दिवंगत नेते रा. सू. गवई स्मारकाचे गुरुवारी उद्घाटन
*मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती
अमरावती, दि. २८ (जिमाका) : दिवंगत नेते रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या भव्य स्मारकाचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. हा सोहळा दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारक, अमरावती मार्डी रस्ता, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मागे, अमरावती येथे होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या शुभहस्ते स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. हा क्षण अमरावतीसाठी विशेष गौरवाचा ठरणार आहे.
स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नगरविकास, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास, औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत.
सोहळ्यासाठी खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, अमर काळे, आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, गजानन लवटे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र उपस्थित राहणार आहेत.
दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारकाविषयी
केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल तसेच रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. (दादासाहेब) गवई यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या भव्य स्मारकामध्ये ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. (दादासाहेब) गवई यांचे जीवन कार्य दर्शवणारे स्मृतीसभागृह (म्युझियम) आणि अत्याधुनिक श्रोतगृह (ऑडिटोरियम) यांचा समावेश आहे. स्मारकाच्या दर्शनी भागावर दादासाहेबांचा १५ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच दादासाहेब गवई यांच्या जीवनाचा आणि कार्याचा प्रवास दर्शविणारे सभागृह तयार करण्यात आले आहे. स्मारकाच्या दर्शनी भागात दादासाहेबांचा २.५ फूट उंचीचा ब्राँझचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांचा जीवनपट, दुर्मिळ छायाचित्रांसह, भिंतीवरील १६ डिजिटल पोस्टर्सच्या माध्यमातून प्रदर्शित केला जाणार आहे. अभ्यागतांना त्यांच्या कार्याबद्दल सखोल माहिती मिळावी यासाठी दृकश्राव्य कियॉस्क आणि व्हीडीओ वॉलची सोय उपलब्ध आहे. यासोबतच स्मारकात स्मरणिका दालन देखील उभारण्यात आले आहे. तसेच स्मारकाच्या पहिल्या माळ्यावर २०० आसनी क्षमतेचे अद्ययावत श्रोतगृह तयार करण्यात आले आहे. याशिवाय श्रोतगृहाच्या तळ मजल्यावर अभ्यागतांसाठी आणि कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या सुविधा म्हणून एक सुसज्ज किचन आणि उपहारगृहाचा समावेश आहे.
00000
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचा दौरा
अमरावती, दि. 28 : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई हे बुधवार, दि. 29 ऑक्टोबर रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार, न्या. गवई यांचे बुधवार, दि. 29 ऑक्टोबर रोजी अमरावती येथे आगमन होणार आहे. गुरूवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता दारापूर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता अमरावती येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
00000
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिनंदन बँक इमारतीचे गुरुवारी लोकार्पण
अमरावती, दि. 28 (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरूवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी अभिनंदन बँक इमारतीचे गुरुवारी लोकार्पण होणार आहे.
सहकार क्षेत्रातील संस्था असलेल्या अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या स्व:मालकीच्या मुख्य कार्यालय इमारत ‘अभिनंदन हाईट्स’चा लोकार्पण सोहळा गुरुवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता श्री ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यासह आमदार सुलभा खोडके, रवी राणा उपस्थित राहणार आहेत. बँकेचे अध्यक्ष ॲड. विजय बोथरा अध्यक्षस्थानी राहतील. या सोहळ्याला भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था, पगारिया ग्रुपचे अध्यक्ष उज्ज्वल पगारिया उपस्थित राहतील.
00000
निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला
सादर करणे बंधनकारक
अमरावती, दि. २८ (जिमाका) : जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेत असलेल्या सर्व महाराष्ट्र राज्य शासकीय सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आपला सन २०२५ चा हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन वरीष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी केले आहे.
जे निवृत्तीवेतनधारक या मुदतीत हयातीचा दाखला सादर करणार नाहीत, त्यांचे डिसेंबर २०२५ पासूनचे निवृत्तीवेतन स्थगित करण्यात येईल. निवृत्तीवेतनधारकांची अद्याक्षरनिहाय अद्ययावत यादी त्यांच्या संबंधित बँक शाखांकडे पाठवण्यात आली आहे. निवृत्तीवेतनधारकांना दाखला सादर करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पहिल्या पर्यायानुसार, निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून पेन्शन घेतात, त्या शाखेत नमूद कालावधीत प्रत्यक्ष हजर राहून, यादीतील त्यांच्या नावासमोर शाखा व्यवस्थापकासमक्ष स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा करू शकतात. यावेळी पुनर्विवाह किंवा पुनर्नियुक्ती झाली असल्यास, ती माहिती नोंदवणे अनिवार्य आहे.
दुसरा पर्याय म्हणून, निवृत्तीवेतनधारक http://jeevanpraman.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून 'जीवन प्रमाण' ( डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ) देखील सादर करू शकतात. ज्यांनी यादीवर स्वाक्षरी केली नाही किंवा डिजिटल प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यांचे पेन्शन थांबवण्याची कार्यवाही केली जाईल, त्यामुळे सर्वांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
• १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन
• तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश
मुंबई दि. २८ : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई वातावरण सप्ताह - ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेच्या संकल्पनेतून साकारला जात असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाची घोषणा केली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, विभागाच्या सचिव जयश्री भोज, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी आदी उपस्थित होते. यावेळी ‘मुंबई क्लायमेट वीक’ च्या लोगोचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
विकसनशील देशांतील वातावरणीय बदल, अन्न व ऊर्जा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून विकास आणि पर्यावरणीय कृती यांच्यात संतुलन साधण्यासाठी तो प्रभावी भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई क्लायमेट वीकचा मुख्य कार्यक्रम १७ ते १९ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे पार पडेल. त्याचबरोबर या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी शहरभर विविध प्रदर्शने, कार्यशाळा, चित्रपट, कला, क्रीडा, आरोग्य आणि अध्यात्म यांच्याशी निगडीत उपक्रम, आणि क्लायमेट फूड फेस्टिव्हल सारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या परिषदेत ग्लोबल साऊथमधील ३० पेक्षा अधिक देशांमधील प्रतिनिधी सहभागी होणार असून यामध्ये व्यवहार्य असा हवामान बदल कृती कार्यक्रम तयार करण्यात येईल. विशेष म्हणजे हा कार्यक्रम राज्यांचे मुख्यमंत्री, विविध शहरांचे प्रतिनिधी, उद्योग, सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि युवक यांच्या सहभागातून तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते मुंबई क्लायमेट विकच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच या उपक्रमाची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई हवामान सप्ताह कृतीसह नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृढनिश्चयाचे प्रदर्शन करतो. माननीय पंतप्रधानांनी ठरवलेल्या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन, मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक दक्षिणेसाठी न्याय्य, नाविन्यपूर्ण, चांगल्या निधीसह हवामान भविष्य घडवण्यास मदत करण्यास तयार आहेत.
ग्लोबल साउथमधील वातावरणीय कृती आणि सहकार्य या क्षेत्रामधील भारताचे नेतृत्व सिद्ध करणारे मुंबई क्लायमेट वीक हे मोठे व्यासपीठ ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईत पहिल्यांदाच "मुंबई क्लायमेट वीक" कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. आता कृती करण्याची वेळ आली आहे.
यासाठी आपण समाजातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक व्यवसायाला आणि जीवनाच्या सर्व स्तरांना हवामान बदलाच्या परिणामांविरुद्ध मोहिमेत सहभागी व्हावे लागणार आहे. तसेच त्यांना कृतींद्वारे बदल कसे कमी करायचे हे प्रत्यक्षात सांगावे लागणार आहे.
"मुंबई क्लायमेट वीक" कार्यक्रम आयोजित केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र आणि मुंबईसाठी बेंचमार्क देखील निश्चित करावे लागतील, हवामान बदलाच्या क्षेत्रात कृती करण्यासाठी काही ध्येये निश्चित करावी लागतील. त्यासाठी आजपासून कृती सुरू करूया असेही ते म्हणाले.
तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्ते मुंबई क्लायमेट वीकच्या व्यासपीठावर एकत्र येऊन वातावरणीय बदलावरच्या सर्वंकष आणि व्यवहार्य उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करतील. हा उपक्रम भारत आणि विकसनशील राष्ट्रांचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचविणारा ठरेल, असेही ते म्हणाले.
मुंबई क्लायमेट वीकचा भर अन्न प्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी सक्षमता या तीन प्रमुख विषयांवर असेल. न्याय, नवोन्मेष आणि वित्तीय दृष्टीकोनातून हे विषय सखोलपणे मांडले जातील.
‘प्रोजेक्ट मुंबई’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती देताना सांगितले की, “मुंबई क्लायमेट वीक हा महाराष्ट्र आणि भारतासाठी एक ऐतिहासिक टप्पा असणार आहे. वातावरणीय बदलाला तोंड देण्यासाठी लोकसहभागावर आधारित असे शाश्वत आणि समावेशक उपाय या परिषदेतील मंथनातून तयार होतील.”
या उपक्रमाचे नॉलेज पार्टनर मॉनिटर डिलॉईट असणार असून क्लायमेट ग्रुप, इंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्ह, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिस्ट्यूट (इंडिया), एव्हरसोर्स, एचटी पारेख फाउंडेशन, युनिसेफ, शक्ती फाउंडेशन, रेनमॅटर फाउंडेशन, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि राष्ट्रीय सेवा योजना यासारख्या संस्था यात सहभागी होणार आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयातील यांचे अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार कौस्तुभ धवसे, प्रोजेक्ट मुंबईचे सल्लागार मंडळ सदस्य रिधम देसाई, जलज दाणी आदी यावेळी उपस्थित होते.
0000
शिक्षक मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 नोव्हेंबरपर्यंत
मतदार नोंदणीसाठी अर्जाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध
अमरावती , दि. 28 ( जिमाका ) :भारत निवडणूक आयोगाने दि. 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभागातील शिक्षक मतदार मतदारसंघात नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. मतदार यादी कार्यक्रमानुसार नमुना क्रमांक 19 व्दारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 6 नोव्हेंबर, 2025 असा आहे.
त्याचप्रमाणे शिक्षक मतदार संघासाठी नमूना क्रमांक-19 मधील अर्ज भरण्याची सुविधा आता ऑनलाईन उपलब्ध असून त्यासाठी https://mahaelection.gov.in/
त्याप्रमाणे शिक्षक मतदार संघासाठी विहित नमूना क्रमांक-19 मधील अर्ज आवश्यक पुराव्यांसह संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन दाखल करण्याची कार्यपध्दतीही मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार दिनांक 6 नोव्हेंबर, 2025 रोजी पर्यंत सुरु आहे.
उपरोक्त सुविधेबाबतची नोंद सर्व संबंधितांनी घ्यावी व पात्र शिक्षकांनी आपले अर्ज अंतिम दिनांकापर्यंत सादर करावे, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ गोविंद दानेज यांनी केले आहे.
**
दक्षता जनजागृती सप्ताहाला भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथेने सुरवात
अमरावती, दि. 28 : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दि. २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षता जनजागृती सप्ताहाला भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथेने सुरवात करण्यात आली.
सदर सप्ताह दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दि. ३१ ऑक्टोबर रोजीच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात येतो. या वर्षीच्या दक्षता जनजागृती सप्ताहाची संकल्पना ‘दक्षता आपली सामायिक जबाबदारी’ या घोषवाक्यावर आधारीत राहणार आहे. सप्ताहाची सुरुवात सोमवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन करण्यात आली. यावेळी सप्ताहानिमित्त राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाला लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक सुनिल किनगे आदी उपस्थित होते. जनजागृती उपक्रमात अमरावती शहरातील बसस्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भिंतीपत्रके लावण्यात आली. तसेच नागरिकांना पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. दक्षता जनजागृती सप्ताहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्टाचार निर्मूलन संबंधाने जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
भ्रष्टाचारासंबंधाने काहीही तक्रार असल्यास भ्रष्टाचार विरोधी तक्रारीसाठी फोन क्रमांक ०७२१/२५५३०५५ किंवा ०७२१/२६६४९०२, टोल फ्री क्रमांक : १०६४, व्हॉट्सॲप क्रमांक: ७५१७५७१०६४ तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, ललीत सेंटर, परांजपे कॉलनी, कॅम्प, अमरावती येथे प्रत्यक्ष येऊन भेटावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.
00000
निमंत्रण
दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारकाचा उद्घाटन सोहळा दि. ३०.१०.२०२५ रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सर्व पत्रकार बांधवांनी दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारक, अमरावती-मार्डी रस्ता, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मागे, अमरावती येथे उपस्थित राहावे, ही विनंती.
आपला,
गजानन कोटुरवार,
जिल्हा माहिती अधिकारी,
अमरावती.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

No comments:
Post a Comment