Thursday, June 27, 2024

जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी

 जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी

             अमरावती, दि. 27 (जिमाका):  जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार जुलै महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दि. 1 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.

00000

Wednesday, June 26, 2024

सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रम; समता दिंडीला प्रादेशिक उपायुक्त यांनी दाखवली हिरवी झेंडी

 











सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रम;

समता दिंडीला प्रादेशिक उपायुक्त यांनी दाखवली हिरवी झेंडी

 

         अमरावती, दि.26 (जिमाका):  राजर्षि शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त समाजकल्याण कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून काढण्यात आलेल्या समता दिंडीला प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केली.

 

            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन समता दिंडी इर्विन चौकपासून रवाना केली. या दिंडीत प्रादेशिक विभाग व समाजकल्याण कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी व स्वयंसेवी संस्था सहभागी झाले होते. समता दिंडी इर्विन चौक-दुर्गावती चौक-मालटेकडी मार्गे सामाजिक न्याय भवन येथे दिंडीचा समारोप करण्यात आला. समता दिंडीमध्ये सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे फलक दर्शविणारा रथ नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच 26  जुन हा आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन असल्याने समाजकल्याण कार्यालय व जिल्हा परिषद मार्फत व्यसनमुक्ती व अंमली पदार्थ सेवन विरोधी जनजागृती करण्यात आली.

 

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व लाभार्थ्यांना अनुदान वाटप

 

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मुख्य कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार शाळेतून प्रथम आलेल्या विद्यार्थांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले.

 

           कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.दिलीप काळे यांनी संबोधित करतांना राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी समाजाच्या दुर्बल घटकास मुख्य प्रवाहात आणण्याकरीता स्वत: कृतीतुन वेगवेगळया पद्धतीने कार्य करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्याकाळी मुलींच्या शिक्षणावर भर देण्याकरीता वसतिगृहांची निर्मीती करून शिक्षणाचे महत्व पटवुन दिले व शिक्षणाकरीता सक्ती म्हणुन मुलांना शाळेत न पाठविणाऱ्या पालकांना दंड आकारला. यावरुन छत्रपती शाहु महाराज शिक्षणा प्रती किती सजग होते याची कल्पना येते. तसेच कार्यकर्ते समाज सुधारक असल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी नमुद केले.

 

            सहायक आयुक्त माया केदार यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच उपस्थित मान्यवरांनी समायोचित मार्गदर्शन केले. यावेळी समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, सहायक आयुक्त माया केदार, समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, समाज भूषण पुरस्कार पंकज मेश्राम, सहाय्यक संचालक लेखा दिनेश मेटकर, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.शिवाजी तुपेकर, समाज कल्याण अधिकारी सरिता बोबडे आदी उपस्थित होते.

 

          कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहु महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले या महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलित करुन झाली. कार्यक्रमास मोठ्या संख्येन सामाजिक न्याय भवनातील अधिकारी, कर्मचारी, सर्व महामंडळातील कर्मचारी तसेच बाहयस्त्रोत यंत्रणेतील कर्मचारी व विविध योजनांचे लाभार्थी व अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय वानखडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले तर आभार प्रदर्शन सरिता बोबडे यांनी केले.

00000

शिष्यवृत्ती पुन्हा रिव्हर्ट करण्यासाठी 30 जून पर्यंत मुदत

 

शिष्यवृत्ती पुन्हा रिव्हर्ट करण्यासाठी 30 जून पर्यंत मुदत

 

            अमरावती, दि. 26 (जिमाका): महाडीबीटी  पोर्टलवर ‘राई टू गिव्ह अप’ चा पर्याय निवडल्याने शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम पुन्हा मिळण्याची संधी मिळणार आहे. रिव्हर्ट करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार राई टू गिव्ह अप हा पर्याय चुकीने निवडलेल्या विद्यार्थ्यांनी 30 जून 2024 पर्यंत शिष्यवृत्ती पुन्हा रिव्हर्ट करुन घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी केले आहे.

 

            राज्य शासनाने शिष्यवृत्तीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना यावर्षी प्रथमच राइट टू गिव्हअपचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. स्वच्छेने शिष्यवृत्तीची रक्कम अस्वीकार करण्यासाठी हा पर्याय दिला होता. केंद्र शासनाच्या गॅस सिलिंडरच्या अनुदानासंदर्भात अशा स्वरुपाची योजना यापूर्वी राबविण्यात आली आहे. या धर्तीवर शिष्यवृत्ती संदर्भात पर्याय उपलब्ध करून दिला होता. मात्र काही विद्यार्थ्यांनी चुकून या पर्यायाची निवड केली. त्यामुळे त्यांच्या शिष्यवृत्तीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. यासंदर्भात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून तसेच राज्यभरातील लोकप्रतिनिधींकडून शासनास करण्यात आली होती. यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने दखल घेत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त करून घेण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थीं वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

            राइट टू गिव्हअप पर्याय निवडून शिष्यवृत्तीच्या रद्द झालेल्या अर्जाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रीया निर्धारित मुदतीत करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अनावधानाने किंवा नजरचुकीने हा पर्याय निवडल्याने शिष्यवृत्तीचे अर्ज रद्यबातल झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा अर्ज रिव्हर्ट बॅक करायचा आहे. यासाठी 30 जून पर्यंत मुदत दिली आहे. अशा विद्यार्थ्यांने महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधून प्राचार्य लॉगइनमधून अर्ज रिव्हर्टबॅक करून घ्यायचा आहे. ही प्रक्रीया पुर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल. रिव्हर्ट बॅक झालेला अर्ज याच मुदतीत विद्यार्थ्यांच्या लॉगिन मधून ऑनलाईन फेर सादर करणे आवश्यक राहील. यासंदर्भात काही अडचण उद्भवल्यास संबंधितांनी जिल्ह्याचे सहायक आयक्त समाजकल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधावा.

                                                                       0000000

रहाटगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरु

 

रहाटगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरु

 

         अमरावती, दि. 26 (जिमाका):  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रहाटगाव येथे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज ऑनलाईन सादर करावा, असे आवाहन रहाटगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय महाजन यांनी केले आहे.

 

           दहावी, बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांनुसार आणि पसंती क्रमानुसारच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश देणे सुरु आहे.  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील अभ्यासक्रम हे सर्वात जास्त रोजगार आणि स्वयं रोजगाराच्या दृष्टीने संधी उपलब्ध करून देण्यास उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे आय टी आय मध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारानी http://admission.dvet.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज करावा. संकेतस्थळावर प्रवेशासंबंधी माहिती पुस्तिका उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरण्याची व मार्गदर्शनाची निशुल्क सुविधा रहाटगाव आयटीआय येथे करण्यात आली आहे.

 

              शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रहाटगाव येथे सन २०२४ -२५ सत्राकरिता इलेक्ट्रिशियन, फिटर, मोटर मेकॅनिक, कॉम्पुटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, फूड प्रोडक्शन जनरल व्यवसायाचा समावेश आहे. या सर्व व्यवसायासाठी शैक्षणिक अहर्ता दहावी उत्तीर्ण अशी आहे.

रहाटगाव संस्थेमध्ये प्रवेश सर्व उमेदवारासाठी खुले असून अनु. जाती व नवबौद्धाच्या मुलामुलीकरिता ८० टक्के व सामान्य प्रवर्गासाठी २० टक्के आरक्षणाची तरतूद आहे. प्रवेश झालेल्या उमेदवारांना वर्षभर कुशल प्रशिक्षण देणारे निर्देशक वर्ग, भव्य वर्कशॉप, अत्याधुनिक संगणक लॅब, प्रॅक्टिकलसाठी सुसज्ज लॅब, वाय फायसुविधा, वाचनालय, वसतिगृह व्यायामासाठी ओपन जिम आदीची व्यवस्था संस्थेत उपलब्ध आहे. या संस्थेत यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी दरवर्षी विविध नामांकित कंपन्याकडून जॉब प्लेसमेंटची व्यवस्था करण्यात येते. या संस्थेतील अनेक माजी प्रशिक्षणार्थी विविध कंपन्यामध्ये कार्यरत आहेत. तर काही प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःचा उद्योग उभारून बेरोजगार हातांना रोजगार देण्याचे काम करित आहे.

          या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रवेशासाठी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य संजय महाजन(८७६६९७६४७१) व गटनिदेशक एस.आर. सुखदेवे (७७०९८०९८५२) यांनी केले आहे.

00000

प्रवासी वाहतूक परवाना ऑटोरिक्षा चालकांना बंधनकार; 31 जुलै नोंदणी करा

 

प्रवासी वाहतूक परवाना ऑटोरिक्षा चालकांना बंधनकार; 31 जुलै नोंदणी करा

 

       अमरावती, दि. 26 (जिमाका): मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 66 अन्वये वैध परवाना असल्याखेरीज ऑटोरिक्षा प्रवाशी वाहनांना सार्वजनिक वाहनांना वापर करता येत नाही. ज्या ऑटोरिक्षा चालक, मालक यांनी अद्यापपर्यंत प्रवाशी वाहतुक परवाना प्राप्त करून घेतलेला नाही, अशा ऑटोरिक्षा चालकांनी दि. 31 जुलै, 2024 पर्यंत परवाना प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.

           

           ऑटोरिक्षा धारकाला ऑटोरिक्षा परवाना प्राप्त करूनच सार्वजनिक ठिकाणी प्रवाशी वाहतुक करणे अनिवार्य आहे. त्यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 चे नियम 75 अन्वये परवाना शुल्क 10 हजार रूपये भरणा करणे आवश्यक आहे. ज्या ऑटोरिक्षा चालक, मालकांनी अद्यापपर्यंत प्रवाशी वाहतुक परवाना घेतला नसल्यास त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, अमरावती येथे कार्यालयीन दिवशी विहित शुल्काचा भरणा करून प्रवाशी वाहतुक परवाना प्राप्त करून घ्यावा.

                                                             000000

शेतकरी बांधवांच्या शंका निरसनासाठी कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक जाहिर

 

शेतकरी बांधवांच्या शंका निरसनासाठी कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक जाहिर

         अमरावती, दि. 26 (जिमाका): कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित शंका व प्रश्नांचे समर्पक निरसन व मार्गदर्शन करण्यासाठी टोल फ्री कक्ष सुरू केला आहे. टोल फ्री कक्षामध्ये संपर्कासाठी दुरध्वनी  टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 व भ्रवणध्वनी टोल फ्री क्रमांक 9822446655 उपलब्ध करून दिला आहे.

 

          दुरध्वनी टोल फ्री क्रमांक संपूर्ण वर्षभर सुरू राहिल. खते बियाणे कीटकनाशके यांची खरीप रब्बी हंगामातील किंमत उपलब्धता गुणवत्ता बाबत शंका निरसन करता येईल. कृषी विभागाचे निगडित मृदा संधारण विस्तार सांख्यिकी प्रक्रिया व नियोजन, फलोत्पादन, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी यंत्रीकिकरण इत्यादी संबंधित शंकांचे निरसन तसेच संबंधित जिल्ह्यांचे कृषी विभागाचे संपर्क क्रमांक कृषी विद्यापीठांचे संपर्क क्रमांक आवश्यकता असल्यास दिले जातात.

 

            भ्रमणध्वनी टोल फ्री क्रमांकावर केवळ संदेश पाठवण्यासाठी वापरता येईल. खरीप हंगाम व रब्बी हंगामात कृषी निविष्ठाची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी  व लिंकिंगबाबतच्या तक्रारी नोंदवताना शेतकऱ्यांनी आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील व्हाट्सअप वर पाठवणेसाठी उपलब्ध आहे.

 

            टोल फ्री क्रमांक कार्यालयीन कामाच्या दिवशी सकाळी 8:00 ते संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत सुरु राहील. शेतकरी बांधवांनी सदर टोल फ्री  क्रमांकावर संपर्क साधून व मार्गदर्शन घेवून आपल्या शंकांचे निरसन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

 

 

 

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

          अमरावती, दि.26 (जिमाका) : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसिलदार विजय लोखंडे यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

000000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...