शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या कर्जमंजुरी आदेशाचे वितरण
अमरावती, दि. 3 (जिमाका): शबरी आदिवासी विकास वित्त व विकास महामंडळ मर्यादित, शाखा कार्यालय, धारणी यांच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त योजनांच्या जाणिव जागृती पंधरवड्याच्या निमित्ताने आज दि. ३ नोव्हेंबर रोजी कर्जमंजुरी आदेश वितरण करण्यात आले.
आमदार तथा सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक केवलराम काळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्याहस्ते लाभार्थींना कर्जमंजुरीचे आदेश वितरीत करण्यात आले. यावेळी शबरी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी श्रीराम बेलसरे, रवि सावलकर, आदित्य आडे, दिलीप भिलावेकर, गणेश दहिकर, सुनिता कास्देकर, ताप्तीपुत्र शेतकरी उत्पादक कंपनी यांना कर्ज मंजुरीचे आदेश देण्यात आले. कार्यक्रमाला शाखा व्यवस्थापक गणेश साखरे, उपप्रादेशिक व्यवस्थापक एम. आर. वानखडे, प्रकल्प समन्वयक सचिन देशमुख, कार्यकारी लेखापाल सागर शेळके आदी उपस्थित होते.
00000
जिल्हा परिषदेचे अंतिम आरक्षण प्रसिद्ध; आगामी निवडणुकीसाठी 59 जागा निश्चित, 30 जागा महिलांसाठी आरक्षित
अमरावती, दि. 03 (जिमाका): अमरावती जिल्हा परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरिता अंतिम आरक्षणाची अधिसूचना आज, 3 नोव्हेंबर, 2025 रोजी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जाहीर केली. या अधिसूचनेअन्वये एकूण 59 निवडणूक विभागांसाठी आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. राज्य शासन, ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार प्रभाग रचना कार्यक्रमानुसार, 22 ऑगस्ट, २०२५ रोजी ५९ निवडणूक विभागांच्या भौगोलिक सीमा शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम मधील तरतुदी आणि राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, अमरावती जिल्हा परिषदेतील अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) आणि स्त्रियांसाठी (सर्व प्रवर्गातील महिलांसह) जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, आरक्षण सोडत काढून ती अंतिमरित्या प्रसिद्ध करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले होते. या कार्यक्रमानुसार, दि. 13 ऑक्टोबर, 2025 रोजी आरक्षित निवडणूक विभागांची जाहीर सोडत काढण्यात आली. त्यानंतर, दि. 14 ते 17 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत आरक्षण विभागनिहाय प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या. प्राप्त हरकती व सूचनांवरील सुनावणी आणि अभिप्रायाचा विचार करून, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी या आरक्षणाला मान्यता दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण अधिसूचित केले आहे. या अधिसूचनेनुसार, अमरावती जिल्हा परिषदेतील एकूण 59 जागांपैकी 30 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. प्रवर्गनिहाय आरक्षणाचा तपशील पाहिल्यास, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 11 जागा, त्यापैकी 6 महिलांसाठी; अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 12 जागा, त्यापैकी 6 महिलांकरिता; नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग साठी 15 जागा, त्यापैकी 8 महिलांसाठी; तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 21 जागा असून, त्यापैकी 10 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
000000
अनुसूचित जातीच्या युवकांसाठी बार्टी पुरस्कृत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
अर्ज सादर करण्याची मुदत 6 नोव्हेंबर
अमरावती, दि. 3 (जिमाका): डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या विशेष प्रोत्साहन योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांसाठी एक महिन्याच्या नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणादरम्यान उद्योजकीय विकास, उद्योगाची निवड, प्रकल्प अहवाल निर्मिती, मार्केटिंग, विविध शासकीय योजना, कर्जपुरवठा, डिजिटल मार्केटिंग आणि वित्तीय व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रशिक्षणासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 8 वी उत्तीर्ण असून, वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे आहे. पदवी, पदविका किंवा आयटीआय झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
परिचय मेळावा व मुलाखत दि. 6 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), टांक चेम्बर्स बिल्डिंग, गाडगेनगर, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे.
इच्छुक उमेदवारांनी दि. 6 नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत त्वरित नोंदणी करावी. मुलाखतीला येतांना तीन फोटो, मूळ शैक्षणिक कागदपत्रे, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड यांची झेरॉक्स प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा प्रकल्प अधिकारी अनिता गवई, तसेच प्रकल्प अधिकारी राजेश सुने (मो. 8788604226, 9168667154) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
.jpeg)


No comments:
Post a Comment