जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकता दिनाची शपथ
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन
अमरावती, दि. 31(जिमाका) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अतिरीक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी प्रतिमेस पुष्पहार करून अभिवादन केले. तसेच राष्ट्रीय संकल्प दिनानिमित्त इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतीय एकात्मतेसाठी निश्चियपूर्वक धोरण आखून त्यासाठी पावले उचलणाऱ्या सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय एकता दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, अधिक्षक निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
00000
जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे १९, २० नोव्हेंबरला आयोजन
*सहभागासाठी नोंदणी करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 31 (जिमाका) : युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन अमरावती येथे करण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे श्रीमती विमलाबाई देशमुख सभागृह येथे 19 ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीत महोत्सव घेण्यात येणार आहे.
युवा महोत्सव सांस्कृतिक आणि नवोपक्रम या संकल्पनेवर आधारित असणार आहे. यामध्ये श्री. शिवाजी विज्ञान उद्यान महाविद्यालयात नवोपक्रम ट्रॅक विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येईल.
या महोत्सवात युवक-युवतींना विविध स्पर्धांमध्ये भाग घेता येईल. सांस्कृतिक स्पर्धेतील लोकगीत आणि लोकनृत्यात 10 जणांना सहभाग घेता येईल. लोकनृत्यासाठी रेकॉर्ड केलेले संगीत वापरण्यास परवानगी नाही. कौशल्य विकास स्पर्धेत कथालेखन (मराठी, हिंदी व इंग्रजी, 1000 शब्दांत - सहभागी संख्या 3), चित्रकला (सहभागी संख्या 2), वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी - सहभागी संख्या 2) आणि कविता (सहभागी संख्या 3) सहभागी घेता येणार आहे.
नवोपक्रम ट्रॅक विज्ञान प्रदर्शनात युवक आणि विद्यार्थ्यांना त्यांचे अभिनव विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकल्प सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त विकसित भारत चॅलेंज ट्रॅक, डिझाईन फॉर भारत आणि हॅक ऑफ सोशल कॉज यावर आधारित उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी वयोमर्यादा ही 15 ते 29 वर्षांपर्यंत राहणार असून दि. 12 जानेवारी 2026 रोजी वयाची गणना करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर आहे.
स्पर्धक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विहित नमुन्यातील इंग्रजीमध्ये ओळखपत्र, आधारकार्ड आणि जन्म तारखेचा दाखला, ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला माय भारत पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तपोवन चौक विद्यापीठ समोर, मार्डी रोड, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत.
महोत्सवात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या युवक-युवतींची निवड विभागस्तरीय युवा महोत्सवासाठी आणि त्यानंतर राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी केली जाईल. युवा महोत्सवात युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
00000
कपास किसान ॲपवर सकाळी 10 पासून स्लॉट बुकींग
अमरावती, दि. 31 (जिमाका) : भारतीय कपास महामंडळाने कपास किसान मोबाईल ॲप सुरू केले आहे. या ॲपवर अकोला आणि औरंगाबाद शाखेसाठी स्लॉट बुकींग सुरू करण्यात आली आहे. ही स्लॉट बुकींग सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
कापूस किसान मोबाईल ॲपद्वारे नोंदणी आणि स्लॉट बुकींग प्रक्रियेस मदत करण्यासाठी लिंक तयार करण्यात आली आहे. यात ॲपमध्ये नोंदणी व स्लॉट बुकींगसाठी सविस्तर माहिती व पायऱ्या दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी youtube.com/@KapasKisan-
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कपास किसान ॲपवर तातडीने नोंदणी करावी. तसेच सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीस येण्यापूर्वी स्लॉट बुकींग करावी, असे आवाहन महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक यांनी केले आहे.
00000
सोमवारी जिल्हा लोकशाही दिन
अमरावती, दि. 31 (जिमाका) : जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अधीक्षक निलेश खटके यांनी केले आहे.
00000
15 नोव्हेंबरपासून नाफेडची मूग, उडीद, सोयाबीन खरेदी सुरू
* शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन
*जिल्ह्यातील 15 नोंदणी केंद्रांना मान्यता
अमरावती, दि. 31(जिमाका) : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मूग, उडीद आणि सोयाबीन पिकांची खरेदी 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी दि. 30 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.
शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत ही दि. ३१ डिसेंबर आहे. त्यानंतर १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. खरेदीचा कालावधी हा दि. १५ नोव्हेंबरपासून पुढील ९० दिवसांसाठी राहणार आहे. जिल्ह्यात १५ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात पणन महासंघाचे ८ आणि विदर्भ को-ऑपरेटिव्हच्या ७ उपअभिकर्ता संस्थांच्या खरेदी केंद्रांना शेतकरी नोंदणीसाठी मान्यता मिळाली आहे.
पणन महासंघाच्या उपअभिकर्ता संस्थांमध्ये अचलपूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संघ मर्यादित, अचलपूर, जयसिंग विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, पथ्रोट, दर्यापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, दर्यापुर, धारणी तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था मर्यादित, धारणी, नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, नेरपिंगळाई, चांदुर रेल्वे विकास खंड सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती मर्यादित चांदुर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती मर्यादित, नांदगाव खंडेश्वर, डॉ. बी. पी. देशमुख तिवसा तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती मर्यादित तिवसा यांचा समावेश आहे.
विदर्भ को-ऑपरेटिव्ह उपअभिकर्ता संस्थांमध्ये विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन अमरावती, अंजनगाव सुर्जी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार सहकारी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, चांदुर बाजार, शिंगणापूर विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, दर्यापूरला शिंगणापूर, दत्तापूर (धामणगाव) ॲग्रीकल्चर खरेदी विक्री संघ, धामणगाव रेल्वे, मोर्शी तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघ, मोर्शी, वरुड तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघ, वरुड यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांनी नजीकच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी कागदपत्रांसह अर्ज करावा. नोंदणीसाठी स्वतःचे आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, चालु हंगामातील पीक पेरा नमुद केलेला सातबारा, नमुना आठ-अ, सामाईक सातबारा क्षेत्र असल्यास सर्वांचे आधारकार्डसह संमती पत्र, अद्यावत बँक पासबुकची झेरॉक्स कागदपत्रे आवश्यक आहे.
हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीकरीता शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचे सोयाबीन असल्याची खात्री करावी. शासनाने ठरवलेल्या गुणवत्तेच्या मानकांमध्ये बसणारे सोयाबीन विक्रीसाठी आणावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाफेडच्या धान्य खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा पणन अधिकारी अजय बिसने यांनी केले आहे.
00000

No comments:
Post a Comment