Wednesday, November 12, 2025

DIO NEWS AMRAVATI 12-11-2025


                                             'अमृत दुर्गोत्सव 2025'ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान!

शिवछत्रपतींना दिली विश्वविक्रमी मानवंदना

अमरावती, दि. 12 (जिमाका): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेने आयोजित केलेल्या 'अमृत दुर्गोत्सव 2025' या उपक्रमाने ऐतिहासिक कामगिरी करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले आहे. शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी अमृतच्या पुणे मुख्यालयातील समारंभात  'मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम' या श्रेणीतील विश्वविक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'चे प्रतिनिधी प्रवीण पटेल यांच्या हस्ते अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांना सुपूर्द करण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि संस्कृती रक्षण या गुणांना उजाळा देत समाजमन घडविणे आणि महाराजांना विश्वविक्रमी मानवंदना देणे हा होता. याअंतर्गत, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या बारा दुर्गांपैकी कोणत्याही एकाची प्रतिकृती अंगणात, सोसायटीत किंवा शाळेत तयार करून, त्यासोबतचा फोटो 'अमृत दुर्गोत्सव 2025' च्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

विजय जोशी यांच्या नियोजनामुळे आणि अमृत कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हा शासकीय उपक्रम न राहता त्याला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. महाराष्ट्रातूनच नव्हे, तर शेजारील राज्ये, अमेरिका, इंग्लंड आणि आखाती देशातूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त व भावनिक प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे दुर्गांच्या प्रतिकृतींसोबत घेतलेल्या फोटोंची संख्या विक्रमी झाली.

प्रमाणपत्र प्रदान करताना, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे पंच प्रवीण पटेल यांनी या विश्वविक्रमाच्या कठीण तपासणी प्रक्रियेची माहिती दिली. योग्य चित्रे निवडणे, अस्पष्ट व दुबार चित्रे बाद करणे अशा अनेक दिवसांच्या क्लिष्ट तपासणीनंतर हा विश्वविक्रम प्रस्थापित होऊ शकला, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या यशाबद्दल विजय जोशी यांनी सर्व शासकीय अधिकारी, सामाजिक नेतृत्व, दुर्गप्रेमी, विद्यार्थी आणि सर्व शिवप्रेमी तसेच अमृत कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. सहभागी झालेल्या प्रत्येकास मा. मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदन पत्र मिळणार आहे.

0000000

शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी 14 नोव्हेंबरला सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कर्ज शिबिर;

जागेवरच कर्ज मंजुरी!

अमरावती, दि. 12 (जिमाका): 'आत्मनिर्भर भारत'च्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी आणि कृषी क्षेत्रातील आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय अमरावती यांच्या वतीने गुरुवार,  दि. 14 नोव्हेंबर रोजी विशेष कर्ज शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामुळे शेतकरी आणि गरजू वर्गाला बँकिंग सुविधा व कर्ज योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे.

हे शिबिर अमरावती परिसरात  कविटकर लॉन, पथ्रोट, नानाजी देशमुख सभागृह, शिरजगाव बंड आणि पंचायत समिती सभागृह, मोर्शी येथे आयोजित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, बँकेच्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखांमध्येही हे विशेष शिबिर होणार आहे. या शिबिराचा उद्देश शेतकरी, स्वयंसहायता समूह आणि समाजातील इतर गरजू वर्गाला विविध कर्ज योजनांचा लाभ मिळवून देणे आहे.

येथे किसान क्रेडिट कार्ड, कुक्कुटपालन, दुग्धशाळा, खाद्य प्रक्रिया, कृषी यांत्रिकीकरण आणि बचत गटांना कर्ज यांसारख्या कृषी आणि संलग्न सुविधांशी संबंधित माहिती व मार्गदर्शन मिळेल.शिबिरात नवीन कर्ज प्रकरणे त्वरित स्वीकृत केली जातील, पात्र प्रकरणांना जागेवरच मंजुरी दिली जाईल आणि त्याच दिवशी कर्ज वितरण सुद्धा करण्यात येणार आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने परिसरातील सर्व सन्माननीय शेतकरी वर्ग, कृषी उद्योजक आणि कृषी संलग्न कामांशी संबंधित व्यक्तींना या शिबिरात उपस्थित राहून त्वरित कर्ज सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

00000

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टेट) परीक्षा: 23 नोव्हेंबरला

अमरावती, दि. 12 (जिमाका): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-04 यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 चे आयोजन करण्यात आले असून ही परीक्षा  रविवार, दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्याचे नियोजित आहे.

 टेट परीक्षेच्या कार्यवाहीबाबतची सर्व अधिकृत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येत आहे. मात्र, अलीकडे युट्युब चॅनेल्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि प्रसार माध्यमांद्वारे परीक्षेसंबंधी अनेक दिशाभूल करणाऱ्या बातम्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर, परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की, उमेदवारांनी अशा कोणत्याही अनधिकृत माहितीवर किंवा अफवांवर मुळीच विश्वास ठेवू नये.

उमेदवार आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधीच्या सर्व सूचना आणि माहितीसाठी केवळ www.mscepune.in तसेच http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळांचेच वेळोवेळी अवलोकन करावे. कोणत्याही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांचे किंवा उमेदवारांचे नुकसान झाल्यास, त्याला ते स्वतः जबाबदार असतील,  असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 12-11-2025

                                                         'अमृत दुर्गोत्सव 2025'ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान! शिवछत्रपतींना दिली ...