Friday, July 12, 2024

लाडक्या बहिणीच्या मदतीसाठी आता 24X7 मदत कक्ष! हेल्पलाइन क्रमांक 8432520301करा सेव्ह बहिणीच्या समस्या आता एका क्लिकवर - संजीता मोहपात्रा

 


लाडक्या बहिणीच्या मदतीसाठी आता 24X7 मदत कक्ष!

हेल्पलाइन क्रमांक 8432520301करा सेव्ह

 

बहिणीच्या समस्या आता एका क्लिकवर

 

- संजीता मोहपात्रा

             अमरावती, दि. 12 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरू केली असून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये आणि त्यांच्या मनात ज्या शंका आहेत, त्यांचे त्वरित समाधान करण्यासाठी आता महिला बाल विकास भवन, गर्ल्स हायस्कूल चौक, अमरावती येथे 24 तास महिलांच्या सुविधेसाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचा हेल्पलाइन क्रमांक 8432520301 असा आहे. या क्रमांकावर लाभार्थी महिला कधीही संपर्क करू शकतात, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  संजीता मोहपात्रा यांनी सांगितले.

  गेल्या पंधरा दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या  योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला  मिळण्यासाठी वेळोवेळी शासनस्तरावरून निर्णय घेण्यात येत आहे. आता ही प्रक्रिया  अतिशय सोपी करण्यात आलेली आहे. आज पर्यंत अमरावती जिल्ह्यातील जवळपास 60 हजार महिलांनी या योजनेमध्ये नोंदणी केली आहे. तरीही काही महिलांना कोणती प्रमाणपत्र लागतात याविषयी शंका आहेत. तर काही ठिकाणी महिला आजही गर्दी करीत आहेत.  हे टाळण्यासाठी आणि महिलांना योग्य ते मार्गदर्शन मिळवण्यासाठी महिला बालविकास भवन येथे महिला मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ज्यांना या योजनेविषयी कोणत्याही शंका असतील त्यांनी तात्काळ 8432 52 0301 या क्रमांकावर संपर्क केल्यास आपल्याला सविस्तर मार्गदर्शन उपलब्ध होईल. यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके  यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ कर्मचाऱ्यांचा कक्ष उपलब्ध करून देण्यात आला असून गरजू महिलांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. कैलास घोडके  यांनी केले आहे.

             "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये , त्याचबरोबर त्यांच्या मनात असलेल्या शंका तात्काळ दूर व्हाव्यात  , यासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला असून हा कक्ष 24 तास सुरू राहील. अशा प्रकारचा कक्ष सुरू करणारा अमरावती हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे."

 

        - मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...