मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम;
नागरिकांना
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी
-जिल्हाधिकारी
सौरभ कटियार
अमरावती, दि. 2 (जिमाका): भारत निवडणूक
आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर
आधारीत मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुररिक्षणाचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्याअनुषंगाने
वयाची 18 वर्षे पूर्ण होणारे किंवा अद्याप मतदार नोंदणी न झालेल्या नागरिक, युवाना
मतदार नोंदणीची संधी प्राप्त होणार आहे. यासाठी मतदार संघानिहाय विशेष शिबिरामार्फत
तसेच ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करता येणार आहे. कोणताही पात्र व्यक्ती मतदार यादीमध्ये
नाव समाविष्ट करण्यापासून वंचित राहू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी
आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत मतदार यादीच्या
विशेष संक्षिप्त पुररिक्षणाचा कार्यक्रमविषयी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी
शिवाजी शिंदे, नायब तहसिलदार प्रविण देशमुख, तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
नविन मतदारांनी त्यांची नावे मतदार यादीमध्ये
समाविष्ट करण्यासाठी फॉर्म क्रमांक 6 भरुन अर्जासोबत आधार कार्ड, किंवा शाळेची टि.सी.,
जन्म तारखेबाबत पुरावा व रहिवाशी पुरावा सोबत जोडून संबंधित बीएलओ आणि संबंधित तहसील
कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करता येईल. तसेच
नागरिकांनी मतदार नोंदणी अर्ज ऑनलाईन स्वरूपात www.nvsp.in किंवा व्हिएचए मोबाईल
ॲप्लीकेशन किंवा www.ceo.maharashtra.gov.in
नोंदणी करता येईल. नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, गावात कायमस्वरूपी नव्याने
वास्तव्यास आलेले किंवा स्थलांतरीत झालेल्या नागरिक यांची नाव नोंदणी केली जाणार आहे.
दि. 25 जून 2024 पासून ते दि. 24 जुलै 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी
यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत
बीएलओ घरी येणार असून याआधी अनावधनाने मतदारयादीतून नावाची वगळणी झाली असल्यास बीएलओ
यांच्याकडे किंवा ऑनलाईन स्वरूपात नमुना 6 भरून मतदार नोंदणी करता येणार आहे.
या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार
दि. 24 जुलै 2024 पर्यंत पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे
प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदारयादी,
मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार
यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट, अंधुक छायाचित्र
बदलून त्याऐवजी मतदाराकडून योग्य छायाचित्र प्राप्त करून मतदारयादीत सुधारणा करणे,
तसेच विभाग, भाग यांची नव्याने रचना, मतदानकेंद्राच्या सीमांची पुनर्रचना, मतदान केंद्राच्या
यादीस मान्यता घेणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे, नमुना 1 ते 8 तयार करणे, दि. 1 जुलै
2024 अर्हता दिनांकावर आधारित एकत्रित प्रारूप यादी तयार करण्यात येणार आहे.
पुनरिक्षण कार्यक्रमात गुरुवार, दि. 25
जुलै 2024 रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करणे, गुरूवार, दि. 25 जुलै
2024 ते शुक्रवार, दि. 9 ऑगस्ट 2024 दरम्यान दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी राहणार
आहे. दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेले
शनिवार व रविवार रोजी विशेष मोहिमांचा कालावधी राहणार आहे. सोमवार, दि. 19 ऑगस्ट
2024 पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे,
डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येणार आहे. मंगळवार, दि.
20 ऑगस्ट 2024 रोजी मतदारयादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
दि. 27 ऑक्टोबर 2023 च्या अंतिम मतदार
यादीमध्ये पुरूष मतदार संख्या 12 लक्ष 33 हजार 378 आहे. स्त्री मतदारांची संख्या
11 लक्ष 59 हजार 157 तर तृतीयपंथी 82, असे एकूण मतदार संख्या 23 लक्ष 92 हजार 617 आहे.
तर दि. 23 जानेवारी 2024 रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरूष मतदार
संख्या 12 लक्ष 34 हजार 525 आहे. स्त्री मतदारांची संख्या 11 लक्ष 64 हजार 672 तर तृतीयपंथी
86, असे एकूण मतदार संख्या 23 लक्ष 99 हजार 283 आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 2
हजार 672 मतदान केंद्रे आहेत.
नागरीकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणाऱ्या
अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र टोल फ्री क्रमांक
1950 कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे मतदार यादीत नाव तपासावे
व नाव नसल्यास तात्काळ त्या ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. उपरोक्त
कालावधीमध्ये नागरिकांनी मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालय, बीएलओ यांच्या
सोबत संपर्क साधून आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट
असल्याची मतदारांनी खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी
सौरभ कटियार यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment