‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभासाठी
जास्तीत-जास्त
महिलांनी नोंदणी करावी
- जिल्हाधिकारी
सौरभ कटियार
अमरावती,
दि. 12 (जिमाका) : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभासाठी आतापर्यंत अमरावती
जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागातून 58 हजार 488
अर्ज प्राप्त झाले आहेत. यात सातत्याने वाढ सुरुच आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी
जास्तीत-जास्त महिलांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले
आहे.
राज्याच्या
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’साठी सुरु
असलेल्या नोंदणीचा आज दुरदृश्यसंवादप्रणालीद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी,
जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त यांच्याकडून आढावा
घेतला. श्री. कटियार यावेळी बैठकीस दुरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. या योजनेच्या
नोंदणीसाठी येत्या काही दिवसात वेबपोर्टल सुरु करुन ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्यात
येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या योजनेच्या लाभासाठी नोंदणी करण्यात येणाऱ्या
सर्व मदतकेंद्रावर योजनेच्या अधिकृत माहितीचे फलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्या.
मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता अंगणवाडी सेविकांबरोबरच ग्रामस्तरावरील
अन्य कर्मचाऱ्यांचीही नियुक्त करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नवीन
बदलांसह आज या योजनेसंदर्भातील सुधारित शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
महिलांनी जास्तीत जास्त नोंदणी
करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
जिल्ह्यातील
ग्रामीण व शहरी भागांमधील महिलांनी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभासाठी
जास्तीत-जास्त संख्येने नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले
आहे. 21 ते 65 वयोगटातील व अडीच लाखांपर्यंत कुटुंबाचे उत्पन्न असणाऱ्या महिलांना या
योजनेसाठी नोंदणी करता येते. ज्या महिलांकडे 15
वर्ष पूर्वीचे केशरी व पिवळे रेशनकार्ड आहे, त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची
गरज नाही. नोंदणीच्यावेळी आधारकार्डवरील नाव, पत्ता, आधारक्रमांक तसेच बॅंक खाते आदी
माहिती अचूकपणे नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
संपूर्ण
जिल्हात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ चे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून लाभार्थ्यांना
सोयीस्कर होईल, अशा पद्धतीने योजनेचे अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. यासाठी अधिकारी आणि
कर्मचारी यांची चमू सज्ज असून कोणाला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तालुकास्तरावर
बालविकास प्रकल्प अधिकारी किंवा जिल्हास्तरावर महिला व बाल विकास भवन गर्ल्स हायस्कूल
चौक अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन सौरभ कटियार, जिल्हाधिकारी अमरावती.
आढावा
बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहोपात्रा, मनपा आयुक्त
सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, महिला व बाल विकास विभागाचे उप मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके तसेच सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment