शुक्रवारी ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी शिबिर
अमरावती, दि. 22 (जिमाका) : ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी अंतर्गत मिळाली नसलेल्या आर्थिक मालमत्तांच्या निकालीकरणासाठी शुक्रवार, दि. 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता विशेष जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती येथील अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य इमारतीत हे शिबिर होणार आहे.
शिबिरात खातेदारांच्या दावा न केलेल्या ठेवींचे निराकरण करणे तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बँका या शिबिरात सहभागी होणार आहेत. ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी अंतर्गत सर्व नामनिर्देशित, पात्र लाभार्थ्यांनी या शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वित्तीय सेवा विभाग आणि राज्यस्तरीय बँकर्स समिती यांच्या निर्देशानुसार हे शिबिर होत आहे. या उपक्रमामुळे खातेदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवी परत मिळवण्याची संधी मिळणार आहे. 10 वर्षांहून अधिक काळ ज्या ठेवींवर दावा केलेला नाही, अशा ठेवी 'ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधी'मध्ये हस्तांतरित करण्यात येतात. खातेदारांना त्या परत मिळवण्याचा पूर्ण अधिकार असल्यामुळे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी केले आहे.
00000
आय.आय.एम.सी. 2027 चे शैक्षणिक सत्र बडनेराच्या नवीन इमारतीत सुरू करण्याचे निर्देश
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव -संजय जाजू यांचे निर्देश
नागपूर आकाशवाणी येथे सचिव जाजू यांनी घेतला विविध कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा
अमरावती /नागपूर 22 ऑक्टोबर 2025
जनसंचार आणि पत्रकारिता क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे भारतीय जनसंचार संस्थान, - आयआयएमसी अमरावतीची बडनेरा येथील प्रस्तावित इमारत 2027 पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज दिले. अमरावती महानगर पालिका आयुक्तांच्या निवास स्थानी उच्चस्तरीय आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती.
यावेळी महानगर पालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, केंद्रीय लोक निर्माण विभागाचे मुख्य अभियंता डी. रायचौधरी,आय.आय.एम.सी. स्पेशल प्रोजेक्ट डायरेक्टर रश्मी रोजा ,
भारतीय जनसंचार संस्थेचे क्षेत्रीय निदेशक डॉ. राजेश सिंह कुशवाहा, विशेष कार्य अधिकारी डॉ . मनोज कुमार सोनोने संजय बसेडिया, अभिजीत कावरे, विष्णू राठोड यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनसंचार संस्थान, अमरावतीचे प्रस्तावित इमारतीचे बांधकाम करताना प्रत्येक टप्प्याची आखणी करा. पहिला टप्पा दर्जेदाररित्या पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्याची निर्मिती करा. बदलत्या हवामानात बांधकाम बंद असतांना इमारतीला लागणारे दरवाजे, खिडक्या व इतर फर्निचरची गुणवत्ता तपासण्याचे काम करून निश्चित वेळेचा सदुपयोग करा, असे निर्देश देत 2027 चे शैक्षणिक सत्र बडनेराच्या प्रस्तावित नवीन व अत्याधुनिक इमारतीत सुरू करा, असे जाजू यावेळी म्हणाले.
केंद्र शासनाच्या वतीने आयआयएमसीच्या नवीन इमारती करिता बडनेरा येथे देण्यात आलेल्या 15 एकर जागेची पाहणी यावेळी सचिव संजय जाजू यांनी केली. या 15 एकर जागेवर शैक्षणिक वर्ग, प्रशासकीय इमारत, क्रीडा संकुल, विद्यार्थी व कर्मचारी निवासस्थानाची आखणी व त्या संबंधित तांत्रिक बाबींची माहिती त्यांनी घेतली. या बैठकीला आयआयएमसी अमरावतीचे कर्मचारीही उपस्थित होते .
दरम्यान अमरावती दौऱ्यापूर्वी सचिव संजय जाजू यांनी आज नागपूरच्या आकाशवाणी केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी नागपूरच्या आकाशवाणी, दूरदर्शनच्या तसंच पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला. आकाशवाणीच्या माध्यमातून जाहिरात संकलनाच्या कार्याला गती देण्याचे निर्देश त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिले . याप्रसंगी आकाशवाणी नागपूरच्या अभियांत्रिकी कार्यक्रम तसेच वृत्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच पत्र सूचना कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment