Tuesday, July 2, 2024

गोदाम बांधकाम व बीज प्रक्रीया संच अनुदानासाठी शेतकरी उत्पादक संघाकडून 31 जुलैपर्यंत अर्ज मागविले

 

गोदाम बांधकाम व बीज प्रक्रीया संच अनुदानासाठी शेतकरी उत्पादक संघाकडून 31 जुलैपर्यंत अर्ज मागविले

 

        अमरावती, दि. 02 (जिमाका): कृषि विभागामार्फत अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानातंर्गत  गोदाम बांधकाम व बीज प्रक्रीया संचाकरिता शासनामार्फत अनुदान दिल्या जाते. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी बंधुंनी दि. 31 जुलै 2024 पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

 

            जिल्ह्यासाठी अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान गळीतधान्य सन 2024-25 साठी शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी(एफपीओ/एफपीसी) करीता गोदाम बांधकामासाठी एकूण सहा लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लक्षांकाच्या अधिन राहुन शेतकरी उत्पादक संघाकडून विहीत नमुन्यातील प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. अन्नधान्य पिकाच्या उत्पादनाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी व मुल्य वृद्धीसाठी गोदाम सुविधा आवश्यक आहे. ज्या ठिकाणी अन्नधान्य पिके व तेलबिया पिके घेतली जातात. तथापि गोदामाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी गोदाम बांधकामासाठी अनुदान देण्यात येतो. या योजेनेअंतर्गत कमाल 205 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लक्ष 50 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय आहे. तसेच अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान कडधान्य योजनेअंतर्गत उत्पादित बियाण्यावर प्रक्रीया करुन दर्जेदार बियाणे उपलब्ध करण्याच्या उद्देशाने शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीसाठी बीज प्रक्रीया संचासाठी अनुदान दिल्या जाते. बीज प्रक्रीया प्रकल्प उभारण्यासाठी (यंत्रसामुग्री व बांधकामासाठी) प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 लक्ष रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय आहे.

 

           गोदाम बांधकाम व बीज प्रक्रीया संच हा दोन्ही बाबी बँक कर्जाशी निगडीत असुन इच्छूक शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीने राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजुर केल्यानंतर संबंधित शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी लाभास पात्र राहील. जिल्ह्यासाठी प्राप्त लक्षांकापेक्षा अधिक शेतकरी गटांचे, शेतकरी उत्पादक संघ, कंपनीचे अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पद्धतीने लाभार्थी शेतकरी गटांची निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...