वंदे मातरम गीतास 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल
आज विविध उपक्रमांचे आयोजन
अमरावती, दि. 6 (जिमाका) : ‘वंदे मातरम’ या गीतास उद्या दि. 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने देशभर वंदे मातरम गीत गायन, देशभक्तीपर भाषणे, निबंध, लेखन, वक्तृत्व स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या सकाळी 10 वाजता वंदे मातरम् गीत गायीले जाणार आहे. तसेच संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), अमरावती येथे सामुहिक वंदे मातरम् गीत गायीले जाणार आहे.
बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी 1875 साली लिहिलेले वंदे मातरम हे गीत स्वातंत्र्य लढयात तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडातही अनन्यसाधारण महत्च प्राप्त आहे. आनंदमठ या कादंबरीतील हे गीत भारतमातेच्या स्तुतीचे प्रतीक असून स्वातंत्र्यलढ्यातील असंख्य क्रांतीकारकांसाठी प्रेरणादायी ठरलेले आहे.
वंदे मातरम कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या कार्यक्रमानुसार उद्या, 7 नोव्हेंबर रोजी बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी रचलेल्या 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त, अमरावती शहरात संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) येथील क्रीडांगणावर सकाळी 9.30 वाजता या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहसंचालक अनंत सोमकुवर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. यावेळी देशभक्तीपर गीत गायन, लेझिम पथनाट्य आणि व्याख्यान अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.
या गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त 'सार्थशताब्दी महोत्सवा'चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रातील 358 तालुक्यांमध्ये हा 'गौरव दिन' साजरा होत आहे.
देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आयोजित केलेल्या या सोहळ्यात तिन्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (संत गाडगेबाबा, भगिनी निवेदिता, दादासाहेब खापर्डे) प्रशिक्षणार्थी आणि निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती अमरावती जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी राम मुळे यांनी दिली आहे.
000000
मागणी असणाऱ्या रोजगारक्षम प्रशिक्षणाची निवड करावी
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 6 (जिमाका) : युवकांमधील कौशल्य विकसित करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. कौशल्य विकास योजनेतून प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षीच्या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यात मागणी असणाऱ्या रोजगारक्षम प्रशिक्षणाची निवड करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रशिक्षण लक्ष्य वाटप करण्याबाबत जिल्हास्तरीय समिती सभा पार पडली. यावेळी कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून यावर्षी प्रशिक्षणावर 1 कोटी रूपये खर्च करण्यात येत आहे. युवकांचे कौशल्य वाढविण्यासाठी प्रशिक्षण हे आवश्यक असून आवश्यकतेप्रमाणे निधी देण्यात येईल. जिल्ह्यात मागणी असणाऱ्या मनुष्यबळाची माहिती घेऊन प्रशिक्षण कार्यक्रम ठरविण्यात यावेत. यासाठी चांगल्या दर्जाच्या प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यात यावी. प्रशिक्षणानंतर प्रामुख्याने रोजगाराचा प्रश्न येत असल्याने यातील प्रशिक्षणार्थ्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. यासाठी त्यांना बँकांशी संलग्न करून द्यावे.
जिल्हा नियोजनमधून यावर्षी बचतगटांना एक लाख रूपये देण्यात येणार आहे. त्यामुळे किसान ड्रोनच्या प्रशिक्षणामध्ये महिलांना प्राधान्य द्यावे. प्रशिक्षणानंतर बचतगटाच्या माध्यमातून ड्रोन खरेदी केल्यास महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध होऊ शकेल. जिल्ह्यात प्रामुख्याने कृषी आधारीत उद्योगासाठी प्रशिक्षण देण्यात यावे. यासाठी कृषि विकास केंद्रांना सहभागी करून घ्यावे. यात कमी खर्चात उद्योग सुरू करता येतील, असे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात यावे. शहरी भागात उद्योजकांना प्रशिक्षित लेखापालाची गरज आहे. त्यामुळे यात कार्यरत संस्थांच्या मदतीने प्रशिक्षण दिल्यास युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जागर करीअरचा, अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम आदींचा आढावा घेण्यात आला.
0000
जिल्ह्यात स्क्रब टायफसबाबत खबरदारी बाळगण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
अमरावती, दि. 6 (जिमाका): अमरावती जिल्ह्यात 'स्क्रब टायफस' या संसर्गजन्य आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने सुरु केल्या आहेत. 'ओरिएंटा त्सुत्सुगामुशी' नावाच्या जिवाणूमुळे होणारा हा आजार 'माईट' नावाच्या विशिष्ट कीटकाच्या चाव्यातून पसरतो.
तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुख या आजाराची मुख्य लक्षणे आहेत.
या पार्श्वभूमीवर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी बाधित गावांमध्ये जलद ताप सर्व्हेक्षण आणि कीटक सर्व्हेक्षण सुरू केले आहे. झुडपांमध्ये वास्तव्य करणाऱ्या माईटच्या नियंत्रणासाठी टेमीफॉस आणि मॅलीथिऑन पावडरचा वापर करून कीटकनाशक फवारणी केली जात आहे. वाढलेले गवत आणि अनावश्यक झुडपे काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे, खुल्या जागी शौचास जाणे टाळणे आणि घराजवळ स्वच्छता राखून कीटकनाशक औषधांचा वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी.
0000000
जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 19 नोव्हेंबरला आयोजन
अमरावती, दि. 6 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे येथे दि. 19 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सव घेण्यात येणार आहे. महोत्सवात श्रीमती विमलाबाई देशमुख सभागृह, डी. एड. कॉलेज आणि शिवाजी विज्ञान महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
सदर युवा महोत्सव हा सांस्कृतिक आणि नवोपक्रम या संकल्पनेवर आधारीत असणार आहे. या महोत्सवात अमरावती जिल्ह्यातील युवक-युवती विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतील. यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात किंवा amravatidso@gmail.com या मेलवर पाठवावे लागतील. तसेच mybharat.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
सांस्कृतिक स्पर्धेतील लोकगीत आणि लोकनृत्यात 10 जणांना सहभाग घेता येईल. लोकनृत्यासाठी रेकॉर्ड केलेले संगीत वापरण्यास परवानगी नाही. कौशल्य विकास स्पर्धेत कथालेखन (मराठी, हिंदी व इंग्रजी, 1000 शब्दांत - सहभागी संख्या 3), चित्रकला (सहभागी संख्या 2), वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी - सहभागी संख्या 2) आणि कविता (सहभागी संख्या 3) सहभागी घेता येणार आहे.
चित्रकला स्पर्धेसाठी नशामुक्त युवा, युवकांसाठी आरोग्यदायी जीवनशैली, तर वक्तृत्व स्पर्धेत भारतातील आणीबाणीचा काळ आणि संविधानाचे उल्लंघन, लोकशाही व लोकशाही मुल्यांचे संरक्षण हे विषय आहेत. नवोपक्रम ट्रॅक विज्ञान प्रदर्शनात युवक आणि विद्यार्थ्यांना त्यांचे अभिनव विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकल्प सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त विकसित भारत चॅलेंज ट्रॅक, डिझाईन फॉर भारत आणि हॅक ऑफ सोशल कॉज यावर आधारित उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी वयोमर्यादा ही 15 ते 29 वर्षांपर्यंत राहणार असून दि. 12 जानेवारी 2026 रोजी वयाची गणना करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 15 नोव्हेंबर आहे. स्पर्धक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विहित नमुन्यातील इंग्रजीमध्ये ओळखपत्र, आधारकार्ड आणि जन्म तारखेचा दाखला, ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तपोवन चौक विद्यापीठासमोर, मार्डी रोड, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत.
महोत्सवात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या युवक-युवतींची निवड विभागस्तरीय युवा महोत्सवासाठी आणि त्यानंतर राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी केली जाईल. युवा महोत्सवात युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
00000
अमरावती जिल्ह्यासाठी 'आधारभूत' खरेदी केंद्रांना मंजुरी;
शेतकऱ्यांना तातडीने नोंदणीचे आवाहन
अमरावती, दि. 6 (जिमाका): अमरावती जिल्ह्यामध्ये खरीप पणन हंगाम 2025-26 अंतर्गत धान (भात) आणि भरडधान्य (ज्वारी, बाजरी, इ.) खरेदी करण्यासाठी किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत एकूण 12 खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. खरेदी केंद्र निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी ही मान्यता प्रदान केली आहे.
जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, अचलपूर आणि चांदूर बाजार या तालुक्यांतील प्रत्येकी एक, अशा 4 सामान्य खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली असून, ही केंद्रे तालुका खरेदी विक्री संस्थांमार्फत चालवली जातील.
याव्यतिरिक्त, धारणी आणि चिखलदरा या आदिवासी बहुल तालुक्यांतील अनुसूचित जनजाती क्षेत्रासाठी विशेषतः 8 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. आदिवासी विकास महामंडळामार्फत ही केंद्रे चालवली जातील. यामध्ये धारणी तालुक्यात सावलीखेडा, साद्रावाडी, धारणी, चाकर्दा, हरिसाल, बैरागड तसेच चिखलदरा तालुक्यात आणि गौलखेडा बाजार येथील केंद्रांचा समावेश आहे. तसेच विदर्भ को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन तर्फे
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे , जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्री. बिसेने, विदर्भ को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशनचे श्री. विधळे, आदिवासी विकास महामंडळाचे संतोष आमटे यांच्यासह संबंधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व खरेदी प्रतिनिधींनी शासनाच्या धोरणानुसारच शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची आधारभूत किंमतीने विक्री करण्यासाठी लवकरात लवकर शासकीय पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.
000000
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 06 (जिमाका): राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी (पण शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी ) 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना' सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि मर्यादित शासकीय वसतिगृहांची जागा लक्षात घेऊन, अनेक विद्यार्थी निवासाच्या समस्येमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. ही अडचण दूर करण्यासाठी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ही योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत 50 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त असलेल्या इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी आवश्यक रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाते.
स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेला असावा आणि मर्यादित प्रवेशक्षमतेमुळे त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. तसेच, विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा.
पात्र विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर त्वरित ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची हार्ड कॉपी आणि सर्व आवश्यक कागदपत्रांची साक्षांकित प्रत सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती यांच्या कार्यालयात 30 नोव्हेंबरपर्यंत जमा करावा.
अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय, अमरावती (दूरध्वनी क्रमांक 0721-2661261) येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे.
000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment