Tuesday, November 11, 2025

DIO NEWS AMRAVATI 11-11-2025

 

सोमवारी ‘युनिटी वॉक’चे आयोजन

*युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती, दि. 11 (जिमाका): सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सोमवार, दि. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता युनिटी वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. विमलाबाई देशमुख सभागृहातून या रॅलीला सुरवात होणार आहे. यात युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पदयात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक पार पडली. यावेळी मेरा युवा भारतच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्यासह राष्ट्रीय छात्र सेना, राष्‍ट्रीय सेवा योजना, आरोग्य, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

मेरा युवा भारत, केंद्रीय युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंती निमित्त ‘सरदार @ १५०’ एकता अभियान जिल्हास्तर युनिटी मार्च, पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही पदयात्रा विमलाबाई देशमुख सभागृहातून निघून पंचवटी चौक, इर्विन चौक येथे येणार आहे. इर्विन चौकात पथनाट्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर ही पदयात्रा गर्ल्स हायस्कूल चौक येथून निघून विमलाबाई देशमुख सभागृहात समारोप होणार आहे. पादयात्रेत सहभागी होण्यासाठी माय भारत पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.

पदयात्रेच्या अनुषंगाने पोलिसांची परवानगी घेण्यात यावी. तसेच पोलिस विभागाने पदयात्रेसाठी सहकार्य करावे. महापालिकेने पदयात्रेच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने पदयात्रेदरम्यान आरोग्य पथक तैनात करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्या. पदयात्रेत राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, खेळाडू, पोलिस भरतीतील युवक, विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच सध्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता सुरू असल्याने पदयात्रा आयोजनात आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

0000

                                           बोगस डॉक्टरांवर पोलिसांच्या समन्वयाने कारवाई करावी

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 11 (जिमाका): बोगस डॉक्टरांच्या संदर्भात आलेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी. याबाबत सखोल तपासासाठी आरोग्य यंत्रणांकडे आलेल्या तक्रारी पोलिसांनाही देण्यात याव्यात. यामुळे भविष्यातही कारवाई करता येईल, असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरीता जिल्हास्तरीय समिततीची सभा पार पडली. यावेळी पोलिस उपअधिक्षक राजेश भुयार, पोलिस निरीक्षक सिमा दाताळकर, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ. विजय अजमिरे, पवन टेकाळे, डॉ. अनिल माणिकराव आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, नागरिकांच्या तक्रारीसोबतच प्रसारमाध्यमांमधील आलेल्या बातम्यांनुसार बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी. ही कारवाई करताना पोलिस विभागाला याची माहिती देण्यात यावी. पोलिसांना माहिती दिल्यास नंतरच्या काळात इतरत्र व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळण्यास मदत होईल. जिल्ह्यात प्रामुख्याने चांदूरबाजार परिसरात बोगस डॉक्टरांच्या तक्रारी अधिक प्रमाणात येत आहे. त्यामुळे या भागात लक्ष देण्यात यावे.

पोलिस आणि आरोग्य विभागाकडे आलेल्या तक्रारीवर तातडीने कारवाई करावी. कारवाई करताना पोलिसांचे सहकार्य घ्यावे. जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचे प्रमाण कमी असले तरी आलेल्या तक्रारीवर कारवाई होणे आवश्यक आहे. यामुळे भविष्यात होणारा अपघात टाळल्या जाऊ शकेल. नागरिकांनीही परिसरात बोगस डॉक्टर व्यवसाय करीत असल्याचे आढळल्यास तातडीने पोलिस आणि आरोग्य विभागाकडे माहिती द्यावी, असे आवाहन श्री. येरेकर यांनी केले.

00000

ज्येष्ठ नागरिकांसाठी 'एल्डर लाईन' (14567): राष्ट्रीय हेल्प लाईन सेवा

अमरावती, दि. 11 (जिमाका): सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी 14567 राष्ट्रीय हेल्प लाईन सेवा देशभरातील सर्व राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात वयोवृद्धांसाठी सुरू करण्यात आली आहे.

 ‘सून खाऊ घालत नाही आणि पोरगाही बघत नाही’, ‘घरात आम्ही दोघं एकटेच, मुलगा परदेशात आहे’, ‘नातेवाइकांनी आमचं घर बळकावलंय’ किंवा ‘कुटुंबात कुणाशी बोलणंच होत नाही’ अशा असंख्य व्यथा, वेदना आणि तक्रारी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक "एल्डर लाईन" 14567 हेल्पलाइनवर मोकळेपणाने मांडत आहेत.

महाराष्ट्रातही सेवा जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्यामार्फत ही सेवा राबवली जाते. "मानवसेवा हीच ईश्वर सेवा" हे ब्रीद वाक्य घेऊन संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा) यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फौन्डेशन, पुणे गेली 37 वर्षांपासून सातत्याने आपल्या विविध प्रकल्पाद्वारे गरीब, आजारी, वृद्ध, अपंग, निराधार, गरीब मुले, मुली आणि महिला यांची सेवा करीत आहे. जनसेवा फाउंडेशनला संयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जा प्राप्त आहे. महाराष्ट्रात, ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेल्या या 14567 राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइनवर आतापर्यंत 4 लाखांहून अधिक कॉल्स आले असून, 30 हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे. हेल्पलाइनद्वारे मिळणाऱ्या मोफत प्रमुख सेवांमध्ये माहिती (आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृह व वृद्धाश्रम, डे केअर सेंटर याबाबत माहिती), मार्गदर्शन (कायदेविषयक, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत कायदेशीर सल्ला, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007), भावनिक आधार (मानसिक आजार व चिंता, ताण, राग इत्यादी व्यवस्थापन), तसेच बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत आणि पुनर्वसन, कुटुंबियांशी संवाद, पोलीस प्रशासनाशी समन्वय व समुपदेशन यांचा समावेश आहे.

 "एल्डर लाईन 14567" ही केवळ हेल्पलाईन नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात, एक सुरक्षित आधार आहे. या माध्यमातून वयोवृद्धांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मानाने जगता येईल, यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते. ज्येष्ठांसाठी ही सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी समाजातील प्रत्येकाने जागरूक व्हावे आणि सर्व गरजू वयोवृद्धांनी या एल्डर लाईनचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

000000

'कुष्ठरुग्ण शोध अभियान' 17 नोव्हेंबरपासून सुरू

अमरावती, दि. 11  (जिमाका): संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत दिनांक 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या नियोजनासाठी अमरावती जिल्ह्याची जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा जिल्हाधिकारी आशिष येरेकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे संपन्न झाली.

या सभेमध्ये सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. पूनम मोहोकार यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाबद्दलची सद्यस्थिती आणि या अभियानाचे विस्तृत नियोजन सादर केले. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी लवकरात लवकर कुष्ठरुग्णांचा शोध घेवून त्यांच्यावर त्वरित उपचार सुरु करण्यासाठी  सर्व उपस्थित अधिकारी तसेच  नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

 श्रीमती महापात्र यांनी समाजातून कुष्ठरोग हद्दपार करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे अपेक्षित आहे. व्यापक प्रमाणामध्ये जनजागृती करण्यात यावी, जेणेकरून कुष्ठरोग संसर्गाची साखळी समाजातून खंडित होईल आणि सन 2030 पर्यंत कुष्ठरोगाचा शून्य प्रसार हे ध्येय आपण जिल्हास्तरावर साध्य करू शकू, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे तसेच संबंधित जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

0000000

परिवहनेत्तर ( दुचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी  नवीन

वाहन मालिका सुरू करण्याबाबत आवाहन

अमरावती, दि. 11 (जिमाका): परिवहनेत्तर ( दुचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी  गुरूवार, दि. 13 नोव्हेंबर 2025  रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालय, कॅम्प, अमरावती, खिडकी क्रमांक -25 येथे जमा करावेत. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांच्या पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे. तसेच अर्जामध्ये वाहन ज्या व्यक्तीच्या नावे आहे, त्या व्यक्तीचा आधारकार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अमरावती, कॅम्प ब्रांच, ट्रेझरी ब्रांच कोड नं 003866 साठी  देय असावा.

 

एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल, त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील, त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी दि. 13 नोव्हेंबर 2025 रोजी   वाजता कार्यालयातील नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंती क्रमांकांसाठी ज्यांनी अर्ज केला आहे, अशाच अर्जदारांनी दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सीलबंद करून खिडकी क्रमांक -25 वर जमा करावे.

एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनापेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन सीलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट धारकांनी दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात उपस्थित रहावे. लिलावासाठी उपस्थित राहणा-या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकार पत्रासह हजर रहावे. कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल, त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. तसेच, विहित वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठलाही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी., असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी  यांनी केले आहे.

00000

पाणी फाउंडेशनच्या 'फार्मर कप'द्वारे 50 हजार शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले;

जिल्ह्यात अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण संपन्न

अमरावती, दि. 11 (जिमाका): सन 2022 पासून पाणी फाउंडेशनने "सत्यमेव जयते फार्मर कप" या उपक्रमाद्वारे संघटन आणि ज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य सुरू केले आहे. या उपक्रमाचा परिणाम 50 हजारहून अधिक शेतकऱ्यांवर झाला असून त्यातील निम्म्या संस्था महिला शेतकऱ्यांच्या आहेत, त्यामुळे हे व्यासपीठ महिला सशक्तीकरणासाठीही प्रभावी ठरले आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि गावात याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे, जेणेकरून शेतीतील संघटनेसाठी जनचळवळ उभी राहील आणि ग्रामीण समृद्धी साधता येईल. पाणी फाउंडेशन या उपक्रमाद्वारे केवळ जलसंधारणच नव्हे, तर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीत आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प बळकट करत आहे. त्याअनुषंगाने, पाणी फाउंडेशन मार्फत घेण्यात येत असलेल्या 'फार्मर कप'साठी शेतकरी तसेच अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे कृषी चिकित्सालय, येरला, मोर्शी येथे मोर्शी व तिवसा तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली पाणी फाउंडेशन यांच्या समन्वयाने एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय सभागृह, अमरावती येथे अमरावती व भातकुली, तसेच दि. 3 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय सभागृह, नांदगाव खंडेश्वर येथे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पाणी फाउंडेशन यांच्या समन्वयाने एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणासाठी कर्मचारी वर्गाने उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते  यांनी 'फार्मर कप' उपक्रमाचे उद्दिष्ट, शाश्वत जलव्यवस्थापनाचे महत्त्व, गट शेती, पाणी बचत आणि शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी गट बांधणी या विषयावर मार्गदर्शन केले.

000000

शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

              अमरावती, दि. 11 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

              सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून  दि. 13 नोव्हेंबर ते  27 नोव्हेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  अरविंद चावरिया यांनी कळविले आहे.

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 12-11-2025

                                                         'अमृत दुर्गोत्सव 2025'ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान! शिवछत्रपतींना दिली ...