Thursday, July 4, 2024

सहकारी व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सूरू; अर्ज करण्याचे आवाहन

 

सहकारी व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सूरू; अर्ज करण्याचे आवाहन

           अमरावती, दि. 04 (जिमाका):  सहकारी संस्थांमध्ये काम करण्यासाठी सहकारी व्यवस्थापन पदविका अनिवार्य केले आहे. या अभ्यासक्रमासाठी भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र, अमरावती येथे दि. 1 जुलै ते 31 डिसेंबर 2024 या मुदतीसाठी प्रवेश देणे सुरू आहे. इच्छुकांनी प्रशिक्षण केंद्रात संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यांनी केले आहे.

 

         सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामकाज सांभाळून हा अभ्यासक्रम दुरूस्थ शिक्षण पध्दतीने पुर्ण करता यावा. तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थामध्ये या पदविका अभ्यासक्रमामुळे नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने 13 सहकार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातुन हा अभ्यासक्रम पोस्टल पध्दतीने सुरू केला आहे. या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुर्ण अंतर्गत भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे दि. 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024 या मुदतीसाठी प्रवेश देणे सुरू आहे. अधिक माहितीसाठी 9881047668 या क्रमांक संपर्क साधावा.

00000

Wednesday, July 3, 2024

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

               अमरावती, दि. 03 (जिमाका): पोलिस ठाणे माहूली जहॉगीर, अमरावती (ग्रामीण) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह ग्राम कापूस तळणी शेत शिवार नरेश गणवीर यांच्या शेतामधील विहीरीत आढळला. मृतकाचे अंदाजे वय 42 ते 45 वर्षे असून मृतकाचा बांधा मजबूत, रंग गोरा, उंची 5 फुट 5 इंच, डोक्याचे केस नसलेला, दाढी काळी पाढंरी वाढलेली, अंगामध्ये हिरव्या रंगाची हाफ टि शर्ट, गर्द आकाशी कलरचा फुलपॅन्ट, घातलेला आहे.

           मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यासाठी गजानन वसंत वाघ  यांचा भ्रमणध्वनी क्रं. 8788529845 किंवा नरेंद्र वानखडे यांचा भ्रमणध्वनी क्रं. 9767633032, क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन माहुली जहॉगीर, अमरावती (ग्रामीण) यांनी केले आहे.

                                                                        00000

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

 


'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

 

योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी

 

जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे

 

दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत

                   

          मुंबई, दि. 3 : 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

 

            त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे किंवा फॉर्म भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

 

                     योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देणे तसेच त्यानंतर योजनेचा फॉर्म भरणे इत्यादी संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात काल विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलदगतीने होईल यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

 

            माता-भगिनींचे आयुष्य बदलवून टाकणाऱ्या विविध योजना राज्य शासनाने आणल्या आहेत. मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयही लगेचच काढण्यात आला. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही योजना म्हणजे माता-भगिनींना माहेरचा आहेर आहे. नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने चोख नियोजन करावे, लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

                     

000

Tuesday, July 2, 2024

गोदाम बांधकाम व बीज प्रक्रीया संच अनुदानासाठी शेतकरी उत्पादक संघाकडून 31 जुलैपर्यंत अर्ज मागविले

 

गोदाम बांधकाम व बीज प्रक्रीया संच अनुदानासाठी शेतकरी उत्पादक संघाकडून 31 जुलैपर्यंत अर्ज मागविले

 

        अमरावती, दि. 02 (जिमाका): कृषि विभागामार्फत अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानातंर्गत  गोदाम बांधकाम व बीज प्रक्रीया संचाकरिता शासनामार्फत अनुदान दिल्या जाते. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी बंधुंनी दि. 31 जुलै 2024 पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

 

            जिल्ह्यासाठी अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान गळीतधान्य सन 2024-25 साठी शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी(एफपीओ/एफपीसी) करीता गोदाम बांधकामासाठी एकूण सहा लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लक्षांकाच्या अधिन राहुन शेतकरी उत्पादक संघाकडून विहीत नमुन्यातील प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. अन्नधान्य पिकाच्या उत्पादनाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी व मुल्य वृद्धीसाठी गोदाम सुविधा आवश्यक आहे. ज्या ठिकाणी अन्नधान्य पिके व तेलबिया पिके घेतली जातात. तथापि गोदामाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी गोदाम बांधकामासाठी अनुदान देण्यात येतो. या योजेनेअंतर्गत कमाल 205 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लक्ष 50 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय आहे. तसेच अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान कडधान्य योजनेअंतर्गत उत्पादित बियाण्यावर प्रक्रीया करुन दर्जेदार बियाणे उपलब्ध करण्याच्या उद्देशाने शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीसाठी बीज प्रक्रीया संचासाठी अनुदान दिल्या जाते. बीज प्रक्रीया प्रकल्प उभारण्यासाठी (यंत्रसामुग्री व बांधकामासाठी) प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 लक्ष रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय आहे.

 

           गोदाम बांधकाम व बीज प्रक्रीया संच हा दोन्ही बाबी बँक कर्जाशी निगडीत असुन इच्छूक शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीने राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजुर केल्यानंतर संबंधित शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी लाभास पात्र राहील. जिल्ह्यासाठी प्राप्त लक्षांकापेक्षा अधिक शेतकरी गटांचे, शेतकरी उत्पादक संघ, कंपनीचे अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पद्धतीने लाभार्थी शेतकरी गटांची निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

0000

बांबू रोपाची लागवड करून बांबु मिशन अभियानची सुरूवात

 



बांबू रोपाची लागवड करून बांबु मिशन अभियानची सुरूवात

 

            अमरावती, दि. 02 (जिमाका): महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जिल्ह्यात बांबू मिशन अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते बांबू लागवड करून बांबू मिशनचा शुभारंभ करण्यात आला.

 

             महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्ह्यासाठी बांबू लागवडीचे 8 हजार हे.चे उद्दिष्ट असून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती कृषी विभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, सामाजिक वनिकरण विभागाकडे जबाबदारी देण्यात आली आहे. शासन निर्णय दि. 27 जून 2024 अन्वये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतंर्गत 1 हेक्टर क्षेत्रावर 3x3 मीटर अंतरावर वैयक्तिक बांबू लागवड व सार्वजनिक बांबू लागवडकरिता 4 वर्षाचे संगोपनासाठी 7 लक्ष 4 हजार 646 रुपये व 3x3 मीटर अंतरावर वैयक्तिक शेत बांधावर बांबू लागवडकरिता 4 वर्षाच्या संगोपनासाठी 84 हजार 274 रुपये अंदाजपत्रकास मान्यता प्रदान केली आहे.

 

            बांबू लागवडीचे अनुषंगाने तालुकास्तरीय यंत्रणानी बांबू रोपान व संगोपनासाठी बांबू‍ मिशन अभियान जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. बांबू लागवडीबाबत शेतकऱ्यामध्ये असलेले संभ्रम दुर करून बांबू लागवडीमुळे कसा फायदा होवून शकतो, याबाबत तालुकास्तरावर प्रचार व प्रसार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले. 

0000

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास दि.15 जुलैपर्यंत मुदतवाढ

 

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास दि.15 जुलैपर्यंत मुदतवाढ

              अमरावती दि. 02 (जिमाका):  सामाजिक न्याय विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीद्वारे  विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास सोमवार दि. 15 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे.

 

            सामाजिक न्याय विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, प्रवर्गांसाठी  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,  शिक्षण फी  परीक्षा फी योजना, राजर्षि छत्रपती शाहू महाराज  गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम संलग्न्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजना अशा विविध योजना राबविण्यात येतात.

 

           माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत सन 2023-24 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गातील नवीन अर्ज भरण्यासाठी  तसेच सन 2022-23 साठी रि-अप्लाय करण्यासाठी  दि. 15 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  ऑनलाईन नुतनीकरणाचे  अर्ज  विहित मुदतीत  भरण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in  महाडीबीटीच्या या संकेतस्थळावर ऑनलाईन नुतनीकरणाचे अर्ज तसेच विद्यार्थ्यांच्या  लॉगिनमधील त्रुटी पुर्ततेसाठी सेंड बँक केलेल्या अर्जाची संबंधित महाविद्यालयानी त्वरीत त्रुटिपूर्तता  करुन जिल्हा लॉगीन वर पाठविण्यात यावे. विहित वेळेत अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील.

 

           महाडीबीटी संकेतस्थळावर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयांना नुतनीकरणाचे अर्ज भरुन रि-अप्लाय करण्यासाठी आणि सेंड बॅक केलेल्या अर्जाची त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाव्दारे करण्यात आले आहे.

00000

मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम; नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 




मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम;

नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

            अमरावती, दि. 2 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुररिक्षणाचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्याअनुषंगाने वयाची 18 वर्षे पूर्ण होणारे किंवा अद्याप मतदार नोंदणी न झालेल्या नागरिक, युवाना मतदार नोंदणीची संधी प्राप्त होणार आहे. यासाठी मतदार संघानिहाय विशेष शिबिरामार्फत तसेच ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करता येणार आहे. कोणताही पात्र व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यापासून वंचित राहू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

              जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुररिक्षणाचा कार्यक्रमविषयी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी‍ शिंदे, नायब तहसिलदार प्रविण देशमुख, तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.

 

            नविन मतदारांनी त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी फॉर्म क्रमांक 6 भरुन अर्जासोबत आधार कार्ड, किंवा शाळेची टि.सी., जन्म तारखेबाबत पुरावा व रहिवाशी पुरावा सोबत जोडून संबंधित बीएलओ आणि संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करता येईल. तसेच  नागरिकांनी मतदार नोंदणी अर्ज ऑनलाईन स्वरूपात www.nvsp.in किंवा व्हिएचए मोबाईल ॲप्लीकेशन किंवा www.ceo.maharashtra.gov.in  नोंदणी करता येईल. नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले किंवा स्थलांतरीत झालेल्या नागरिक यांची नाव नोंदणी केली जाणार आहे. दि. 25 जून 2024 पासून ते दि. 24 जुलै 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत बीएलओ घरी येणार असून याआधी अनावधनाने मतदारयादीतून नावाची वगळणी झाली असल्यास बीएलओ यांच्याकडे किंवा ऑनलाईन स्वरूपात नमुना 6 भरून मतदार नोंदणी करता येणार आहे.

 

            या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार दि. 24 जुलै 2024 पर्यंत पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदारयादी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट, अंधुक  छायाचित्र बदलून त्याऐवजी मतदाराकडून योग्य छायाचित्र प्राप्त करून मतदारयादीत सुधारणा करणे, तसेच विभाग, भाग यांची नव्याने रचना, मतदानकेंद्राच्या सीमांची पुनर्रचना, मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे, नमुना 1 ते 8 तयार करणे, दि. 1 जुलै 2024 अर्हता दिनांकावर आधारित एकत्रित प्रारूप यादी तयार करण्यात येणार आहे.

 

          पुनरिक्षण कार्यक्रमात गुरुवार, दि. 25 जुलै 2024 रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करणे, गुरूवार, दि. 25 जुलै 2024 ते शुक्रवार, दि. 9 ऑगस्ट 2024 दरम्यान दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी राहणार आहे. दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेले शनिवार व रविवार रोजी विशेष मोहिमांचा कालावधी राहणार आहे. सोमवार, दि. 19 ऑगस्ट 2024 पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येणार आहे. मंगळवार, दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी मतदारयादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

 

           दि. 27 ऑक्टोबर 2023 च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरूष मतदार संख्या 12 लक्ष 33 हजार 378 आहे. स्त्री मतदारांची संख्या 11 लक्ष 59 हजार 157 तर तृतीयपंथी 82, असे एकूण मतदार संख्या 23 लक्ष 92 हजार 617 आहे. तर दि. 23 जानेवारी 2024 रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरूष मतदार संख्या 12 लक्ष 34 हजार 525 आहे. स्त्री मतदारांची संख्या 11 लक्ष 64 हजार 672 तर तृतीयपंथी 86, असे एकूण मतदार संख्या 23 लक्ष 99 हजार 283 आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 672 मतदान केंद्रे आहेत.

 

           नागरीकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र टोल फ्री क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे मतदार यादीत नाव तपासावे व नाव नसल्यास तात्काळ त्या ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीमध्ये नागरिकांनी मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालय, बीएलओ यांच्या सोबत संपर्क साधून आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट असल्याची मतदारांनी खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

                                                            000000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...