Friday, November 7, 2025

DIO NEWS AMRAVATI 7-11-2025









                             देशभक्तीचा उत्साह, ऐक्य आणि राष्ट्रीय अभिमानाची अनुभूती

भारत माता स्तुतीच्या गौरव दिनानिमित्त

वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन

अमरावती, 7 (जिमाका) : 'वंदे मातरम्' राष्ट्रगीताच्या 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज सामुदायिक वंदे मातरम् गीत गायनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रभावना जागवणाऱ्या गीताचे उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी एकसुरात सामूहिक गायन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, तहसीलदार विजय लोखंडे, निलेश खटके, तसेच विविध कार्यालयांचे प्रमुख, शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. देशभक्तीचा उत्साह, ऐक्य आणि राष्ट्रीय अभिमान यांची अनुभूती सर्वांना यावेळी आली.

स्वातंत्र्य सेनानी व थोर कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी क्रांतीची जाज्वल्य ज्योत आपल्या गीतातून सबंध देशभर पेटवली. 'वंदे मातरम्' या गीत रचनेला 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित येथील संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या क्रीडांगणावर हजारो विद्यार्थी, तरुणांच्या उपस्थितीत 'वंदे मातरम्' गायनाचा सामूहिक सोहळा संपन्न झाला. यावेळी मुलांनी देशभक्तीपर लघू नाटिका सादर केली, तर मुलींनी लेझीम पथक सादर केले.

खासदार डॉ. अनिल बोंडे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक अनंत सोमकुवर, प्राचार्य अनिल बोरकर, प्राचार्य राजेश शेळके, तहसीलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख वक्त्या पायल किनाके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती, भगिनी निवेदिता मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रहाटगाव येथील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. निदेशक प्रकाश गंडोधर यांनी सूत्रसंचालन केले.

00000


बालविवाह रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका महत्वाची

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 7 (जिमाका) : बालविवाह होत असल्यास गावातील नागरिकांन याची माहिती असते. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी प्रामुख्याने मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका आणि लोकप्रतिनिधींनाची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘बालविवाह मुक्त महाराष्ट्र, आपला संकल्‍प अभियान’च्या अनुषंगाने बैठक पार पडली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, महिला व बालविकास उप मुख्य कार्यकारी अधिकारी विलास मसराळे, माविमचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश टेकाळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, पोलिस विभागाच्या दिप्ती ब्राम्हणे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, जिल्हाधिकारी मुलामुलींचा जन्मदर हा समाधानकारक आहे. मात्र काही भागात बालविवाह होत आहे. त्यामुळे माता आणि बालकांचे चांगले पोषण होत नसल्याने मातामृत्यू आणि बालमृत्यूची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे कमी वयात होणारे विवाह रोखणे आवश्यक आहे. यासाठी प्रामुख्‍याने शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाभरात किशोरी मेळाव्यांसारखे उपक्रम राबविण्यात यावे. मेळघाटात कोरकू बोलीभाषा असल्यामुळे जनजागृतीसाठी त्यांच्याच भाषेचा उपयोग करावा.

शाळेतून मुलींची अनुपस्थिती ही मुख्याध्यापकांना पहिल्यांदा जाणवते. त्यामुळे मुख्याध्यापकांनी अचानक शाळेत मुलींची गैरहजेरी जाणविल्यास याबाबत समितीला माहिती द्यावी. अशा मुलींचे बालविवाह होत असल्यास तातडीने याची माहिती देण्यात यावी. तसेच गावातील ग्रामसेवक, सरपंच यांनाही गावातील विवाहाची माहिती होत असल्याने त्यांच्यावरही जबाबदारी सोपविण्यात यावी. गावात बालविवाह झाल्यास ग्रामसेवकांवर कार्यवाही करावी. बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती ही महत्वाची असल्याने येत्या बालकदिनी बालविवाह रोखण्याची शपथ सर्व शाळांमध्ये घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिली.

बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानाबाबत जनजागृती करण्यात यावी. यासाठी कृति आराखडा तयार करण्यात यावा. यात कार्यक्रमाचे नियोजन करून जिल्ह्यात राबविण्यात यावेत. तसेच गावातीलच महिलांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविले असल्यास अशांचा सत्कार करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी उपस्थितांनी बालविवाह रोखण्याची शपथ घेतली.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 12-11-2025

                                                         'अमृत दुर्गोत्सव 2025'ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान! शिवछत्रपतींना दिली ...