शेती पिके व फळबागांच्या उत्पादनासाठी मधमाशापालन
खादी व ग्रामोद्योग विभागातर्फे 50 टक्के अनुदान
अमरावती दि.16 (जिमाका): परागीभवनाव्दारे शेती पिके व फळबागांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी मधमाशापालन अत्यंत उपयुक्त शेतीपुरक व्यवसाय असून यासाठी खादी व ग्रामोद्योग विभागातर्फे 50 टक्के अनुदान उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. या योजनेतंर्गत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान 50 टक्के स्वगुंतवणूक शासनाच्या हमी भावाने मधखरेदी, तसेच विशेष प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक मधपाळ हा साक्षर असावा, स्वतःची शेती असल्यास प्राधान्य वय 18 वर्षापेक्षा जास्त आवश्यक आहे.
तसेच केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ याची पात्रता किमान 10 वी पास वय 21 वर्षापेक्षा जास्त अशा व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेती जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असावी व लाभार्थ्याकडे मधमाशापालन प्रजनन मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असणे आवश्यक आहे. केंद्रचालक संस्था नोंदणीकृत असावी संस्थेच्या नांवे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1000 चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
मध उद्योगाचे प्रशिक्षणाकरीता अर्ज महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व्दारा जिल्हा उद्योग केंद्र कॅम्प या पत्यावर अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अमरावती यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment