Monday, July 15, 2024

मागासवर्गीय व्यक्तींसाठी कर्ज योजना; लाभ घेण्याचे महामंडळाचे आवाहन

 

मागासवर्गीय व्यक्तींसाठी कर्ज योजना; लाभ घेण्याचे महामंडळाचे आवाहन

          अमरावती, दि. 15 (जिमाका) : मागासवर्गीय व्यक्तींसाठी सुरु केलेली 20 टक्के बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना तसेच शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

         वैयक्तिक  व्याज परतावा योजना : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या ‘वैयक्तिक  व्याज परतावा योजनेंतर्गत जास्तीत जास्त 10 लक्ष रुपयांपर्यंत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध होऊ शकेल तसेच या कर्जाची नियमित कर्जफेड केल्यास व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या खात्यात दरमहा जमा करण्यात येईल. या योजनेच्या परतफेडीचा कालावधी बँकेच्या नियमावलीनुसार राहील. महामंडळाच्या पोर्टलवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

         थेट कर्ज योजना :  थेट कर्ज योजनेची मर्यादा 1 लक्ष रुपये असून व्याज दर द.सा.द.शे 4 टक्के आहे. तसेच कर्ज परतफेडीचा कालावधी 4 वर्षांचा आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज आकारण्यात येणार नाही. ज्यांचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 अंक आहे, अशांना या कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.

         20 टक्के बीज भांडवल योजना: 20 टक्के बीज भांडवल योजनेंतर्गत 5 लक्ष रुपये मंजूर असून या रकमेपैकी 20 टक्के रक्कम महामंडळ, 75 टक्के बँक तसेच लाभार्थींचा सहभाग 5 टक्के राहील. महामंडळाचा व्याज दर द.सा.द.शे. 6 टक्के असून बँकेचा व्याज दर बँकेच्या प्रचलित दरानुसार राहील. परतफेडीचा कालावधी 5 वर्षांचा आहे.

 

         शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना : शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत उच्च शिक्षणासाठी राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम प्रवेशासाठी बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करण्यासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी 10 लक्ष रुपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष रुपये एवढे कर्ज देण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्याचे वय 17 ते 30 वर्षे दरम्यानचे असावे. तसेच तो इ.मा.व. प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागासाठी 8 लक्ष रुपयांपर्यंत व शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमिलेअरच्या मर्यादेत असावी.

         महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना :  इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरीब व होतकरू महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्यातील बचतगटातील उत्पादित केलेल्या वस्तुंचे उत्पादन प्रक्रीया व मुल्य आधारित उद्योगाकरीता बँकेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या. 5 ते 10 लक्ष रुपयेपर्यंतच्या कर्ज रक्क्मेवरील 12 टक्के व्याज परतावा उपलब्ध करून देण्यात येते. सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत लोकसंचालित साधन केंद्र, सी.एम.आर.सी. च्या सहाय्याने राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यारी महिला इतर मागास प्रर्वगातील व महाराष्ट्राची रहीवाशी असावी, त्यांचे वय 18 ते 60 वर्ष असावे. बचत गटाची नोंदणी महिला विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन सी. एम. आर. सी. केंद्रात केलेली असावी.

                   या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नागपूर यांचे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयामागे, अमरावती दुरध्वनी क्रमांक- 0721- 2550339 तसेच संकेतस्थळ www.msobcfdc.in येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सुशांत बेझलवार यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...