लाडक्या बहिणींची आता ओवाळणी करून नोंदणी !
जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी वेगळा उपक्रम
- संजीता मोहोपात्रा
अमरावती, दि. 12 (जिमाका) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्ह्यामध्ये चांगला जोर धरत असून या योजनेला महिला वर्गातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत जवळपास 60 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. यात सातत्याने वाढ सुरुच आहे. प्रामुख्याने अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, समूह साधन व्यक्ती, पर्यवेक्षिका, ग्रामपंचायतचा डेटाएन्ट्री ऑपरेटर, ग्रामसेवक यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणावर काम सुरू असून या योजनेला आणखी उत्तम प्रतिसाद मिळावा म्हणून महिला बाल विकास विभागामार्फत नाव नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या काही महिलांची आता प्रातिनिधीक स्वरूपात ओवाळणी करून नोंदणी करण्यात यावी, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहोपात्रा यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रचार प्रसिद्धी विविध माध्यमातून करण्यात येत आहे. यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. लाभार्थ्यांना अर्ज करताना जास्तीत-जास्त सुकर व्हावे म्हणून शासकीय अधिकारी आणि कर्मचारी लाभार्थ्यांना मदत करीत आहेत. यासाठी लवकरच गावागावात या योजनेचे प्रसिद्धी फलक लावण्यात येणार असल्याचे नियोजन महिला व बालविकास विभागामार्फत करण्यात आलेले आहे.
योजनेसाठी अत्यावश्यक प्रमाणपत्र :
आधार कार्ड, रहिवासी दाखल्यामध्ये रेशन कार्ड किंवा मतदार कार्ड किंवा जन्म दाखला यापैकी एक, बँक पासबुकची झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे अथवा केशरी रंगाचे रेशन कार्ड आणि स्वतःचा फोटो या केवळ पाच प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे.
लाभार्थ्यांनी कोणतेही प्रकारची केंद्रावर गर्दी न करता आवश्यक प्रमाणपत्र घेऊन संबंधित यंत्रणेकडे गेल्यास अर्ज नोंदविण्यात येईल. त्यामुळे कोणीही केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ अंतर्गत तालुकानिहाय प्राप्त अर्जांची संख्या (दि. 11 जुलै सांयकाळ पर्यंत)
अमरावती तालुक्यात 5 हजार 196, भातकुली 6 हजार 260, तिवसा 2 हजार 589, अचलपूर 4 हजार 99, अंजनगाव सुर्जी 2 हजार 382, दर्यापूर 2 हजार 394, चांदूर बाजार 4 हजार 44, चांदुर रेल्वे 2 हजार 570, धामणगाव रेल्वे 2 हजार 963, नांदगाव खंडेश्वर 3 हजार 329, वरूड 2 हजार 425, मोर्शी 2 हजार 746, चिखलदरा 3 हजार 444, धारणी 7 हजार 172 व नागरी भाग 6 हजार 875 असे एकूण 58 हजार 488 अर्ज प्राप्त झाले आहेत.
0000
No comments:
Post a Comment