विपश्यना केंद्राने संस्कारक्षम पिढी तयार करावी
-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती, दि. 10 (जिमाका) : एकविसावे शतक भारताचे आहे. त्यामुळे जगाला दिशा देऊ शकणारे युवक घडविणे आवश्यक आहे. 2047 मधील विकसित भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी संस्कारक्षम पिढी तयार करणे आवश्यक आहे. विपश्यना केंद्राच्या माध्यमातून या कामाला गती मिळणार आहे. त्यासाठी विपश्यना केंद्राने संस्कारक्षम पिढी तयार करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
सृजनशील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे उभारण्यात येणाऱ्या कोंडेश्वर रोड येथील बोधीभुमि संस्कार केंद्राचा आज पायाभरणी सोहळा आज पार पडला. यावेळी आमदार रवि राणा, केवलराम काळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, कमलताई गवई, किर्ती गवई, रविराज देशमुख आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, पुढील पिढी घडविण्यासाठी संस्कार केंद्र उभे राहणे आवश्यक आहे. संस्कारामुळे प्रगल्भ व्यक्ती तयार होऊन एक मजबूत पिढी तयार होईल. विपश्यना केंद्राच्या योगदानातून समाज निर्माण होणार आहे, तसेच समाजाला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे केंद्र हे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संकुल व्हावे. तथागत गौतम बुद्धांनी जगाचे कल्याण करणारी शिकवण दिली आहे. ही शिकवण पुढे नेण्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देत आहे.
कोंडेश्वर येथील केंद्र उच्च दर्जाचे व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. याठिकाणी विपश्यना केंद्रासह गौतम बुद्धांची मुर्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, वसतिगृह, वाचनालय करण्यावर भर देण्यात येणार आहे. केंद्राचा विकास करताना आराखडा तयार करावा. केंद्राच्या संस्थेने आवश्यक असणाऱ्या बाबींचा या आराखड्यात समावेश करावा. यासोबतच ईर्विन चौकातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार रवि राणा यांनी मार्गदर्शन केले. सुरुवातीला उपस्थितांनी तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीचे पूजन केले. त्यानंतर श्री. बावनकुळे यांनी कुदळ मारून विपश्यना केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष कलावती भटकर, कोषाध्यक्ष अन्नपूर्णा दामले, सचिव अश्विनी भटकर, वैदर्भी मेश्राम आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील यश मिळविलेल्यांचा सत्कार करण्यात आला.
00000
अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये बदल
पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 10 (जिमाका): अमरावती शहरात नोव्हेंबर महिन्यात दर रविवारी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे.
सर्व वाहनांना वाहतूकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग
नोव्हेंबर महिन्यातील 16 नोव्हेंबर, 23 नोव्हेंबर व 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते 8 वाजता वेलकम टी पॉईट कडून बियाणी चौकाकडे येणार एकतर्फी मार्ग सर्व वाहनांना वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.
वाहतूकीस पर्यायी मार्ग
वेलकम टी पॉईट ते पंचवटी चौकपासून कांता नगर चौक किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्ग वरील वाहतूक नियमन रूग्णवाहिका, अग्नीशामक वाहन, कायाद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही. वाहतूक परिस्थितीनुसार वाहतूक थांबविणे व वळविणे याबाबत सर्व अधिकार वाहतूक विभागास राहील. तसेच अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता सहायक पोलीस आयुक्त वाहतुक अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातुन नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतूकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार राहील.
ही अधिसूचना माहे नोव्हेंबर 2025 मधील दर रविवारी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत प्रायोगिक तत्वावर अंमलात राहील.
या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कामकाज सुरळीत सुरु,
अफवांना बळी न पडण्याचे आवाहन
अमरावती, दि. 10 (जिमाका): मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी अलीकडील काही दिवसांपासून सोशल मीडियासह विविध माध्यमांतून नकारात्मक व निराधार अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवांना कोणतेही तथ्य नसून, महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरु आहे.
महामंडळामार्फत जुलै ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत मोठ्या संख्येने कर्ज मंजुरी देण्यात आली आहे. दि. 10 ऑक्टोबर 2025 पासून महामंडळाच्या वेब प्रणालीचे अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, वेब प्रणालीचे सुरक्षा लेखापरीक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत, कर्ज व बँक मंजुरी या दोन सेवा 15 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात देण्यासाठी आवश्यक ते बदल करणे सुरु आहे. मध्यस्थांमार्फत लाभार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी, महामंडळाने सीएसआर केंद्राद्वारे फक्त 10 रुपयांत सेवा उपलब्ध व्हावी यासाठी सामंजस्य करार केला आहे, त्यास अनुषंगाने वेब प्रणालीमध्ये बदल करण्याचे काम सुरु आहे. लाभार्थ्यांना महामंडळाच्या सर्व सेवा थेट मोबाईलद्वारे देता याव्यात म्हणून मोबाईल ॲप विकसित होत आहे.
महामंडळामार्फत लाभार्थ्यांना सुरळीत व सहजपणे व्याज परतावा मिळणार आहे. लाभार्थ्यांना योजनांबाबत मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी चॅटजीपीटी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. महामंडळ समाजाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी कटिबद्ध आहे, तरी सर्वसामान्य नागरिकांना आणि लाभार्थ्यांना विनंती आहे की, कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या किंवा अफवांवर आधारित माहितीवर विश्वास ठेवू नये. महामंडळाचे सर्व कामकाज सुरु असून, वेब प्रणालीचे अद्ययावतीकरण हे समाजहिताचे व लाभार्थ्यांच्या सोयीसाठीचे आहे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा समन्वयक रोहित मोंढे यांनी केले आहे.
000000
हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदी 15 नोव्हेंबरपासून सुरु होणार
अमरावती, दि. 10 ( जिमाका): महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ आणि नाफेड यांच्या संयुक्त विद्यमानाने हंगाम 2025-26 मध्ये केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग, उडीद आणि सोयाबीनची प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया 15 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत असून, खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे.
केंद्र शासनाने या पिकांसाठी आधारभूत दर निश्चित केले आहेत. त्यानुसार, मूग 8 हजार 768 रुपये, उडीद 7 हजार 800 रुपये आणि सोयाबीन 5 हजार 328 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केले आहेत.
खरेदी प्रक्रियेसाठी राज्य शासनाने दोन केंद्रीय नोडल एजंन्सींची नियुक्ती केली आहे. यामध्ये नाफेडकडे (Nafed) अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिमसह एकूण 22 जिल्ह्यांची जबाबदारी असेल, तर एनसीसीएफकडे (NCCF) नागपूर, चंद्रपूर, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, हिंगोली या एकूण 6 जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या गावाजवळील नाफेड,किंवा एनसीसीएफच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने पॉस मशीनद्वारे करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी आधारकार्ड, बँकेचे पासबुक, चालू वर्षाचा 7/12 उतारा आणि पीकपेरा या कागदपत्रांसह शेतकऱ्यांची केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे. नोंदणीनंतर एसएमएस प्राप्त झाल्यावरच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी केंद्रावर घेऊन यावा, असे आवाहन पणन महासंघाच्या संचालक मंडळाने केले आहे.
00000000
स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी 'अवांतर वाचन' महत्त्वाचे:
दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन
अमरावती, दि. 10 (जिमाका): स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमाच्या पुस्तकांपुरते मर्यादित न राहता अवांतर वाचन देखील करावे, कारण ते यश मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते, असे मत विभागीय आयुक्त कार्यालयतील अप्पर आयुक्त सूरज वाघमारे यांनी व्यक्त केले. शासकीय विभागीय ग्रंथालय, अमरावती येथे दिवाळी अंक प्रदर्शन 2025 चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
शासकीय विभागीय ग्रंथालय, सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. येथे विविध विषयांवरील दिवाळी अंक प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सूरज मडावी आदी उपस्थित होते. शासकीय विभागीय ग्रंथालयात 1 लाख 25 हजारहून अधिक विविध विषयांवरील ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. अनेक विद्यार्थी दररोज या सेवेचा लाभ घेतात. तसेच, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची नवीन इमारत लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहे. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, अधिकाधिक नागरिकांनी ग्रंथालय सेवेचा लाभ घेण्यासाठी या दिवाळी अंक प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन डॉ. सूरज मडावी यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कुरवाडे यांनी तर शेषराव भिरडे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे अमरावतीत आयोजन
अमरावती, दि. 10 नोव्हेंबर (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, अमरावती आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांनी वेस्टर्न फुटबॉल असोसिएशन, महाराष्ट्र आणि अमरावती जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने अमरावती येथे राज्यस्तरीय शालेय फुटबॉल (14 वर्षांखालील मुले व मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. दि. 13 ते 15 नोव्हेंबर 2025 या दरम्यान जिल्हा परिषद सायन्सकोर मैदान आणि पोलीस फुटबॉल मैदान, अमरावती येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील मुंबई, लातूर, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, अमरावती आणि नागपूर या आठ विभागांतून एकूण 16 संघ सहभागी होत असून, यामध्ये सुमारे 400 पंच, अधिकारी आणि खेळाडू यांचा समावेश असेल.
या स्पर्धेतून राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे, जो मध्य प्रदेश आणि झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करेल. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची निर्मिती करण्यात आली असून, खेळाडूंची निवास व्यवस्था विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्यातील सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
000000
पोस्टवूमन ते 'यूपीएससी' अधिकारी!
अमरावतीच्या रसिका मुळे यांनी मिळवले देशात ८७ वे स्थान!
अमरावती, दि. 10 (जिमाका): अमरावती प्रधान डाकघरात 'पोस्टवूमन' म्हणून कार्यरत असलेल्या रसिका राजेश मुळे यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर देशातील सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा-2024 उत्तीर्ण केली आहे. राखीव यादीतून त्यांची निवड झाली असून, त्यांनी संपूर्ण देशातून 87 वी रँक मिळवण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
या यशाबद्दल प्रधान डाकघर अमरावती येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रवर डाकपाल सुजितकुमार लांडगे यांच्या हस्ते रसिका मुळे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. रसिका मुळे यांचे हे यश संघर्ष करणाऱ्या हजारो तरुणांसाठी मोठे प्रेरणास्थान ठरले आहे
यावेळी श्री. लांडगे यांनी रसिका मुळे यांच्या परिश्रमाचे कौतुक केले आणि त्यांना पुढील प्रशासकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार समारंभास उपडाकपाल, सर्व सहायक डाकपाल तसेच प्रधान डाकघरातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
000000
'नशामुक्त भारत' अभियानांतर्गत अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर व्याख्यान
अमरावती, दि. 10 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत नुकतेच अंमली पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामांबाबत विभागीय स्तरावरील मागासवर्गीय 1000 मुलांचे शासकीय वसतिगृह, निंभोरा, अमरावती येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य व व्यवस्थापन समिती सदस्य प्राध्यापक डॉ. प्रफुल्ल गवई, हे प्रमुख व्याख्याते होते. डॉ. गवई यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या बोधपर उदाहरणे व गोष्टींच्या माध्यमातून अंमली पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणाम सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना निरोगी आयुष्याचे महत्त्व पटवून देत, अंमली पदार्थ व इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती आणि सकारात्मक जीवनशैली अंगिकारण्यास प्रोत्साहन मिळाले.समाज कल्याण अधिकारी, संत गाडगेबाबा विद्यापीठाचे गृहपाल, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment