दुर्गम भागातील रस्त्यांबाबत तातडीने उपाययोजना
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 4 (जिमाका) : खुटीया, एकताई, सिमोरी, हातरू येथील रस्ते, वीज, पुल आदींच्या व्यवस्थेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील. प्रामुख्याने या भागातील रस्त्यांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी रस्त्यांचे अंदाजपत्रक सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
मेळघाटातील नागरिकांनी विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते. त्यानुषंगाने मागण्यासंदर्भात गावातील नागरिकांशी आज जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपवनसंरक्षक अर्जूना के. आर., किर्ती जमदाडे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, कुटीदा ते सिंभोरी आणि सोमिथा ते कुटीदा या रस्त्यांचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारे अंदाजपत्रक तातडीने तयार करण्यात येईल. या रस्त्यांची कामे रोजगार हमी योजनेतून करण्याची शक्यता पडताळून पाहता येईल. मेळघाटातील हातरू ते करंजखेड मार्गाचा संपर्क तुटत असल्याने याबाबतही योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. पुलाच्या कामांना सुमारे 15 कोटींचा निधी लागणार आहे. त्यामुळे पुलाच्या बांधकामासाठी शासनस्तरावर मागणी करण्यात येणार आहे. ही कामे व्हावीत, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी जरिदा उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागला आहे. येत्या काळात 22 गावातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. विजेच्या समस्येमुळे मोबाईलचे नेटवर्क राहत नाही. याबाबत विजेची सोय असणाऱ्या ठिकाणी नेटवर्क राहण्यासाठी सूचना देण्यात येतील. आदिवासी क्षेत्रातील मक्याची खरेदी आदिवासी विभागाकडून करण्यात येते. ही खरेदी सुरू करावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येतील. तसेच नागरिकांच्या रस्ते, वीज, पुलाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कालावधी लागणार आहे. ही कामे होण्यासाठी शासनस्तरावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे श्री. येरेकर यांनी सांगितले.
000000
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला यश!
5 हजार 700 लोकांनी सोडले व्यसन; 5.84 लाखांचा दंड वसूल
अमरावती, दि. 4 (जिमाका): जिल्ह्यामध्ये 2017 पासून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला (NTCP) मोठे यश मिळाले असून, या कार्यक्रमामुळे तब्बल 5 हजार 700 लोकांनी तंबाखूचे व्यसन सोडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा समन्वय समितीमार्फत हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमांतर्गत तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल 846 शाळांमध्ये 1 लाख 48 हजार 558 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून, जनजागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, तंबाखू सोडण्यास मदत करण्यासाठी जिल्हा रुग्णालय आणि तालुका स्तरावर एकूण 14 समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत, जिथे सन 2017 पासून आजपावेतो 90 हजार 328 लोकांना समुपदेशन करण्यात आले.
यासोबतच, कोटपा कायदा 2003 ची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे . सन 2017 पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 3 हजार 664 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून 5 लाख 84 हजार 416 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अन्न व औषध विभागाने 2018 पासून अवैध तंबाखूवर 212 कारवाया करत 5 कोटी 51 लाख रुपयांहून अधिक किमतीचा माल जप्त केला आहे.
या यशासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य, पोलीस, शिक्षण व अन्न व औषध विभागाच्या समन्वयाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment