Thursday, October 30, 2025

DIO NEWS AMRAVATI 30-10-2025







                 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमरावती विमानतळावर आगमन व स्वागत

अमरावती, दि. 30 (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी अमरावती विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. जिल्हा प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले.

यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, आमदार केवलराम काळे, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदी उपस्थित होते.

 

000000

























सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास साध्य

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती, दि. 30 (जिमाका): ज्या ठिकाणी चांगल्या बँक निर्माण होतात, त्या ठिकाणी आर्थिक सक्षमता वाढते. नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या बँक महत्त्वपूर्ण ठरतात. सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास साध्य होतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती येथील अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी 'अभिनंदन हाईट्स' या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या सुविधेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेवा-सुविधेबाबत त्यांनी बँकेचे अभिनंदन केले.

            सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवी राणा, आमदार उमेश उर्फ चंदु यावलकर, प्रवीण पोटे-पाटील, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथ्था, बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा, अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष ॲड. विजय बोथरा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री . फडणवीस म्हणाले, सहकारी बँकेमुळे तळागाळातील नागरिकांचा विकास होतो. शेतकरी व लघु उद्योगांना कर्ज त्वरित कर्ज व बचत सुविधा मिळते. ज्यांना व्यवसाय, उद्योग धंदा स्थापन करावयाचा आहे, त्यांना सुरुवातीला कर्ज लागते. त्यावेळी या बँकेंचे प्रोत्साहन व सहकार्य महत्त्वपूर्ण ठरते. राज्यात सहकारी बँकांनी कालानुरुप बदल केले आहेत. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांच्या स्पर्धेत त्या उत्तम स्थान टिकवून आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकाराचे महत्त्व जाणून 'सहकारिता मंत्रालय ' स्थापन केले आहे. यामुळे सहकार क्षेत्रात मोठे बदल होत आहे .यातून 'सहकारातून समृद्धीकडे' हा मार्ग जात आहे. गुणवत्तापूर्ण कार्य करून 'अभिनंदन  सहकारी बँक' सहकार क्षेत्रात चांगले योगदान देत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

            सहकारी बँक नागरिकांना आपली बँक वाटते. यातील अभिनंदन बँक ही सर्व मानकांवर  उत्तम कार्य करीत आहे. अभिनंदन बँकेला सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्य शासनामार्फत गौरविण्यात आले आहे. ग्राहकांनी या बँकेत ३७३.७७ कोटी जमा केले आहेत. बँकेने २५३.९७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. कर्जाची गुणवत्ता  नेट एन.पी.ए. हे शून्य टक्के आहे.  नेट एनपीए हे बँकेच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे लक्षण आहे. बँक योग्य आर्थिक नियोजन करून आपल्या ग्राहकांना तत्पर आणि अत्याधुनिक सेवा पुरवित असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा यांना शाल -श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. कॅम्प परिसरामध्ये अत्याधुनिक सेवा-सुविधांसह अभिनंदन बँकेची पाच मजली इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ २२ हजार चौ. फुट आहे.

            बँकेचे अध्यक्ष विजय बोथरा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन प्राजक्ता चौधरी यांनी तर आभार संचालक मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन गांग यांनी मानले.

 

00000

अॅग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अमरावती, दि. 30 (जिमाका) : माहे सप्टेंबर 2025मधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे अनुदान तात्काळ जमा करण्यात येत आहे. ही मदत बँक खात्यात जमा होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना 'अॅग्रीस्टॅक' नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कृषि, पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या शासन निर्णयानुसार, सर्व शेतकऱ्यांसाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण झाली आहे, अशांच्या बँक खात्यात सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ जमा केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी झालेली आहे, त्यांना ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही.

शेतकऱ्यांनी अद्याप अॅग्रीस्टॅक नोंदणी केलेली नसल्यास तात्काळ नोंदणी पूर्ण करावी. यासाठी शेतकऱ्यांनी आपला गाव नमुना नं., सातबारा उतारा आणि आधारकार्डसह आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा. केंद्रावर आपली अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी आणि फार्मर आयडी प्राप्त करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.

00000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमरावती विमानतळावरुन प्रस्थान

अमरावती, दि. 30 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज सायंकाळी 5.45 वाजता अमरावती विमानतळावरुन मुंबईकडे प्रस्थान केले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार होते.  

यावेळी आमदार संजय खोडके, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदी उपस्थित होते. यावेळी लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

00000




 जारीदासह परिसरातील ५० गावांसाठी खात्रिशीर विजेची सोय झाल्याने मेळघाटातील आदीवासी बांधव आणि महावितरणकडून मा. सरन्यायाधिश भुषण गवई यांचे आभार

अमरावती, दि. 30 : महावितरणच्या ३३ केव्ही जारीदा (चिखलदरा) उपकेंद्रामुळे मेळघाटातील दुर्गम भागाला खात्रिशीर वीज पुरवठ्याची सोय झाली आहे. भारताचे मा. सरन्यायाधिश भुषण गवई यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे वनविभागाची परवानगी लवकरात लवकर मिळाली. जारीदा उपकेंद्र सुरू करण्यातील मुख्य अडथळा दुर होवून उपकेंद्र कार्यान्वित झाल्याने परिसरातील आदीवासी बांधव तसेच महावितरणचे अधीक्षक अभियंता दिपक देवहाते, कार्यकारी अभियंता प्रदिप अंधारे यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश भुषण गवई यांचे दारापूर (दर्यापूर तालुका) येथे आभार मानले.

           मेळघाटातील अतिदुर्गम व आदीवासी बहुल वन क्षेत्रामधील महावितरणच्या जारीदा वितरण केंद्राअंतर्गत वीज पुरवठा होणाऱ्या ५० गावांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा करण्याकरीता  जिल्हा विकास निधीतील आदीवासी उपयोजनेअंतर्गत ९ कोटी ३३ लाख ९४ हजार खर्च करून जारीदा येथे नविन ३३ केव्ही उपकेंद्र उभारण्यात आले आहे.

       ५ एमव्हीए क्षमता असलेल्या या उपकेंद्राला ३३ केव्ही वाहिनीव्दारे २२० केव्ही कोयलारी (मध्य प्रदेश) उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यात येणार आहे. उपकेंद्राचे काम ऑक्टोबर २०२३ ला पुर्ण झाले, परंतु ३३ केव्ही वाहिनीचा काही भाग वन विभागाच्या जमिनीमध्ये येत असल्यामुळे वन्य जीव संरक्षण कायदा (WLCA) आणि वन संरक्षण कायदा (FCA) अंतर्गत प्रस्ताव मंजूरीकरीता वन खात्याकडे पाठविण्यात आले होते.

         मेळघाटातील दुर्गम अतीदुर्गम भागातील आदीवासी बहुल भागांना सुरळीत आणि दर्जेदार वीज पुरवठा करण्यासंदर्भात महावितरण आणि जिल्हा प्रशासन कायम आग्रही राहीले असून त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर ३३ केव्ही जारीदा उपकेंद्राला या अगोदर "राष्ट्रीय वन्य जीव बोर्डाच्या" स्टँडींग कमीटीच्या दिल्ली येथील बैठकीत १२ मार्च २०२५ आणि  "पर्यावरण मंत्रालय सल्लागार" समितीच्या दिल्ली येथील बैठकीत "वन संरक्षण कायदा" अंतर्गत १६ एप्रिल २०२५ ला ३३ केव्ही जारीदा उपकेंद्राच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली होती.

      यानंतर भारताचे मा. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश भुषण गवई यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे वन्य जीव विभागाने दिनांक १४ जुलै २०२५ ला काम सुरू करण्याची मान्यता प्रदान केली असून पर्यावरण मंत्रालयाकडून दिनांक ६ ऑगष्ट २०२५ ला अंतीम मान्यता मिळाली.

       त्यामुळे महावितरणच्या ३३ केव्ही जारीदा उपकेंद्र कार्यान्वित करण्यामधील मुख्य अडथळा दुर झाल्यानंतर उर्वरित कामे महावितरणकडून पुर्ण करून ३३ केव्ही जारीदा उपकेंद्र कार्यान्वित झाल्याने आदीवासी भागाला खात्रिशिर वीज पुरवठ्याची सोय झाली आहे.

000000
























स्मारक, संदर्भग्रंथाने रा. सू. गवईंच्या कार्याचा गौरव

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

* दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारकाचे उद्घाटन

अमरावती, दि. 30 (जिमाका) : रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे कार्य मार्गदर्शक ठरावेत, तसेच त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, यासाठी स्मारक आणि सर्वंकष वाटचालीचा दस्तावेज तयार करण्यासाठी संदर्भग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही प्रकल्पातून त्यांच्या कार्याचा गौरव राज्य शासनाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

अमरावती येथे राज्य शासनाने उभारलेल्या दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या स्मारकाचा उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. सरन्यायाधिश न्यायमुर्ती भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, ॲड. आशिष जयस्वाल, न्या. भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई, खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, आमदार किरण सरनाईक, संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, गजानन लवटे, चरणसिंग ठाकूर, चैनसूख संचेती, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, रा. सू. गवई यांच्या कार्यकर्तृत्वाचा सार्थ गौरव करणारे स्मारक उभे राहिले आहे. स्मारक उभे करताना याचा उपयोग विद्यापिठातील विद्यार्थ्यांना व्हावा, तसेच नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, असा दृष्टीकोन ठेवण्यात आला आहे. येत्या काळात याच परिसरात मोठे प्रेक्षागृह साकारल्या जाणार आहे. त्यामुळे हे स्मारक युवकांच्या जडणघडणीत निर्णायक भूमिका निभावेल. स्मारकामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेच्या उपयोगाने रा. सू. गवई यांची दृकश्राव्य भाषणे ऐकण्यास मिळणार आहेत. किऑक्स, डिजीटल वॉल, अशा अत्याधुनिक सोयीने स्मारक उभे राहिले आहे.

रा. सू. गवई यांचे जीवन हे अजातशत्रू होते. त्यांनी समाजाच्या समस्या सोडवून आपली एक विशिष्ट ओळख निर्माण केली. त्‍यामुळे त्यांची दीर्घ राजकीय वाटचाल महत्वाची ठरली आहे. राज्यपाल पद भूषविताना त्यांनी जैन आणि बौद्ध तिर्थस्थळे विकसित करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. तसेच शैक्षणिक सुधारणांवर भर दिला. भारतीय संविधानाप्रति त्यांना नितांत आदर होता. त्यांनी संविधान बदलाबाबत केलेले ‘नख आणि दाताने विरोध करतो’ हे वाक्य अजरामर आहे. प्रत्येक प्रश्न हा संविधानाच्या माध्यमातून सोडविला जावू शकतो, अशी त्यांची धारणा होती, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

न्यायमुर्ती गवई म्हणाले, रा. सू. गवई यांचे स्मारक पूर्ण होणे ही एक स्वप्नपूर्ती आहे. स्मारकाची पायाभरणी ते उद्घाटन ही कामे गतीने करण्यात आली आहे. या वास्तूचा लाभ नागरिकांना होणार आहे. विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील, हा दृष्टीकोन ठेवून स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारकात जीवनपट दर्शविताना कल्पकता ठेवली आहे. त्यामुळे स्मारक हे सर्वांग सुंदर झाले आहे. समाजाने दिलेल्या आशिर्वादाने वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्य घटकांचे प्रश्न सोडवून न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नुकताच झुडपी जंगलाचा प्रश्न सोडविण्यात आला असून याचा असंख्य शाळा, महाविद्यालय, तसेच नागरिकांचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलतांना म्हणाले, रा. सू. गवई यांचे व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून घडले आहे. त्यांच्या अंगी विनयशिलता, नम्रता आणि शालिनता होती. त्यांना भेटल्यानंतर ऊर्जा जाणवायची. त्यांनी चळवळ जीवंत ठेवण्याचे काम केले. त्याचमुळे त्यांची तळागाळातील नागरिकांशी नाळ जुळली. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर त्यांनी सभागृहात आवाज उठविलेला पाहिले आहे. दिक्षाभूमीसोबतच त्यांनी राज्यपाल म्हणून भूषविलेल्या राज्यातील तिर्थस्थळांचा विकास केला. तसेच शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल केला. सामाजिक न्यायाची योजना राबविण्यास सरकारला सूचना केल्यात. त्यामुळे त्यांचे स्मारक हे मानवतेच्या विचारांनी उभे राहिले असल्याचे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, येत्या कालावधीत रा. सू. गवई यांचे जन्मशताब्दी वर्ष येणार आहे. यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी केली. स्मारकाचे काम दर्जेदार झाले आहे. येत्या काळात स्मारकाच्या विस्तारासाठी निधी देण्यात येईल. पूर्णाकृती पुतळाही हुबेहुब साकारला गेला आहे. दादासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्वांशी उत्तम समन्वय साधला. आमदार, खासदार, राज्यपाल म्हणून त्यांची राजकीय वाटचाल दीर्घकाळ राहिली. उत्कृष्ट वक्तृवाने त्यांनी नेतृत्व आणि कर्तृत्व घडविले असल्याचे श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

स्मारकाच्या कामात विशेष लक्ष देऊन बांधकाम उत्कृष्टरित्या केल्याबद्दल जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याची सरन्यायाधिश भूषण गवई यांनी स्तुती केली. स्मारकाचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच यावेळी कंत्राटदार नितीन गभने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी, वास्तूविषारद प्रशांत सातपुते, मुर्तीकार प्रज्ञानंद मूर्ती, पुरूषोत्तम पाटणकर, उमेश रोडे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी स्मारकाच्या दर्शनी भागावरील दादासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी स्मारकाची पाहणी केली. कार्यक्रमात दादासाहेब गवई यांच्या जीवनावरील चित्रफित दाखविण्यात आली. तसेच स्मारकाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रास्ताविक केले. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले.

स्मारकाविषयी…

       केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल तसेच रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. (दादासाहेब) गवई यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या भव्य स्मारकामध्ये ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. (दादासाहेब) गवई यांचे जीवन कार्य दर्शवणारे स्मृतीसभागृह (म्युझियम) आणि अत्याधुनिक श्रोतगृह (ऑडिटोरियम) यांचा समावेश आहे. स्मारकाच्या दर्शनी भागावर दादासाहेबांचा १५ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच दादासाहेब गवई यांच्या जीवनाचा आणि कार्याचा प्रवास दर्शविणारे सभागृह तयार करण्यात आले आहे. या स्मारकासाठी 35 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

स्मारकाच्या दर्शनी भागात दादासाहेबांचा २.५ फूट उंचीचा ब्राँझचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांचा जीवनपट, दुर्मिळ छायाचित्रांसह, भिंतीवरील १६ डिजिटल पोस्टर्सच्या माध्यमातून प्रदर्शित केला जाणार आहे. अभ्यागतांना त्यांच्या कार्याबद्दल सखोल माहिती मिळावी यासाठी दृकश्राव्य कियॉस्क आणि व्हीडीओ वॉलची सोय उपलब्ध आहे. यासोबतच स्मारकात  स्मरणिका दालन देखील उभारण्यात आले आहे. तसेच स्मारकाच्या पहिल्या माळ्यावर २०० आसनी क्षमतेचे अद्ययावत श्रोतगृह तयार करण्यात आले आहे. याशिवाय श्रोतगृहाच्या तळ मजल्यावर अभ्यागतांसाठी आणि कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या सुविधा म्हणून एक सुसज्ज किचन आणि उपहारगृहाचा समावेश आहे.

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 12-11-2025

                                                         'अमृत दुर्गोत्सव 2025'ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान! शिवछत्रपतींना दिली ...