मर कप' स्पर्धेसाठी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण नुकतेच पार पडले. या प्रशिक्षणाला तालुक्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना 'सत्यमेव जयते फार्मर कप 2026' या राज्यव्यापी उपक्रमासाठी सज्ज करणे तसेच पाणी फाउंडेशन व फार्मर कप स्पर्धेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी कृषी अधिकारी प्राजक्ता तायडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांसाठी महाविस्तार AI ॲपची माहिती देवून शेतकऱ्यांकडून ते डाउनलोड करून नोंदणी करून घेतली. पाणी फाउंडेशन टीममधील प्रशिक्षक जयकुमार सोनुले यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.  तर प्रफुल्ल कोल्हे यांनी गट शेती तसेच गटांमधील शेतकऱ्यांनी  घ्यावयाच्या पिकांबद्दल बाबत माहिती दिली.  

प्रशिक्षणात पुढे होणाऱ्या तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणाची माहितीही देण्यात आली. प्रशिक्षणाच्या शेवटी पाणी फाउंडेशन टीमने शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.  प्रशिक्षक रेणुका पोहोकार व प्रशांत देवरे यांनी निवासी प्रशिक्षणाची नोंदणी यावेळी करून घेतली. या प्रशिक्षणास कृषी विभागातील सर्व मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, पोकरा गावातील कृषी ताई तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी  प्रशांत गुल्हाने यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रुपाली चौधरी यांनी तर आभार मंडळ कृषी अधिकारी  नीतिमान व्यवहारे यांनी मानले.

000000

कुष्ठरोग शोध अभियानबाबत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन


 

Wednesday, November 26, 2025

DIO NEWS AMRAVATI 26-11-2025




                                    




                                     जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

अमरावती, दि. 26 (जिमाका) : संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी -कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, अधीक्षक निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

संविधान दिनानिमित्त इर्विन चौकात संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. यात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सहभाग नोंदविला.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, भारताचे संविधान हा एक देशाचा मजबूत पाया आहे. संविधानातील तरतुदींमुळे देशात शांतता नांदत आहे. संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकांला मुलभूत हक्क दिले आहे. त्यासोबतच कर्तव्येही दिली आहेत. नागरिकांना दिलेल्या अधिकारामुळे देशाने आज प्रगती केली आहे. समातनेमुळे देश विकसित राष्ट्र होत असल्याचे सांगितले.

सुरवातीला श्री. येरेकर यांनी इर्विन चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केले. यावेळी श्री. येरेकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिकरित्या वाचन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार विजय लोखंडे, नायब तहसिलदार टिना चव्हाण आदी उपस्थित होते.

00000


रिटेल कर्ज मेळावा येत्या शुक्रवारी

गृह आणि वाहन कर्जावर विशेष मार्गदर्शन

अमरावती, दि. 26 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, अमरावती यांच्या पुढाकाराने अभियंता भवन, शेगाव नाका, अमरावती येथे रिटेल आऊटरीच प्रोग्राम अर्थात रिटेल कर्ज मेळाव्याचे आयोजन शुक्रवार, दि. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील नागरिकांना गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि मोर्टगेज लोन यांसारख्या विविध रिटेल कर्ज योजनांची तसेच सध्या उपलब्ध असलेल्या व्याजदर सवलतींची सविस्तर माहिती देणे हा आहे.

या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिष येरेकर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, विविध शाखा व्यवस्थापक तसेच संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी, शहरातील प्रमुख कार डीलर आणि बिल्डर उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना यावेळी बँक अधिकाऱ्यांकडून कर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांसंबंधी ऑन-द-स्पॉट मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे, ज्यामुळे कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेतील अनेक शंकांचे त्वरित निरसन होऊ शकेल.

 सर्वसामान्य नागरिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून, इच्छुकांनी आपली उपस्थिती नोंदविणे आवश्यक आहे. अमरावती शहरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि कर्ज योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेड़ाऊ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा.

000000

इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखेत बदल;

22 फेब्रुवारी 2026 रोजी होणार परीक्षा

अमरावती, दि. 26 (जिमाका): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) च्या तारखेत बदल करण्यात आला असून ही परीक्षा आता दि. 22 फेब्रुवारी 2026   रोजी घेण्यात येणार आहे.

या परीक्षा पूर्वी दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित केल्या होत्या. परंतु, याच दिवशी, 8 फेब्रुवारी रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेस राज्यातील अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक प्रविष्ठ झाले असल्याने, शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यामुळे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी)  पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) आता दि. 22 फेब्रुवारी 2026   रोजी घेण्यात येणार आहेत. या बदलाची सर्व संबंधित विद्यार्थी, पालक आणि शाळांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

000000

संविधान प्रास्ताविका वाचनात विद्यार्थ्यांच्या लक्षवेधी सहभाग

अमरावती, दि. 26 (जिमाका) : समाज कल्याण विभागातर्फे ‘घर घर संविधान’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने बुधवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन जनजागृती अभियानाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या महर्षी रमण सभागृहात अभियानाचे उद्घाटन, तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त माया केदार होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे, तहसीलदार विजय लोखंडे, समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर, व्याख्याते प्रा. डॉ. राजेश मिरगे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय प्राचार्य डॉ. विनय राऊत, माजी प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संगीता भुयार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड, समाज कल्याण अधिकारी एस. एस. बोबडे, विशेष अधिकारी सचिन मोरे उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी श्री. भटकर यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस फक्त एका पुस्तकाचा स्विकारण्याचा दिवस नाही. हा दिवस देशाच्या आत्म्याची, विचारांची आणि मूल्यांची पुनःस्थापना करणारा दिवस आहे. भारतीय संविधान म्हणजे केवळ कायद्याचा ग्रंथ नव्हे, तर लाखो वंचिताच्या आशेचा दीपस्तंभ आहे. या दीपस्तंभाचे निर्माता हे डॉ. आंबेडकर असल्याचे सांगितले.

प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी भारतीय संविधानकर्त्यांना देशातील पारंपारिक विषमता मुलक मानसिकतेचे चांगलेच ज्ञान व भान होते. म्हणूनच त्यांनी संविधानामध्ये मूलभूत हक्काची तरतूद केली असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. राजेश मिरगे यांनी संविधान दिन हा केवळ घटनादिनाचा स्मरण दिन नाही. लोकशाहीचे आत्मपरीक्षण आणि वचनबद्ध होण्याचा दिवस असल्याचे सांगितले.

सुरवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. जनजागृती अभियानाच्या संविधान चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण राजेंद्र जाधवर यांनी प्रास्ताविक केले. श्रीकृष्ण पखाले यांनी सूत्रसंचालन केले. समाज कल्याण अधकिारी सरिता बोबडे यांनी आभार मानले.

00000



नगरपालिकांच्या निवडणुकीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी

अमरावती, दि. 26 (जिमाका) : येत्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चांदूरबाजार येथे भेट दिली. दरम्यान त्यांनी नगरपालिकेच्या शाळांना भेट दिली.

नगर परिषद चांदूर बाजार सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मतदानाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सोनल सूर्यवंशी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी गीता ठाकरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार मनोज सोनारकर, श्री. गवई, यश अग्रवाल, श्री. थोरात आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी चांदूरबाजार येथील स्ट्राँग रूमची पाहणी केली. त्यानंतर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना साहित्य वाटप होणाऱ्या ठिकाणची पाहणी केली. दरम्यान श्री. येरेकर यांनी नगर परिषद विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाला भेट दिली. विद्यालयातील खोली क्र. 1 मधील मतदान केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी सहावीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याच शाळेत सुरू असलेल्या विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

00000



DIO NEWS 26-12-2025

  टपाल विभागात 'डाक जीवन विमा' प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती अमरावती, दि. 26 (जिमाका):  भारतीय डाक विभागाच्या अमरावती विभ...