Monday, July 8, 2024

खरीप पीक स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

 

खरीप पीक स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

           अमरावती, दि. 08 (जिमाक) :  पिकांच्या उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सहभागासाठी मूग व उडीद पीक उत्पादक शेतकऱ्यांनी दि. 31 जुलैपूर्वी तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल उत्पादकांनी 31 ऑगस्टपूर्वी कृषी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

          राज्यामध्ये पीकांची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी उत्पादन वाढविणे, प्रयोगशील शेतक-यांचे मनोबल उंचावणे, त्यापासून इतरांना प्रेरणा मिळणे, अद्ययावत तंत्रज्ञान सर्वदूर पोहोचविणे असा स्पर्धेचा उद्देश असल्याचे श्री. सातपुते यांनी सांगितले.

 

स्पर्धेत बक्षीसे अशी आहेत

         सर्वसाधारण व आदिवासी गट दोहोंसाठी तालुका पातळीवर अनुक्रमे पाच, तीन व दोन हजार रूपये अशी पहिली तीन बक्षीसे आहेत. जिल्हास्तरावर पहिले बक्षीस 10 हजार असून, दुसरे 7 हजार व तिसरे 5 हजार रूपये आहे. राज्यस्तरावर पहिली तीन बक्षीसे अनुक्रमे 50 हजार, 40 हजार व 30 हजार रूपये अशी आहेत.

 

एकापेक्षा जास्त पिकांसाठी सहभाग घेऊ शकता

           स्पर्धेतील सहभागासाठी संबंधित पिकाची शेतात किमान 40 आर क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी सहभाग घेता येईल. सर्व गटासाठी पीकनिहाय 300 रूपये प्रवेश शुल्क आहे. इच्छुकांनी विहित अर्जासह प्रवेश शुल्काची पावती, सातबारा, आठ अ उतारा, तसेच आदिवासी बांधवांसाठी जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

            स्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत आहे. त्यासाठी पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी स्पर्धा जाहीर करतील. प्रत्येक तालुक्यात किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 असणे आवश्यक आहे. मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीसाठी कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन श्री. सातपुते यांनी केले.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...